Total Pageviews

Wednesday, December 29, 2010

दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद

पुणे महापालिकेने बहुमताने ठराव मंजुर केल्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची बदनामी करणारे जेम्स लेनचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्याच्या निषेधासाठी यापैकी कुणीही रस्त्यावर उतरले नव्हते. उलट त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी उभे राहून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोल सांगत होते. त्याच सुमारास पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या बहुलकरांची माफी मागायला राज ठाकरे पुण्याला गेले होते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेपेक्षा वेगळी नाही, हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा या सगळ्यांच्या रोजी-रोटीचा विषय आहे. केवळ छत्रपतींचे नाव घेत त्यांनी समाजामध्ये विद्वेषाची बीजे पेरली आणि त्या बळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यहननाचा विषय आला तेव्हा गप्प राहिले आणि दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी रस्त्यावर उतरले.
जेम्स लेनच्या पुस्तकापासून सुरू झालेला हा विषय मराठा संघटनांनी विशेषत: संभाजी ब्रिगेडने लावून धरला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असा त्यांचा दावा होता. राज्य सरकारतर्फे क्रीडा प्रशिक्षकासाठी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत होता, तो बंद करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्याअनुषंगाने सरकारने इतिहास संशोधकांची एक समितीन नेमली होती, आणि त्या समितीनेही दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा ठोस पुरावा सापडत नसल्याचा निर्वाळा दिला होता, तेव्हापासून दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कारही बंद करण्यात आला. म्हणजे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ही भूमिका महाराष्ट्र सरकारनेही अधिकृतपणे मान्य केली आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेने केलेल्या पुतळा हटवण्याच्या ठरावावर आक्षेप घेता येत नाही. महापालिकेने तो बहुमताने केलेला ठराव आहे आणि पुतळा हटवण्याची प्रक्रिया त्याच ठरावाच्या अनुषंगाने पार पडली आहे. पुतळा मध्यरात्री हलवायचा की दिवसा उजेडी बँडबाजा लावून हा प्रश्न सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा होता. गेली अकरा वर्षे राज्याच्या सत्तेबाहेर असल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या शिवसेनेकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांना आयती संधी चालून आली असून दादोजी कोंडदेव आणि नथुराम गोडसे यांची बाजू घेऊन आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू ठेवला आहे.
मुळात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते किंवा नव्हते, हा शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाच्या नेत्यांनी ठरवण्याचा विषय नाही. यासंदर्भात इतिहास संशोधक आणि त्यातही विशेषत: अलीकडचे संशोधन काय सांगते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून अनेकांनी दादोजी हे गुरू नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु तत्कालीन इतिहास संशोधकांनी केलेली मांडणीच अधिक प्रचलित राहिली आणि त्याच आधारावर दादोजींना गुरू मानण्यात आले. पुन्हा ही मांडणी करताना टप्प्याटप्प्याने दादोजींचे उदात्तीकरणही करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीतील एक प्रमुख इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे यासंदर्भातील म्हणणे असे आहे की, दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी मांडणी केली जाते, ती उत्तरकालीन साधनांच्या आधारे. म्हणजे छत्रपतींच्यानंतर अडीचशे वर्षानी लिहिलेल्या बखरींच्या आधारे ही मांडणी केली जाते. मात्र ती साधने विश्वासार्ह मानता येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणानंतर उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही अधिक खोलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ आढळला. या शिवकालीन ग्रंथात कुठेही दादोजींचा शिक्षक म्हणून उल्लेख येत नाही. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचे मुतालिक एवढाच त्यांचा उल्लेख आहे. आणि इतका अस्सल पुरावा दुसरा कुठलाही आढळत नाही.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुमारे वर्षापूर्वी लिहिलेल्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे लिहिले आहे. त्याचा दाखला काही दादोजी समर्थक देतात. त्यासंदर्भात डॉ. पवार यांचे म्हणणे असे आहे की, ते माझे लेखन हे संशोधन नसून पाठय़पुस्तकासाठी केलेले लेखन आहे. त्यावेळी उपलब्ध साधनांच्या आधारे तो उल्लेख केला आहे. परंतु मी संशोधकाच्या दृष्टिकोनातून या विषयाचा शोध घेतल्यावर दादोजींचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आले. संशोधनाच्या क्षेत्रात सतत शोध सुरू असतात आणि जुनी मांडणी पुसून टाकणारे नवे संशोधन येत असते. त्यामुळे जे अद्ययावत असते तेच अधिक प्रमाण मानायचे असते. दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याची अलीकडे केलेली मांडणी खोडून काढणारी कोणतीही साधने अद्याप कुणी उजेडात आणलेली नाहीत. त्यामुळे तेच आजचे वास्तव आहे. महाराष्ट्र सरकारनेही ती वस्तुस्थिती मान्य केली आहे.
शिवरायांच्या शिक्षणासंदर्भात डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, शहाजींनी जिजाबाई आणि शिवाजीची पाठवणी पुणे जहागिरीवर केली, तेव्हा विद्वान पंडित, निष्णात अध्यापकांचा एक संच त्यांच्याबरोबर दिला. त्यांनी त्यांना नाना विद्या, नाना शास्त्रे शिकवली. रणनीती, राजनीती, अश्वनीती, अश्वपरीक्षा, विषपरीक्षा, जादू यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. स्वत: शहाजी महाराज हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. ते आपल्या पंडिताला संस्कृतमधून समस्या घालीत असत. असा विद्वान मनुष्य आपल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी एका मुतालिकावर कसा काय सोपवू शकेल?
डॉ. पवार यांनी शिवकालीन साधनांच्या आधारे केलेली मांडणी खोडून काढणारे संशोधन त्यानंतर कुणी केलेले नाही. आज दादोजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या लोकांच्या बाजूला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे अशी इतिहासाच्या क्षेत्रात काम करणारी जाणकार मंडळी आहेत. दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातील नवी मांडणी पुढे आल्यानंतर त्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. शिवसेना-मनसेसारख्या संघटना पाठिशी असताना खरेतर त्यांनी कुणाच्या दहशतीला भीक घालण्याचे कारण नाही. दादोजींसंदर्भातील काही अस्सल ऐतिहासिक पुरावे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. शिवसेना काय किंवा मनसे काय, दोन्हींचे सल्लागार म्हणून बाबासाहेब पुरंदरे मिरवत असतात. जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्यांमध्ये संशयाची सुई त्यांच्यासह पुण्यातील काही इतिहास संशोधकांकडे होती. दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी आताचे आंदोलनही त्यांच्याच सल्ल्यावरून होत असल्याचे कुणी मानले तर त्याला चूक म्हणता येणार नाही.
प्रश्न एका दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा नाही. खोटा इतिहास मांडायचा आणि तोच खरा असल्याचे सांगून भावनिक मुद्दय़ावर आंदोलने करायची, हे शिवसेना स्थापनेपासून करत आली आहे. आताही दादोजी कोंडदेवांसंदर्भातील वस्तुस्थिती समजून न घेता राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद खरोखर वेगळे आहेत काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाल्यावाचून राहात नाही.

Tuesday, December 28, 2010

पृथ्वीराजांचा आसूड !

साहित्य समेलनाच्या अखेरच्या दिवशी समारोप समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आसूड कडाडला आणि अवघे मराठी सारस्वत थरारून गेले. यापुढे भाषा आणि साहित्य व्यवहारात सरकारशी जपून व्यवहार करावा, लागेल याचीच जाणीव साहित्य व्यवहारातील कारभाऱ्यांना झाली. नथुराम गोडसेच्या नावाचा वाद उद्भवल्यानंतर मुख्यमंत्री साहित्य संमलनाच्या समारोपाला येणार किंवा नाही याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. ठाण्यातील काँग्रेसच्या एका गटाने तर त्यांना निवेदन देऊन संमेलनाला येऊ नये, अशी विनंती केली होती. असे असूनही मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेल्या निमंत्रणाचा मान राखून संमेलनाला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा लाभ घेऊन महामंडळाने भिक्षेकरी वृत्तीचे दर्शन घडवत स्वत:च्या पदाधिकाऱ्यांसाठी सरकारी मंडळांवर प्रतिनिधित्वाची आणि घटकसंस्थांच्या अनुदानवाढीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची दखलही घेतली नाही, आश्वासन तर दूरच राहिले. नथुराम गोडसेच्या वादाचा थेट नामोल्लेख टाळून त्यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि महामंडळाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी केला, तर त्याचा तीव्र निषेधच होईल आणि संमेलनाच्या व्यासपीठावर यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे सुनावले. संमेलनाच्या समारोप समारंभात पृथ्वीराज चव्हाण यांचा हा आसूड कडाडला, तेव्हा सारा सभामंडप स्तब्ध झाला. एरव्ही राजकीय नेते अशा संमेलनाला उपस्थित राहतात तेव्हा तुझ्या गळा माझ्या गळा असा गुडीगुडी व्यवहार पाहायला मिळतो. साहित्यिकांनी सरकारला मार्गदर्शन करावे, वगैरे भंपक विधाने केली जातात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाण्यातच हित असल्याचे प्रतिपादन करून फुल्यांच्या सत्यधर्माचे आचरण हाच खरा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. टेक्नोक्रॅट पृथ्वीराज चव्हाण मराठी भाषेच्या अनुषंगाने काही तांत्रिक ऊहापोह करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी थेट वैचारिक दिशाच स्पष्ट केल्यामुळे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. प्रारंभापासून मराठीत व्यवहार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्याकडे येणाऱ्या तालिकेवरील अभिप्रायही मराठीत असावेत, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगून सरकारचे सर्व व्यवहार मराठीत होतील, याची ग्वाही दिली. त्याचबरोबर केवळ शासन निर्णय काढून आणि दुकानांच्या पाटय़ा मराठीत करून मराठीला उर्जितावस्था येणार नाही, तर मराठी ही जीवनशैली आणि श्वास बनला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले. सुमारे तीसेक वर्षापूर्वी पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्य व्यवहारावरील मक्तेदारीचे दावा केला होता, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ‘साहित्य ही कुठल्या वर्गाची नक्तेदारी नाही’ अशा भाषेत समज दिली होती. आणि आज पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतरावांचे स्मरण करीतच साहित्य महामंडळाला समज देऊन पुन्हा एकदा कृष्णेचे पाणी दाखवले !

Thursday, December 23, 2010

नकुसा नव्हे लाडकी…

लातूर जिल्ह्यातील चाटा गावातील प्रीतीलता सुरवसेला परवा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा सत्कार करण्यात आला, त्यात प्रीतीलताचा समावेश होता. ही प्रीतीलता म्हणजे नकुसा. वडिलांना हवा होता मुलगा आणि झाली मुलगी. तिच्या जन्माची किंमत आईला घटस्फोटाच्या रुपानं चुकती करावी लागली. अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईनं सत्यशीलाच्या पाठिंब्यानं ती चित्रपटसृष्टीत आली असून इथे करिअर करण्याची जिद्द बाळगून आहे.
प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्यावतीनं नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रीतीलताला ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.
भारताची फुलराणी सायना नेहवाल नकोशा मुलींपैकीच एक. तिनंच अलीकडं एका मुलाखतीत हे सांगून टाकलं. पण या नकोशा मुलीनं केवळ कुटुंबालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवलं.
प्रातिनिधिक स्वरुपातली कर्तृत्ववान मुलींची अशी अनेक नावं सांगता येतील.
मुलींचं घटतं प्रमाण ही भारताचीच नव्हे तर सर्वच दक्षिण आशियाई देशांपुढची गंभीर समस्या बनली आहे. पारंपारिक मानसिकता, दार्रिय़ अशी अनेक कारणं त्यामागं आहेत. त्यांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातून छोटे छोटे प्रयोग किंवा उपक्रम आकाराला येत आहेत.
..
मुलगी नको मुलगा हवा, ही मानसिकता जागतिक पातळीवरची आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. खेडय़ापाडय़ांतून पूर्वापार ही मानसिकता जोपासली जातेय. आपण कितीही पुढारलेपणाच्या गप्पा मारत असलो तरी आजही अशी मानसिकता मोठय़ा प्रमाणावर आढळते. काही भटक्या जमातींमधून मुलींच्या जन्माचे उत्सव साजरे केले जातात, मात्र जिथं संपन्नता आणि समृद्धी आढळते तिथं मात्र मुलगी ओझं वाटते. इस्टेटीचा वारस ही त्यांची पहिली डिमांड असते. बडय़ा लोकांपुरती ही मानसिकता आहे असं नाही. मुलीच्या जबाबदारीचं ओझं वाटत असल्यामुळं गरिबीतही अशीच मानसिकता आढळते. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांतून या मानसिकतेचं दर्शन अनेक प्रकारे घडत असतं. मुलीच्या जन्माचा आनंद फार कमी प्रमाणात साजरा केला जातो. किंबहुना मुलगी झालेला बाप चेहरा पाडूनच फिरताना दिसतो. मुलगा हवा असताना झालेल्या मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवण्याचे अनेक मार्ग अवलंबले जातात. प्रीतीलता सुरवसेच्या आईला घटस्फोटाची किंमत मोजावी लागली, तशी तर अनेक महिलांना मोजावी लागते. घटस्फोट दिला जात नाही, तिथं मुलगा न होणाऱ्या महिलेला सातत्यानं मानहानी सहन करावी लागते. हे झालं मुलीच्या आईचं. पण जी मुलगी जन्माला आली, तिलाही हे भोग टळत नाहीत. त्यातला पहिला मार्ग अवलंबला जातो, तो म्हणजे तिचं नामकरण. ‘नाव ठेवणं’ असं त्याला बोली भाषेत म्हणतात. ‘नावं ठेवल्यासारखंच’ हे नाव ठेवलं जातं. त्यातूनच दगडी, धोंडी अशी नावं ठेवली जातात. यातलं शेवटचं टोक असतं, ते म्हणजे ‘नकुसा.’ नकोशी असताना झालेली मुलगी ती नकुसा. हाक मारतानाच तिला तिच्या नकोशा जन्माची जाणीव व्हावी, अशा रितीनं हे नाव ठेवलं जातं आणि मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात सहज धांडोळा घेतला तर अशा अनेक नकुसा आढळतील.
असाच धाांडोळा सातारा जिल्ह्यात घेण्यात आला. साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांकरिया यांनी त्यांना कल्पना सुचवली आणि त्यांनी तिला प्रतिसाद दिला. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लावून गावोगावी एक शोधमोहीम सुरू केली. काय होती ही मोहीम? शून्य ते सोळा वयोगटात ‘नकुसा’ नावाच्या मुलींच्या शोधाची. आरोग्य यंत्रणेनं जिल्ह्यातील घरोघरी जाऊन मुलींची माहिती गोळा केली. तब्बल सहा महिने मोहीम सुरू होती. त्या माध्यमातून मुलींच्या नावाचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात शून्य ते सोळा वयोगटातील दोनशे बावीस नकुसा असल्याचं या मोहिमेत आढळून आलं.
कोरेगाव आणि वाई या दोन तालुक्यांमध्ये नकुसा नावाची एकही मुलगी आढळली नाही. बाकी सगळीकडं या नकुसा होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाटण तालुक्याचे मूळ रहिवाशी. या मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात तब्बल ब्याण्णव नकुसा आढळल्या. त्याखालोखाल मराठी साहित्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणदेशात म्हणजे ‘माण’ तालुक्यात छप्पन्न नकुसा आढळल्या. कराड तालुक्यात सोळा, महाबळेश्वर तालुक्यात बारा, सातारा, फलटण आणि खंडाळा तालुक्यात प्रत्येकी अकरा आणि जावळी तालुक्यात पाच नकुसा आढळून आल्या.
आपला जन्म नकोसा होता, हे नावामुळंच या मुलींच्या लक्षात येतं आणि तशाच दबलेल्या मानसिकतेत त्या जगत राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक विकासावर होतो. हे लक्षात आल्यामुळं केवळ नकुसांचा शोध घेऊन ही मोहीम थांबणार नाही. त्यापुढचा टप्पा आहे, या नकुसांचं नाव बदलण्याचा. या मुलींना भविष्यात ‘नकुसा’ नावानं कुणी हाक मारू नये आणि तिच्या नकोशा जन्माची आठवण पुन्हा काढू नये, यासाठी हे नामकरण करण्यात येणार आहे.
‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा..’, एवढंच नेहमी सांगितलं जातं. आपणही तेवढय़ाच ओळीचा सतत उच्चार करीत असतो. परंतु मुलाच्या कर्तृत्वाचा जयजयकार करणारी ही ओळ अर्धीच आहे. चोखा मेळ्यांनी त्याच्यापुढं जे म्हटलंय ते कधी सांगितलंच जात नाही. ‘कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई, इतुके ना देवे तुझ्याने, माझे होई गा निसंतान..’ यातलं कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. महाराष्ट्रच्या खेडय़ापाडय़ांतून ‘नकुसा’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या अशा अनेक मीरा मुक्ताबाई आहेत. साताऱ्यात राबवलेला ‘नकुसा होणार लाडकी’ हा उपक्रम महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरावा.

Tuesday, December 21, 2010

मोहिते-पाटलांचे पुनर्वसन

महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयसिंह मोहिते-पाटील यांची निवड करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले, परंतु त्यासाठी त्यांना एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. मोहिते-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसने एक वर्षाहून अधिक काळ तिष्ठत ठेवले, हा कृतघ्नपणाच म्हणता येईल. प्रत्येक नेत्याच्या राजकीय जीवनात चढउतार असतात, त्याप्रमाणे मोहिते-पाटलांच्या राजकीय आयुष्यातला हा कठिण काळ होता. नेतृत्वाकडूनच खच्चीकरण होत असताना त्यांच्यापुढे पक्षत्यागाचा पर्याय होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार हवा मधल्या काळात तयार झाली होती, परंतु आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी त्यावर पडदा टाकला होता. तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होतीच. आणखी तिष्ठत ठेवले असते तर नजिकच्या काळात वेगळे काही घडले नसतेच असे नाही.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले, त्याचवेळी राज्याच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शंकरराव मोहिते-पाटील हे आक्रमक स्वभावाचे होते, त्यांचा राजकीय वारसा चालवणारे विजयसिंह मोहिते-पाटील सरंजामी थाटाचे असले तरी तुलनेने मवाळ प्रकृतीचे. राजकारणात आवश्यक तेथे तडजोड करणारे आणि विरोधकांबाबतही सहिष्णू धोरण ठेवणारे नेते. सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील घराण्याच्या राजकारणाबद्दल उलट-सुलट चर्चा करणारेही विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबाबत कधी एकेरीवर येऊन बोलत नाहीत, यावरून त्यांच्या राजकारणाचा पोत लक्षात यावा. राज्याच्या राजकारणातअनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे गट सक्रीय होते, किंबहुना ते आजही आहेत. वसंतदादांच्या पश्चात त्यांच्या गटाच्या बहुतांश नेत्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असले तरीही अधून मधून या गटाला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावीशी वाटते. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे या गटाचे नेतृत्व होते. त्याअर्थाने ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांपैकी ते एक होते.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर काँग्रेसशी निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या काहींनी वेगवेगळ्या कारणांनी पवारांचे नेतृत्व स्वीकारले. सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी विष्णूअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस विचारमंथन करून पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राष्ट्रवादीची रिकामी बस थोडी भरल्यासारखी वाटली, तरीही बरीच रिकामी होती. शरद पवार यांना अपेक्षित असलेले पाठबळ महाराष्ट्रातूनच उभे राहात नसल्याचे चित्र दिसत होते, अशा काळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मोहिते-पाटील आपल्याबरोबर येतील, हे पवारांनाही अपेक्षित नसावे. परंतु ते घडले आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय वाढली. या घटनेकडे पाहताना मोहिते-पाटील यांचे व्यक्तिश: शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील ष्टद्धr(७०)ण काय आहेत याची कल्पना येऊ शकते. मोहिते-पाटलांचा हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता. त्याची अनेक कारणे सांगितली जात होती. दिल्लीत वजन असलेले सुशीलकुमार शिंदे जिल्ह्याच्या राजकारणातले त्यांचे स्पर्धक असले तरी मोहिते-पाटील त्यांना कधीच जुमानत नव्हते. कारण मोहिते-पाटील यांना जनाधार होता आणि सुशीलकुमार पक्षनेतृत्वाच्या मर्जीत राहून राजकारण करणारे. दिल्लीतील वजनाच्या बळावर सुशीलकुमार शिंदे कायम उप्रव देत राहतील, ही एक भीती असावी. दुसरे म्हणजे आधीच्या एका विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांची मतांची आघाडी सत्तर-ऐंशी हजारांवरून सतरा-अठरा हजारांवर आली होती. शरद पवार यांनी दाखवलेल्या उप्रवमूल्यामुळे हे घडल्याचे स्पष्ट दिसत होते. शरद पवार यांच्या विरोधात गेल्यानंतर कदाचित आपल्या भविष्यातील राजकारणाला ते धोका ठरू शकतील, अशी भीतीही असावी. तिसरी शक्यता म्हणजे काँग्रेसमध्ये विश्वास टाकावा, असे नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांचे नेतृत्व त्यांना अधिक विश्वासार्ह वाटले असावे. यापैकी कोणतीही गोष्ट खरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना काळात पर्यायाने शरद पवार यांच्या अत्यंत अडचणीच्या काळात मोहिते-पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अल्पकाळ उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला, परंतु योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यावेळी जिल्ह्यातील त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागले.
गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी द्यायचे निश्चित झाले होते, परंतु विजयसिंहांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी ऐनवेळी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातच कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. तो टाळण्यासाठी शरद पवार यांनाच माढा मतदारसंघातून उमेदवारीसाठी निमंत्रण देण्यात आले. शरद पवार यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: तेथून लढण्याचा निर्णय घेतला आणि मोहिते-पाटील कुटुंबातला गृहकलह टाळला. मोहिते-पाटील यांचा विधानसभेचा परंपरागत असलेला माळशिरस मतदारसंघ राखीव झाला होता. पुनर्रचनेत त्यांच्या मतदारसंघातला बराचसा भाग माढा मतदारसंघात गेल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ते तेवढे सोपे राहिले नव्हते. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांच्या प्रभावक्षेत्राबाहेरील अनेक स्थानिक नेत्यांना बळ देऊन मोहिते-पाटलांचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत होते आणि त्याला बऱ्यापैकी यशही येत होते. मोहिते-पाटलांचा गट संपवण्याची प्रक्रियाच सुरू करण्यात आली होती. माढय़ामधून बबन शिंदे यांचे नेतृत्व उभे राहिले होते आणि ते मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे मोहिते-पाटलांसाठी माढा मतदारसंघ नाही देता आला, परंतु पंढरपूरमध्ये उमेदवारी दिली. अख्खा मतदारसंघच नवखा आणि त्यात पुन्हा विद्यमान आमदार सुधाकर परिचारक यांच्याविषयीची नाराजी या सगळ्याचे पर्यवसान त्यांच्या पराभवात झाले. पराभवानंतर मोहिते-पाटलांचा योग्य सन्मान राखला जाईल आणि त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्याही तशा अपेक्षा होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने तेवढे औदार्य दाखवले नाही. सुमारे तीसेक वर्षे सलग सत्ता उपभोगल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या वाटय़ाला राजकीय विजनवास आला होता. युतीच्या काळात ते सत्तेबाहेर होते, परंतु ती गोष्ट निराळी होती. यावेळी त्यांचा पक्ष सत्तेत असूनही ते सत्तेबाहेर फेकले गेले होते. मोहिते-पाटलांची गरज संपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना साइड ट्रॅक केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना तयार झाली होती. साखर संघाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. असे असले तरीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे स्वत:चे नव्हे, तर पुत्र रणजितसिंह यांचे राजकीय भवितव्य काय असेल, यावरच मोहिते-पाटील घराण्याची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असेल. त्याअर्थाने आगामी काळ विजयसिंह मोहिते-पाटील आणि अजित पवार या दोघांच्याही संयमाची कसोटी पाहणारा ठरेल.

Sunday, December 19, 2010

पवार आणि मुंडे

शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाढदिवस बारा डिसेंबरला मोठय़ा झोकात साजरे करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाशी बांधिलकी मानून काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि मुंडे यांची ओळख आहे. दोघेही सध्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. दोघांची तुलना करणे तसे कठिण आहे. तुलना केली तर त्यातून मुंडेंना पवाराच्या जोडीला आणून त्यांचे मोठे डिजिटल पोस्टर बनवल्यासारखे किंवा पवारांना मुंडेंच्या पातळीवर आणणेही योग्य ठरणार नाही. कट्टर राजकीय विरोधक असले तरी दोघांच्याही वाटचालीत काही परस्परपूरक बाबी आहेत.
शरद पवार हे काँग्रेस आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित राहिले. दोघांचाही प्रवास राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून झाला, परंतु शरद पवार यांनी दोन वेळा राष्ट्रीय पक्षाविरुद्ध बंड पुकारून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि आज स्वत:च्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहेत. मुंडे यांनी मात्र पक्षाच्या छत्रछायेखालीच आपला प्रवास सुरू ठेवला, त्यातही प्रमोद महाजन यांच्यासारखा गॉडफादर पक्षात होता, तोर्पयत महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे राहिले. महाजन यांच्या मृत्युनंतर मात्र मुंडे पक्षात एकाकी पडले. फारच मानहानी होऊ लागली तेव्हा सर्व पदांचा राजीनामा देऊन बंडाचा पवित्रा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक त्यातही पुन्हा कोणतीही सार्वत्रिक निवडणूक न लढवलेले असे नितिन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मुंडेंवर आली. मात्र मुंडे हा पक्षाचा बहुजन चेहरा असल्यामुळे त्यांना थेट दुखावण्याची भूमिका कुणी घेऊ शकत नाही. काळाची पावले ओळखून अलीकडच्या काळात ओबीसींचे संघटन करण्याच्यानिमित्ताने मुंडे यांनी तेवढे उप्रवमूल्य स्वत:पाशी गोळा करून ठेवले आहे. त्याच बळावर ते आज पक्षात सन्मानाचे स्थान टिकवून आहेत.
शरद पवारांचा राष्ट्रीय राजकारणातील थेट सहभाग दोन दशकांपासूनचा असला तरी पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे नेटवर्क तगडे आहे. देशभरातील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आणि अन्य बडय़ा नेत्यांशी त्यांचा दोस्ताना आहे. त्याअर्थाने राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा वावर तीन दशकांचा आहे. पवार काँग्रेसमध्ये असते तर त्यांना हे स्थान मिळवता आले नसते. काँग्रेसमधून बाहेर पडून डावे, समाजवादी आणि जनसंघवाल्यांची मोट बांधून त्यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यामुळे यशवंतरावांच्या या मानसपुत्राला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. याच प्रयोगाला खंजिराचा प्रयोग असे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात असल्यामुळे पवारांना त्याची किंमतही चुकवावी लागली. काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावंत मित्र आजही खंजिराच्या आठवणी काढीत स्वत:चा उत्कर्ष साधून घेतात. काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची रोजी-रोटी टिकवण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. आज तशी परिस्थिती दिसत नाही, परंतु केवळ पवारांचे विरोधक या एकाच क्वालिफिकेशनवर अनेकांनी दिल्लीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले.
पवार आणि मुंडे यांचे राजकारण परस्परपूरक आहे, असे म्हणताना मुंडेंचा तडफेचा काळ लक्षात घ्यावा लागतो. छगन भुजबळ शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेतेपदामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला संधी मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात कारणीभूत असला तरी मुंडे यांनी संघर्षयात्रा काढून उठवलेले रानही तेवढेच महत्त्वाचे होते. या संघर्षयात्रेमध्ये मुंडे यांनी राजकारणी आणि गुन्हेगारांच्या संबंधांचा मुद्दा घेतला आणि त्याचा रोख थेट शरद पवार यांच्यावर ठेवला. पवार यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात मुंडे यशस्वी झाले. या हल्ल्याने पवारांना पुरते घायाळ केले आणि मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या रांगेतील नेत्यांमध्ये विराजमान झाले.
पवार आणि मुंडे दोघेही ग्रासरुट लीडर आहेत. मात्र पवारांचा पाया जेवढा पक्का आहे, तेवढा मुंडेंचा नाही. लोकसभा किंवा विधानसभेची बारामतीची निवडणुक ही औपचारिकता असते, एवढे पवारांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. याउलट मुंडे यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचा इतिहास आहे. किंबहुना रेणापूरमधून विलासराव देशमुख यांच्या मदतीशिवाय निवडून येणे त्यांच्यासाठी अवघड असायचे. असे असले तरी ते रेणापूरमधून सातत्याने निवडून आले आणि गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी झाले. मुंडे यांच्या एकसष्ठी समारंभात त्यांचा गौरव करताना पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, ‘मुंडे यांच्यामुळे भाजप सर्वसामान्यांर्पयत पोहोचला.’ गौरव समारंभात लोक काहीही बोलत असतात, तशा प्रकारचे हे विधान नव्हते. अडवाणींनी वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला. बनियांचा आणि पांढरपेशांचा पक्ष असलेल्या भाजपला मुंडे यांच्यामुळे समाजाच्या विविध थरांमध्ये जागा मिळाली. मंडल आयोगाचे आंदोलन पेटले होते, तेव्हा भाजपने राममंदिर बांधण्याच्या उन्मादात मंडलविरोधी भूमिका घेतली होती, शिवसेनेनेही मंडलला विरोध केला होता. मात्र महाराष्ट्रात मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मंडल आयोगाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. भाजपच्या भावनेच्या लाटेला बांध घालण्याचे काम अनेकदा मुंडे यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे गणपतीला दूध पाजण्याच्या कार्यक्रमात सामील झाले असताना उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांनी मात्र हे थोतांड आणि अंधश्रद्धा असल्याचे सांगून विज्ञाननिष्ठ भूमिका घेतली होती. शिवसेना कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘वडिलांना शिव्या दिल्या तर राग येणारच’ असे विधान करून राजधर्माला तिलांजली दिली, मात्र मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन राजधर्माचे पालन केले होते. भारतीय जनता पक्षासारख्या मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या पक्षात राहूनही आपली उदारमतवादी प्रतिमा जपण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.
शरद पवार साठीच्या उंबरठय़ावर पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र दुर्दैवाने त्यांना तिथर्पयत मजल मारता आली नाही. भविष्यात त्यांना तशी संधी मिळेल याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. पंतप्रधानपद हे अर्थात मूल्यमापनाचे परिमाण होऊ शकत नाही. पात्रता असूनही पंतप्रधानपद न मिळालेल्या लोकांची अनेक नावे सांगता येतात, तसेच पात्रता नसताना हे पद मिळालेल्यांचीही नावे सांगता येतात. मात्र गेल्या दोन वर्षातील पवारांची वाटचाल त्यांच्या समर्थकांनाही गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी क्रिकेटची आवड जोपासावी की कुस्ती फेडरेशनचे काम करावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु या एक्स्ट्रा करिक्युलम अ‍ॅक्टिव्हिटींमुळेच ते कृषी खात्याला न्याय देऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित असलेले हे खाते कें्रातले ग्लॅमर नसलेले खाते होते, पवारांच्यामुळे हे खाते चर्चेत आले. परंतु क्षमता असूनही पवारांना या खात्यावर छाप पाडता आली नाही. त्यांनी फक्त कृषी खात्याला योग्य दिशा दिली असती तरी कोणत्याही पंतप्रधानापेक्षा देशाने त्यांना लक्षात ठेवले असते, परंतु तसे होऊ शकले नाही, हे पवारांचेही दुर्दैव आणि देशाचेही.

Monday, December 13, 2010

एका ‘सुपारी’ची डायरी

आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स्पाँटेनिअस ओव्हरफ्लो म्हणतात तशी भस्सकन ओळ आली, ‘आम्हाला वगळा गतप्रभ होतील राजकारणे..’ आजच्या काळात इतकी वास्तवदर्शी ओळ कुणाला सुचायची टाप नाही. काव्यगायनाच्या सुपाऱ्या घेऊन गावोगावी िहडणाऱ्या कवींनी तर नादच करायला नको. सुपारी अंगातच असावी लागते. छपरी मिशा वाढवल्या आणि बटवा बाळगून सुपारी चघळली म्हणून इतकं वास्तववादी सुचणार नाही, मिस्टर नायगावकर. त्यासाठी कवितेतली सुपिरिअ‍ॅरिटी नव्हे तर वागण्या-बोलण्यात आणि जगण्यातही सुपारिअ‍ॅलिटी हवी. कवींचा एवढा राग राग का करतेय, असं वाटत असेल ना तुम्हाला? कशासाठी त्यांच्याबद्दल प्रेम बाळगायचं? बाईच्या जातीला धार्जिण असलेल्या या कवडय़ांना सुपारीची अ‍ॅलर्जी का म्हणते मी? सगळं चालतं त्यांना. ताडीमाडीब्रँडीव्हिस्कीतंबाखूसिगारेट. फक्त सुपारीचं वावडं. ते कोण एक बापट कवी वसंत समाजवादी, जायाचंच की कवातरी पट्दिशी म्हणायचेत कुठल्याही स्टेजवरून. त्यांनी लिहिली होती एक कविता सुपारीवर. काय तर म्हणे कवितेतला नायक लग्न झालेल्या आपल्या प्रेयसीच्या घरी जातो. तिथं तो आपल्या त्या प्रेयसीनं कशिद्यात साकारलेलं नवरा बायकोचं चित्र पाहतो आणि एकही टाका चुकला नसल्याबद्दल हळहळतो. निघताना सुपारी खाल्ल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा ‘एवढी का सुपारी लागली ?’ असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. अरे, तिचं लग्न व्हायच्या आधी तिच्या बापाला सुपारी दिली असतीस तर आता सुपारी लागली म्हणायची वेळ आली असती का? पण याला लग्न नव्हतं करायचं तर कविता लिहायची होती. त्यामुळं कवितेत सुपारीकुळाचा उद्धार झाला. हिंदू लिहून मराठी साहित्यात अडगळ निर्माण केलेल्या भालचं्र नेमाडे यांनी एका कवितेत ‘तंबाखू खाण्यासाठी मजबूत दात असोत जगावर थुंकण्यासाठी, सिगारेट पिण्यासाठी मजबूत फुप्फुसं..’ असं लिहिलंय. पण सुपारीची दखल घेतली नाही. आम्ही काय हिंदू नाही? की कवितेत स्थान मिळण्याएवढय़ा पॉप्युलर नाही? केशवसुत एवढे क्रांतिकारक कवी, त्यांनाही ‘एक सुपारी द्या मज आणून..’ असं नाही लिहावंसं वाटलं,
..
कवींनी उपेक्षेनं मारलं, पण गाणी लिहिणाऱ्यांनीही म्हणावी तशी कदर नाही केली. केळीचे सुकले बाग असूनिया पाणी असं लिहितात, पण पावसानं आमच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्याची कळ कुणाला आली नाही. रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..लिहितात. सुपारीच्या बागेत ये ना..असं लिहिलं तर साल्यांची प्रतिभा विटाळेल काय? त्या तिकडं विदर्भ मराठवाडय़ातल्या दुष्काळी भागातल्या कवी-गीतकारांबद्दल काही बोलायलाच नको. दुसऱ्याच्या चंचीतले पान खायला, सुपारी चघळायला यांचा हात सदैव पुढे, पण सुपारीवर लिहायचं म्हटलं की यांचा प्रादेशिकवाद जागा होतो. पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा द्वेष कोकणाच्या वाटय़ालाही येतो. आम्ही काय त्यांचा सम्रु अडवून ठेवलाय? पण नाहीच लिहिणार. पण असं कुणी कोंबडं झाकलं म्हणून सूर्य संपावर जाणार आहे थोडाच ? खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली आता बाई सुपारी फुटली..केवढा धुमाकूळ घातला गाण्यानं. सुपारी घातल्यामुळं गाणं रंगलं, हे ध्यानात घ्यावं. गाणं रंगवायचं असलं तर कात-चुना नव्हे, सुपारी पाह्यजे.
..
अखिल भारतात ज्यांना सुपारी बहाद्दर म्हटलं जातं, पूर्वी बोरूबहाद्दर म्हटलं जायचं, त्या पत्रकार जमातीबद्दल चार-चौघात बोलावं बोलण्यासारखं काही नाही. सिग्रेटी फुंकतील. न चुकता बारमध्ये जातील. गुटख्याच्या पुडय़ांची माळ बाळगून तासातासाला तोंडात पुडय़ा रिकामे करणारे रिपोर्टरकमऑपरेटरकमपेजडिझायनरकमजमलेतरसबएडिटरमाप आहेत. त्यात सुपारी घेणाऱ्यांची कमतरता नाही. पण सुपारी खाऊन माहीत असलेले कितीसे सापडतील? गेला तो जमाना, जेव्हा एक्सप्रेस टॉवरमध्ये सुपारी खाणं आणि चघळणंही कसं तारतम्यानं व्हायचं. ‘हालहडकी’ हे एका एशियाटिक सुपारीचं नाव आहे, आणि अरूण टिकेकर हे ती खाणाऱ्या संपादकाचं, हे आजच्या पिढीला कसं कळणार? शेवटी शेवटी त्यांचं लेखन एवढं जड होऊ लागलं, त्याला हालहडकी सुपारी कारणीभूत असल्याचं कळल्यामुळं एक्सप्रेसच्या मॅनेजमेंटनं कें्राशी बोलून कर्नाटकातून येणाऱ्या त्या सुपारीवर महाराष्ट्रात बंदी घालायला लावल्याची आठवण दिनकर रायकर पुढं कधीतरी एखाद्या दिवाळी अंकासाठी लिहिणार आहेत, असं कानावर आहे.
..
कवी, गीतकार, पत्रकार ही सगळी कृतघ्न मंडळी. परंपरेचा अभिमान नाही. संस्कृती जोपासण्याची समज नाही. सगळे नुसते लिहून उत्सव साजरा करणारे. प्लेटॉनिक लव्ह करून पोरं थोडीच होतात? त्यापेक्षा राजकारणी बरे. थेट कृतीवर भर. काळ कितीही बदलला तरी सुपारीची बरकत त्यांच्यामुळंच टिकून राहिलीय. एकेकाळी अंडरवर्ल्डशी संबंधामुळं अंधाऱ्या कोठडीत खितपत पडलेलं आमचं जिणं राजकारणी मंडळींनी बाहेर काढलं. इथं खून खराबा नाही. अंधारकोठडी नाही. आपल्यामुळं कुणाला थर्ड डिग्री नाही. जो आदर्श वागणार नाही, त्याचीच सुपारी देणार आणि पुन्हा कवी गीतकारांसारखं ‘दिल्या घेतल्या सुपारीची शपथ तुला आहे..’असंही रडगाणं गाऊन शपथेच्या बंधनात अडकवणार नाही.

Monday, December 6, 2010

एका पत्रकाराची डायरी

माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना असतात. स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सुरू झाल्यानंतर एकदा आमचे आजोबा म्हणाले होते की, महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिलं, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. अब्राहम लिंकन, हिटलर, साने गुरुजी, एपीजे अब्दुलकलाम, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, सुधीर गाडगीळ, अशोकराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, कवी चं्रशेखर गोखले, संगीतकार सलील कुलकर्णी, मोहन जोशी, सुधीर भट अशा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या थोर थोर लोकांनी जो काही नावलौकिक मिळवला तो काही असा तसाच नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळेच ते शक्य होऊ शकले. आमचे मोठे काका म्हणायचे की, चौथीच्या वर्गात असताना एकदा गृहपाठ केला नाही, म्हणून मास्तरांनी ओल्या फोकेनं फोकळलं, त्यादिवशी दप्तर टाकूनच त्यांनी शाळेला पाठ दाखवली. तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग. पुढं त्यांनी राजकारणात करिअर करून झेडपीच्या अध्यक्षपदार्पयत मजल मारली. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी घटना कुठली, याचा विचार अस्मादिक करतात तेव्हा पट्कन सांगू शकतो, की ज्या दिवशी मंत्रालयाची पायरी चढलो ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. नाहीतर काय म्हणायचं! मुंबईत आलो तेव्हा पायात स्लीपर असायचं. आज वुडलँडचे शूज आहेत. आलो तेव्हा डिलाईल रोडला एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत दहा जणांच्यात शेअर करून राहात होतो. आज जवळच्याच अपार्टमेंटमध्ये भाडय़ानंच राहात असलो तरी मुंबईत आपल्या मालकीचे तीन फ्लॅटस आहेत टक्केवारीतले आणि तिन्ही भाडय़ानं देऊन तीन कुटुंबाची राहण्याची गरज भागवतोय. आपल्या गावातच काय, पंचक्रोशीत भौतिक प्रगतीचा एवढा वेग कुणाला पकडता आला नसेल.
तर मुद्दा होता कलाटणीचा. मंत्रालयात येण्याचा आणि कलाटणीचा संबंध काय? मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक? त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला? अस्मादिक ज्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्याचं नाव मुंबईत कुणी ऐकलं असण्याची काडीमात्र शक्यता नाही. नाही म्हणायला डीजीआयपीआरमधल्या म्हणजे माहिती-जनसंपर्क विभागातल्या अ‍ॅक्रिडिटेशन विभागाच्या कारकूनांच्या कानावरून गेलं असेल नाव. आपण काय लिहितो, कुठं छापून येतं कुणीच शोधू शकणार नाही. तरीसुद्धा मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरच्या केबिनींचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले असतात. खपाच्या उच्चांकाच्या उडय़ा मारणारे अपॉइंटमेंटसाठी ्रोण लावून बसतात आठवडा-पंधरा दिवस. तर मुद्दा असा की, कसलाच आधार नसताना आपण वट निर्माण केलीय. शून्यातून निर्माण केलंय म्हणाना सगळं. पूर्वी मुख्यमंत्र्यांचं ब्रिफिंग दाखवायचेत सह्या्रीवर सातच्या बातम्यात, तेव्हा पहिल्या रांगेत असायचो आपण. सगळा महाराष्ट्र बघायचा. गावाकडनं किती फोन यायचेत. विलासरावांनी बंद केलं सगळं आणि आपलं दर्शन बंद झालं, पण मंत्रालयातली वट तशीच आहे.
बरखाबाईंनी काही सेटलमेंट करून दिली सेंटरमध्ये कॅबिनेटची, त्याच्या बातम्या किती आल्या. एका सेटलमेंटची एवढी चर्चा, आपण तर इथं नुसती सेटलमेंटचीच कामं करीत असतो, पण इकडचं तिकडं कळत नाही. एखाद्या गरीब बिचाऱ्या फौजदाराची, तहसिलदाराची, सरकारी डॉक्टरची गैरसोय होत असते. त्यांना बदलीसाठी थोडी हेल्प करणं म्हणजे समाजसेवाच असते. त्या बिचाऱ्यांना तरी कोण आहे इथं मुंबईत? आणि सारखं सारखं कामं घेऊन जात नाही आपण कुणाकडं. एका खात्यात वर्षातनं एकच काम घेऊन जायचं, असं बंधन घालून घेतलं स्वत:वर. पदरचा चहा पाजून पर्सनल रिलेशनवर कामं करतात लोक. आणि आम्ही काही जाहिरात देत नाही, की आम्ही अशी अशी बदल्यांची कामं करू म्हणून. माहिती काढून लोकच येतात. कधी कुणाला फसवलं नाही, कुणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला नाही. सुपारी घेऊन लॉबिंग करणाऱ्या पत्रसम्राटांची कमतरता नाही इथं. आपण तसल्यांच्या टोळीपासून सुरक्षित अंतरावर राहतो. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधीही चांगलं !

Friday, December 3, 2010

भुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा

सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री तसेच अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी नुकताच पुणे येथे समता मेळावा घेतला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आणि भुजबळ यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात मेळावा होत असल्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने दुखावल्यानंतर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भुजबळ यांनी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची चर्चा सुरू झाली. खरेतर महाराष्ट्रातील सत्तांतराचे नाटय़ अत्त्युच्च बिंदूवर असतानाच त्याची चर्चा सुरू झाली होती. ज्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या दहा मंत्र्यांचा शपथविधी झाला,(त्यात भुजबळ यांचाही समावेश होता.) त्याच दिवशी सायंकाळी भुजबळ यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भातील ब्रेकिंग न्यूज झळकल्या होत्या आणि अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. पुण्यातील मेळाव्याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावरून भुजबळ यांच्या त्या बहुचर्चित भेटीमागचे कारणही स्पष्ट होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केलेल्या तर्क-वितर्काना भुजबळ यांनी मेळाव्यातून उत्तर दिले. मेळावा शक्तिप्रदर्शनासाठी नसल्याचे स्पष्ट करून शरद पवार यांची शक्ति हीच आमची शक्ति आणि आमची शक्ति हीच शरद पवार यांची शक्ति असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगून टाकले.
भुजबळ यांच्या या निवेदनाचा सूर सच्चा असला तरी अलीकडच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहता कुणाही राजकीय नेत्याच्या विधानामागील नेमक्या भावना जाणून घेणे कठिणच असते. त्यात पुन्हा कोणतेही सबळ कारण नसताना उपमुख्यमंत्रिपद काढून घेतलेल्या भुजबळ यांच्या विधानामागील भावना कशा पकडता येणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेते आणि भुजबळ यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. भुजबळ हे स्वत:ला इतर मागासवर्गीयांचे राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ओबीसींच्या हक्कांसाठी त्यांची लढाई सुरू असतानाच मराठा नेत्यांनी मराठय़ांना आरक्षणाची मागणी लावून धरली. अर्थात तोंडदेखल्या आश्वासनापलीकडे कुणी या मागणीला फारसे महत्त्व दिले नसले तरी भुजबळ हेच मराठा आरक्षणाच्या आडवे येत असल्याची मराठा नेत्यांची भावना आहे. त्यातून हा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी कृतीतून वेळोवेळी हे सिद्ध केले आहे. राजकीय गरज म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी अलीकडे वेळोवेळी वेगवेगळी विधाने केली असली तरीही इतर मागासांचे हक्क डावलून किंवा अन्य समाजघटकांवर अन्याय होईल, अशा प्रकारे मराठय़ांच्या आरक्षणाचा विचार करण्याची त्यांची भूमिका नाही. पवार यांची ही समज राष्ट्रवादी काँग्रेसमधील अन्य कोणत्याही मराठा नेत्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातूनच ओबीसी-मराठा हा संघर्ष अधिक तीव्र बनत गेला. या पाश्र्वभूमीवर भुजबळ यांनी पुण्याच्या मेळाव्यात मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे सांगितले. भुजबळ यांच्या या स्पष्टीकरणानंतरही मराठा नेते आणि भुजबळ यांच्यातील दरी कमी होईल, अशी शक्यता नाही. प्रत्येक नेत्याची राजकीय गणिते असतात. ती गणिते जुळवण्यासाठी आरक्षणासारख्या विषयांवरील भूमिका ठरवाव्या लागतात. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, तेव्हा शरद पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. कोणताही निर्णय घेताना सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी घ्या, असे पवार म्हणाले होते. परंतु त्याच पवारांनी नंतर निवडणुकीच्या काळात ‘मराठय़ांना राजकीय आरक्षणाची गरज नाही’ असे सोयीस्कर विधान करून मराठा आरक्षणाचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. सारांश काय, तर प्रत्येक नेत्याला आपापल्या राजकीय सोयीनुसार भूमिका घ्याव्या लागतात, परिस्थितीनुसार आवाजातील चढउतार कमी-जास्त होतात.
भुजबळ यांनी मेळाव्यात समता परिषदेची पंचसूत्री विषयपत्रिका जाहीर केली. जातिनिहाय जनगणना, ओबीसी स्वतंत्र घटक योजना, खासगी क्षेत्रात आरक्षण, न्यायव्यवस्थेत प्रतिनिधित्व आणि विधानसभा व लोकसभेत आरक्षण ही पंचसूत्री विषयपत्रिका घेऊन समता परिषद काम करेल, असे त्यांनी जाहीर केले.
भुजबळ यांच्या राजकीय प्रवासाची दिशा अलीकडच्या काही वर्षात निश्चित झाली होती, आणि तीच आपली दिशा राहील हेही त्यांनी सूचित केले आहे. खरेतर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पक्षाच्या स्थापनेपासून त्यांचे ते स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी सातत्याने आग्रहाने केला. भुजबळ हे ज्येष्ठ होतेच, शिवाय शरद पवार यांच्यानंतरचे पक्षातील स्टार कँपेनर होते. त्याची पक्षासाठी प्रारंभीच्या काळात तीव्र गरज होती. (आर. आर. पाटील यांना त्यासाठी तयार व्हायला मधला बराचसा काळ जावा लागला.) मध्यंतरी झी टीव्हीवरील हल्ल्यानंतर भुजबळांना राजीनामा द्यायला लावण्यामागे तेलगी प्रकरणाचे वादळ हेच कारण असल्याचे लपून राहिले नव्हते. परंतु त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासह पंकच भुजबळ यांनाही उमेदवारी देऊन पवारांनी त्यांच्यावरील विश्वास अबाधित असल्याचेच संकेत दिले होते. आता तर त्यात समीर भुजबळ यांच्या खासदारकीची भर पडली आहे. छगन भुजबळ यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु एका घरात एक मंत्रिपद, एक खासदारकी, एक आमदारकी असताना अन्याय झाला असे कसे म्हणणार? आयुष्यभर सतरंज्या उचलून साधे विशेष कार्यकारी अधिकारपदही न मिळालेल्यांनी मग काय म्हणायचे?
एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. भुजबळ यांचे जे बलस्थान आहे, तीच त्यांची कमकुवत बाजू आहे. भुजबळ यांनी ओबीसींचे नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ओबीसींचे संघटन ही त्यांची ताकद आहे. परंतु त्यांच्यासारख्या नेत्याने ओबीसींपुरते स्वत:ला मर्यादित करून ठेवले, हीच त्यांची कमकुवत बाजू ठरली. पक्षातील मराठा आमदारांना भुजबळ हे आपले नेते वाटेनासे झाले. खरेतर शरद पवार यांच्यानंतर तशाच प्रकारचे सामाजिक भान, प्रश्न समजून घेण्याची क्षमता भुजबळ यांच्याकडे होती. परंतु ओबीसींचे राष्ट्रीय नेते होण्यासाठीच त्यांनी लक्ष कें्िरत केले. ओबीसींचे नेते होण्याच्या नादात राज्याचे नेते होण्याची संधी त्यांनी गमावली. त्यामागे अर्थात त्यांची दूरदृष्टीही असू शकते. येणाऱ्या काळात राजकारणाचे स्वरूप बदलत जाईल तेव्हा हीच ताकद आपल्या उपयोगी पडू शकेल, अशीही त्यांची धारणा असावी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेत्यांच्या राजकारणात तशी सहजासहजी आपली डाळ कुणी शिजू देणार नाही, तेव्हा आपले आस्तित्व आणि उप्रवमूल्य असल्याशिवाय सन्मानजनक स्थान मिळणार नाही. अशा वेळी नेतेपदाचा सोस टाकून राजकारणातील सन्मानजनक स्थान टिकवून ठेवण्यासाठी ओबीसी संघटनाचा आधार त्यांना अधिक विश्वासार्ह वाटला असावा.

Wednesday, November 24, 2010

अजित पवार की सुप्रिया सुळे?

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही अधूनमधून कें्रातील आघाडीचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अशा पंडितांना उमेद येते, आणि तिसऱ्या आघाडीची मोट बांधून शरद पवार पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या फुटायला लागतात. ओरिसाच्या नवीन पटनायकांपासून आंध्रातल्या वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यार्पयतचे संदर्भ त्यासाठी जोडले जातात. परंतु तसेही काही घडत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदामुळे संबंधितांना पुन्हा एक मुद्दा मिळाला आहे.
शरद पवार यांची माया पुतण्यापेक्षा मुलीवर असणे स्वाभाविक आहे, परंतु चार दशकांहून अधिक काळ राजकारणात तेही लोकांशी थेट संपर्कात राहणाऱ्या शरद पवार यांना लोकमानस कळत नसेल, असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. अजित पवार दोन दशके राजकारणात आहेत आणि सुप्रिया सुळे यांना अवघी चार वर्षे झाली आहेत. पहिल्यांदा त्या राज्यसभेवर गेल्या. गेल्यावर्षी लोकसभेची निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाडय़ात उतरल्या. शरद पवार यांनी त्यांना एकदम राजकारणात आणलेले नाही. महाराष्ट्राचे विशेषत: तळागाळातल्या घटकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत यासाठी राजकारणाआधी त्यांना समाजकार्याचे धडे दिले. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने यांच्याबरोबर भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काही वर्षे कार्यरत होत्या. जेणेकरून गावकुसाबाहेरच्या गरिबातल्या गरीब माणसांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी. बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांशी संबंधित क्षेत्रात सक्रीय आहेत. जोडीने शिक्षण क्षेत्र आहेच. काही प्रमाणात सामाजिक धडे गिरवायला लावूनच शरद पवारांनी आपल्या लेकीला राजकारणात आणले आहे. चार वर्षापासून त्या खासदार आहेत, परंतु त्यांच्या आतार्पयतच्या वाटचालीवरून काय दिसते? खरेतर शरद पवारांची मुलगी म्हणून जी संवेदनशीलता आणि झपाटा दिसायला हवा होता, तो त्यांच्या कामातून आतार्पयत तरी दिसला नाही. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आदिवासी भागातील बालमृत्यूर्पयत अनेक प्रश्न तीव्रतेने समोर आले. त्याठिकाणी त्या कुठेच दिसल्या नाहीत. मुंबईत आंदोलन करुन रुग्णांना वेठीला धरणाऱ्या डॉक्टरांच्या एका आंदोलनात डॉक्टरांच्या बाजूने मध्यस्थीसाठी त्या पुढे आल्याचे दिसले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर यासारख्या संस्थांशी संबंधित असण्यात काही गैर नाही, परंतु त्यापेक्षा तळागाळातील लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करणे कधीही चांगले. लोकसभेवर निवडून आल्यानंतर बारामती मतदार संघाशी त्यांनी ठेवलेला संपर्क, लोकांची कामे करून देण्याचा झपाटा हे सगळे मतदारसंघाच्या बांधणीसाठी पूरक ठरणारे आहे. कारण त्यांना माहीत आहे, की शरद पवार यांची लेक किंवा बारामतीची माहेरवाशीण म्हणून यावेळी लोकांनी कौतुकाने निवडून दिले. हे कौतुक फारतर आणखी एका निवडणुकीर्पयत टिकेल. त्यानंतर टिकायचे असेल तर त्यांना स्वत: आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध करावे लागेल. अजित पवार यांनी ते सिद्ध केले आहे. आणि ते त्यांनी केले नसते तर शरद पवारांच्या या पुतण्याला बारामतीच्या लोकांनी कधीच फेकून दिले असते. बारामतीच्या लोकांशी जोडून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, मात्र शरद पवार यांच्या लेकीकडून एवढय़ा माफक अपेक्षा नाहीत. हे म्हणजे सुनील गावसकरनंतर रोहनच्या कारकीर्दीसारखे आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणारा घराणेशाहीचा पुरस्कर्ता असलेला मोठा गट आहे. त्यामागील भाबडेपणा आणि लाचारी लपून राहणारी नाही, परंतु सुप्रिया सुळे यांना त्यादृष्टिने वाटचाल करायची असेल तर खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. बारामतीचा पाया मजबूत करण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करावे लागेल. बारामतीच्या पलीकडे विदर्भापासून कोकणार्पयत आणि मुंबईपासून खानदेशार्पयत महाराष्ट्र उभा-आडवा-तिडवा पसरला आहे. प्रदेशनिहाय तळागाळातल्या लोकांचे शेकडो प्रश्न आहेत. सामाजिक सांस्कृतिक आकलन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रश्न समजून घेत लोकांशी जोडून घेऊन काम सुरू केले तरच नेतृत्व प्रस्थापित करता येईल. मात्र त्यांची सध्याची कार्यपद्धती एनजीओसारखी आहे. त्यातून तात्कालीक प्रसिद्धी मिळेल, परंतु दीर्घकालीन काहीच साध्य होणार नाही.
नेतृत्व लादून चालत नाही, तर ते लोकांनी स्वीकारावे लागते. अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत, ही त्यांची दोन दशकांच्या वाटचालीची कमाई आहे. सुरुवातीच्या काळात केवळ उद्धट आणि उर्मट अशी प्रतिमा असलेल्या अजित पवार यांनी नंतरच्या काळात कार्यशैलीमध्ये खूप बदल केले आहेत. आक्रमकपणा कायम राहिला आहे, आणि ते त्यांचे बलस्थानही ठरले आहे. शरद पवार यांची दिल्लीच्या राजकारणातील व्यस्तता वाढल्यानंतर राज्यातील पक्षीय प्रश्नांमध्ये निर्णायक निकाल देणारे कुणी नव्हते. म्हणजे एकाच लेव्हलचे दहा-बारा नेते असल्यामुळे कुणी कुणाला जुमानत नव्हते. परंतु अलीकडच्या काही वर्षात अजित पवार यांनी सर्वाना धाकात ठेवले आहे. त्याला कुणी दादागिरी म्हणत असले तरी पक्षशिस्तीसाठी असा धाक आवश्यक असतो. अजित पवार यांनी आपल्या कार्यशैलीतून नेतृत्व स्वत:कडे खेचून घेतले आहे. शरद पवार यांनी ते नाकारायचे म्हटले असते तरी ते शक्य नव्हते. असे असले तरी नेतृत्व निभावणे तितकेसे सोपे नाही. याआधी आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यावर व्यक्तिश: नेतृत्वाचे ओझे नव्हते. किंवा नेतृत्वाच्या अनुषंगाने त्यांचे मूल्यमापन होणार नव्हते. जी काही बेरीज-वजाबाकी असेल त्याची पावती शरद पवार यांच्या नावावर फाटत होती. यापुढे मात्र महाराष्ट्रात तरी पक्षाचे जे काही होईल, त्या श्रेय-अपश्रेयाची जबाबदारी अजित पवारांना घ्यावी लागेल. व्यक्तिगत चारित्र्यापासून सार्वजनिक व्यवहारांर्पयत साऱ्या कसोटय़ांवर उतरले तरच नेतृत्व प्रस्थापित होऊ शकेल.
सुप्रिया सुळे यांना राजकारणात रुळायला आणि महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यायला अजून बराचसा वेळ द्यावा लागेल. तोर्पयत त्यांना अजित पवार यांचे नेतृत्व मानूनच काम करावे लागेल. स्वत:चे नेतृत्व उभे करताना एखाद्याचे नेतृत्व मानून काम करणे अवघड असते. हा तोल कसा सांभाळला जातोय त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.

Sunday, November 21, 2010

मा. पृथ्वीराजबाबांची डायरी

दिल्ली सोडून मुंबईला जाताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या. इथलं काय काय सामान बरोबर घ्यायचं आणि काय काय इथंच सोडायचं हे ठरवायला बराच वेळ लागला. पुस्तकं तर सोबत घ्यायलाच पाहिजेत. पण स्वेटर, जाकिटांचं ओझं कशाला घ्यायचं, यावर सगळ्यांचंच एकमत झालं. मुंबईतल्या उकाडय़ात हे सगळं निरुपयोगी ठरणार. राजीवजींनी आग्रह केला म्हणून राजकारणात यावं लागलं. जीव रमवण्यासाठी आपण राजकारणात आलोच नव्हतो. त्यामुळं या दिल्लीत जीव रमत नाही, असं म्हणण्याची वेळ आली नाही. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण हळुहळू अंगवळणी पडत गेलं सगळं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. खूप माणसं पाहता आली. अनेकांशी बंध निर्माण झाले. त्या सगळ्यांना सोडून जातानाची हुरहूर आहेच. पण दिल्लीतल्या थंडीला मात्र कायमचं मुकणार आहोत, ती सतत आठवत राहील. दिल्लीशी जोडणारा तेवढाच भावनिक धागा आहे..
..
गेली दोन-तीन वर्षे मुंबई खुणावत होती. आपल्याला दिल्लीतला मुक्काम हलवून मुंबईत जावं लागणार, याचे संकेत मिळत होते. पण आपल्याच मनाची तयारी होत नव्हती. तशी मुंबईची ओढ कधीच नव्हती आणि कधी तिच्याशी भावनिक नातं निर्माण होण्यासारखा संबंधही आला नव्हता. बालपणापासून दिल्लीतच अधिक दिवस गेल्यामुळे लांब असली तरी दिल्ली परकी वाटली नाही. इथल्या थंडीत प्रीतीसंगमावरच्या थंडीची आठवण व्हायची आणि मन थेट कृष्णाकाठी धाव घ्यायचं. नाही नाही म्हणता म्हणता दिल्लीतला मुक्काम आवरता घेऊन मुंबईत दाखल व्हावं लागलं. दिल्लीत कराड, कुंभारगावची माणसं फारशी भेटत नव्हती, आता ती सारखी भेटत राहतील. (त्यांना पुढच्या काळात टाळायचं कसं, हे जुन्या-जाणत्यांना विचारून घ्यायला पाहिजे.) दिल्लीतून मुंबईत म्हणजे एकदम गर्दीत आल्यासारखं वाटतंय. दिल्लीतही गर्दी होती, पण आपल्या अवती-भोवती आणि पुढं पुढं करणारी माणसं नव्हती. आणि तेच तेच चेहरे सारखे सारखे दिसताहेत गेले काही दिवस. काही ओळखीचे. बरेचसे अनोळखी पण अनेक वर्षाचा परिचय असल्याचं भासवणारे. कुणाला ओळख द्यायची आणि कुणाला नाही, हे सुद्धा समजून घ्यायला हवं.
..
मुंबई-दिल्ली विमानप्रवास
..
अँटनी दिल्लीत नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही. प्रणवदाही बिझी आहेत.
..
मॅडमही महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आलं
.
मुंबई-दिल्ली विमानप्रवास.
...
मध्यरात्री एक वाजता फोन वाजला. हल्ली दिल्लीचे फोन येण्याला काळ-वेळ नसतो. त्यामुळं फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवता येत नाही. रिंग वाजत असताना दुर्लक्षही करता येत नाही. आलेला फोन घ्यावाच लागतो. रिसिव्ह केला, तर पलीकडून आवाज आला, त्यांनी नावही सांगितलं, पण ते लक्षात आलं नाही. आपण काँग्रेसचे आमदार आहोत, असं पलीकडची व्यक्ती सांगत होती, एवढं माझ्या लक्षात आलं. नाहीतर एवढय़ा रात्री झोपेत असताना काय काय लक्षात ठेवणार. मंत्रिमंडळाच्या यादीत आपलं नाव आहे का, असं ते विचारत होते. सकाळी फोन करा म्हणून फोन बंद केला. तर तासाभरात वेगवेगळे चार फोन आले. मग कंटाळून बंद केला. झोप नीट झाली नाही तर तब्येत बिघडायची. अजून दिल्लीला किती फेऱ्या मारायला लागतील, याचा अंदाज नाही. अशा वेळी तब्येत राखली पाहिजे. सरकारच्या कामाला सुरुवात करून गाडीने लवकर पिकअपही घ्यायला हवा. तब्येत सांभाळूनच राहायला हवं.
..
पुन्हा दिल्ली. मनमोहनसिंगांची भेट घेतली. खूप सद्गदित झाले. मलाही खूप वाईट वाटलं, निरोप घेताना. एवढी सज्जन माणसं फार क्वचित आयुष्यात येतात. त्यासाठी भाग्य असावं लागतं, असं म्हणतात.
..
यादी फायनल करून मुंबईत परत. संध्याकाळी पुन्हा दिल्लीचे फोन किरकोळ फेरबदल. हुश्श केलं. पण फोन थांबेचनात. पहाटे अडीचर्पयत दहा वेळा दुरुस्त्या केल्या. शेवटी मूळची यादी कोणती आणि दुरुस्त्या केलेली अंतिम यादी कोणती, माझं मलाच कळेना. कन्फ्यूजनही कन्फ्यूजन.सोल्यूशन कोई पता नही, अशी अवस्था झाली. शेवटी जाकिटाच्या एका खिशात जी यादी सापडली, तीच फायनल करून टाकली. म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे. पुढचं पुढं पाहून घेऊ. सोनिया मॅडमनी हीच फायनल केलीय म्हणून सांगून टाकू..

Thursday, November 18, 2010

सर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा

अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतील मोजके कलावंत आणि सत्तेचे लाभार्थी वगळता फारसे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. अशोकरावांनी गेल्या वर्षभरात जो काही कारभार केला तो पाहता आघाडी सरकारच्या हितचिंतकांचीही ‘बरे झाले राज्य बुडाले’ अशीच प्रतिक्रिया उमटली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कोणतेही दिवे लावलेले नव्हते, उलट महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य वाढवले होते. अनेक आघाडय़ांवर नामुष्कीजनक स्थिती होती. तरीसुद्धा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे जातीयवादी विचारांचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटणाऱ्या लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार यावे, असे वाटत होते. नाकर्त्यां सरकारच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि युती सत्तेपासून दूर राहिली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी ज्या संवेदनशून्य रितीने कारभार सुरू केला, त्यामुळे साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला होता. तो होणारच होता. परंतु इतक्या लवकर होईल असे वाटत नव्हते. अशोकराव जाऊन पृथ्वीराज चव्हाण आले आणि नेहमीचे झिलकरी गोळा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्वच्छता अभियान सुरू झाल्याचे हाकारे घालू लागले. पन्नास वर्षे महाराष्ट्रात भ्रष्टाचारी राजवटी होत्या आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने नवा मसीहा आला आहे, असाच सगळ्यांचा अविर्भाव होता किंबहुना अजूनही तो आहे. सत्तेवर असताना भ्रष्टाचाराच्या बाबतीत खोऱ्यांनी ओढण्याची नवी परिभाषा निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनीही भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारल्याचा पवित्रा घेतला. एक मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार झाल्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला जोर चढणे स्वाभाविक असले तरी त्यांच्या ओरड करण्याला नैतिक अधिष्ठान नाही.
पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि स्वच्छ प्रशासन या गोष्टी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यापुरत्याच ठीक आहेत, याची त्यांना असायला हरकत नाही. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याच्या औषधाचा अजूनतरी कुणाला शोध लागलेला नाही. त्यामुळे स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार असा गवगवा केला तर काही महिन्यांतच त्याचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे हे काम पहिल्यांदा नव्या कारभाऱ्यांना करावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी काही कालावधी लागेल. अन्य कुणाच्या नेतृत्वाखाली काम करताना एखाद्या खात्यापुरती जबाबदारी पार पाडणे आणि नेतृत्व करताना सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करणे यात मोठे अंतर असते. आणि नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपुढे हेच आव्हान असेल. दोघांचाही मार्ग काटय़ाकुटय़ांनी भरलेला आहे, परंतु त्यातून वाट काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासातील असल्यामुळे त्यांच्याविरोधात दिल्लीत जाऊन कागाळ्या करण्याचा मार्ग काही काळापुरता तरी बंद होणार आहे. असे काही करण्याचा प्रयत्न करणारेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत. मग ते दिल्लीत असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे दुखावलेले अशोकराव चव्हाण असोत. त्याअर्थाने महाराष्ट्रात जम बसवण्याासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. ते स्वत: पाटण तालुक्यातील असल्यामुळे दुर्गम भागाच्या समस्या काय असू शकतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. दिल्लीत असले तरी गेल्या काही वर्षात त्यांनी सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातील स्थानिक पातळीवरील राजकारण जवळून पाहिलेले आहे. नेत्याचे मूल्यमापन करताना त्याच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली जाते, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कमकुवत काँग्रेस हा मुद्दा सतत चर्चेत येत राहील. त्यामुळे सर्वाना सोबत घेऊन साताऱ्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांना वगळून काँग्रेस मजबूत होणार नाही, हेही त्यांना ठाऊक असेल. विलासराव देशमुख यांची कारकीर्द खांदे उडवण्यात आणि अशोक चव्हाण यांची घोळ घालण्यात निघून गेली. त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रगल्भ म्हणता येईल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कराडच्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला सर्वागीण विकासाची दिशा दिली. राज्य सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठय़ावर असताना कराडच्याच पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याचे नेतृत्व आले आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची चर्चाही खूप झाली. कोणताही ठपका नसताना छगन भुजबळ यांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घेतल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त झाले. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे छगन भुजबळांना मिळालेले उपमुख्यमंत्रिपद हे शरद पवार यांच्या कृपेमुळे मिळाले होते. भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परस्परांना खूप काही दिले असले तरी भविष्यकालीन वाटचालीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे हे एकदा निश्चित करण्याची आवश्यकता होती. ती यापूर्वीच होण्याची आवश्यकता होती मात्र शरद पवार यांच्या डोक्यातील सामाजिक समतोलाच्या समीकरणांमुळे भुजबळांना संधी मिळाली होती. अशोक चव्हाण यांच्या पायउतार होण्यामुळे राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आले. पक्षात दुसऱ्या फळीतील अनेक नेते असल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर आपणच अशा तोऱ्यात किमान डझनभर नेते तरी वावरत होते. मात्र वेळोवेळी प्रत्येकाच्या मर्यादा उघड होत होत्या. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्यशैलीमुळे पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काका-पुतण्यांच्यातील मतभेदाच्या अनेक वावडय़ा प्रसारमाध्यमांनी उडवल्या. अजित पवार यांनी काकांशी असलेले काही मुद्दय़ांवरील आपले मतभेद लपवले नाहीत (पुण्यातील कलमाडी यांचा प्रचार करण्याचा मुद्दा) आणि कधी लक्ष्मणरेषाही ओलांडली नाही. शरद पवार यांचा पुतण्या यापलीकडे जाऊन त्यांनी आपले नेतृत्व उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे आणि उद्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांची असेल. पक्ष वाढला तर त्याचे श्रेय घ्यायला अनेकजण पुढे येतील. परंतु नुकसान झाले तर त्याची जबाबदारी अजितदादांनाच घ्यावी लागेल. त्याअर्थानेही त्यांच्यापुढचे आव्हान कठिण आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा समाजाचे असल्यामुळे सामाजिक समतोल बिघडल्याची चर्चा केली जात आहे. आपल्याकडे नेत्यांच्या जातीवरून सत्तेच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते, तेच मुळात चुकीच्या पायावर असते. नेता कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा राज्यकर्ते म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय समाजातील उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यास सहाय्यभूत ठरणारे आहेत का, हे महत्त्वाचे असते. यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळताना तळागाळातल्या घटकांचा विचार केला, तेवढी समज अन्य कुठल्या नेत्याकडे अभावानेच दिसली. त्यामुळेच त्यांना राज्याचे आणि सर्व समाजघटकांचे नेते म्हणून मान्यता मिळाली. मराठा आरक्षणासारखे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार आहेत. अशा काळात सर्व समाजघटकांना विश्वास आणि आधार वाटेल, असा कारभार असायला हवा.

Wednesday, November 3, 2010

बेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा मागोवा घेताना आणि मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या नावांचा गौरवाने उल्लेख केला जातो. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या शंकरराव चव्हाण यांची कारकीर्दही महाराष्ट्राच्या जडणघडणीच्यादृष्टिने महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक असलेल्या शंकररावांचा जाहीर गौरव क्वचितच होतो. खुशमस्कऱ्यांचा गोतावळा सभोवती बाळगणाऱ्यांपैकी ते नव्हते किंवा कार्यकर्ते पाळून त्यांच्या कोणत्याही गैरव्यवहारांना पाठिशी घालणाऱ्यांपैकीही ते नव्हते. त्याचमुळे त्यांच्याविषयी लिहिणारे, त्यांचे पोवाडे म्हणणारे फारसे आढळत नाहीत.
19 जुलै 1920 ही शंकररावांची जन्मतारीख आणि 14 फेब्रूवारी 2004 हा त्यांचा मृत्युदिवस. त्यांची जयंती किंवा स्मृतीदिन नसताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कारण काय, अशी शंका कुणी उपस्थित करील. पण शंकररावांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांनी आदर्श गृहनिर्माण सोसायटीमध्ये आपली सारी सासुरवाडी वसवली आणि त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले. मुख्यमंत्रिपद म्हणजे नियम आणि कायदे धाब्यावर बसवून आपल्या हितसंबंधियांना, नात्यातल्या, निकटच्या, अतिनिकटच्या लोकांना घरे देण्याची जहागिरी असल्याप्रमाणेच ते व्यवहार करीत आले. यातील एकेका प्रकरणाच्यावेळी त्यांना अडचणीत आणणे शक्य होते. नट-नटय़ांना घरे देताना नियम धाब्यावर बसवले तेव्हा विरोधी पक्षातल्या कुणीही ब्र काढला नाही. नट-नटय़ांना घरे देताना रसिकतेचे दर्शन घडवतात आणि गिरणी कामगारांना घरे देताना मात्र त्यांच्यातील कठोर प्रशासक जागा होतो. गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी विधिमंडळात मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले असतानाही तातडीने खुलासा करून घरे मोफत देणार नसल्याचे सांगून टाकतात. शंकरराव चव्हाणही कठोर प्रशासक होते, परंतु संवेदनाशून्य नव्हते. आणि त्यांचा सार्वजनिक व्यवहार इतका सैलसर कधीच नव्हता.
यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव महसूल खात्याचे उपमंत्री होते. त्यांच्या काळातच कूळकायद्याची अमलबजावणी सुरू झाली होती. या कायद्याची काटेकोर अमलबजावणी व्हावी, अपवाद म्हणून कुणालाही सूट मिळू नये असा शंकररावांचा आग्रह होता. मुंबईतील जॅक कंपनीकडे मोठी जमीन होती. कंपनीला कूळ कायद्यातून सूट देऊन महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडील जमीन काढून न घेता ती त्यांच्याकडेच ठेवली होती. कायद्यानुसार साठ एकरपेक्षा जादा जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात होती, त्याचवेळी पाच हजार एकरापेक्षा अधिक जमीन असलेल्या जॅक कंपनीला कायद्यात सूट दिली होती. शंकररावांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली भूमिका मांडून सरकारच्या पक्षपाती धोरणाला कडाडून विरोध केला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ मंत्री वसंतराव नाईक यांच्याकडेही विरोध नोंदवला, परंतु तो त्यांनी गंभीरपणे घेतला नाही. शंकरराव यशवंतरावांना म्हणाले, ‘आपली परवानगी असेल तर मी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी बोलतो.’ यशवंतराव म्हणाले, ‘ तुमची इच्छा असेल तर या विषयावर पक्षश्रेष्ठींशी बोलू शकता. आमची तुम्हाला पूर्ण परवानगी आहे.’ त्यानंतर शंकररावांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावर नंदा यांनी जॅक कंपनीकडे जमीन कायम ठेवण्याच्या निर्णयात बदल होणार नाही, हे स्पष्ट केले. शंकररावांना हे अनपेक्षित होते, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान पंडित नेहरुंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. नेहरूंची भेट घेऊन त्यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यामुळे नेहरू प्रभावित झाले. शंकररावांची भूमिका न्याय्य असल्याचे नेहरूंच्या लक्षात आले. त्यामुळे पुढच्या सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने घडल्या. जॅक कंपनीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अखेर बदलावा लागला. शंकररावांच्या जिद्दीमुळे यशवंतरावही प्रभावित झाले. मुख्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांचा विरोध पत्करून एका उपमंत्र्याने थेट पंतप्रधानांशी संवाद साधून आपली भूमिका त्यांच्या गळी उतरवणे सोपी गोष्ट नव्हती. परंतु शंकररावांनी ते करून दाखवले. (आज अशोकरावांच्या काळात असे काही जमिनीचे प्रकरण असते तर त्यांनी आपले सारे मेहुणे, पाहुणे, साडू आणि सासुरवाडीतला गोतावळा जॅकच्या जागेत वसवला असता.)
शंकररावांशी संबंधित आणखी एक उदाहरण आहे. ते या काळात ते मुख्यमंत्री होते. फेब्रुवारी ला त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर बंगला गेला, तेव्हा मुंबईत साधे घरही नसलेल्या शंकररावांनी कुटुंब नांदेडला पाठवण्याचा विचार सुरू केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांना एक फ्लॅट मिळाला, तो केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्यामुळे दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ तेथे राहता येणे शक्य नव्हते. दहा महिन्यांनी त्यांची पुन्हा घराची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर आमदार निवासाच्या एकाच खोलीत त्यांनी सहा महिने काढले. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तिला मुंबईत राहायला घर नव्हते, यावर आजच्या काळात कुणाचा कुणाचा विश्वास बसणार नाही. शंकरराव हे एकमेव उदाहरण नाही. पंतप्रधानपद भूषवलेल्या मोरारजी देसाई यांचेही मुंबईत घर नव्हते. आजच्या काळात या उदाहरणांना दंतकथांचे मोल आहे.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी कारभार सुरू केल्यानंतर त्यांच्या भाटांनी लगेच ‘ज्युनिअर हेडमास्तर’ असे त्यांचे बारसे करून टाकले. आपल्याकडे विशेषणे लावणाऱ्या प्रतिभावंतांची कमतरता नाही. त्यामुळे सुमारांनाही मोठमोठी विशेषणे किंवा पदव्या लावून त्या पदव्यांची बदनामी केली जाते. आदर्श सोसायटीत अशोकरावांनी सासुरवाडीच थाटली हा त्यांचा पहिला आणि एकमेव अपराध नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते कशाचीही पर्वा न करता अतिशय बेबंदपणे कारभार करीत आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अमिताभ बच्चनसोबत बसायला लागू नये म्हणून घाबरून आदल्याच दिवशी संमेलनाला जाताना त्यांनी पळपुटेपणा दाखवला आणि हसे करून घेतले. विश्वकोश निर्मिती मंडळ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. अशोक चव्हाण सांस्कृतिक कार्यमंत्री असतानाच या मंडळाच्या प्रतिष्ठेचे तीन-तेरा वाजायला सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मंडळाच्या ऱ्हासाकडे डोळेझाक केली. साहित्य संस्कृती मंडळाची फेररचना झाली परंतु विश्वकोश मंडळाची दुरुस्ती करायला ते अद्याप धजावलेले नाहीत. सांस्कृतिक धोरण जाहीर केले, परंतु ते अद्याप कागदावरच आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. अन्य मंत्र्यांच्या फाईली अडवताना आपण कठोर प्रशासक असल्याचा आभास त्यांनी निर्माण केला, परंतु प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार कसा आहे, याचे दर्शन आदर्श सोसायटीच्या निमित्ताने घडले आहे. प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर दिल्लीत सोनिया गांधींपुढे बाजू मांडण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन गेले. आणि आपण बुडणार असू तर आपल्या स्पर्धकांनाही घेऊन बुडू, असे ठरवून आदर्शच्या फाईलवर कुणीकुणी सह्या केल्या, त्याचा पाढा वाचला. मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय काहीही होऊ शकतो. ते जातील किंवा राहतीलही. अशोकराव चव्हाणांचा एकूण व्यवहार मात्र मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा कमी करणारा आहे.

Monday, November 1, 2010

महाराष्ट्राची साहित्य अकादमी

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर, वैचारिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणारा एक शक्तिशाली नवा प्रवाह भारतीय जीवनात निर्माण झाला असून आपण एका समृद्ध अशा कालखंडात प्रवेश करीत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्ध करण्याची जी प्रतिज्ञा देशाने केली तिचाच हे पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळे या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी आम्हाला एक नवे साधन प्राप्त झाले आहे. यापुढे आता एक निश्चित कालखंड सुरू होत असून या क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण पुऱ्या केल्या पाहिजेत. या जबाबदाऱ्या स्पष्ट करून त्या पार पाडण्यासाठी निश्चित अशी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे, असे मला वाटू लागले आणि त्यातूनच या मंडळाची कल्पना निर्माण झाली. साहित्य अकादमी ही अशाच प्रकारची संस्था असून ती साली अस्तित्वात आली. वेगवेगळ्या भाषेतील दुर्मिळ ग्रंथ प्रसिद्ध करणे, इतिहासाचे, वाड्.मयाचे आणि निरनिराळ्या संस्कृतीचे संशोधन करणे यासारखे विविध स्वरुपाचे कार्य ही संस्था करीत असते. साहित्य अकादमीसारखेच व शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक व्यापक स्वरुपाचे कार्य या मंडळाकडून व्हावे, या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे.’
..
‘या मंडळाने कोठल्या प्रकारचे काम करावे, हे कोणत्या पद्धतीने करावे यासंबंधी कुठलेही बंधन, कुठलीही मर्यादा शासन या मंडळावर घालू इच्छित नाही.’
..
‘हे मंडळ वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रकाशन खाते व्हावे, असे नव्हे. तर एक प्रकारचे सर्जनशील आणि विचार करणारे हे मंडळ पॉवर हाऊस बनावे, विद्युतगृह बनावे, अशी या मंडळासंबंधीची माझी अपेक्षा आहे. हे मंडळ महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारे माध्यम बनावे अशी माझी त्याबद्दलची कल्पना आहे.’
..
महाराष्ट्र सरकारने 19 नोव्हेंबर 1960 रोजी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणातील ही अवतरणे आहेत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन आणि प्रकाशन यांना उत्तेजन देणे हा मंडळाचा मुख्य उद्देश होता.
यशवंतरावांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यात मंडळाला कितपत यश आले? मंडळाच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीकडे बारकाईने पाहिले अनेक बाबी दिसून येतात. भाषा-संस्कृतीच्या क्षेत्रात मंडळाने केलेले काम मोठे आहे, परंतु मंडळ मार्केटिंगमध्ये कमी पडले.
नवलेखक अनुदान योजना ही मंडळाची एक महत्त्वाची योजना आहे. परंतु साहित्य क्षेत्रातील बडय़ा धेंडांनी अनुदानाची खिरापत म्हणून या योजनेची सतत टवाळी केली आणि साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे केवळ नवलेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देणारे मंडळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. या योजनेतून काही सुमार पुस्तके निघाली. परंतु ज्या काळात ही योजना सुरू झाली त्या काळाच्या पातळीवर विचार केला तर त्या पुस्तक निघण्याचे महत्त्व लक्षात येईल. पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाचा आज मोठा विस्तार झाला असून कुणीही आपले पुस्तक स्वखर्चाने प्रकाशित करू शकतो. किंवा प्रकाशकही सुमार पुस्तकांची रद्दी छापत असतात. परंतु पंचवीसेक वर्षापूर्वीचा काळ विचारात घेतला तर पुस्तक प्रकाशित करण्याबाबत कमालीचे अज्ञान होते. त्या काळात मंडळाने अनेक हस्तलिखितांना छापील अक्षरांचे भाग्य मिळवून दिले. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील खेडय़ापाडय़ातील लेखकांची पुस्तके या योजनेत प्रसिद्ध झाली. साहित्य क्षेत्रात प्रस्थापित बनलेल्या अनेक साहित्यिकांचे पहिले पुस्तक तसेच अनेक महत्त्वाची पुस्तके मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. उदाहरणादाखल नावेच घ्यायची तर प्रतिमा इंगोले, आनंद नाडकर्णी, वाहरू सोनावणे, उर्मिला पवार, संजय पवार, लालू दुर्वे, इं्रजित भालेराव, द. भा. धामणस्कर, सुकन्या आगाशे, विश्वनाथ शिंदे, रामचं्र पठारे, नीरजा, अरुण काळे यांची घेता येतील. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ किंवा बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमचं’ ही पुस्तके मंडळाच्या अनुदानातूनच प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय मंडळाने नवलेखकांना मार्गदर्शनासाठी पासून कार्यशाळा घेतल्या जातात. नव्याने लिहिणाऱ्यांना दिशा देण्यामध्ये या कार्यशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आजचे अनेक नामवंत लेखक या उपक्रमाचा कृतज्ञतेने उल्लेख करतात. मंडळाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ चा संक्षिप्त मराठी अनुवाद, पाश्चात्य रोगचिकित्सा, रस-भाव विचार, धर्मशास्त्राचा इतिहास, नामदेव गाथा, एकनाथी भागवत, कौटिलीय अर्थशास्त्र, भाषाशुद्धी, आगरकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट आदींचे समग्र वाड्.मय अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश आहे. अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाड्.मय अवघ्या रुपयांत मंडळाने उपलब्ध करून दिले. त्याआधी महात्मा जोतिराव फुले यांचे समग्र वाड्.मयही अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले, त्याच्या खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या. वाड्.मयकोश, शब्दकोश तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोशांची निर्मिती हे मंडळाचे मोठेच योगदान आहे. मंडळावर आणि मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना या बाबी विचारात घेतल्या तर संबंधितांच्या टीकेची धार आपोआप कमी होईल. विश्वकोशाची निर्मिती ही साहित्य संस्कृती मंडळानेच सुरू केली आणि बऱ्याच कालावधीने विश्वकोश मंडळ वेगळे करण्यात आले, हेही लक्षात घ्यावे लागते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या प्रकांड पंडिताकडे मंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे यशवंतरावांची दूरदृष्टी होती. तर्कतीर्थानी मंडळाची घडी बसवली आणि दिशाही दिली. अर्थात मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्त्या राजकीय पातळीवर होत असल्यामुळे काहीवेळा वादही निर्माण झाले. एका पुस्तकावरून अकारण वाद निर्माण केल्यामुळे प्राचार्य रा. रं. बोराडे यांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु बोराडे यांच्या काळातच मंडळाच्या कारभाराला खऱ्या अर्थाने शिस्त आली, हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांनी मंडळ अधिक लोकाभिमुख बनवले. कर्णिक यांच्या काळातच मंडळाने उपक्रमांची व्याप्ती वाढवली, अनेक नवनवे उपक्रम सुरू केले. नव्या योजना आखल्या आहेत. शब्दकोश आणि विज्ञानकोशाच्या सीडी पासून ग्रामीण जीवन कोश, प्रमाण भाषा कोश, सणांचा कोश, बोलीभाषेचा प्रकल्प, मराठी शब्द व्युत्पत्ती कोश हस्तकलांचा माहिती कोश तयार करण्याबरोबरच वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठीही काही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. अन्य भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्याचे प्रयत्न आतार्पयत झाले आहेत,त्याला गती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठीतील दर्जेदार साहित्याचा अन्य भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. हा प्रकल्प गांभीर्याने राबवला तर मराठी साहित्याच्या वैश्विकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होईल. साहित्य अकादमी ज्याप्रमाणे लेखकांना प्रवासासाठी अभ्यासवृत्ती देते, तशी अभ्यासवृत्तीही सुरू करण्यात येणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशने एवढी मौलिक आहेत, परंतु ती वाचकांर्पयत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. ही पुस्तके मिळवण्यासाठी शासकीय ग्रंथागारामध्ये जावे लागते. आणि शासकीय ग्रंथागारे मोजकीच आणि फारतर जिल्ह्याच्या ठिकाणी, तीही गावाबाहेर असल्यामुळे लोक तिथर्पयत जात नाहीत, परिणामी मौलिक पुस्तके धूळ खात पडतात. बदलत्या काळात व्यावसायिक पद्धतीने या प्रकाशनांचे वितरण करण्याचा मार्ग चोखाळला पाहिजे. कुठल्याही पुस्तकाच्या दुकानांतून ती उपलब्ध झाली तरच अधिकाधिक वाचकांर्पयत पोहोचतील. आगामी काळात सरकारी बंधने ओलांडली तर मंडळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि वाचकाभिमुख होईल. साहित्य अकादमीचे नाव ज्या आदराने घेतले जाते, त्याच आदराने साहित्य संस्कृती मंडळाचे नाव घेतले जाईल. महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक विश्वाचे नेतृत्व मंडळाकडे येईल.

Friday, October 29, 2010

गृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अवस्था ‘गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळण्याला’ अशी झाली आहे. एखाद्या व्यक्तिच्या मागे कुणी कुणी काय काय लावून द्यावे? साऱ्यांच्या नजरेत खुपणारे गृहखाते त्यांच्याकडे आहे. तासगावच्या एस. टी. स्टँडवर एखाद्याचा खिसा कापला, कुठे जातीय तणाव पसरला किंवा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला..असे काहीही घडले तरी त्यासाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरले जाते. अर्थात मंत्र्यांनी वेशांतर करून धाडसाने काळाबाजार उघड केल्याची किंवा डान्स बारची पाहणी केल्याची उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी तासगाव-सांगलीच्या स्टँडवर वेशांतर करून पाकिटमारांना पकडून द्यावे, अशी अपेक्षा कुणी केली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. आणि अत्यंत गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईचे त्याहीपेक्षा गुप्त पद्धतीने चित्रण एखाद्या वृत्तवाहिनीने केले तरीही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जमानाच तसा आहे. आर. आर. पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर ‘माझे तुमच्यावर लक्ष आहे’ असे नमूद करून कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी (पुराव्यानिशी) आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आपल्या कार्यालयाचा आणि घरचा पत्ता, दूरध्वनीही दिले आहेत. माझे तुमच्यावर लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले असले तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्यावरच कुणीतरी लक्ष बारीक लक्ष ठेवून असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरज येथे झालेल्या शिबिरात व्यासपीठावर त्यांच्यामागील खुर्चीवर खुनाचा आरोप असलेला नगरसेवक राजू गवळी येऊन बसला. लक्षात आल्यामुळे त्याला तेथून घालवून देण्यात आले, परंतु तोवर त्याचा बोभाटा झाला होता. मुलाने मांडीवर घाण केली म्हणून आई-बाप मांडी कापून टाकत नाहीत, तेवढे कनवाळू मन आबांच्याकडे आहे. परंतु मेणाहूनि मऊ असणाऱ्या आबांच्याकडे कठिण वज्रासही भेदण्याचा कणखरपणा आहे. म्हणूनच आपल्या शेजारी गुन्हेगाराला बसवण्यामागे षड्.यंत्र असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही, असा खरमरीत इशारा दिला. त्यामुळे बाकी काही होवो न होवो, आबांच्या नावावर आणखी एक ‘इशारा’ जमा झाला. सावकारांना कोपरापासून ढोपरार्पयत सोलून काढू, हुंडा घेणाऱ्याची पोलिस ठाण्यार्पयत वरात काढू आणि संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही..खरेतर आबांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लागण्याचे फारच मनावर घेतलेले दिसते. म्हणूनच मुंबईतील इफ्तार पार्टीतील दृष्यांपाठोपाठ मिरजेतील हा प्रकार घडल्यामुळे हेतूपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा संशय बळावत आहे. वृत्तवाहिन्यांना असे फुटेज मिळायचा अवकाश की, लगेच ब्रेकिंग न्यूज झळकायला लागतात आणि संबंधिताची इमेज पार ब्रेक होऊन जाते. वस्तुस्थितीची शहानिशा न कळता गुन्हेगार गृहमंत्र्यांच्या शेजारी बसला किंवा दिसला म्हणजे त्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा देखावा प्रसारमाध्यमांमधून उभा केला जातो. वेळ कोणती आहे, ठिकाण कोणते आहे, संबंधितांचा एकत्र येण्याचा हेतू काय आहे अशा अनेक बाबींची शहानिशा केल्याशिवाय असा निष्कर्ष काढणे संबंधितांवर अन्याय करण्यासारखे असते. त्याचा विचार न करता प्रसारमाध्यमे वारंवार या मार्गाचा अवलंब करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
गुन्हेगारांनी आपल्या आसपास फिरकू नये यासाठी आर. आर. आबांनी पोलिस यंत्रणाच कामाला लावलेली दिसते. ते स्वाभाविकही आहे. गृहमंत्र्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या साऱ्याच लोकांची माहिती असते असे नाही. असली तर काही बिघडणार नाही. परंतु अनेक प्रकारच्या व्यापा-तापांतून अशी माहिती ठेवण्याची अपेक्षा बाळगणे जरा अतिच होईल. मात्र संबंधित हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि गुन्हेगारांची सावलीही गृहमंत्र्यांवर पडू नये, याचा बंदोबस्त केला पाहिजे. मुंबई आणि मिरजेती घटनांमुळे सावध झालेल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना तशी तंबी केल्यामुळे पोलिस भलतेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी ‘नो क्राईम’ पास हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. सांगली पोलिसांनी तसे पास काढले असले तरी ती त्यांच्या पातळीवर केलेली उपाययोजना आहे, की आर. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार केलेली कार्यवाही आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आर. आर. पाटील यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगवर ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याच्याशीच ते विसंगत ठरेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वृत्तांत प्रसारमाध्यमांना पुरवणाऱ्या सहकारी मंत्र्यांचा समाचार घेतल्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मंत्रालयात बिल्डरना थेट प्रवेश मिळतो, उद्योजकांना पायघडय़ा घातल्या जातात. पण सामान्य माणसाला? यात मी कुणालाही दोष देत नाही. मी स्वत:सुद्धा याच व्यवस्थेचा भाग आहे व तितकाच दोषीसुद्धा. जनता सार्वभौम आहे याची प्रचिती सध्या तलाठी - पोलिस शिपायांपासून कलेक्टर्पयत कुठेतरी येताना दिसते का?’
आर. आर. पाटील यांनी वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले आहे. परंतु गुन्हेगारांची सावली पडू नये म्हणून सामान्य माणसांना त्यांची भेट घेण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार असेल तर मात्र ते गंभीर आहे. इफ्तार पार्टीतील गुन्हेगारांची संगत हा आर. आर. पाटील यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचा गलथानपणा होता. मिरजेतील प्रकार हे षड्.यंत्र होते असे मानले तरी आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्याने असल्या गोष्टींची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असाल आणि तुमचा हेतू शुद्ध असेल तर कोण काय फुटेज दाखवते आणि कुणाला काय वाटते याची चिंता करण्याचे कारण नाही. इतकी काळजी करायला लागलात तर घरात किंवा मंत्रालयात कोंडून घेऊन काम करावे लागेल. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आज गृहखाते आहे म्हणून पोलिसांना आपल्याभोवतीच्या लोकांचा बंदोबस्त करायला किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगू शकता. उद्या दुसऱ्याच कुठल्या खात्याचे मंत्री असाल तर काय करणार? राजकारणात एवढा प्रवास झाल्यानंतर भावनेच्या बळावर कुठलाही निर्णय घेणे हे प्रगल्भपणाचे लक्षण नव्हे. गुन्हेगारांना घाबरून जेवढे लांब पळाल, तेवढे गुन्हेगार तुमच्यामागे सोडले जातील, एवढे तुमचे विरोधक आणि हितचिंतक सक्षम आहेत. म्हणून बाकी काही करण्यापेक्षा गुन्हेगारांना तुमची आणि तुमच्या पोलिसांची जरब वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे अधिक परिणामकारक आणि लोकहिताचे ठरेल. पुन्हा पोलिसांचे कवच घेऊन भुरटय़ा गुन्हेगारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हालही. पण उद्या खासदार पद्मसिंह पाटील यांच्या मांडीला मांडी लावून तुमचे साहेबच बसतील तेव्हा तुम्ही त्या व्यासपीठावर जाणार की नाही? पप्पू कलानी, हितें्र ठाकून वगैरे समाजसेवक लोकांचे किंवा बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न घेऊन आलेत तर त्यांना भेटणार नाही का? दीपक मानकर यांच्यासारख्या लोकनेत्याने पुण्यात कधी एखाद्या समारंभात गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ढकलून देणार का? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता येणार नसतील तर मग सामान्य माणसांनाच भेटीसाठी पोलिसांचा अडथळा का? असेच चालू राहिले तर सामान्य माणसांपासून तुटत जाल आणि पायाखालची जमीन कधी निसटली हेसुद्धा कळणार नाही.

Wednesday, October 27, 2010

कंदिलाचे दिवस

‘जत्रा’ साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा प्रा. व. बा. बोधे यांची धारावाहिक कादंबरी हा त्यातील वाचकप्रिय भाग होता. त्यांच्या या कादंबरीसाठी काढलेली चित्रे दिलखेचक असायची. कादंबऱ्या वरकरणी साप्ताहिकाच्या प्रकृतीला साजेशा, थोडय़ाशा श्रंगारिक वळणाने जाणाऱ्या असाव्यात असे चित्रावरून वाटायचे. आणि वाचक त्याकडे वळायचा. मात्र प्रत्यक्षात या कादंबऱ्यांमध्ये गावकुसाबाहेरच्या भटक्यांच्या जगण्याचं चित्रण असायचं. त्यात कधी एखादी प्रेमकहाणी यायची. ती प्रा. बोधे यांच्या शैलीने अशी काही खुलवलेली असायची की वाचणारा त्यात अडकून जायचा. गोष्टीवेल्हाळ शैलीमुळे बोधे यांचे लिखाण कधी कंटाळवाणे वाटले नाही. आपल्या वाड्.मयीन संस्कृतीत लोकप्रिय लेखकाकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. बोधे यांनी ‘जत्रा’ मधून केलेले लेखन आणि त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता यामुळे त्यांच्या साहित्याकडे समीक्षकांनी गंभीरपणे पाहिले नाही. कोणत्याही ग्रामीण साहित्यिकापेक्षा बोधे यांनी केलेले ग्रामजीवनाचे चित्रण अधिक प्रभावी आणि गावगाडय़ाला व्यापकपणे कवेत घेणारे आहे. गाव, गावगाडा, बलुतेदारी, दलित जीवन आणि गावाबाहेरच्या भटक्यांचे जगणे असे सगळे बोधे यांच्या साहित्यात येते. मात्र बोधे कुठल्या साहित्यिकांच्या, समीक्षकांच्या किंवा चळवळीच्या कंपूत शिरले नाहीत. त्यामुळे त्यांचे साहित्य दुर्लक्षित राहिले. लोकप्रियता मिळाली तरी समीक्षकांची मान्यता मिळाली नाही. मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘कोकरउडय़ा’ हे आत्मचरित्रही अत्यंत वेगळ्या प्रकारचे असूनही त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.
‘कंदिलाचे दिवस’ हे बोधे यांचे अलीकडील ललितगद्य. मराठीत ललितलेखन म्हणजे छोटय़ा छोटय़ा ललितलेखांचे संकलन असे स्वरुपाचे आहे. परंतु ललितगद्याची रूढ संकल्पना ओलांडून हे पुस्तक पुढे जाते. कादंबरीप्रमाणे एकाच विषयावरील दीर्घ ललितलेखनाचा हा प्रयोग त्याअर्थानेही वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल असा आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ग्रामीण जीवनाचे आणि लोकसंस्कृतीचे आरस्पानी दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. कंदिलाचे दिवस म्हणजे हरवलेल्या संपन्न ग्रामजीवनाचा कलात्मक शोध आहे. आज चाळिशीत असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या खेडय़ात वाढलेल्या कुणाही व्यक्तिला स्वत:चेच अनुभवविश्व वाटावे आणि त्यात हरवून जावे. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी ते खुलवून खुलवून सांगतात. या आठवणी सांगता सांगता खेडय़ातल्या जीवनावर मार्मिक भाष्य करतात. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी सांगताना स्वाभाविकपणे बोधे बालपणातल्या आठवणींमध्ये हरवून जातात. स्वत:चं घर. दार्रिय़ातल्या जगण्याचा संघर्ष, अडचणीच्या काळात एकमेकाच्या मदतीसाठी धावून येणारे साधे-भोळे गावकरी, समूहजीवनातला जिव्हाळा हे सारं येतं. ‘वाहत्या प्रवाहात चांदणं पडावं तसं पन्नास वर्षापूर्वीचं जगणं माझ्या रक्तवाहिन्यांत खोलवर पसरलं आहे. आजही तो ग्रामीण समाज मला लख्ख दिसतो. कंदिलाच्या प्रकाशातली लोकवर्तुळ मनाच्या गाभाऱ्यात जमा होत..अंधाराला मागे सारत झेपावणाऱ्या प्रकाशरेषा स्पष्ट दिसू लागतात..’ असं प्रारंभीच्या निवेदनात स्पष्ट करतानाच बोधे म्हणतात, ‘पन्नास वर्षापूर्वी गावागावात अंधार होता. पण माणसांची मनं प्रकाशाने तेजाळली होती. बापलेक प्रेमाने जगत. मायलेकीत अगत्य होतं. भाऊबहिणींत जिव्हाळा होता. घरांची आडी एकमेकांना बांधली होती. लेकरू जपल्यासारखं प्राण्यांना जपत. आता काळ बदलला. जगण्याची समग्र परिमाणं बदलली. प्रकाशाचे काचवर्तुळ हरवले. हे वर्तुळ फार लहान होते. पण सुखी होते. वर्तुळ विकसित झाले. माणसे हरवत गेली..’
अंधार पडला की घराघरात दिवे, कंदिल लावले जात. या कंदिल लावण्याचा सोहळा बोधे इतक्या तपशीलाने आणि बारकाव्यांनीशी सांगतात की, ते चित्र डोळ्यासमोर हुबेहुब उभं राहतं. ते लिहितात, ‘पूर्वी दिवा लावणं, कंदील लावणं हा सोहळा असायचा. जीवनाचे अनेक उन्हाळे, पावसाळे अंगावर झेललेल्या आईभोवती, आजीभोवती पोरी कोंडाळं करून बसत. मग राख यायची. फडकं यायचं. वात ढकलायला काडी यायची. रॉकेलची बाटली नि नाळकं यायचं. बाटलीची दोरीसुद्धा अंगाचा आकडा करून ताठ उभी राहायची. मग आई, आजी राखेनं काच घासायची. पोरी फडक्यानं कंदील पुसायच्या. कंदिलाचे खांदे, डोकं, कडी, काचेची जाळी काळजीपूर्वक पुसायची. मग आजीच्या हातातलं फडकं कंदिलावर पुन्हा फिरायचं. पोरींचे नाजूक हात काचेवर फिरत. काचेत डोळे घालून पोरी हसत..आजीच्या हातातलं काम हळुहळू पोरींच्या हातात जाई. प्रत्येक पोरगी प्रत्येक काम मन:पूर्वक करे. मग कंदिलात हळवार रॉकेल ओतलं जाई. शेजारचा दिवा अशावेळी उपयोगी पडे. दिव्याच्या पिवळ्याजर्द उजेडात चिमणे देह उजळून निघत. परकरी पोरींच्या चेहऱ्यावर वेगळी प्रभा फाके.’
कंदिलाबद्दल आणि कंदिलाच्या दिवसांबद्दल सांगताना बोधे दिव्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती देतात. दारावर पत्र्याचा करून घेतलेला दिवा, विकतची नाजूक चिमणी, सुं्री याबद्दल तपशीलवार सांगतात. प्रभाकर कंदिलाबद्दल सांगतात. लग्न समारंभात मिरवणाऱ्या मेंटल बत्तीभोवतीच्या गोष्टी रंगवून सांगतात. सांगता सांगता कधी आधुनिक संदर्भ देतात. विकत घेतलेल्या चिमणीच्या आकारासंदर्भात ते लिहितात, या चिमण्या मोठय़ा देखण्या असत. आकार फ्यूएल व्होडकाच्या बाटलीसारखा, वर निमूळता होत गेलेला..
कंदिलाचं अस्तित्व ठळकपणे जाणवायचं ते रानात. वस्तीवस्तीवर चमकणारा कंदिलाचा पिवळाधम्मक ठिपका कुठूनही नजरेत भरायचा..असं चित्रमय शैलीतलं वर्णन पुढे नेताना बोधे लिहितात, ‘ वीज नसलेला तो काळ. माणसं सुगीच्या दिवसांत रानामाळात वस्ती टाकत. खळं सारवून स्वच्छ करत. भाकरीचा नैवेद्य तिवडय़ाजवळ पुरत. कणसाच्या शेजऱ्यावर झोपत. बैलं जवळच बांधावरच्या झुडपांना गुंतवत. हिरवं कडवाळ बैलं चवीनं खात. अशावेळी एकुलता एक कंदील देवाच्या डोळ्यासारखा वस्तीवर जागत राहायचा.’
कंदिलाभोवतीच्या रानातल्या आठवणी, शाळेची कलापथकं, तमाशाचे फड, गावातल्या पारावरच्या गप्पा, नाटकाच्या रंगणाऱ्या तालमी, अभ्यासात जागणाऱ्या रात्री, अशा कितीतरी गोष्टींबद्दल बोधे गोष्टीवेल्हाळ सांगत राहतात. कंदील घेऊन खेकडी धरायला गेलेल्या आठवणी येतात. माळावरच्या भटक्यांच्या पालातला मिणमिणता दिवा आणि नंतरचे त्यांच्या अंधारभरल्या आयुष्याचं चित्रण करतात. कधी नर्मविनोदी शैली, कधी गोष्टीवेल्हाळ वर्णन कधी कधी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरही जाते. गावात वीज आल्यानंतरच्या काळाबद्दल ते लिहितात, ‘माझ्या घरात वीज यायला तब्बल नऊ र्वष लागली. वीज आल्यानं एक झालं, दार्रिय आणखी स्वच्छ रुपात दिसायला लागलं. मधल्या अंधारयुगात चुलीवरच्या दिव्यानेच आम्हाला साथ दिली.’
दिव्याखालच्या अंधारातलं गावातल्या दार्रियाचं चित्र उभं करताना बोधे लिहितात, ‘घरात रॉकेलचा डबा बाळगणारे तुरळक श्रीमंत गावात होते. घरोघर रॉकेलची बाटलीच असायची. काळपटलेल्या जाड काचेच्या बाटलीली दोरी बांधलेली असायची. माणसं रॉकेलसुद्धा पुरवून पुरवून वापरत. काही बायका तर दिवा किंवा कंदील घेऊनच दुकानात जात. त्यात चार आण्याचं रॉकेल टाकून आणत. बाटलीभर रॉकेल घ्यायला पैसे तर हवेत. आहे त्या तुटपुंज्या संसारात कशातरी गरजा भागवायच्या. माझी आई तर चुलीतल्या जाळावरच प्रकाशाची गरज भागवायची. चुलीत चघळ सारायचं. जेवायला ताटं वाढायची. चार काटक्या एका हाताने चुलीत सरकवायच्या. त्या प्रकाशात जेवण उरकायचं.’
भूतकाळतले सारेच रम्य होते असे नाही, तर अनेक वाईट गोष्टीही होत्या. त्याबद्दल बोधे लिहितात, कंदिलाच्या दिवसांत सगळंच चांगलं होतं, असं मी म्हणणार नाही. तेव्हाही उलाढाली करणारे राजकारणी होतेच. फौजदाराला हाताशी धरून गावावर डोळे वटारणारे महाभाग होतेच. केवळ पायलीभर धान्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालणारी माणसं होती. इनामदाराने दिलेल्या एक किलो वांग्यासाठी भर दिवसा त्याला भोग देणाऱ्या बायका होत्या..
कंदिलाच्या भोवतालचे भावविश्व चितारतानाच बोधे खेडय़ातल्या बदलत जाणाऱ्या वास्तवाचे चित्रणही करतात. हे बदलते वास्तव इतके अस्वस्थ करणारे आहे की त्याबद्दल फक्त निरीक्षणे न नोंदवता आसूडासारखे फटकारे लगावतात. त्यामागची तळमळ आणि तगमग शब्दाशब्दातून जाणवते. बदलत्या वास्तवाने ते अस्वस्थ होतात.
वीज नसलेल्या काळातल्या अंधारयुगातल्या माणसांच्या मनातल्या उजेडाच्या गोष्टी सांगता सांगता ते वीज आल्यानंतर मनामनांत दाटलेल्या अंधाराचा समाचार घेतात. खेडय़ातल्या बदलत्या वास्तवाचा वेध घेताना केवळ आठवणी आणि गोष्टींपुरते मर्यादित न राहता चिंतनशील वृत्तीने बदलत्या काळाचा धांडोळा घेतात. राजकारणाने नासवलेल्या खेडय़ातल्या सामाजिक पर्यावरणाचा पोटतिडकीने वेध घेतात. दार्रिय़, अज्ञान आणि जन्मभर अखंड कष्टात होरपळूनही आपल्या संपन्न नैतिक जाणिवा जपणारा समाज या पुस्तकाच्या रुपाने प्रा. व. बा. बोधे यांनी अजरामर केला आहे. गेल्या पन्नास वर्षातले खेडय़ातले वास्तव जाणून घ्यायचे असेल तर ‘कंदिलाचे दिवस’ वाचायलाच हवेत.

Tuesday, October 26, 2010

डॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..!

सरकारी कामं सुलभतेनं व्हावीत म्हणून निर्माण केलेली एक खिडकी योजना ही अलीकडच्या काही वर्षातील आहे. परंतु महसूल खात्यात आलेल्या एका नवख्या अधिकाऱ्यानं सुमारे 22 वर्षापूर्वी ती सुरू करून एक नवा पायंडा सुरू केला होता. संजय राडकर असं त्या अधिकाऱ्याचं नाव. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तहसीलदार कार्यालयाइतकी सामान्य माणसांची नाडणूक अन्यत्र कुठे क्वचित होत असेल. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात सरकारी कामकाज म्हणजे लोकांना शिक्षाच होती. कारण तालुक्याच्या ठिकाणी कुठूनही यायचं तर आधी बरंचसं अंतर चालत यायचं आणि मग मिळेल त्या वाहनानं पोहोचायचं. म्हणजे एक पूर्ण दिवस मोडल्याशिवाय तहसीलदार कार्यालयात येणंच होत नाही. तिथं आल्यावर तिथल्या कारकून मंडळींकडून होणारी अडवणूक बोलायलाच नको. कुठल्याही दाखल्यासाठी महिनो न महिने चकरा माराव्या लागत. मोठय़ा साहेबाकडं जाऊन तक्रार करण्याचंही धारिष्टय़ नसायचं. महसूल खात्यातली पहिलीच नोकरी होती. दाखल्यासाठी लोकांची होणारी अडवणूक राडकरांना जाणवल्यावाचून राहिली नाही. त्यांनी त्यावर असा काही उपाय शोधून काढला, की एका फटक्यात लोकांची दाखले मिळण्याची समस्या दूर झाली.
तहसीलदार कार्यालयाकडून जे दाखले दिले जातात, त्यांची एक यादी केली. प्रत्येक दाखल्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात, त्याची यादी लिहिली. कोणता अर्ज कोणत्या दिवशी कोणत्या खिडकीत द्यायचा याची सूचना लिहिली. आणि तो दाखला कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत, कोणत्या खिडकीत मिळेल अशा साऱ्या सूचना लिहिल्या. आणि लोकांचा कारकूनांशी थेट संपर्क तोडून टाकला. ठराविक दिवशी ठराविक खिडकीत अर्ज द्या आणि ठराविक दिवशी दाखला घेऊन जा, एवढी साधी सिस्टिम घालून दिली.
गोष्ट अगदी छोटीशीच होती, परंतु कारकूनी पातळीवरचा मोठा भ्रष्टाचारच संपवून टाकला.


त्यानंतर कोल्हापूर चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून आले. मोरेवाडीच्या माळावर भूतबंगल्याप्रमाणे भकासपणे चित्रनगरी उभी होती. चित्रीकरणाची सामुग्री होती, ती भाडय़ानं दिली जात होती. बाकी एकराच्या माळावर काहीच होत नव्हतं. त्या माळावर काहीतरी हालचाली सुरू व्हाव्यात यासाठी राडकरांनी प्रयत्न सुरू केले. पाण्याची योजना तयार केली. चित्रीकरणासाठी स्टुडिओची उभारणी सुरू केली. उद्यान, पोलिस ठाणे अशा मराठी चित्रपटांसाठी लागणाऱ्या गोष्टी प्राधान्याने तयार करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेलेल्या चित्रनगरीत जीव भरण्याची चिन्हे दिसत असतानाच राडकरांची बदली झाली आणि पुन्हा चित्रनगरीला मरणकळा आली. कारण सरकारनं तिथं कायमस्वरुपी अधिकारी कधीच नेमला नाही. कोल्हापूर शहरातील कुठल्या तरी उपजिल्हाधिकाऱ्याकडं त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवायचं धोरण ठेवलं. तो अधिकारी पगारपत्रकावर सह्या करण्यापुरता येत असे. चित्रनगरीत प्राण फुंकण्याचं राडकरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.


सांगली जिल्ह्यातील विटय़ाला ते प्रांताधिकारी होते. तिथं असताना त्यांनी रॉकेलच्या काळाबाजाराला चाप लावला. त्यांच्या अधिकारपदाच्या काळातच विटय़ातील अतिक्रमण निर्मूलनाचा विषय आला. त्यांनी सारी अतिक्रमणं हटवण्याचा निर्धार केला. त्यासंदर्भातील सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नोटिसा दिल्या आणि अतिक्रमण निर्मूलनाची तारीखही ठरवली. ज्यांनी अतिक्रमणं केली होती, ते लोक कोर्टातून स्टे मिळवणार हे गृहित होतं. आणि त्यामुळं मोहीम थांबवावी लागू नये याची तयारी राडकरांनी केली होती. त्यादिवशी त्यांनी कोर्टात आपला एक माणूस बसवला. कोर्टात जे जे म्हणून काही प्रकरण येईल, त्याला कॅव्हेट दाखल करायला सुरुवात केली. कुठलंही प्रकरण असूदे. चुकून एखाद्यानं अतिक्रमण निर्मूलनाला स्टे मिळवू नये, हा त्यामागचा उद्देश. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. आणि कुठलाही स्टे येण्याआधी त्यांनी अतिक्रमणं हटवून टाकली. इच्छाशक्ती असेल तर अधिकारी काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणून याकडं पाहता येतं.


कोल्हापूर जिल्ह्यात करवीर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रांताधिकाऱ्याला तलाठय़ांशी खूप जमवून घेऊन काम करावं लागतं. तलाठय़ांना हाताळण्याइतकं कठीण दुसरं काही नसतं. महसूल खात्यातील सर्वसाधारण पद्धत अशी की, वांड तलाठय़ांना वठणीवर आणायच्या भानगडीत कुठला अधिकारी पडत नाही. उलट त्यांना हाताशी धरून सारे व्यवहार केले जातात. असे तलाठी अधिकाऱ्यांच्या खास गोटातले असतात. त्यांच्याशिवाय त्या कार्यालयातलं कुठलंही पान हलत नसतं. राडकरांनी चार्ज घेतल्यानंतर तलाठय़ांचा अभ्यास सुरू केला. काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच गावात होते. त्याना कुणी हलवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि जेव्हा जेव्हा हलवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी थेट मंत्रालयातून आपली जागा कायम राखली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी धोरण म्हणून पाच वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या तलाठय़ांच्या बदल्या केल्या. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एका सज्जावर मांड ठोकून बसलेले तलाठी हादरले. पहिल्यांदाच त्यांच्या सत्तेला कुणीतरी आव्हान दिलं होतं. अनेकांनी मध्यस्थ घालून, ओळखी-पाळखी काढून, वशिला लावून असे हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण राडकर कुणालाच बधले नाहीत. बदलीमुळे आपले संस्थान खालसा झाले असे वाटणाऱ्या एका तलाठय़ाने थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. संबंधित तलाठय़ाची बदली रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. राडकरांनी ते प्रकरण अतिशय कौशल्यानं हाताळलं. फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, पाच वर्षाहून अधिक काळ एका जागी असल्यामुळं त्यांची बदली केलीय. तेव्हा वरून विचारलं की, पाच वर्षे एका जागी असलेल्या सगळ्यांच्याच बदल्या केल्यात का ? त्यावर त्यांनी होय म्हणून सांगितलं. भुजबळांच्या कार्यालयातून फोन ठेवून देण्यात आला. राडकरांनी संबंधित तलाठय़ाला तातडीने बोलावून घेतलं आणि आजच्या आज हदलीच्या ठिकाणी हजर होण्याची ऑर्डर दिली. आणि संध्याकाळर्पयत तिथं हजर झाला नाही, तर राजकीय दबाव आणला म्हणून सस्पेंड करेन अशी धमकी दिली. त्यादिवशी सकाळर्पयत गुर्मीत वावरणाऱ्या त्या तलाठय़ाचं म्यांव मांजर झालं आणि तो चरफडत बदलीच्या ठिकाणी हजर झाला. त्याच्याबरोबरच आणखी जे काही लटपटी खटपटी करण्याच्या प्रयत्नात होते, त्यांनी आपापली बदलीची ठिकाणं गाठली.


राडकर याच कार्यालयात नुकतेच आले असतानाची एक घटना आहे.
कोल्हापुरात त्यादिवशी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘वैदिक धर्म’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. दसरा चौकातलं राजर्षी शाहू स्मारक भवनाचं सभागृह खचाखच भरलं होतं. यावेळी डॉ. साळुंखे यांनी सुमारे सव्वा तास केलेलं भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा दस्तावेज ठरावा. ‘सकाळ’ मध्ये त्या भाषणाचा सुमारे पाऊण पान वृत्तांत मी छापला होता. हा समारंभ संपल्यानंतर हॉलबाहेर आल्यावर राडकर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा असतानाच माझ्याशी निकटवर्ती असलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकांनी पाहिलं. ते जवळ आल्यावर त्यांची ओळख करून दिली.
त्यानंतर त्या साहित्यिकांचा फोन आला. म्हणाले, राडकरसाहेब तुमचे मित्र आहेत का ? तर म्हणालो होय. म्हणाले आमचं एक काम आहे, बराच काळ पेंडिंग आहे. खूप त्रास झालाय त्याचा मला. मी आशा सोडून दिलीय. पण तुम्ही शब्द टाकलात तर काहीतरी होईल. म्हटलं, काम रीतसर असेल तर ते मी करून घेईन. पण काही बेकायदा करायचं असेल तर जमणार नाही. मी त्यांना ते सांगणार नाही. आणि मी सांगितलं तरी ते करणार नाहीत.
त्यावर संबंधित साहित्यिकांनी स्टोरी सांगितली.
कोल्हापूरजवळ कष्टकरी लोकांची एक गृहनिर्माण वसाहत उभारायची होती. सारे गरीब लोक होते. घरांचं स्वप्न उराशी बाळगून होते. परंतु प्रांत कार्यालयाच्या पातळीवर त्याला मंजुरी मिळत नव्हती. तिथं वळवी का काहीतरी अशा नावाचे एक प्रांत होते. त्यांनी ते काम करायला चार लाख रुपयांची मागणी केली होती. यांनी सगळ्यांनी जमवून जमवून दोन लाखांर्पयत रक्कम जमा केली होती. तेवढी द्यायची तयारी होती. परंतु साहेब चार लाखांच्या खाली यायला तयार नव्हते. यांची ऐपत दोन लाखांपेक्षा जास्त नव्हती आणि ते चार लाखाच्या खाली येत नव्हते. त्यामुळं अनेक महिने निर्णयाशिवाय प्रकरण पडून होतं. साहित्यिकांनी अनेक मध्यस्थ, ओळखीचे लोक घातले, पण साहेब बधले नाहीत. चार लाखाच्या खाली एक रुपया घेणार नाही म्हणत होते. प्रकरण पडून असतानाच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी राडकर आले.
साहित्यिकांनी सांगितल्यानुसार राडकरांच्या कानावर प्रकरण घातलं. सारं रीतसर आणि कायदेशीर आहे म्हणून सांगितलं. करुन टाकू म्हणाले. त्यांना फाईल घेऊन भेटायला सांगा.
त्यानुसार साहित्यिक त्यांना भेटले. त्या संपूर्ण प्रकरणात यूएलसी डिपार्टमेंटकडून एका दाखल्याची कमतरता होती. तेवढी पूर्तता करा म्हणजे लगेच करुन टाकू असं राडकरांनी सांगितलं. आणि ते साहित्यिक गेल्यावर त्यांनी मलाही फोन करून तसं सांगितलं.
दरम्यान मधे बराच काळ गेला. साहित्यिक एकदा भेटल्यावर त्यांना विचारलं तर म्हणाले, अहो तो यूएलसीचा दाखला मिळणं खूप त्रासदायक आहे. त्यावर त्यांना म्हटलं की, तो मिळाल्याशिवाय काम होणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी काहीही करा. मधे मी राडकरांना कधीही त्याची आठवण केली नाही. एकदा ते ऑफिसला जात असताना रस्त्यातच भेटले. गाडी थांबवून खाली उतरले आणि म्हणाले, सरांचं ते काम होईल. फक्त यूएलसीमधून तो दाखला द्यायला सांगा. बाकी काहीच अडचण नाही.
दरम्यान साहित्यिकांनी तो दाखला मिळवला. तो मिळवायला त्यांना सतरा हजार रुपये खर्च आला. तो दाखला त्यांनी सादर केला आणि अवघ्या आठ दिवसांत त्यांना प्रकरण मंजूरीची कागदपत्रं रजिस्टर्ड टपलानं घरी पोहोचली. त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या कामासाठी आधीचा अधिकारी चार लाखाच्या खाली येत नव्हता, ते काम या अधिकाऱ्यानं साधा चहासुद्धा न घेता उलट दोन वेळा आपलाच चहा पाजून घरी पाठवलं. हे कुठल्या युगात काम करताहेत ?
हे एकच प्रकरण नाही. राडकरांनी आपल्या कार्यालयातून मंजूर प्रकरणांची कागदपत्रं संबंधितांना रजिस्टर्ड टपालानं पाठवण्याची नवी पद्धत रूढ केली.
महसूल खात्यात असं काही घडू शकतं, यावर आजही कुणाचा विश्वास बसू शकणार नाही.राडकर चांगलं वाचन करायचे. चित्रपट पाहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित असायचे. अनेक क्षेत्रात त्यांनी अनेक मित्र जोडले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात शिकवायलाही जात होते. शिकणं आणि शिकवणं या त्यांच्या आवडीच्या गोष्टी असाव्यात. अगदी अलीकडच्या अनेक नव्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. मधल्या काळात ते एका स्कॉलरशीपवर मनिलाला गेले. फिलिपीन्स विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. नावापुढं ‘डॉ.’ लागलं.


शिवाजी विद्यापीठात प्रा. द. ना. धनागरे यांच्या कुलगुरूपदाच्या काळात चार वर्षे सतत त्यांच्याविरोधात आंदोलनं होत होती. तत्कालीन कुलसचिवांनी राजीनामा दिल्यानंतर कुलसचिवपदाची जाहिरात निघाली. राडकरांना वाटलं, थोडी वाट वाकडी करून पाचेक वर्षे विद्यापीठाचा अनुभव घ्यावा. त्यांनी कुलसचिवपदासाठी अर्ज केला. पदासाठी पात्र ठरत असले तरी वय आणि अनुभव तुलनेने कमी होता. परंतु त्यांना अधिक संधी होती. मात्र त्याच सुमारास धनागरेविरोधी आंदोलन टिपेला पोहोचलं होतं. आंदोलकांनी कुलसचिवपदाच्या मुलाखती हाणून पाडण्याचा निर्धार केला. त्यादिवशी मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. परिणामी मुलाखती स्थगित करण्यात आल्या.
काही महिन्यांनी धनागरे यांची कुलगुरूपदाची मुदत संपली. डॉ. मुरलीधर ताकवले यांची नियुक्ती झाली. हे डॉ. राम ताकवले यांचे धाकडे भाऊ. त्यांनी काही काळाने कुलसचिवपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. राडकरही एक उमेदवार होते. मुलाखती झाल्या. परंतु मुलाखती सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयातून कुलगुरूंना फोन आला आणि एका विशिष्ट उमेदवाराची शिफारस करण्यात आली. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्याचीच निवड झाली. कुलसचिवपद हे विद्यापीठाच्या विद्यमान रचनेत फार महत्त्वाचे आहे, असे नाही. परंतु राडकरांच्यासारखा तरुण अधिकारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आला असता, तर आंदोलनकाळात निर्नायकी स्थिती निर्माण झालेल्या तिथल्या प्रशासनाला नक्कीच त्यांनी शिस्त लावली असती. परंतु ते घडायचे नव्हते. विद्यापीठाला लायकीप्रमाणेच कुलसचिव मिळाले. या कुलसचिवांनी नोकर भरतीत पैसे खाल्ले म्हणूुन नंतर आलेल्या कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी निलंबित केले. प्रकरण कोर्टात गेले. ते निर्दोष सुटलेही. परंतु नोकरभरतीत पैसे गोळा करायला कुलसचिवांनी एका शिपायाची नियुक्ती केली होती आणि पैसे गोळा केले होते, हे खरेच होते. ते कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही एवढेच.

अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीत चांगल्या अधिकाऱ्याला काम करणं अवघड जात असतं. परंतु राडकरांनी आपल्या अंगभूत कौशल्यानं अशा गोष्टींचा कधी जाच करून घेतला नाही. स्वत: कधीही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. पण आपली व्यवस्था सुधारण्याच्या फालतू भानगडीत पडले नाहीत. आपण जिथं काम करतोय, त्या जागेवरून लोकांसाठी काय करता येईल, याचा विचार मात्र ते सतत करायचे. सरकारी यंत्रणा कशीही असली तरी सरकारी यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास वाढायला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी तिथंही चांगल्या अधिकाऱ्यांचा शोध सतत सुरू असतो आणि शोध घेणारे त्यांच्यार्पयत येत असतात.


सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी राडकरांना आपल्याकडं विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून घेतलं. महसूल खात्याची प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालून जात होती. याठिकाणी असतानाचा एक किस्सा आहे.
नाणीजचे नरें्र महाराज हे आज मोठे प्रस्थ आहे. त्यावेळी ते नुकतेच नावारुपाला येत होते. बुवांच्या नादी लागणं हा शंकरराव चव्हाण यांच्यापासूनचा वारसा. अशोकराव उच्चशिक्षित असले तरी बुवांचे नादिष्ट. नरें्र महाराज त्यांच्या घरी आले. त्यांनी सपत्नीक त्यांच्या पायावर डोके ठेवले. आशीर्वादपर मार्गदर्शन केल्यानंतर महाराजांनी आपल्या एका जमिनीच्या भानगडीची फाईल अशोकरावांकडं दिली. अशोकरावांनी राडकरांना बोलावून घेऊन त्यांच्याकडं ते प्रकरण सुपूर्द केलं.
राडकरांनी फाईल पाहिली आणि त्यात बरीच अनियमितता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या साऱ्या गोष्टी नियमित केल्याशिवाय काही करता येणार नाही, असं त्यांचं मत बनलं आणि त्यांनी ते नरें्र महाराजांना सांगितलं. महसूलमंत्र्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांना हे अनपेक्षित होतं. आपण इथून हे प्रकरण मंजूर करून घेऊन जायचं या इराद्यानं आलेल्या महाराजांचा भ्रमनिरास झाला. कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकेल याचं मार्गदर्शन राडकरांनी नरें्र महाराजांना केलं. महाराज निघून गेले. महिनाभरात साऱ्या गोष्टींची पूर्तता केली. आधीच्या फाईलमध्ये ज्या अनियमितता होत्या, त्या दूर केल्या. त्यानंतर ती फाईल राडकरांच्याकडं आली. राडकरांनी ती पुन्हा तपासून ओके केली आणि त्यांनी ओके केल्यानंतरच अशोकरावांनी त्यावर अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.
महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणाले, त्या साहेबानं आधी आपलं प्रकरण अडवलं, पण त्यांनीच ते मार्गी लावून दिलं. चांगला माणूस आहे तो.


लोकप्रतिनिधींना चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असतेच असते. पंतप्रधान कार्यालयातले उपमंत्री बनलेले पृथ्वीराज चव्हाण स्वत:साठी चांगल्या अधिकाऱ्याच्या शोधात असताना त्यांचा शोध डॉ. संजय राडकर या अधिकाऱ्याजवळ येऊन थांबला आणि राडकर थेट पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले.
या सगळ्या घडामोडी घडत असताना राडकरांना आयएएस केडरही मिळालं नव्हतं. ते उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं किंवा नुकतंच झालं होतं.
वर्षभरात पंतप्रधान कार्यालयाला रामराम ठोकून शासकीय सेवेतून पाच वर्षाची सुट्टी घेऊन राडकरांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सेझच्या भूसंपादन विभागात नोकरी पटकावली. लाख-सव्वा लाख रुपये पगारावर.
असं का ? म्हणून विचारलं तर म्हणाले, पाचेक वर्षे बाहेर काढावीत. बऱ्यापैकी पैसे हातात येतील. काही बॅलन्स टाकता येईल. पाच वर्षानी परत येईर्पयत आयएएस केडर मिळेल. कलेक्टर म्हणून काम करता येईल. काहीतरी काम करण्याची संधी मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खात्यावर थोडा बँक बॅलन्स असल्यामुळं जरा ताठ कण्यानं नोकरी करता येईल.
खरंतर प्रांताधिकाऱ्यानं फारशी खावखाव न करताही सहजपणे महिन्याला लाख-दीडलाख मिळू शकतात. प्रयत्न केले तर पाच-दहा लाखांना मरण नाही. असं असतानाही पैसे कमवायचे म्हणून सरकारी नोकरीतून विश्रांती घेऊन राडकरांनी सव्वा लाखांच्या पगाराची रिलायन्स सेझमध्ये नोकरी पत्करली. यावरूनच महसूल खात्यातला हा अधिकारी किती स्वच्छ आणि पारदर्शी होता याचं प्रत्यंतर येतं. पण असं असूनही राडकरांनी हे कधी त्याची जाहिरात केली नाही किंवा मी असा आहे आणि बाकीचे असे आहेत, असं कधी बोलले नाहीत. व्यवस्थेत राहूनही खूपशा चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात याच्यावर त्यांचा विश्वास होता आणि अगदी छोटय़ा छोटय़ा ठिकाणी काम करतानाही ते त्यांनी दाखवून दिलं होतं.
अलीकडं त्यांचा कधीतरी फोन व्हायचा. फोन केला की, बोला चोरमारे साहेब..असं म्हणून खळखळून हसायचे. आम्ही मित्र असलो तरी ते चोरमारे साहेब असंच म्हणायचे. या एकदा ऑफिसला. स्टेशनवर उतरल्यावर फोन करा. गाडी पाठवून देतो. शक्यतो लंचलाच या..असं तीन-चारवेळा बोलणं झालं. पण जाणं काही शक्य झालं नाही.


19 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास स्टार माझा मधून मेघराज पाटलांचा फोन आला. संजय राडकर तुमच्या माहितीचे आहेत का, ते कोल्हापूरला वगैरे होते. म्हटलं होय, मित्र आहेत ते माझे अगदी खास. त्यांनी काही संदर्भ दिलाय का ? त्यावर ते म्हणाले, पाम बीच रोडवर अक्सिडेंटमध्ये ते ठार झालेत.
सारं शरीर थंड पडल्यासारखं वाटलं. पण मेघराज पाटीलच म्हणाले, पण ते तेच आहेत का, कन्फर्म करायचं होतं.
दरम्यानच्या काळात आमच्या नवी मुंबईच्या वार्ताहरानं बातमी पाठवली होती. त्यात रहाडकर असा उल्लेख होता. थोडा धीर आला. कुणीही गेलं असलं तरी ते वाईटच. पण गेलेत ते संजय राडकर नसतील तर बरं आणि नसावेत. मनातल्या मनात देवाचा धावा. काही सुचत नाही तेव्हा तोच शेवटचा आधार असतो.
साम मराठीत मिलिंद औताडेला फोन करून खात्री करून घेतली. त्यानंही तेच ते म्हणून सांगितलं. पण विश्वास बसत नव्हताच.
रात्री घरी निघालो. सव्वा अकराच्या सुमारास ऑफिसमधून असिफ बागवानचा फोन आला. त्यानं राडकरांची माहिती विचारून घेतली. एकदा कुठल्याशा मुलाखतीच्या निमित्तानं त्यांचा फोटो मागवून घेतला होता, तो माझ्या फोल्डरला सेव्ह होता. तो कुठल्या फोल्डरमध्ये आहे, ते सांगितलं.
सुचत काहीच नव्हतं. मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होतो.
अकरा पंचवीसला ठाणे स्टेशनवर उतरल्यावर आणखी एक गोष्ट मनात आली. आपण राडकरांची सगळी माहिती सांगितली. पण गेलेत ते आपलेच संजय राडकर आहेत याची निश्चित खात्री करून घेतलेली नाही. आमचे जे दोन-चार कॉमन मित्र होते, त्यांना मीच खबर दिली होती. त्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती. किंवा त्यांच्या कुणा संबंधितांकडून किंवा आमच्या कॉमन मित्राकडून मला फोन आला नव्हता. त्यांचा फोटो छापला आणि ते ते नसलेच तर? मनात पुन्हा विचार आला, तसं असेल तर सोन्याहून पिवळं. खुलासा करून टाकू. राडकरांची समजूत काढणं अवघड नव्हतं. तेही आपल्या मृत्युची बातमी मस्त एंजॉय करतील. पण जो गेला आहे तो आपला मित्र नाही, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते?
तरीही मन शांत होत नव्हतं.
प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर सारा धीर गोळा करून मोबाईल काढला आणि त्यांच्या नंबरवर फोन लावला. अपेक्षित होतं की स्वीच्ड ऑफ असावा. पण रिंग व्हायला लागली. पलीकडून आवाज आला, ‘बोला, चोरमारेसाहेब, काय म्हणताय?’
अहो, तुमच्या निधनाची बातमी आम्ही छापलीय उद्याच्या अंकात, काय घोळ आहे?
तिकडून राडकरांचं खळाळणारं हास्य..
डोकं सुन्न झालं. मोबाईलची रिंग थांबली होती. तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेला क्रमांक प्रतिसाद देत नाही, अशी काहीशी टेप ऐकू आली.
खरं काय आणि भास कोणता?
रिडायल केलं. पुन्हा रिंग आणि तीच रेकॉर्ड..
आता मात्र खरोखर पायातलं बळ गेलं आणि तिथंच मटकन खाली बसलो! दुपारपासून साचून राहिलेला बांध असा मध्यरात्री फुटला!
इतक्या जवळचं कुणी गेलं की खूप असुरक्षित वाटायला लागतं, तसंच वाटायला लागलं.