डॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..!

सरकारी कामं सुलभतेनं व्हावीत म्हणून निर्माण केलेली एक खिडकी योजना ही अलीकडच्या काही वर्षातील आहे. परंतु महसूल खात्यात आलेल्या एका नवख्या अधिकाऱ्यानं सुमारे 22 वर्षापूर्वी ती सुरू करून एक नवा पायंडा सुरू केला होता. संजय राडकर असं त्या अधिकाऱ्याचं नाव. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तहसीलदार कार्यालयाइतकी सामान्य माणसांची नाडणूक अन्यत्र कुठे क्वचित होत असेल. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात सरकारी कामकाज म्हणजे लोकांना शिक्षाच होती. कारण तालुक्याच्या ठिकाणी कुठूनही यायचं तर आधी बरंचसं अंतर चालत यायचं आणि मग मिळेल त्या वाहनानं पोहोचायचं. म्हणजे एक पूर्ण दिवस मोडल्याशिवाय तहसीलदार कार्यालयात येणंच होत नाही. तिथं आल्यावर तिथल्या कारकून मंडळींकडून होणारी अडवणूक बोलायलाच नको. कुठल्याही दाखल्यासाठी महिनो न महिने चकरा माराव्या लागत. मोठय़ा साहेबाकडं जाऊन तक्रार करण्याचंही धारिष्टय़ नसायचं. महसूल खात्यातली पहिलीच नोकरी होती. दाखल्यासाठी लोकांची होणारी अडवणूक राडकरांना जाणवल्यावाचून राहिली नाही. त्यांनी त्यावर असा काही उपाय शोधून काढला, की एका फटक्यात लोकांची दाखले मिळण्याची समस्या दूर झाली.
तहसीलदार कार्यालयाकडून जे दाखले दिले जातात, त्यांची एक यादी केली. प्रत्येक दाखल्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात, त्याची यादी लिहिली. कोणता अर्ज कोणत्या दिवशी कोणत्या खिडकीत द्यायचा याची सूचना लिहिली. आणि तो दाखला कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत, कोणत्या खिडकीत मिळेल अशा साऱ्या सूचना लिहिल्या. आणि लोकांचा कारकूनांशी थेट संपर्क तोडून टाकला. ठराविक दिवशी ठराविक खिडकीत अर्ज द्या आणि ठराविक दिवशी दाखला घेऊन जा, एवढी साधी सिस्टिम घालून दिली.
गोष्ट अगदी छोटीशीच होती, परंतु कारकूनी पातळीवरचा मोठा भ्रष्टाचारच संपवून टाकला.


त्यानंतर कोल्हापूर चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून आले. मोरेवाडीच्या माळावर भूतबंगल्याप्रमाणे भकासपणे चित्रनगरी उभी होती. चित्रीकरणाची सामुग्री होती, ती भाडय़ानं दिली जात होती. बाकी एकराच्या माळावर काहीच होत नव्हतं. त्या माळावर काहीतरी हालचाली सुरू व्हाव्यात यासाठी राडकरांनी प्रयत्न सुरू केले. पाण्याची योजना तयार केली. चित्रीकरणासाठी स्टुडिओची उभारणी सुरू केली. उद्यान, पोलिस ठाणे अशा मराठी चित्रपटांसाठी लागणाऱ्या गोष्टी प्राधान्याने तयार करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेलेल्या चित्रनगरीत जीव भरण्याची चिन्हे दिसत असतानाच राडकरांची बदली झाली आणि पुन्हा चित्रनगरीला मरणकळा आली. कारण सरकारनं तिथं कायमस्वरुपी अधिकारी कधीच नेमला नाही. कोल्हापूर शहरातील कुठल्या तरी उपजिल्हाधिकाऱ्याकडं त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवायचं धोरण ठेवलं. तो अधिकारी पगारपत्रकावर सह्या करण्यापुरता येत असे. चित्रनगरीत प्राण फुंकण्याचं राडकरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.


सांगली जिल्ह्यातील विटय़ाला ते प्रांताधिकारी होते. तिथं असताना त्यांनी रॉकेलच्या काळाबाजाराला चाप लावला. त्यांच्या अधिकारपदाच्या काळातच विटय़ातील अतिक्रमण निर्मूलनाचा विषय आला. त्यांनी सारी अतिक्रमणं हटवण्याचा निर्धार केला. त्यासंदर्भातील सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नोटिसा दिल्या आणि अतिक्रमण निर्मूलनाची तारीखही ठरवली. ज्यांनी अतिक्रमणं केली होती, ते लोक कोर्टातून स्टे मिळवणार हे गृहित होतं. आणि त्यामुळं मोहीम थांबवावी लागू नये याची तयारी राडकरांनी केली होती. त्यादिवशी त्यांनी कोर्टात आपला एक माणूस बसवला. कोर्टात जे जे म्हणून काही प्रकरण येईल, त्याला कॅव्हेट दाखल करायला सुरुवात केली. कुठलंही प्रकरण असूदे. चुकून एखाद्यानं अतिक्रमण निर्मूलनाला स्टे मिळवू नये, हा त्यामागचा उद्देश. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. आणि कुठलाही स्टे येण्याआधी त्यांनी अतिक्रमणं हटवून टाकली. इच्छाशक्ती असेल तर अधिकारी काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणून याकडं पाहता येतं.


कोल्हापूर जिल्ह्यात करवीर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रांताधिकाऱ्याला तलाठय़ांशी खूप जमवून घेऊन काम करावं लागतं. तलाठय़ांना हाताळण्याइतकं कठीण दुसरं काही नसतं. महसूल खात्यातील सर्वसाधारण पद्धत अशी की, वांड तलाठय़ांना वठणीवर आणायच्या भानगडीत कुठला अधिकारी पडत नाही. उलट त्यांना हाताशी धरून सारे व्यवहार केले जातात. असे तलाठी अधिकाऱ्यांच्या खास गोटातले असतात. त्यांच्याशिवाय त्या कार्यालयातलं कुठलंही पान हलत नसतं. राडकरांनी चार्ज घेतल्यानंतर तलाठय़ांचा अभ्यास सुरू केला. काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच गावात होते. त्याना कुणी हलवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि जेव्हा जेव्हा हलवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी थेट मंत्रालयातून आपली जागा कायम राखली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी धोरण म्हणून पाच वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या तलाठय़ांच्या बदल्या केल्या. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एका सज्जावर मांड ठोकून बसलेले तलाठी हादरले. पहिल्यांदाच त्यांच्या सत्तेला कुणीतरी आव्हान दिलं होतं. अनेकांनी मध्यस्थ घालून, ओळखी-पाळखी काढून, वशिला लावून असे हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण राडकर कुणालाच बधले नाहीत. बदलीमुळे आपले संस्थान खालसा झाले असे वाटणाऱ्या एका तलाठय़ाने थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. संबंधित तलाठय़ाची बदली रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. राडकरांनी ते प्रकरण अतिशय कौशल्यानं हाताळलं. फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, पाच वर्षाहून अधिक काळ एका जागी असल्यामुळं त्यांची बदली केलीय. तेव्हा वरून विचारलं की, पाच वर्षे एका जागी असलेल्या सगळ्यांच्याच बदल्या केल्यात का ? त्यावर त्यांनी होय म्हणून सांगितलं. भुजबळांच्या कार्यालयातून फोन ठेवून देण्यात आला. राडकरांनी संबंधित तलाठय़ाला तातडीने बोलावून घेतलं आणि आजच्या आज हदलीच्या ठिकाणी हजर होण्याची ऑर्डर दिली. आणि संध्याकाळर्पयत तिथं हजर झाला नाही, तर राजकीय दबाव आणला म्हणून सस्पेंड करेन अशी धमकी दिली. त्यादिवशी सकाळर्पयत गुर्मीत वावरणाऱ्या त्या तलाठय़ाचं म्यांव मांजर झालं आणि तो चरफडत बदलीच्या ठिकाणी हजर झाला. त्याच्याबरोबरच आणखी जे काही लटपटी खटपटी करण्याच्या प्रयत्नात होते, त्यांनी आपापली बदलीची ठिकाणं गाठली.


राडकर याच कार्यालयात नुकतेच आले असतानाची एक घटना आहे.
कोल्हापुरात त्यादिवशी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘वैदिक धर्म’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. दसरा चौकातलं राजर्षी शाहू स्मारक भवनाचं सभागृह खचाखच भरलं होतं. यावेळी डॉ. साळुंखे यांनी सुमारे सव्वा तास केलेलं भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा दस्तावेज ठरावा. ‘सकाळ’ मध्ये त्या भाषणाचा सुमारे पाऊण पान वृत्तांत मी छापला होता. हा समारंभ संपल्यानंतर हॉलबाहेर आल्यावर राडकर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा असतानाच माझ्याशी निकटवर्ती असलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकांनी पाहिलं. ते जवळ आल्यावर त्यांची ओळख करून दिली.
त्यानंतर त्या साहित्यिकांचा फोन आला. म्हणाले, राडकरसाहेब तुमचे मित्र आहेत का ? तर म्हणालो होय. म्हणाले आमचं एक काम आहे, बराच काळ पेंडिंग आहे. खूप त्रास झालाय त्याचा मला. मी आशा सोडून दिलीय. पण तुम्ही शब्द टाकलात तर काहीतरी होईल. म्हटलं, काम रीतसर असेल तर ते मी करून घेईन. पण काही बेकायदा करायचं असेल तर जमणार नाही. मी त्यांना ते सांगणार नाही. आणि मी सांगितलं तरी ते करणार नाहीत.
त्यावर संबंधित साहित्यिकांनी स्टोरी सांगितली.
कोल्हापूरजवळ कष्टकरी लोकांची एक गृहनिर्माण वसाहत उभारायची होती. सारे गरीब लोक होते. घरांचं स्वप्न उराशी बाळगून होते. परंतु प्रांत कार्यालयाच्या पातळीवर त्याला मंजुरी मिळत नव्हती. तिथं वळवी का काहीतरी अशा नावाचे एक प्रांत होते. त्यांनी ते काम करायला चार लाख रुपयांची मागणी केली होती. यांनी सगळ्यांनी जमवून जमवून दोन लाखांर्पयत रक्कम जमा केली होती. तेवढी द्यायची तयारी होती. परंतु साहेब चार लाखांच्या खाली यायला तयार नव्हते. यांची ऐपत दोन लाखांपेक्षा जास्त नव्हती आणि ते चार लाखाच्या खाली येत नव्हते. त्यामुळं अनेक महिने निर्णयाशिवाय प्रकरण पडून होतं. साहित्यिकांनी अनेक मध्यस्थ, ओळखीचे लोक घातले, पण साहेब बधले नाहीत. चार लाखाच्या खाली एक रुपया घेणार नाही म्हणत होते. प्रकरण पडून असतानाच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी राडकर आले.
साहित्यिकांनी सांगितल्यानुसार राडकरांच्या कानावर प्रकरण घातलं. सारं रीतसर आणि कायदेशीर आहे म्हणून सांगितलं. करुन टाकू म्हणाले. त्यांना फाईल घेऊन भेटायला सांगा.
त्यानुसार साहित्यिक त्यांना भेटले. त्या संपूर्ण प्रकरणात यूएलसी डिपार्टमेंटकडून एका दाखल्याची कमतरता होती. तेवढी पूर्तता करा म्हणजे लगेच करुन टाकू असं राडकरांनी सांगितलं. आणि ते साहित्यिक गेल्यावर त्यांनी मलाही फोन करून तसं सांगितलं.
दरम्यान मधे बराच काळ गेला. साहित्यिक एकदा भेटल्यावर त्यांना विचारलं तर म्हणाले, अहो तो यूएलसीचा दाखला मिळणं खूप त्रासदायक आहे. त्यावर त्यांना म्हटलं की, तो मिळाल्याशिवाय काम होणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी काहीही करा. मधे मी राडकरांना कधीही त्याची आठवण केली नाही. एकदा ते ऑफिसला जात असताना रस्त्यातच भेटले. गाडी थांबवून खाली उतरले आणि म्हणाले, सरांचं ते काम होईल. फक्त यूएलसीमधून तो दाखला द्यायला सांगा. बाकी काहीच अडचण नाही.
दरम्यान साहित्यिकांनी तो दाखला मिळवला. तो मिळवायला त्यांना सतरा हजार रुपये खर्च आला. तो दाखला त्यांनी सादर केला आणि अवघ्या आठ दिवसांत त्यांना प्रकरण मंजूरीची कागदपत्रं रजिस्टर्ड टपलानं घरी पोहोचली. त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या कामासाठी आधीचा अधिकारी चार लाखाच्या खाली येत नव्हता, ते काम या अधिकाऱ्यानं साधा चहासुद्धा न घेता उलट दोन वेळा आपलाच चहा पाजून घरी पाठवलं. हे कुठल्या युगात काम करताहेत ?
हे एकच प्रकरण नाही. राडकरांनी आपल्या कार्यालयातून मंजूर प्रकरणांची कागदपत्रं संबंधितांना रजिस्टर्ड टपालानं पाठवण्याची नवी पद्धत रूढ केली.
महसूल खात्यात असं काही घडू शकतं, यावर आजही कुणाचा विश्वास बसू शकणार नाही.



राडकर चांगलं वाचन करायचे. चित्रपट पाहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित असायचे. अनेक क्षेत्रात त्यांनी अनेक मित्र जोडले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात शिकवायलाही जात होते. शिकणं आणि शिकवणं या त्यांच्या आवडीच्या गोष्टी असाव्यात. अगदी अलीकडच्या अनेक नव्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. मधल्या काळात ते एका स्कॉलरशीपवर मनिलाला गेले. फिलिपीन्स विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. नावापुढं ‘डॉ.’ लागलं.


शिवाजी विद्यापीठात प्रा. द. ना. धनागरे यांच्या कुलगुरूपदाच्या काळात चार वर्षे सतत त्यांच्याविरोधात आंदोलनं होत होती. तत्कालीन कुलसचिवांनी राजीनामा दिल्यानंतर कुलसचिवपदाची जाहिरात निघाली. राडकरांना वाटलं, थोडी वाट वाकडी करून पाचेक वर्षे विद्यापीठाचा अनुभव घ्यावा. त्यांनी कुलसचिवपदासाठी अर्ज केला. पदासाठी पात्र ठरत असले तरी वय आणि अनुभव तुलनेने कमी होता. परंतु त्यांना अधिक संधी होती. मात्र त्याच सुमारास धनागरेविरोधी आंदोलन टिपेला पोहोचलं होतं. आंदोलकांनी कुलसचिवपदाच्या मुलाखती हाणून पाडण्याचा निर्धार केला. त्यादिवशी मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. परिणामी मुलाखती स्थगित करण्यात आल्या.
काही महिन्यांनी धनागरे यांची कुलगुरूपदाची मुदत संपली. डॉ. मुरलीधर ताकवले यांची नियुक्ती झाली. हे डॉ. राम ताकवले यांचे धाकडे भाऊ. त्यांनी काही काळाने कुलसचिवपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. राडकरही एक उमेदवार होते. मुलाखती झाल्या. परंतु मुलाखती सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयातून कुलगुरूंना फोन आला आणि एका विशिष्ट उमेदवाराची शिफारस करण्यात आली. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्याचीच निवड झाली. कुलसचिवपद हे विद्यापीठाच्या विद्यमान रचनेत फार महत्त्वाचे आहे, असे नाही. परंतु राडकरांच्यासारखा तरुण अधिकारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आला असता, तर आंदोलनकाळात निर्नायकी स्थिती निर्माण झालेल्या तिथल्या प्रशासनाला नक्कीच त्यांनी शिस्त लावली असती. परंतु ते घडायचे नव्हते. विद्यापीठाला लायकीप्रमाणेच कुलसचिव मिळाले. या कुलसचिवांनी नोकर भरतीत पैसे खाल्ले म्हणूुन नंतर आलेल्या कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी निलंबित केले. प्रकरण कोर्टात गेले. ते निर्दोष सुटलेही. परंतु नोकरभरतीत पैसे गोळा करायला कुलसचिवांनी एका शिपायाची नियुक्ती केली होती आणि पैसे गोळा केले होते, हे खरेच होते. ते कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही एवढेच.

अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीत चांगल्या अधिकाऱ्याला काम करणं अवघड जात असतं. परंतु राडकरांनी आपल्या अंगभूत कौशल्यानं अशा गोष्टींचा कधी जाच करून घेतला नाही. स्वत: कधीही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. पण आपली व्यवस्था सुधारण्याच्या फालतू भानगडीत पडले नाहीत. आपण जिथं काम करतोय, त्या जागेवरून लोकांसाठी काय करता येईल, याचा विचार मात्र ते सतत करायचे. सरकारी यंत्रणा कशीही असली तरी सरकारी यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास वाढायला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी तिथंही चांगल्या अधिकाऱ्यांचा शोध सतत सुरू असतो आणि शोध घेणारे त्यांच्यार्पयत येत असतात.


सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी राडकरांना आपल्याकडं विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून घेतलं. महसूल खात्याची प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालून जात होती. याठिकाणी असतानाचा एक किस्सा आहे.
नाणीजचे नरें्र महाराज हे आज मोठे प्रस्थ आहे. त्यावेळी ते नुकतेच नावारुपाला येत होते. बुवांच्या नादी लागणं हा शंकरराव चव्हाण यांच्यापासूनचा वारसा. अशोकराव उच्चशिक्षित असले तरी बुवांचे नादिष्ट. नरें्र महाराज त्यांच्या घरी आले. त्यांनी सपत्नीक त्यांच्या पायावर डोके ठेवले. आशीर्वादपर मार्गदर्शन केल्यानंतर महाराजांनी आपल्या एका जमिनीच्या भानगडीची फाईल अशोकरावांकडं दिली. अशोकरावांनी राडकरांना बोलावून घेऊन त्यांच्याकडं ते प्रकरण सुपूर्द केलं.
राडकरांनी फाईल पाहिली आणि त्यात बरीच अनियमितता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या साऱ्या गोष्टी नियमित केल्याशिवाय काही करता येणार नाही, असं त्यांचं मत बनलं आणि त्यांनी ते नरें्र महाराजांना सांगितलं. महसूलमंत्र्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांना हे अनपेक्षित होतं. आपण इथून हे प्रकरण मंजूर करून घेऊन जायचं या इराद्यानं आलेल्या महाराजांचा भ्रमनिरास झाला. कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकेल याचं मार्गदर्शन राडकरांनी नरें्र महाराजांना केलं. महाराज निघून गेले. महिनाभरात साऱ्या गोष्टींची पूर्तता केली. आधीच्या फाईलमध्ये ज्या अनियमितता होत्या, त्या दूर केल्या. त्यानंतर ती फाईल राडकरांच्याकडं आली. राडकरांनी ती पुन्हा तपासून ओके केली आणि त्यांनी ओके केल्यानंतरच अशोकरावांनी त्यावर अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.
महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणाले, त्या साहेबानं आधी आपलं प्रकरण अडवलं, पण त्यांनीच ते मार्गी लावून दिलं. चांगला माणूस आहे तो.


लोकप्रतिनिधींना चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असतेच असते. पंतप्रधान कार्यालयातले उपमंत्री बनलेले पृथ्वीराज चव्हाण स्वत:साठी चांगल्या अधिकाऱ्याच्या शोधात असताना त्यांचा शोध डॉ. संजय राडकर या अधिकाऱ्याजवळ येऊन थांबला आणि राडकर थेट पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले.
या सगळ्या घडामोडी घडत असताना राडकरांना आयएएस केडरही मिळालं नव्हतं. ते उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं किंवा नुकतंच झालं होतं.
वर्षभरात पंतप्रधान कार्यालयाला रामराम ठोकून शासकीय सेवेतून पाच वर्षाची सुट्टी घेऊन राडकरांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सेझच्या भूसंपादन विभागात नोकरी पटकावली. लाख-सव्वा लाख रुपये पगारावर.
असं का ? म्हणून विचारलं तर म्हणाले, पाचेक वर्षे बाहेर काढावीत. बऱ्यापैकी पैसे हातात येतील. काही बॅलन्स टाकता येईल. पाच वर्षानी परत येईर्पयत आयएएस केडर मिळेल. कलेक्टर म्हणून काम करता येईल. काहीतरी काम करण्याची संधी मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खात्यावर थोडा बँक बॅलन्स असल्यामुळं जरा ताठ कण्यानं नोकरी करता येईल.
खरंतर प्रांताधिकाऱ्यानं फारशी खावखाव न करताही सहजपणे महिन्याला लाख-दीडलाख मिळू शकतात. प्रयत्न केले तर पाच-दहा लाखांना मरण नाही. असं असतानाही पैसे कमवायचे म्हणून सरकारी नोकरीतून विश्रांती घेऊन राडकरांनी सव्वा लाखांच्या पगाराची रिलायन्स सेझमध्ये नोकरी पत्करली. यावरूनच महसूल खात्यातला हा अधिकारी किती स्वच्छ आणि पारदर्शी होता याचं प्रत्यंतर येतं. पण असं असूनही राडकरांनी हे कधी त्याची जाहिरात केली नाही किंवा मी असा आहे आणि बाकीचे असे आहेत, असं कधी बोलले नाहीत. व्यवस्थेत राहूनही खूपशा चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात याच्यावर त्यांचा विश्वास होता आणि अगदी छोटय़ा छोटय़ा ठिकाणी काम करतानाही ते त्यांनी दाखवून दिलं होतं.
अलीकडं त्यांचा कधीतरी फोन व्हायचा. फोन केला की, बोला चोरमारे साहेब..असं म्हणून खळखळून हसायचे. आम्ही मित्र असलो तरी ते चोरमारे साहेब असंच म्हणायचे. या एकदा ऑफिसला. स्टेशनवर उतरल्यावर फोन करा. गाडी पाठवून देतो. शक्यतो लंचलाच या..असं तीन-चारवेळा बोलणं झालं. पण जाणं काही शक्य झालं नाही.


19 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास स्टार माझा मधून मेघराज पाटलांचा फोन आला. संजय राडकर तुमच्या माहितीचे आहेत का, ते कोल्हापूरला वगैरे होते. म्हटलं होय, मित्र आहेत ते माझे अगदी खास. त्यांनी काही संदर्भ दिलाय का ? त्यावर ते म्हणाले, पाम बीच रोडवर अक्सिडेंटमध्ये ते ठार झालेत.
सारं शरीर थंड पडल्यासारखं वाटलं. पण मेघराज पाटीलच म्हणाले, पण ते तेच आहेत का, कन्फर्म करायचं होतं.
दरम्यानच्या काळात आमच्या नवी मुंबईच्या वार्ताहरानं बातमी पाठवली होती. त्यात रहाडकर असा उल्लेख होता. थोडा धीर आला. कुणीही गेलं असलं तरी ते वाईटच. पण गेलेत ते संजय राडकर नसतील तर बरं आणि नसावेत. मनातल्या मनात देवाचा धावा. काही सुचत नाही तेव्हा तोच शेवटचा आधार असतो.
साम मराठीत मिलिंद औताडेला फोन करून खात्री करून घेतली. त्यानंही तेच ते म्हणून सांगितलं. पण विश्वास बसत नव्हताच.
रात्री घरी निघालो. सव्वा अकराच्या सुमारास ऑफिसमधून असिफ बागवानचा फोन आला. त्यानं राडकरांची माहिती विचारून घेतली. एकदा कुठल्याशा मुलाखतीच्या निमित्तानं त्यांचा फोटो मागवून घेतला होता, तो माझ्या फोल्डरला सेव्ह होता. तो कुठल्या फोल्डरमध्ये आहे, ते सांगितलं.
सुचत काहीच नव्हतं. मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होतो.
अकरा पंचवीसला ठाणे स्टेशनवर उतरल्यावर आणखी एक गोष्ट मनात आली. आपण राडकरांची सगळी माहिती सांगितली. पण गेलेत ते आपलेच संजय राडकर आहेत याची निश्चित खात्री करून घेतलेली नाही. आमचे जे दोन-चार कॉमन मित्र होते, त्यांना मीच खबर दिली होती. त्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती. किंवा त्यांच्या कुणा संबंधितांकडून किंवा आमच्या कॉमन मित्राकडून मला फोन आला नव्हता. त्यांचा फोटो छापला आणि ते ते नसलेच तर? मनात पुन्हा विचार आला, तसं असेल तर सोन्याहून पिवळं. खुलासा करून टाकू. राडकरांची समजूत काढणं अवघड नव्हतं. तेही आपल्या मृत्युची बातमी मस्त एंजॉय करतील. पण जो गेला आहे तो आपला मित्र नाही, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते?
तरीही मन शांत होत नव्हतं.
प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर सारा धीर गोळा करून मोबाईल काढला आणि त्यांच्या नंबरवर फोन लावला. अपेक्षित होतं की स्वीच्ड ऑफ असावा. पण रिंग व्हायला लागली. पलीकडून आवाज आला, ‘बोला, चोरमारेसाहेब, काय म्हणताय?’
अहो, तुमच्या निधनाची बातमी आम्ही छापलीय उद्याच्या अंकात, काय घोळ आहे?
तिकडून राडकरांचं खळाळणारं हास्य..
डोकं सुन्न झालं. मोबाईलची रिंग थांबली होती. तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेला क्रमांक प्रतिसाद देत नाही, अशी काहीशी टेप ऐकू आली.
खरं काय आणि भास कोणता?
रिडायल केलं. पुन्हा रिंग आणि तीच रेकॉर्ड..
आता मात्र खरोखर पायातलं बळ गेलं आणि तिथंच मटकन खाली बसलो! दुपारपासून साचून राहिलेला बांध असा मध्यरात्री फुटला!
इतक्या जवळचं कुणी गेलं की खूप असुरक्षित वाटायला लागतं, तसंच वाटायला लागलं.

टिप्पण्या

  1. mr vijay,

    Its very good example of honesty to work n commitment to people...Mr. radkar was person of human values which are rare now days...I appreciate ur effort to flash light on his mission ..although it is incomplete.
    I believe to excel in career we need not to be dishonest or need not to compromise with our principles...n here is example of Mr.radkar's life which strengthens my stand...but who knows course of life?we have lost a good person..after all life has no logic...anyway keep writing for such people...

    -raghumicrobirla@gmail.com

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

एका ‘सुपारी’ची डायरी