Total Pageviews

Wednesday, November 30, 2011

निळा कोल्हा, गांधीजी वगैरे…
निळ्या कोल्ह्याची गोष्ट बहुतेकांना माहीत आहे. भूक लागल्यामुळे गावात शिरलेल्या कोल्ह्याच्या मागे कुत्री लागतात, तेव्हा कोल्हा एका धोब्याच्या घरात शिरतो आणि जीव वाचवण्यासाठी पिंपात लपून बसतो. त्या पिंपात नीळ असते. कुत्री निघून गेल्याचा अंदाज घेऊन थोडय़ा वेळाने निळीत भिजलेला कोल्हा बाहेर येतो आणि जंगलात धूम ठोकतो. निळ्या कोल्ह्याला पाहून कोण हा विचित्र प्राणी आला म्हणून वाघ, सिंहासह सारे प्राणी घाबरून जातात. निळ्या रंगामुळे सगळे घाबरल्याचे लक्षात आल्यावर कोल्हा परिस्थितीचा ताबा घेतो आणि म्हणतो, ‘मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी पाठवले आहे. आजपासून मी तुमचा राजा असेन.ब्रह्मदेवाचीच आज्ञा असल्याचे मानून वाघ, सिंहासह सगळे प्राणी त्याचा जयजयकार करतात. कोल्हेराजाची राजवट सुरू होते. एके दिवशी दरबार भरलेला असतानाच राज्याबाहेर कोल्हेकुई सुरू होते. त्याबरोबर निळ्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि भावनातिरेकात तेही आपल्या बांधवांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागतात. भर दरबारात सोंग उघडे पडते तेव्हा सारे प्राणी त्याच्यावर हल्ला करतात..
सोंग घेतले की असेच होते. सोंग असो किंवा मुखवटा ते सदासर्वकाळ निभावता येत नाही. त्याला काहीएक कालमर्यादा निश्चितच असते. गांधीजींचे सोंग ही तर महाकठीण गोष्ट. अर्थात बालवाडीपासून विद्यापीठांर्पयतच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गांधीजींची सोंग काढले जाते. गणपतीच्या मिरवणुकीत, काही मोर्चामध्येही गांधीजींचे सोंग घेतलेली पात्रे भेटतात. पंचा, टक्कल, चष्मा आणि हातात काठी घेतले की झाले गांधीजी. हे सोंग फारसे अवघड नसते. कारण सोंग काढणाऱ्याला गांधीजींच्या भूमिकेत शिरण्याची गरज नसते. त्यांना गांधीजींसारखी वेशभूषा करून डिट्टो गाांधींसारखे दिसण्यात त्यांना गंमत वाटत असते. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मोर्चा किंवा मिरवणूक संपली की सोंग संपत असते. त्यानंतर ती व्यक्ती आपापले छंद जोपासण्यास मोकळी असते. कदाचित मोर्चात किंवा मिरवणुकीत भेटलेले हे गांधीजी नंतर बार किंवा गुत्त्यामध्येही आढळू शकतात. गांधीजींचे सोंग वठवले म्हणून त्यांच्यासारखे वागण्याचा आग्रह धरला जाऊ लागला तर सार्वजनिक जीवनातून गांधी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि केवळ गांधीजींसारखी वेशभूषा केली म्हणून गांधीजींच्या जवळपास जाता येत नाही. गांधीजींचे नाव घेतले किंवा त्यांनी केलेली एखादी कृती केली म्हणून प्रतिगांधी बनता येत नाही.
दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरोधात लढा उभारला असताना एका गोऱ्या पठाण तरुणाने केलेल्या हल्ल्यात गांधीजींचे दात पडले होते. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल केल्यावर गांधीजींचे समर्थक जमले आणि त्या तरुणाविरोधात पोलिस तक्रार करुया, त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणू लागले. तेव्हा त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वावर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू.त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी पदयात्रा काढली होती, तेव्हा अनेकदा सनातन्यांनी त्यांच्यावर शारीरिक हल्ले करण्याचे प्रयत्न केले. परंतु यापैकी कोणत्याही वेळी गांधीजींनी त्या हल्ल्यांचा प्रतिकार केला नाही किंवा हल्ला करणाऱ्यांविरोधात तक्रारही केली नाही. दुष्टाच्या दुष्टत्वाचा मुकाबला दुष्टत्वाने नव्हे तर सुष्टत्वाने केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या विरोधकांशी शत्रुत्व न धरता त्याच्या मनातील चुकीच्या समजुती बदलण्यासाठी हृदयपरिवर्तन केले पाहिजे, या मताचे ते होते. जोतिराव फुले यांनीही आपल्याला ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले होते. महात्मा होण्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते आणि ती जोतिराव फुले आणि मोहनदास करमचंद गांधी या दोघांनीही दिली होती. अहिंसा हे केवळ उच्चारण्याचे शब्द नव्हे तर गांधीजींसाठी हयातभराचे आचरण होते. त्यासाठी त्यांना कधी सोंग घ्यावे लागले नाही किंवा नाटक करावे लागले नाही.
स्वत:च्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहणे आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे, ही स्वत:ला शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया गांधीजींनी लहानपणापासून ठेवली होती, म्हणून ते महात्मा बनले होते. त्यासाठी त्यांनी कधी अवसान आणले नाही किंवा कधी त्यांना सोंगही घ्यावे लागले नाही. म्हणूनच स्वत:वरील हल्ल्यांबाबतही ते सोशिक राहिले आणि दुसऱ्या कुणा व्यक्तिला कुणी थोबाडीत मारली तर एकच मारली का ?’ अशी त्यांची मळमळ कधी उफाळून आली नाही. कारण अहिंसा हा त्यांचा धर्म होता, ते सोंग नव्हते.

Wednesday, November 23, 2011

कुणाचे बापजादे काय करीत होते ?

मुंबईसह पुणे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्याच्या प्रथम चरणात बापजाद्यांच्या नावावर पावत्या फाटू लागल्या आहेत. अर्थात दोन्ही बाजूंनी केली जाणारी वक्तव्ये एवढय़ा हिणकस पातळीवरील आहेत, की त्यांची दखल घेतली तर महत्त्व दिल्यासारखे होईल. स्वत:चे कर्तृत्व थिटे पडायला लागले की, बापजाद्यांच्या पुण्याईचा आधार घेतला जातो, परंतु इथे वंशज एवढे पॉवरफुल आणि स्वयंभू आहेत, की त्यांना कुणाच्या पुण्याईची गरज भासत नाही. त्यांचा उन्माद एवढा जोरात आहे की, विरोधकांच्या बापजाद्यांची मापे काढण्यार्पयत त्यांची मजल गेली आहे. पहिल्या टप्प्यातच ही पातळी गाठली आहे, त्यावरून पुढील काळात काय घडू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आणि अजित पवार यांनी जो काही तमाशा मांडला आहे, तो महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवराळपणाची परंपरा उद्धव आणि राज संयुक्तपणे पुढे चालवत आहेत, परंतु त्यांच्या तोंडाला लागून अजित पवार मात्र आपली परंपरा विसरले आहेत, असे वाटते. ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बारामतीचा म्हमद्या,’ ‘मैद्याचं पोतंअशा गलिच्छ भाषेत शरद पवारांवर टीका करीत होते, तेव्हा पवारांनी कधीही वाकडा-तिकडा शब्द उच्चारला नव्हता. माझं बालपण कोल्हापुरात गेलंय. मी लहानपणी राजाचा असं शिकलेलो नाही..असं बोलून पवार सूचकपणे ठाकरेंच्या शिवराळ भाषेचा प्रतिवाद करायचे आणि आपल्यावर यशवंतरावांसारख्या सुसंस्ककृत नेत्याचे संस्कार असल्याचे सांगायचे. अजित पवार यांना काकांची सभा ऐकण्याचा योग कधी आला नसावा त्यामुळे शिवराळपणाचा सुसंस्कृतपणे प्रतिवाद कसा करायचा, हे त्यांना माहीत नसावे किंवा ठाकरे कंपनीला त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे आक्रमक नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण होते, असा त्यांचा गैरसमज असावा. कुणाचे बापजादे काय करीत होते, याच्याशी महाराष्ट्रातील जनतेला देणे-घेणे नाही. आजच्या घडीला राजकारण करताना तुम्ही काय कर्तृत्व गाजवत आहात, हे अधिक महत्त्वाचे आहे.
पहिल्या टप्प्यातच राज ठाकरे यांनी जे काही मांडले आहे, ते पाहता त्यांना सारी निवडणुक स्वत:भोवती फिरवत ठेवायची असावी असे दिसते. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नसते, त्यांना काहीही बोलायला मुभा असते. त्याबाबतीत ठाकरे कंपनीची बरोबरी कुणी करू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनी अशाच प्रकारे  मध्ये महाराष्ट्र ढवळून काढला, त्याला गोपीनाथ मुंडे यांची आक्रमक साथ मिळाली आणि शरद पवार यांच्याकडून अपक्षांची रसद मिळाली त्यामुळे शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली. परंतु युतीचा कारभार पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पुन्हा कधीही निवडून देण्याचा विचार केला नाही. तोंडाचा बाजार मांडणे आणि राज्याचा कारभार चालवणे या भिन्न गोष्टी आहेत आणि त्यातील फरक समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. अर्थात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रामराज्याचा अनुभव येत नाही हे खरे असले तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पर्याय म्हणून युतीला स्वीकारले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या मार्गानेच जाण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची जी वैशिष्टय़े होती, ती सारी त्याच्याही भाषणात खच्चून भरलेली असतात. नाहीतर हल्ली लोक अनेक गोष्टींनी एवढे त्रासलेले असतात की, त्यांनाही दोन घटका मनोरंजन हवे असते. टीव्हीवर तसे मनोरंजक काही नसते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा, नाटक पाहणे महागाईमुळे परवडणारे राहिलेले नाही. अशा काळात राज ठाकरे यांच्या भाषणाइतके मनोरंजनमूल्य अन्य कोणत्याही गोष्टीला नाही, त्यामुळे लोक आवर्जून गर्दी करतात. आणि गर्दीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांना चौकार षटकार ठोकावे लागतात. नकला कराव्या लागतात. पुण्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार किंवा आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात त्यांनी जी वक्तव्ये केली, त्यामागे टीकेपेक्षाही मनोरंजन हाच त्यांचा उद्देश असावा. परंतु मनोरंजनही सुमार आणि दर्जेदार अशा दोन प्रकारचे असते. राज ठाकरे हे व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांना कलेची चांगली जाण असल्याचे मानले जाते. वस्तुस्थितीवर व्यंगात्मक प्रतिक्रिया प्रभावी ठरते, परंतु व्यंगावरचा विनोद हा हिणकस मानला जातो. पोलिस भरतीसंदर्भातील प्रवेश सादर करताना राज ठाकरे यांनी आर. आर. पाटील यांच्या उंचीसंदर्भात केलेली टिपणी अशीच खालच्या पातळीवरची होती. अशाच प्रकारे उद्या कुणी ठाकरे कंपनीवर विनोद करायचे म्हटले तरी फारसे अवघड नाही.
राज ठाकरे यांनी महापालिका उमेदवारीसाठी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून त्याकडे स्वागतशील दृष्टिने पाहण्यास हरकत नाही. परंतु या परीक्षेच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीला आपण क्रांतिकारी वळण देत आहोत, असा त्यांचा जो अविर्भाव दिसून येतो, त्याची आवश्यकता नाही. यानिमित्ताने त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमधील दिनकर भोसलेचा अजेंडाच हाती घेतल्याचे दिसते. कारकूनासाठी परीक्षा होते, पोलिसांसाठी परीक्षा होते, मग पंतप्रधानांसाठी परीक्षा का नाही किंवा गृहमंत्र्यांची उंची का मोजत नाहीत, हे त्यातूनच येते. सिनेमात शेवटी दिनकर भोसले जे बोलतो की, या देशाचा अर्थमंत्री चांगला अर्थतज्ज्ञ का होत नाही, कायदामंत्री चांगला कायदेतज्ज्ञ का होत नाही वगैरे वगैरे..राज ठाकरेंना सिनेमातले डायलॉग प्रत्यक्षात आणायचे असल्याचेच दिसून येते.
इथे एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे, ती म्हणजे प्रारंभीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची अट घालण्याचा विचार झाला नव्हता असे नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. ज्या देशातील बहुसंख्य जनता निरक्षर आहे, त्या जनतेचा प्रतिनिधी साक्षरांना केले, तर साक्षरांच्या गैरव्यवहाराचे काय, असा त्यांचा युक्तिवाद होता. शिवाय मागासांना निरक्षर ठेवायचे आणि निरक्षरांना मूर्ख ठरवून त्यांना सर्व प्रकारच्या मालकी हक्कांपासून वंचित ठेवायचे, असाही डाव असल्याचे बाबासाहेबांचे म्हणणे होते. घटनेच्या माध्यमातून एक व्यक्ति एक मूल्य हे क्रांतिसूत्र त्यांनी त्याच उद्देशाने दिले. परीक्षा देऊन उमेदवारी मिळवलेले आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी चांगला कारभार करतील, याचा काय भरवसा ? कारण जास्त हुशार लोकांनीच अधिक भ्रष्टाचार केल्याचा देशाचा इतिहास आहे. आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अल्पशिक्षित मुख्यमंत्र्यांनी केलेला लोकाभिमुख कारभारही विस्मरणात जाण्याएवढा जुना झालेला नाही.

Wednesday, November 16, 2011

श्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा मुंबईतल्या एका वृत्तपत्राने कोल्हापुरात आणखी एक खानावळ सुरू झालीअशा शब्दात त्याची संभावना केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहात होते. उच्च शिक्षण ही ठराविक वर्गाची मिरासदारी आहे, असे मानणाऱ्या वर्गाकडून प्रारंभीच्या काळात शिवाजी विद्यापीठाची हेटाळणी होत होती, परंतु विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिवाजी विद्यापीठाची भक्कम पायाभरणी केली. एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील चौतीस संलग्न महाविद्यालये आणि चौदा हजार विद्यार्थी घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आज सव्वादोनशे महाविद्यालये आणि दोन लाखांवर विद्यार्थी आहेत. शिवाय मधल्या काळात सोलापूर विद्यापीठ वेगळे सुरू झाले, ते वेगळेच.
अनेक चढउतारांवरून प्रवास करीत शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. आज स्वायत्त संस्था, अभिमत विद्यापीठे, परदेशी विद्यापीठे याचबरोबर खासगी विद्यापीठांचे युग सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर शिवाजी विद्यापीठासारख्या पारंपारिक विद्यापीठाचे भवितव्य काय असू शकेल, असा प्रश्न निर्माण होतोच. त्याही आधी देशातील अन्य पारंपारिक विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाचे वेगळेपण कशात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वत:च्या फंडातून पंचेचाळीस लाखांची वेगळी तरतूद करून शिष्यवृत्ती योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. आवर्जून नोंदवण्याजोगी बाब म्हणजे कमवा आणि शिका योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत ही योजना राबवून श्रमाची प्रतिष्ठा रुजवण्याचा प्रयत्न केला. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर ही योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे ऐपत नसलेल्या खेडय़ा-पाडय़ांतील कष्टकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. शिवाजी विद्यापीठात या योजनेअंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातील शेतात भांगलण करताना दिसतील, पिठाच्या गिरणीत काम करताना दिसतील, कँटिनमध्ये काम करताना दिसतील किंवा ग्रंथालयातही असतील. दिवसातील काही तास काम करवून घेऊन त्यांच्या निवास आणि भोजनाची सोय विद्यापीठातर्फे केली जाते. या योजनेतून आतार्पयत शेकडो मुलांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. प्रारंभी या योजनेअंतर्गत मर्यादित जागा होत्या. काही वर्षापूर्वी विद्यापीठाने व्याप्ती वाढवून मागेल त्याला कामयोजना सुरू केली. शहरातील काही उद्योजकांचे सहकार्य घेऊन बाहेरही काम मिळवून दिले. चारेक वर्षापूर्वी विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांची शुल्कवाढ केली, तेव्हा एका विद्यार्थी संघटनेने मोर्चा आणला. मोर्चाचे शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना भेटायला गेल्यावर त्यांनी या संघटनेला ठणकावून सांगितले, ‘तुम्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी इथे आला आहात, ते विद्यार्थी आमचे आहेत. शुल्कवाढ करणे ही विद्यापीठाची गरज आहे. परंतु पैसे नाहीत म्हणून कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही जबाबदारी विद्यापीठाची आहे.
आपल्या विद्यार्थ्यांना आईच्या मायेने पोटाशी धरणारे असे विद्यापीठ जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेतरी असेल काय?
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यापासून के. भोगीशयन, बॅरिस्टर पी. जी. पाटील, रा. कृ. कणबरकर, डॉ. के. बी. पवार, डॉ. अप्पासाहे वरुटे, प्रा. द. ना. धनागरे, डॉ. एम. जी. ताकवले, डॉ. माणिकराव साळुंखे अशी कुलगुरूंची परंपरा विद्यापीठाला लाभली. डॉ. एन. जे. पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. अप्पासाहेबांनप्रशासनाची अशी भक्कम चौकट घालून दिली आहे, की अनेक वादळे आली तरी तिला धक्का पोहोचला नाही. राज्यातील अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा शिवाजी विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम असून ते अनेकदा सिद्ध झाले आहे. ग्रामीण विद्यापीठ हे बिरूद विद्यापीठाने कधीच मागे टाकले असून गेल्या दशकात जगभरातील अनेक नामांकित संस्थांशी संशोधन करार करून त्यांच्याशी जोडून घेतले आहे. उच्चशिक्षण, संशोधनाबरोबरच परिसर विकास हे उद्दिष्ट ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होत शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे.

Thursday, November 10, 2011

गांधीविचारांचा ‘अनुपम’ पाईक
  अलीकडच्या काही वर्षात गांधी, गांधीवाद, गांधीगिरी या विषयावर बोलण्याची फॅशन बनली आहे. अण्णा हजारे प्रतिगांधी असल्याच्या थाटात राळेगणसिद्धीपासून दिल्लीर्पयत मिरवू लागले आहेत. ऊस दरासाठी आंदोलन करताना हिंसाचाराला चिथावणी देणारे खासदार राजू शेट्टीसुद्धा आपण अजित पवारांच्या दादागिरीच्या विरोधात गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याची भाषा करू लागले आहेत. या लोकांनी गांधीजींच्या नावाचा इतक्या सवंगपणे वापर सुरू केला आहे की, नवख्या लोकांचा गांधीजी आणि त्यांच्या मार्गाबद्दल गैरसमज झाल्यावाचून राहणार नाही. यापुढील काळात गांधीजींच्या किंवा गांधीमार्गाच्या अशा भ्रष्ट आवृत्त्याच पाहायला मिळणार का, असाही प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही. गांधीवादाचे प्रामाणिकपणे आचरण करणारे, गांधीजींच्या विचारधारेशी अधिकाधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारे जीव या भारतभूमीवर आस्तित्वात आहे का, असाही प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. बरेचसे गांधीवादी खादी भांडार किंवा गांधी विचारांच्या पुस्तकांच्या दुकानांतून दिसतात. अशी दुकाने गांधीवाद्यांची म्युझियमच बनली आहेत. हे बहुतेक थकलेले लोक आहेत. देशात जे क्रियाशील गांधीवादी आहेत, त्यामध्ये अनुपम मिश्र यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. दिल्लीतल्या गांधी शांति प्रतिष्ठानचे काम पाहणारे अनुपम मिश्र हे एक वेगळेच रसायन आहे. आजच्या काळातला गांधीवादी कसा असायला हवा, हे त्यांच्याकडे पाहून कळते. अनुपम मिश्र यांना जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या गृहस्थांचा संपर्क एका पुस्तकाच्या निमित्ताने आला. राजस्थान की रजत बूंदेनावाचे त्यांचे पुस्तक आहे. वेगळ्या संदर्भासाठी ते हवे होते. त्या पुस्तकाचे प्रकाशन गांधी शांति प्रतिष्ठानने केले होते. म्हणून प्रतिष्ठानला पत्र पाठवून पुस्तक व्हीपीपीने पाठवण्याची विनंती केली, किंवा पुस्तकाची किंमत कळवल्यास मनीऑर्डर करतो, मग पाठवून द्या, असे लिहिले. त्यावर उलटटपाली थेट पुस्तकच हातात आल, त्यासोबत अनुपम मिश्र यांचे पत्र होते. अनुपम मिश्र हे गांधी शांति प्रतिष्ठानचे काम पाहतात, याची तोवर कल्पना नव्हती. त्यांनी पत्रात लिहिले होते, तुम्हाला पुस्तक हवे आहे, तर व्हीपीपी किंवा मनी ऑर्डर या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत. हम आपको ग्राहक नही, पाठक मानते हैपत्रातील या वाक्याने अक्षरश: थरारून गेलो. पुस्तकाच्या ग्राहकाला वाचक मानण्याची ही धारणा सगळीकडेच रुजायला हवी, असे मनोमन वाटून गेले. पुस्तकाची मागणी करणाऱ्या कुणा अनोळखी व्यक्तिविषयी एवढी आत्मियता पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होती. त्यानंतर अनुपम मिश्र यांच्याशी ष्टद्धr(७०)णानुबंध जुळले. जेव्हा जेव्हा दिल्लीला जाईन तेव्हा गांधी शांति प्रतिष्ठानला भेट आणि अनुपम मिश्र यांच्याशी गप्पा हा नित्याचा परिपाठ बनला.
अतिशय लाघवी तरीही अकृत्रिण बोलणे. व्यक्तिमत्त्वातला साधेपणाही कमालीचा प्रभावीत करणारा. बोलण्यातून झिरपणारे जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्याला समृद्ध करणारे. इतक्या वेळा भेटी झाल्या, परंतु अनुपम मिश्र कधी स्वत:विषयी बोलताना आढळले नाहीत. पाणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याच विषयावर ते सतत बोलत असतात. त्यांचे बोलणेही पाण्यासारखेच, खळाळणाऱ्या झऱ्यासारखे निर्मळ आणि प्रवाही. पाण्याच्या क्षेत्रात या माणसाने एवढे प्रचंड काम केले आहे, परंतु या या गोष्टी मी केल्यातअसे चुकूनही कधी त्यांच्या बोलण्यातून येत नाही. पारंपारिक जलसाठवणुकीच्या बाबतीत ते देशातील जाणकार म्हणून ओळखले जातात. आज भी खरे है तालाबया त्यांच्या पुस्तकाचा देशातील बहुतेक सर्व भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि त्या त्या भाषांमध्ये हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक संस्थांनी खर्च करून ते पुस्तक लोकांर्पयत पोहोचवले आहे. देशाला तलावांची समृद्ध परंपरा होती आणि ही परंपराच आजच्या पाणीसमस्येवरील सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे.  मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकानंतरच देशभर प्राचीन जलस्त्रोतांचा शोध आणि पारंपारिक तलावांचा शोध तसेच पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू झाले. राजस्थानात जयपूर जिल्ह्यातील लापोडिया गावातल्या ग्रामस्थांनी या पुस्तकालाच धर्मग्रंथ मानून जलस्त्रोतांचा शोध घेतला. सामूहिक प्रयत्नातून दुष्काळग्रस्त गावाचा कायापालट घडवून आणला. तीनशे लोकवस्तीचे हे गाव दरवर्षी दुधापासून चाळीस लाखांचे उत्पन्न घेते. यातूनच गावाला लक्ष्मणसिंह यांच्यासारखा ग्रामविकासाचा नायक मिळाला. लापोडिया गावापासून प्रेरणा घेऊन आजुबाजूची सुमारे तीनशे गावे स्वयंपूर्ण बनली. या परिसरातून रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतरही खूप कमी झाले. ख्यातनाम जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून घेतला आहे. भारत ज्ञान विज्ञान परिषदेने या पुस्तकाच्या  हजार प्रती छापून मोफत वाटप केले. मध्य प्रदेशच्या जनसंपर्क विभागाने  हजार प्रती छापून प्रत्येक ग्रामपंचायतीर्पयत पोहोचवल्या. कपार्टच्या सुहासिनी मुळे यांनी या पुस्तकावर वीस मिनिटांची फिल्म बनवली असून ही फिल्म दूरदर्शनवर अनेकदा दाखवण्यात आली आहे. देशभरातील सोळा रेडिओ स्टेशन्सनी पुस्तकाचे क्रमश: वाचन प्रसारित केले.
देशभरातील पर्यावरणाशी संबंधित संस्था आणि चळवळींशी संबंधित असलेला हा माणूस नेहमी पडद्यामागे राहात आला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या नवीदिल्लीस्थित संस्थेच्या स्थापनेमध्ये अनिल अग्रवाल यांच्याबरोबर अनुपम मिश्र यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता, हे खूप कमी लोकांना ज्ञात आहे. पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजें्र सिंह यांच्या अलवरमधील कामाचे खूप कौतुक झाले. त्यासाठी त्यांना मॅगेसेसे पुरस्कारही मिळाला. परंतु या कामामध्ये लोकसहभागाची जोड देण्याची कल्पना अनुपम मिश्र यांची होती. राजें्र सिंह यांच्या तरुण भारत संघाचे ते अनेक वर्षे अध्यक्षही होते. प्रारंभीच्या काळात राजें्र सिंह यांच्याबरोबर अनुपम मिश्र आणि सीएसईचे संस्थापक अनिल अग्रवाल यांनीही काम केले. राजें्र सिंह यांच्या कामाला वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका या दोघांनी बजावली. राजें्र सिंह यांनी लोकांमध्ये मिसळून प्रचंड काम केले आणि देशासमोर अलवरला देशासमोरचे एक आदर्श उदाहरण बनवले. अलवरचे काम मार्गी लागल्यानंतर अनुपम मिश्र यांनी तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानमध्ये जिथे जिथे पाण्यासाठी काम सुरू होते तिथे तिथे जाऊन मदतीचा हात दिला. याच कामासाठी ते देशाच्या कानाकोपऱ्यांर्पयत पोहोचले. गांधी शांति प्रतिष्ठानच्या वतीने गांधीमार्गनावाचे उत्तम दर्जाचे हिंदी द्वैमासिक प्रकाशित केले जाते, त्याचे संपादन अनुपम मिश्र करतात.
एका लेखात त्यांनी म्हटले आहे, ‘लिहिण्या-वाचण्याशी संबंधित बाबी औपचारिक असतात. शाळेच्या वर्गात बसून सगळे येत नाही. एवढय़ा मोठय़ा समाजाचे संचालन करण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी काही वेगळे मार्ग अनुसरण्याची गरज आहे. काही गोष्टी रात्री आईच्या कुशीत शिरुन झोपी जाता जाता समजायला लागतात तर काही गोष्टी काका, आजोबांच्या खांद्यावर बसून चालता चालता लक्षात येतात. जगण्याचे शिक्षण अशा अनेक मार्गानी परिपूर्ण होत असते.
 आजच्या काळात खराखुरा गांधीविचारांचा पाईक पाहायचा असेल तर अनुपम मिश्र यांना भेटायला हवे !

Wednesday, November 2, 2011

पत्रकार रागावले त्याची गोष्ट...  देशातील तमाम पत्रकार रागावले आहेत. संपादक संतापले आहेत. पत्रकार संघटनांचे नेते खवळले आहेत. अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलनावेळी देशात दुसऱ्या की तिसऱ्या क्रांतीची जी लहर उठली होती तिचे कर्ते-धर्ते आपणच आहोत, असा समज असलेले इलेक्ट्रॉनिक माध्यमातले धुरीणही लालेलाल झाले आहेत. आम्ही कुणाचीही मापे काढू शकतो. कुणाच्याही खासगी बैठकीत कॅमेरा लावू शकतो. कुणालाही काहीही म्हणण्याचा, काहीही दाखवण्याचा आणि त्यावर काहीही भाष्य करण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु आमच्याबद्दल मात्र काही बोलाल तर खबरदार! ही माध्यमातल्या बहुतांश लोकांची सर्वसाधारण धारणा आहे. म्हणूनच प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती मरकडेय काटजू यांनी प्रसारमाध्यमांतल्या लोकांसंदर्भात स्पष्ट मत नोंदवल्यानंतर ते अनेकांच्या जिव्हारी लागले.
पत्रपंडितांचा संताप अनावर होणे स्वाभाविक आहे. कारण स्वत:बद्दल प्रतिकूल मत ऐकण्याची कधी कुणाला सवय नसते. आपण इतरांविरोधात कशाही मोहिमा चालवल्या तरी त्या संबंधितांनी खपवून घेतल्या पाहिजेत. चारित्र्यहनन केले तरीसुद्धा सहिष्णुता दाखवली पाहिजे. स्वत:बद्दल, स्वत:च्या पत्रकारितेबद्दल, लोकशाहीचा चौथा खांब म्हणून बजावत असलेल्या भूमिकेबद्दल तोंडदेखले कौतुक ऐकण्याची सवय असलेल्या अशा पत्रपंडितांना आपल्या माघारी आपल्यासंदर्भात काय प्रतिक्रिया आहेत, याची मात्र खबर नसते. त्यामुळेच असे कुणी थेट बोलते तेव्हा पित्त खवळल्यावाचून राहात नाही. लांबची उदाहरणे राहूद्या. मागे नांदेडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंडुक्याची भाषा केली, तेव्हा पत्रविश्वाचे नेतृत्व करणारे सगळे एकवटले आणि त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्याही कार्यक्रमांवर बहिष्कार घालून त्रागा व्यक्त केला. परंतु निर्णयप्रक्रियेत नसलेल्या अविचारी लोकांनी घेतलेल्या या निर्णयाचे पुढे जे व्हायचे तेच झाले. हा बहिष्कार त्यांना राबवता तर आला नाहीच, उलट शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीचे निमित्त साधून घाईत तो मागेही घेऊन टाकला. नंतर काही दिवसांनी विलासराव देशमुख हे पॅनलच्या चॅनलवरील तज्ज्ञांसंदर्भात बोलल्यावर लगेच त्यांना टार्गेट करण्यात आले. या सगळ्याचा अर्थ काय निघतो, तर आम्हाला जे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे तो आमचा विशेषाधिकार आहे. भारतीय घटनेने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला दिले आहे, त्यामुळे माध्यमांना जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढेच कुणाही व्यक्तीला आहे, याचे भान ठेवले जात नाही. त्याचमुळे स्वत:च्या विशेषाधिकाराचा कांगावा केला जातो आणि असहिष्णू वृत्तीचे दर्शन घडवले जाते. न्यायमूर्ती काटजू यांच्या वक्तव्यानंतर खरेतर माध्यमातील लोकांनी त्रागा करण्याची गरज नव्हती. तो करण्याऐवजी ते काय म्हणाले, हे नीट ऐकून त्यानिमित्ताने वस्तुस्थितीकडे डोळसपणे पाहिले तर त्यांच्या वक्तव्यातील तथ्य लक्षात आले असते आणि तेच माध्यमांच्या भल्याचे ठरले असते.
न्यायमूर्ती काटजू यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसारमाध्यमांसंदर्भातील मते मांडली आहेत. ते म्हणालेत त्यातील ठळक भाग असा आहे : भारतातील प्रसारमाध्यमांमधील बहुतांश पत्रकारांची बौद्धिक पात्रता खूपच निम्नस्तरावरील आहे. बहुतांश पत्रकार खूपच चाकोरीबद्ध आहेत, त्यामुळेच माझे त्यांच्याविषयीचे मत विपरीत आहे. स्पष्ट सांगायचे, तर या पत्रकारांना अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्रातील सिद्धांत किंवा साहित्य, तत्त्वज्ञान यांचे फारसे ज्ञान असेल, असे वाटत नाही. त्यांनी या विषयांचा अभ्यास केला असेल, असेही वाटत नाही. भारतीय माध्यमे जनतेच्या हिताविरोधातच भूमिका घेत असल्याचे दिसून येतात. सामान्यांच्या वास्तवातील समस्यांचे मूळ आर्थिक घडामोडींमध्ये आहे. देशातील  टक्के जनता भयावह दार्रिय़ात आहे, महागाईची समस्या, आरोग्याचे प्रश्न, बेरोजगारी अशी आव्हाने आहेत. मात्र, प्रसारमाध्यमे जनतेचे लक्ष मूळ समस्यांवरून इतरत्र वळवताना दिसतात.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रेस कौन्सिलच्या निरीक्षणाखाली आणायला हवे, असे मतही त्यांनी मांडले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील लोकांना ते साहजिकच जास्त झोंबले आहे.
प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ही मुलाखत दिली असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला विशेष अर्थ प्राप्त होतो. एरवी एक आक्षेप घेता आला असता, तो म्हणजे न्यायव्यवस्थेतल्या व्यक्तीला प्रसारमाध्यमांसंदर्भात विद्वत्ता पाजळण्याचा काय अधिकार? प्रसारमाध्यमांसंदर्भातले त्यांचे आकलन काय? न्यायालयाच्या चार भिंतीत राहून त्यांना समाजाचे कितपत आकलन झाले आहे? प्रसारमाध्यमांसंदर्भात बोलण्याच्या आधी त्यांनी न्यायव्यवस्थेत काय बजबजपुरी माजली आहे, ते पाहावे आणि त्यासंदर्भातही जनतेचे प्रबोधन करावे, असेही म्हणता आले असते. परंतु प्रसारमाध्यमांतील लोकांच्या दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयातून न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेल्या मरकडेय काटजू यांच्याबाबतीत असे काही म्हणता येत नाही. न्यायमूर्ती काटजू यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली आणि त्यांनी ज्या भूमिकेतून आपली जबाबदारी पार पाडली, हे पाहिले तरी त्यांचा अधिकार लक्षात येतो. वानगीदाखल त्यांनी दिलेल्या काही निकालांवर दृष्टिक्षेप टाकता येईल. मुंबईच्या केईएम रुग्णालयात  वर्षे रुग्णशय्येवर असणाऱ्या अरुणा शानबागला इच्छामरण देण्यासंदर्भातील याचिका त्यांच्यापुढे आली होती. तेव्हा माणसाच्या जगण्याच्या अधिकारासंदर्भातील ऐतिहासिक म्हणता येईल, असा निकाल देणारे हेच ते न्यायमूर्ती काटजू. भारतीय दंडविधानातील कलम मध्ये आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरवणारी तरतूद आहे. परंतु ही तरतूद काढून टाकण्याची सूचना त्यांनीच संसदेला केली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती वैफल्यग्रस्त असते. अशा काळात तिला शिक्षेची नव्हे तर मदतीची गरज असते, असे मत यासंदर्भात त्यांनी नोंदवले आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्याकडे समाज गुन्हेगार म्हणून पाहतो, अनेक घटक त्यांचे शोषण करीत असतात आणि पोलिस यंत्रणेकडून गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. कोलकात्यातील एका प्रकरणामध्ये न्यायमूर्ती काटजू यांनी या महिलांच्या जगण्याच्या अधिकारासंदर्भातील महत्त्वपूर्ण निकाल देतानाच देशभरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासंदर्भात कें्र आणि सर्व राज्य सरकारांना आदेश दिले होते. अलीकडच्या काळात घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर हा देशाला कलंक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. पाकिस्तानच्या तुरुंगात  वर्षे खितपत पडलेल्या गोपाल दास या भारतीय कैद्याच्या मुक्ततेसंदर्भात काटजू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आसिफ अली झरदारी यांनी दास यांची मुक्तता केली. ही घटना मार्च मधील. त्यानंतर दोनच महिन्यांनी भारतीय तुरुंगात असलेले ऐंशी वर्षे वयाचे पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ खलील चिश्ती यांच्या मुक्ततेसंदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले होते.
या काही उदाहरणांवरून त्यांची वैचारिक भूमिका आणि तीव्र सामाजिक भान याचे प्रत्यंतर येते. आणि हे एकदा समजून घेतले म्हणजे त्यांना प्रसारमाध्यमांच्या उथळपणासंदर्भात बोलण्याचा अधिकार पोहोचतो किंवा नाही, याचा सोक्षमोक्ष लागतो. म्हणूनच माध्यमातल्या पंडितांनी अनावश्यक त्रागा करण्यापेक्षा स्वत:च्या न्यूजरूममध्ये डोकावून पाहिले तर जास्त बरे होईल. इथे आणखी एक गोष्ट नमूद करायला पाहिजे, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे फार उथळपणे वागतात, अशी चर्चा मु्िरत माध्यमातील लोक करीत असतात. परंतु नीट पाहिले तर आता इलेक्ट्रॉनिक आणि मु्िरत माध्यमांतील लोकांमध्ये फारसा गुणात्मक फरक उरलेलला नाही. दोन्हीकडे जसे गंभीर, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेले थोडेसे लोक आहेत, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती काटजू म्हणतात त्या वर्गातले बरेचसे लोक सापडतील.