श्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठाची
स्थापना झाली, तेव्हा मुंबईतल्या एका
वृत्तपत्राने ‘कोल्हापुरात आणखी एक खानावळ सुरू झाली’
अशा शब्दात त्याची संभावना केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या
संकल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहात होते. उच्च शिक्षण ही ठराविक वर्गाची
मिरासदारी आहे, असे मानणाऱ्या वर्गाकडून प्रारंभीच्या काळात
शिवाजी विद्यापीठाची हेटाळणी होत होती, परंतु विद्यापीठाचे
पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत
शिवाजी विद्यापीठाची भक्कम पायाभरणी केली. एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूर,
सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील
चौतीस संलग्न महाविद्यालये आणि चौदा हजार विद्यार्थी घेऊन सुरू झालेल्या
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आज सव्वादोनशे महाविद्यालये आणि दोन लाखांवर
विद्यार्थी आहेत. शिवाय मधल्या काळात सोलापूर विद्यापीठ वेगळे सुरू झाले, ते वेगळेच.
अनेक चढउतारांवरून
प्रवास करीत शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. आज स्वायत्त
संस्था, अभिमत विद्यापीठे, परदेशी विद्यापीठे याचबरोबर खासगी विद्यापीठांचे युग सुरू होत आहे. या
पाश्र्वभूमीवर शिवाजी विद्यापीठासारख्या पारंपारिक विद्यापीठाचे भवितव्य काय असू
शकेल, असा प्रश्न निर्माण होतोच. त्याही आधी देशातील अन्य
पारंपारिक विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाचे वेगळेपण कशात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वत:च्या फंडातून पंचेचाळीस लाखांची वेगळी
तरतूद करून शिष्यवृत्ती योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले
विद्यापीठ आहे. आवर्जून नोंदवण्याजोगी बाब म्हणजे ‘कमवा आणि
शिका’ योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले
विद्यापीठ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत ही योजना राबवून
श्रमाची प्रतिष्ठा रुजवण्याचा प्रयत्न केला. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी
विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर ही योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे ऐपत
नसलेल्या खेडय़ा-पाडय़ांतील कष्टकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. शिवाजी
विद्यापीठात या योजनेअंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातील
शेतात भांगलण करताना दिसतील, पिठाच्या गिरणीत काम करताना
दिसतील, कँटिनमध्ये काम करताना दिसतील किंवा ग्रंथालयातही
असतील. दिवसातील काही तास काम करवून घेऊन त्यांच्या निवास आणि भोजनाची सोय
विद्यापीठातर्फे केली जाते. या योजनेतून आतार्पयत शेकडो मुलांनी आपले उच्चशिक्षण
पूर्ण केले आहे. प्रारंभी या योजनेअंतर्गत मर्यादित जागा होत्या. काही वर्षापूर्वी
विद्यापीठाने व्याप्ती वाढवून ‘मागेल त्याला काम’ योजना सुरू केली. शहरातील काही उद्योजकांचे सहकार्य घेऊन बाहेरही काम
मिळवून दिले. चारेक वर्षापूर्वी विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांची शुल्कवाढ केली,
तेव्हा एका विद्यार्थी संघटनेने मोर्चा आणला. मोर्चाचे शिष्टमंडळ
कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना भेटायला गेल्यावर त्यांनी या संघटनेला ठणकावून
सांगितले, ‘तुम्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी इथे आला आहात,
ते विद्यार्थी आमचे आहेत. शुल्कवाढ करणे ही विद्यापीठाची गरज आहे. परंतु
पैसे नाहीत म्हणून कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित
राहणार नाही, ही जबाबदारी विद्यापीठाची आहे.’
आपल्या
विद्यार्थ्यांना आईच्या मायेने पोटाशी धरणारे असे विद्यापीठ जगाच्या पाठीवर
दुसरीकडे कुठेतरी असेल काय?
डॉ. अप्पासाहेब पवार
यांच्यापासून के. भोगीशयन, बॅरिस्टर
पी. जी. पाटील, रा. कृ. कणबरकर, डॉ. के.
बी. पवार, डॉ. अप्पासाहे वरुटे, प्रा. द.
ना. धनागरे, डॉ. एम. जी. ताकवले, डॉ. माणिकराव
साळुंखे अशी कुलगुरूंची परंपरा विद्यापीठाला लाभली. डॉ. एन. जे. पवार यांच्या
नेतृत्वाखाली सध्या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. अप्पासाहेबांनप्रशासनाची अशी
भक्कम चौकट घालून दिली आहे, की अनेक वादळे आली तरी तिला
धक्का पोहोचला नाही. राज्यातील अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा शिवाजी
विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम असून ते अनेकदा सिद्ध झाले आहे. ग्रामीण
विद्यापीठ हे बिरूद विद्यापीठाने कधीच मागे टाकले असून गेल्या दशकात जगभरातील अनेक
नामांकित संस्थांशी संशोधन करार करून त्यांच्याशी जोडून घेतले आहे. उच्चशिक्षण,
संशोधनाबरोबरच परिसर विकास हे उद्दिष्ट ठेवून विद्यापीठाची वाटचाल
सुरू आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज
होत शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा