फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

मराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह या प्रक्रियेला अधिक सजगपणे सामोरा जाताना दिसतो. नाटककार आणि पत्रकार म्हणून परिचित असलेल्या जयंत पवार यांनीही अनेक नामवंत लेखकांप्रमाणे दिवाळी अंकांची गरज म्हणून कथा लिहिण्यास प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनीच तसे नमूद केले आहे. मागणीनुसार लिहिलेल्या कथा म्हणजे पाडलेल्या कथा असा समज होण्याची शक्यता असते, परंतु पवार यांच्यावर तसा आळ घेण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढय़ा त्यांच्या कथा आशयदृष्टय़ा सशक्त आहेत. ते या सात वर्षाच्या काळात लिहिलेल्या सात कथांचा संग्रहात समावेश आहे.
मराठीत भाऊ पाध्येंचा अपवाद वगळता महानगरी संवेदनेची कथा तेवढय़ा ताकदीने कुणी लिहिली नाही. महानगरी संवेदनेची कथा म्हणून समीक्षकांनी गौरवलेली अन्य जी कथा आहे, ती खरेतर त्या त्या लेखकांच्या समकालीन, समकंपू, समविचारी अशा लेखक-समीक्षकांनीच प्राधान्याने गौरवलेली कथा आहे. एकूण मराठी कथेच्या पसाऱ्यात तिचे अस्तित्व अगदीच क्षीण राहिले. अर्थात माणसांच्या जगण्यापासून फारकत घेऊन केवळ मनोविश्लेषणाच्या अंगाने गेल्यामुळेच हा प्रवाह बळकट झाला नाही. जयंत पवार यांनी हे सगळे प्रवाह बारकाईने वाचलेले, अभ्यासलेले असावेत आणि ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ सारख्या कथेत त्यांच्यावरील या शक्तिंचा प्रभाव जाणवल्यावाचून राहात नाही. लेखक कितीही अष्टपैलू आणि हुकमी असला तरी ज्याचा त्याचा म्हणून एक कमांड एरिया असतो. ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ ही स्वतंत्र कथा म्हणून ठीकठाक असली तरी जयंत पवार यांचा तो प्रांत किंवा कमांड एरिया नव्हे, हेही लक्षात आल्यावाचून राहात नाही. मुंबईतले गिरणगाव, चाळसंस्कृती आणि तिथली स्थित्यंतरे हा जयंत पवार यांचा कमांड एरिया आहे आणि या संग्रहातील बहुतांश कथा त्याच परिसरातल्या आहेत. ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरू !’आणि ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथांमधील काहीसा रुक्षपणाही प्रारंभीच्या काळातील त्यांच्यावरील महानगरी संवेदनेच्या लेखकांच्या प्रभावाचाच भाग असल्याचे लक्षात येते. असे असले तरी गिरणगाव, गिरणी कामगारांच्या संपानंतरची गिरणगावची पडझड, संपकाळातला कामगारांचा लढाऊपणा, चहुबाजूंनी वाताहात होत असताना परिस्थितीशी नेटानं सामना करणारी माणसं, सामान्य माणसांच्या जगण्यातले असामान्य प्रसंग, त्यांची चिकाटी यांचं एवढं उत्तम चित्रण मराठी साहित्यात यापूर्वी आल्याचं आठवत नाही. कथा सुटय़ा सुटय़ा असल्या तरी एकत्रितपणे चांगला परिणाम साधतात आणि मराठी कथेच्या आशयाच्या कक्षाही रुंदावतात. पवार यांनी निवेदनाचे केलेले प्रयोगही वेगळे असल्यामुळे वाचकाला सोबत घेऊनच कथा प्रवास करतात. चाळीत राहणाऱ्या एका थोडय़ाशा उच्चभ्रू कुटुंबानं एक बंद असलेला सामायिक संडास दुरुस्त करून घेतला आणि कुलुप लावून आपल्या ताब्यात ठेवला. तो संडास सगळ्यांच्या वापरासाठी खुला व्हावा म्हणून चाळकऱ्यांनी केलेल्या संघर्षाची कथा ‘एका रोमहर्षक लढय़ाचा गाळीव इतिहास’ मध्ये आहे. त्यासंदर्भात लेखक जे नोंदवतो ते खूप महत्त्वाचे आहे. ‘ह्या लढय़ाची शिदोरी एक महिना चाळकऱ्यांना पुरली आणि मोडून पडायला आलेली माणसं एक महिना ताठ उभी राहिली. दीर्घ काळ चाललेला संप हळूहळू तुटला, मोडला तरी तो एक महिना खातमकर चाळकरी लांबवू शकले.’ ‘जन्म एक व्याधी’ ही कथा अशीच माणसांच्या गांजलेपणाची, त्यांच्यातील नात्यांच्या ओलाव्याची, माणुसकीची, स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी नाती पणाला लावणाऱ्या माणसांच्या मनोव्यापारांची चटका लावणारी कथा आहे.
‘छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चं्र’ ही संग्रहातील अखेरची कथा गिरणगावमधून बाहेर पडून मुंबईतल्या माणसांच्या जगण्याचे हादरवून टाकणारे दर्शन घडवते. पोलिस तपासकथा लिहिणारा लेखक हा कथेचा निवेदक आहे. दोन कवींनी एका रहस्यमय बाईचा घेतलेला शोध हा कथेचा विषय आहे. अरुण काळे आणि भुजंग मेश्राम हे हयात नसलेले दोन कवी जणू पुन्हा जिवंत होऊन अस्वस्थ आत्म्यांप्रमाणे मुंबईत वावरतात. मनोहर ओक आणि विवेक मोहन राजापुरे हे दोन कवीही कथेत येतात. ‘किती जण येतात बे ह्या शहरात. कुठे कुठे पसरतात, हरवतात, नाहीसे होतात. जगायला येतात नि मरून जातात...’ असं एक कवी म्हणतो. तर ‘या शहरातून कवीच कसे एकेक करून नाहीसे होत चाललेत ?’ असं कथेचा निवेदक म्हणतो. संवेदनशील माणसांचं जगणं किती अवघड बनत चाललंय, याचं हादरवून टाकणारं चित्रण या कथेत येतं.
एकूण मराठी कथेला आशयाच्या अंगाने विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जयंत पवार यांची कथा आहे. केवळ मनोविश्लेषणाच्या अंगाने न जाता कथेतील गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन चिंतनाच्या अंगाने समकालीन वास्तवाला भिडण्याचे महत्त्व पवार जाणतात. पहिल्या कथासंग्रहात लेखकाला गवसलेली स्वत:ची बलस्थाने हे मराठी कथेच्यादृष्टीने शुभसूचक आहे. निखिलेश चित्रे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाला लाभली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे पवारांची कथा वाचकाला जगण्याच्या धुमश्चक्रीत मध्यभागी आणून उभे करते.

टिप्पण्या

  1. Parikshan changle kele aahes.Kal wachayala milale navhate blog mule te shakya zale.Tuzi sahityachi jaan yatunahi vyakt hote.vel devun tuze likhanahi karit raha,je bahuda tu karit asavas pan pustak rupane baher yevu det nahis ase watate.aso.
    Tuza

    Hemant Divate

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी