अण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग
आपली चळवळ भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे , की काँग्रेसच्या विरोधात याबद्दलच अण्णा हजारे यांचा गोंधळ झालेला दिसतो , परंतु त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. अण्णांच्या आजवरच्या वाटचालीत असे अनेक गोंधळाचे टप्पे दिसतील . अण्णांनी दिल्लीत झेंडा रोवण्यापूर्वी त्यांच्याबाबतीत एक गोष्ट ठामपणे म्हणता येत होती , ती म्हणजे अण्णांचा वापर कुणीही करून घेऊ शकते , परंतु अण्णांना कुणी मॅनेज करू शकत नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर वावरत असताना अण्णांनी तेवढे सत्त्व जपले होते , परंतु केजरीवाल-किरण बेदी-मनीष शिसोदिया-प्रशांत भूषण वगैरे चौकडीने त्यांचा ताबा घेतला तेव्हापासून अण्णांच्या बाबतीतले सगळे अंदाज चुकायला लागले असून चौकडीच्या हातातले बाहुले बनून अण्णा वागायला लागले आहेत. अण्णांच्या गांधी प्रतिमेचे भांडवल करून दिल्लीत गर्दी जमते आणि वृत्तवाहिन्यांवर ओसंडून कव्हरेज मिळते , हे लक्षात आल्यामुळे त्याचा लाभ घेऊन काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे , असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी यांनी केला ...