Total Pageviews

Friday, November 21, 2014

नक्षत्रबनाची धोंडेवाडीसाता-याजवळील धोंडेवाडी हे छोटेसे गाव महात्मा गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे.
वीस वर्षांपूर्वी धोंडेवाडी अत्यंत मागास म्हणून ओळखली जात होती. खेडोपाडी अशी अनेक मागास गावे असतात, ज्यांना पंचक्रोशीतले लोग अडाणी गावे म्हणून संबोधतात. धोंडेवाडीची तशीच स्थिती होती. जग सुधारेल पण धोंडेवाडी सुधारणार नाही’, असे पंचक्रोशीतले लोक बोलायचे. गाव तसे आडवळणीच. त्यामुळे एसटी येत नव्हती. कुठल्याही सर्वसाधारण गावाप्रमाणे इथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य असायचे. गावात एकही शौचालय नव्हते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य असायचेच पण महिलांची गैरसोयही व्हायची. जवळच असलेल्या आंगापूर गावचे माणिक शेडगे शेतात जायचे, तेव्हा धोंडेवाडीची शाळकरी मुले भेटायची. त्यांच्याशी ते संवाद साधाययचे. गावातल्या मुलांशी संवाद सुरू झाल्यावर तोच संवाद त्यांना धोंडेवाडी गावात घेऊन गेला. गावातली परिस्थिती बघून त्यांनी काहीएक नियोजन केले आणि स्वच्छतेपासून कामाला सुरुवात केली. गावक-यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि तिथून धोंडेवाडीच्या विकासाची वाटचाल सुरू झाली.
गांधीजी म्हणायचे की कुणी एका तरुणाने मनावर घेऊन गावाची सेवा केली पाहिजे. गावातच सर्व बाबींची सोडवणूक झाली पाहिजे. आणि हे काम व्यक्तिगत पातळीवरच व्हायला पाहिजे. संस्था आली की ते काम तात्पुरते किंवा तकलादू होते. गांधीजींच्या याच विचारांवर निष्ठा ठेवून डॉ. माणिक शेडगे यांनी धोंडेवाडीच्या विकासासाठी वाहून घेतले.
नक्षत्रबन हा गावातील एक अनोखा उपक्रम आहे. एकूण 27 नक्षत्रे आहेत. प्रत्येक राशीचे आणि नक्षत्राचे वेगळे झाड असते, असे मानले जाते. ज्या नक्षत्रात जन्म झाला, त्या नक्षत्राच्या झाडाखाली माणसाला मन:शांती लाभते, अशी पिढ्यानपिढ्या चालत आलेली समजूत आहे. राशी, नक्षत्र आणि नक्षत्रांचे झाड या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कालबाह्य वाटू शकतात. परंतु जुन्या समजुतीचा आधार घेऊन त्यांना काळाशी सुसंगत नवे संदर्भ जोडून काही विधायक प्रयत्न करता येऊ शकतात. डॉ. माणिक शेडगे यांनी त्या समजुतीचा आधार घेऊन भुंड्या टेकडीवर नक्षत्रबन फुलवले. कोणत्याही गावाजवळची टेकडी म्हणजे दगड काढण्यासाठी, खाणकामासाठी हक्काचे ठिकाण असते. हे ओळखून टेकडीला पहारीचा स्पर्श होण्याआधीच त्यांनी तिथे नक्षत्रबनाची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अशी संकल्पना काही दिवसांत किंवा महिन्यात साकार होऊ शकत नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी पाच वर्षात तीनशे दुर्मीळ झाडे लावून टेकडी पर्यावरणदृष्टय़ा विकसित केली. ही टेकडी आता दत्तटेकडी म्हणून ओळखली जाते. टेकडी नुसती विकसित करून ग्रामस्थ थांबले नाहीत तर तिचा नित्य उपयोगही होऊ लागला. गावक-यांच्या सगळ्या बैठका नक्षत्रबनात होतात. त्यामुळे धोंडेवाडी हे परिसरातील पर्यावरणाचे केंद्र बनले आहे. वृक्षारोपण किंवा टेकड्या विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठा आजुबाजूच्या गावातले लोक धोंडेवाडीला येतात.
रवींद्रनाथ टागोरांनी अशी एक संकल्पना मांडली आहे की, यात्रा, उत्सवाच्या काळात लोकांना जे काही सांगितले जाते, ते लोक लक्षात ठेवतात. हीच गोष्ट ध्यानात घेऊन लोकांच्या प्रबोधनासाठी यात्रेचा उपयोग करून घेण्यात आला. गावात गोकुळाष्टमीचा उत्सव पारंपारिकरित्या साजरा केला जातो. यादिवशी गो महोत्सव म्हणजे गायींचे प्रदर्शन भरवले जाऊ लागले. चांगल्या गायींचे क्रमांक काढून गायींचे चांगले संगोपन करणा-या शेतक-यांना सन्मानपत्रे देऊन सत्कार केला जाऊ लागला. प्रत्येक कुटुंब लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार असलेल्या गावाला लोकराज्य ग्राम म्हटले जाते. राज्यात अशी अनेक गावे आहेत, परंतु धोंडेवाडी राज्यातील पहिले महिला लोकराज्य ग्रामआहे. इथल्या सगळ्या महिला लोकराज्यच्या वर्गणीदार झाल्या. महिला सबलीकरणाच्या बाबतीतही धोंडेवाडी आघाडीवर आहे. सर्व महिला बचतगटाच्या सदस्य आहेत. गावात सात बचतगट आहेत. पैकी तीन गट स्वतंत्र उद्योग चालवतात, एक बचतगट दूध डेअरी, एक रास्त धान्य दुकान चालवतो. निर्मलग्राम बनलेल्या धोंडेवाडीला ग्रामस्वच्छता तसेच तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे, त्यामध्येही महिला बचत गटांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. गावातील वीस कुटुंबे सामुदायिक शेती करतात. सामुदायिकरित्या आले लागवड हेही गावाचे वैशिष्ट्य आहे.
ज्ञानयात्री विवेकानंद वाचनालय सुरू करून हे ग्रंथालय आणि शाळेचे विद्यार्थी जोडून घेतले आहेत, जेणेकरून मुलांना वाचनाची सवय लागावी. वाचायला लागल्यामुळे छोट्याशा गावात अनेक मुलांमधून वक्ते तयार झाले आहेत.
धोंडेवाडीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सगळा गाव पूर्वापार शाकाहारी आणि व्यसनमुक्तही आहे. गावात कृष्णभक्तांची आणि दत्तभक्तांची संख्या खूप आहे. पूर्वी गावात गवळ्यांची संख्या अधिक होती. शाळीग्राम पूजनाची परंपरा असल्यामुळे मांसाहार वर्ज्य असावा, असे सांगण्यात येते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा गावात आजही विनातक्रार पाळली जाते. येथील नव्या पिढीनेही अगदी हसतमुख या शाकाहारी परंपरेचा स्वीकार केला आहे. नव्याने नांदायला आलेली सून असो अथवा या गावातून इतरत्र नांदायला गेलेल्या मुली असोत, सगळेच शाकाहाराचे पालन करतात. मांसाहार वर्ज्य असल्यामुळे गावात शेळी किंवा कोंबडी पालनही केले जात नाही. गायी पाळण्याची परंपरा असून सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबे गोपालन करतात. सेंद्रीय शेती करण्याकडेही गावक-यांचा कल आहे.  डॉ. माणिक शेडगे यांनी गावाच्या विकासासाठी वाहून घेतले असून त्यांच्याच पुढाकाराने गावात नवनव्या योजना राबवल्या जातात. कोणतीही सरकारी योजना राबवण्यामध्ये धोंडेवाडी अग्रेसर असते. गावाची एकीही अभूतपूर्व असून ग्रामपंचायत निवड बिनविरोध होते.
पाचशेहून अधिक लोकसंख्या असलेले धोंडेवाडी गाव सातारा तालुक्यात आहे. विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कराड उत्तर विधानसभा मतदार संघात झाला. निर्मलग्राम चळवळ जोर धरू लागल्यानंतर ग्रामस्थांनी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान घ्यायचे नाही असे ठरवले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढून ७५ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. २००६ मध्येच गाव निर्मल बनले आहे. ज्या कुटुंबांकडे शौचालयासाठी जागा नव्हती, त्यांना सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व शौचालये शोषखड्ड्याची म्हणजे पर्यावरणपूरक आहेत.
पेशाने डॉक्टर असले तरी डॉ. माणिक शेडगे वैद्यकीय व्यवसाय करीत नाहीत. श्रमप्रतिष्ठेवर विश्वास असल्यामुळे शेतीच करतात. त्यांनी सामाजिक कार्यालाच वाहून घेतले आहे, परंतु नुसते समाजकार्य म्हणजे शुद्ध सेवा होत नाही, अशी धारणा असल्यामुळेच त्यांनी उदरनिर्वाहासाठी शेतीचा पर्याय निवडला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन गावाने विकास साधला असला तरी तो स्पर्धेपुरता मर्यादित नाही. शाश्वत विकासाची संकल्पना त्यामागे आहे.

Friday, November 7, 2014

जबाबदारी पतंगरावांची ! 

 सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्याच्या इतर भागांमध्ये लक्षणीय यश मिळाले असले तरी सांगली जिल्हा वगळता दक्षिण महाराष्ट्रात फारसा थारा मिळालेला नाही. विधान परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते देऊन दक्षिण महाराष्ट्रात भाजपचा पाया विस्तारण्याची जबाबदारी सोपवलेली दिसते. सत्ता गमावल्यामुळे सैरभैर झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसऱ्या-चौथ्या फळीतील कार्यकर्तेही आता भाजपची वाट धरतील. ज्यांचा राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या राजकारणाच्यादृष्टिने उपयोग होऊ शकतो. पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या सत्ताच अधिक महत्त्वाच्या ठरतात.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील नेते सत्तेच्या सावलीत राहतील, मात्र त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कुत्रेही विचारणार नाही. ना धड सत्तेत ना विरोधात अशा अवस्थेत त्यांना राजकीय अस्तित्वासाठी कुठलातरी एक पर्याय निवडावा लागेल. ज्यांना सत्तेचे लाभ किंवा संरक्षण हवे असेल ते भाजपकडे सरकतील. भाजपशी कधीच जमू शकणार नाही, अशी धारणा असलेले कार्यकर्ते काँग्रेसचा पर्याय निवडतील. माजी मंत्री जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांनीही भविष्यात काँग्रेसचा पर्याय निवडला तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नेमका भाजपशी काय करार केलाय याचा अंदाज येत नसल्यामुळेच सर्वजण शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. कोल्हापूरचे धनंजय महाडिक, साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील हे तिन्ही खासदारही भविष्यात भाजपच्या छावणीत दाखल झाले तर आश्चर्य वाटणार नाही. शरद पवार यांच्या मध्यस्थीने भाजपशी व्यवहार करण्यापेक्षा थेट व्यवहार करण्याला ते प्राधान्य देतील आणि तेच त्यांच्या सोयीचे ठरेल. धनंजय महाडिक यांनी आपल्या चुलतभावाला भाजपकडून विधानसभेवर निवडून आणून स्वतःसाठी वाट तयार केली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नसल्याचे लक्षात आले आहे आणि मुलाच्या भवितव्याचा विचार करूनच विजयसिंह मोहिते-पाटील यांना निर्णय घ्यावा लागेल. उदयनराजे तर पक्ष मानतच नसल्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला पक्षबांधणीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मात्र त्यासाठी खमके नेतृत्व हवे आणि त्या नेतृत्वाला केंद्रीय पातळीवरून अधिकार मिळायला हवेत. प्राप्त परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि पतंगराव कदम हे तीन बडे नेते दक्षिण महाराष्ट्रात आहेत. पैकी सुशीलकुमार शिंदे केंद्रात आणि त्यानंतर थेट सोलापूर शहरातच लक्ष घालतात. अधे-मधे कुठे पाहात नाहीत. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होणार नाही. पृथ्वीराज चव्हाणही दिल्ली आणि कराड याव्यतिरिक्त कुठे लक्ष देत नाहीत. कोल्हापूरचे सतेज पाटील वगळता त्यांना फारसे कुणी समर्थकही नाही. पक्षसंघटना बांधण्यासाठी तालुका पातळीवरील नेत्यांशी संपर्क नसलेल्या व्हाइट कॉलर नेत्यांचा उपयोग नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे पतंगराव कदम हाच एकमेव पर्याय उरतो आणि प्राप्त परिस्थितीत तेच काँग्रेस पक्षाची घडी बसवू शकतात. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांशी त्यांचा दीर्घ संपर्क आहे. सोलापूर जिल्हाही त्यांच्यासाठी नवा नाही. पतंगरावांच्याच भाषेत बोलायचे तर चारही जिल्ह्यातील स्थानिक नेते-कार्यकर्त्यांची सगळी अंडी-पिल्ली त्यांना माहीत आहेत. मोठ्या पडझडीनंतर पक्षबांधणी करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. उदाहरण घ्यायचे तर आमदार महादेवराव महाडिक यांना घेऊन कोल्हापुरात काँग्रेसची बांधणी करता येणार नाही, हे पतंगरावांना माहीत आहे. किमान कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये ते चांगली बांधणी करू शकतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतील. साताऱ्यामध्ये ते फारसे काही करू शकणार नाहीत कारण तिथे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अडसर असेल. विलासकाका उंडाळकरांचे काय करायचे, हाही प्रश्न निर्माण होईल. तिथल्या कारस्थानी राजकारणात शक्ती घालवण्यापेक्षा तीन जिल्ह्यांत लक्ष घातले तरी खूप काही साध्य करता येईल. साताऱ्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून त्यांचीही परीक्षा घेता येईल.
दक्षिण महाराष्ट्रातील एकूण ३७ जागांपैकी २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे बंडखोरांसह १८ जागा होत्या, त्या यावेळी १३ पर्यंत घसरल्या आहेत. काँग्रेसकडे सात जागा होत्या, त्यातील एक जागा कमी झाली आहे. भाजपच्या दोन जागा वाढून आठ झाल्या आहेत. त्यामध्ये भाजपने अन्य पक्षांतून घेतलेल्या शिवाजीराव नाईक (शिराळा), विलासराव जगताप (जत) आणि अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) अशा तिघांचा समावेश आहे. शिवसेनेच्या सहा जागा वाढून त्या नऊ झाल्या आहेत. त्यातल्या सहा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे, ते टिकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना आखावी लागेल. सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी तिथे काँग्रेसचेही लक्षणीय संख्याबळ आहे. भविष्यात तिथली सत्ता मिळवण्याच्यादृष्टिने तयारी करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊन स्वतःची ओळख नष्ट केली आहे. आतापर्यंत मुस्लिम मतदार काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या पाठीमागेही होता, आता तो राष्ट्रवादीपासून पूर्णपणे फारकत घेऊन काँग्रेसकडे येईल. धर्मनिरपेक्ष पर्याय म्हणून राष्ट्रवादीसोबत असलेले अन्य समाजघटकही काँग्रेसकडे वळतील. राजू शेट्टी यांनी भ्रमनिरास केलेल्या मतदारांना पु्न्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्थानिक पातळीवर भाजप-राष्ट्रवादी एक झाले तरीही काँग्रेसकडे मजबूत समर्थन असेल. फक्त ते संघटित करणारे नेतृत्व हवे आहे. आजघडीला ती क्षमत फक्त पतंगराव कदम यांच्याकडेच आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात मजबूत बांधणी करून राज्याच्या मोहिमेवर निघणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल !