Total Pageviews

Tuesday, August 23, 2016

मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’


रंगनाथ पठारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा  नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो.
‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आपले लेखन, आपली आसक्ती, आपला भ्रम याचा तो शोध घेतोय. पुन्हा पुन्हा तो आपलं जगणं रचण्याचा प्रयत्न करतोय, त्याची ही गोष्ट आहे. या लेखकाने तरुण वयात स्त्री-पुरुषांमधल्या नेत्रयुग्माच्या मिथुनाचे दृश्य पाहिले. कॉलेजच्या समारंभासाठी आलेले एक ख्यातनाम लेखक समारंभानंतर एका स्त्रीशी बोलत उभे राहतात. समोरासमोर अगदी निकट उभे असताना त्यांनी एकमेकांच्या नजरांनी जो पूल बांधला होता, त्याने त्यांच्यातले अंतर पूर्णतः नाहीसे झाले होते. भोवतालची माणसं, परिसर किंवा पृथ्वीसुद्धा त्यांच्यादृष्टीने अस्तित्वात उरली नव्हती. नाग-नागिणीच्या मिथुनशिल्पापेक्षा कितीतरी आटोकाट जहरी असं ते मिथुनशिल्प सगळ्यांच्या नजरेसमोर धडधडीत साकार झालं होतं. त्या नेत्रमैथुनाच्या दृश्याच्या परिणामामुळं लेखकाचं जगणंच प्रभावित होऊन जातं. आणि तीच तृष्णा घेऊन त्याचा प्रवास सुरू होतो. त्या तृष्णेपुढं त्याला कशाचीच फिकिर नाही. त्याला कोणतीही सत्ता नकोय. अमरत्व नकोय, कीर्ती नकोय. जिच्या नजरेत नजर घातल्यावर परमसुखाचा अनुभव मिळेल, असे डोळे असलेल्या स्त्रीच्या शोधात तो आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटणारा रस्ता कदाचित तिथं असेल असं त्याला वाटतं.
अशा अनोख्या शोधात निघालेल्या लेखकाला आयुष्याच्या अनेक टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया भेटत राहतात. त्या स्त्रियांचे भावविश्व, त्यांची कौटुंबिक, सामाजिक स्थिती, त्यांचे नातेसंबंध, लेखकाशी आलेला त्यांचा संपर्क, विकसित होत गेलेले संबंध यातून कादंबरी उलगडत जाते. एकेका स्त्रीसोबतचे त्याचे जगणे हे स्वतंत्र आयुष्य असते. अशा अनेक आयुष्यांचे तुकडे आणि हे तुकडे जोडून त्यातून पुन्हा पुन्हा एक नवे आयुष्य रचण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी.
लेखकाच्या मुलाचं लग्न, त्यासाठी मध्यस्थी करणारा राजाराम नावाचा मित्र, लग्नानंतर थोड्या दिवसांनी सुनेनं माहेरी निघून जाणं आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार करणं असे सगळे लेखकाचे कौटुंबिक आयुष्य सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू असतानाच त्याला सुनेत्रा भेटते. ही सुनेत्रा म्हणजे एका नामदारांचे प्रेमपात्र. कविता लिहिण्याची आवड असलेल्या सुनेत्राची ओळख नामदार महोदयच लेखकाशी करून देतात. सुंदर सुनेत्राशी जवळिक वाढू लागल्यानंतर नामदार महोदय लेखकाच्या आयुष्याला कलाटणी देतात. आणखी एका नामदारांचे प्रेमपात्र असलेल्या सुलोचनाबाई, त्यांच्या मुली अंबिका आणि अंबालिका, कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नामवंत लेखकाची मैत्रिण कामाक्षी, फळविक्रेती आसराबाई, सांस्कृतिक दौऱ्यावर सोबत असलेली तरुणी नीलाक्षी अशा विविध स्त्रिया लेखकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटतात. एक भेट, दुसरी भेट, दुसऱ्या भेटीला पहिल्या भेटीचा संदर्भ, त्यातून फुटलेली चौथी, पाचवी गोष्ट, सहाव्या गोष्टीत आलेला दुसऱ्या गोष्टींचा संदर्भ अशा एकात एक मिसळलेल्या तुकड्यांतून लेखकाचे आयुष्य उभे राहिले आहे. एकाच आयुष्याकडे ‘स्वच्या आणि   ‘स्वेतरच्या म्हणजे इतरांच्या नजरेतून पाहिल्यानंतर ते वेगवेगळे भासते. या कादंबरीतही लेखक आयुष्याकडे अनेक दृष्टिकोनातून पाहतो.
अस्तित्वाच्या प्रत्येक ठिपक्यावर लेखकाला एक मुद्रा दिसते. त्यात एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून नृत्य करताना दिसतात. त्यातील स्त्री काहीकेल्या लेखकाच्या हाती लागत नाही. तिच्या शोधात तो जगभर हिंडला, सारं आयुष्य पणाला लावलं, परंतु एखाद्या चपळ हरिणीसारखी ती कायम निसटत राहिली. ती जेव्हा जेव्हा लेखकाला सापडली किंवा सापडली असं वाटलं, तेव्हा लक्षात आलं की ती आपली स्त्री नव्हती. आपलं सारं लेखन म्हणजे या स्त्रीचा शोध असल्याची गर्भित लेखकाची धारणा आहे.
कादंबरीतल्या किंवा कथेतल्या पात्रांमध्ये लेखक किंवा त्याच्या आजुबाजूची माणसे शोधण्याचा प्रयत्न करू नये, याअर्थाने ही कादंबरी वाचकांना घडवण्याचं काम करते.  घटना अनेक घडत असतात. मात्र लेखकाच्या आयुष्यातली अशी घटना अनेक शक्यता निर्माण करीत असते. त्याच्यासाठी घटना निमित्तमात्र असते. तो त्या घटनेच्या आधारे शक्यतांच्या विविध वाटा धुंडाळत राहतो. अनेक घटनांचे तुकडे जोडत त्या तुकड्यांतून भ्रमित करणाऱ्या नव्या घटनांची निर्मिती करीत असतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतला लेखक अशीच स्वतःच्या जगण्याची गोष्ट रचण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट रचता रचता त्या गोष्टीला दुसरी फांदी फुटते, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी आणि ती चौथी फांदी पुन्हा पहिल्यापाशी येते. सत्य-असत्याचे अनेक तुकडे जोडत असंख्य भ्रमांच्या अरण्यात घेऊन जातो. ‘चोषक फलोद्यान’ ही कादंबरी म्हणजे वाचकाला चक्रावून टाकणारे असेच एक अरण्य आहे.
कोणत्याही कलाकृतीची रचना स्वतंत्र आणि स्वायत्त असते. जसं प्रत्येक माणसाचं जगणं स्वतंत्र असतं, तसंच कलाकृतीचं असतं. प्रत्यक्षातली माणसं आणि कलाकृतीतली माणसं वेगळी असतात. प्रत्यक्षातल्या अनेक माणसांचं जगणं कलाकृतीतल्या एका व्यक्तिरेखेत साकारलेलं असू शकतं किंवा एका माणसाचं जगणं कलाकृतीतल्या अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्यात तुकड्यातुकड्यांनी विखुरलेलं असू शकतं. पठारे यांच्या या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की लोकपरंपरेतल्या गोष्टींप्रमाणे कादंबरीतल्या पात्रांचं जगणं प्रवाही आहे. एकेका आयुष्याची कथा संपली असं वाटत असतानाच ती संपलेली असते तिथूनच नव्याने सुरू झालेली असते हे खूप उशीरा लक्षात येते. कुठल्याही एका आयुष्याला पूर्णत्व येत नाही, म्हणून मग लेखक अनेक आयुष्यांचे तुकडे एका आयुष्यात जोडून त्याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतो, तरीही पूर्णत्व असं येत नाहीच.
सगळं जगणं हेच मुळात भ्रामक असतं. तो एक भ्रमाचा फुपाटाच असतो, ते केवळ चोषक फलोद्यान असतं. तुमची दुनिया कशी, तर तुम्हाला दिसली तशी. कारण दुनिया ही तुमच्या मनाची निर्मिती असते. प्रत्यक्षात दुनिया हा फक्त भास असतो, भ्रम असतो. तिच्यात कोणतीही संगती नसते. ती तशी आहे असं मानून ती शोधण्यात आयुष्य घालवल्यावर लक्षात येतं की भासांमध्ये संगती नसणं अधिक नैसर्गिक. सत्य केवळ एकच. चोषक फलोद्यान. असंख्य भ्रमांचं हे असंबद्ध – कदाचित सुसंबद्ध अरण्य.

Wednesday, August 17, 2016

गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये ठिकठिकाणी मेलेली जनावरे उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे. आणि सरकार नाक दाबून बुक्क्यांचा मार खात आहे.

दलितांनी पारंपरिक कामे बंद करण्याची शपथ घेतानाच प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर देशभर रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उनाचे आंदोलन गुजरातपुरते असले तरी त्याला राष्ट्रीय परिमाण आहे. जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैय्या कुमार, तसेच हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचीसुद्धा उनाच्या मेळाव्याला उपस्थित होती. गुजरातमधून दलितांनी फुंकलेले रणशिंग देशभरातील  दलितांचे आत्मभान जागृत करू शकेल, असा विश्वास या आंदोलनाने जागवला आहे. दलित नेत्याला मंत्रिपद देऊन दलितांचा प्रतिकात्मक सन्मान करण्याला महत्त्व आहेच. रामदास आठवले यांनी माग माग मागून मिळालेले मंत्रिपद त्याअर्थाने महत्त्वाचे आहेच. परंतु प्रतिकात्मक मंत्रिपदापेक्षाही दलितांच्याप्रती सन्मानाची भावना  महत्त्वाची असते. गुजरातमध्ये सरकार आणि समाजाकडे त्याचाच अभाव आहे. गुजरात सरकार दलितांच्या जमिनीच्या मागणीला कितपत प्रतिसाद देते, हेही पाहावे लागेल.
उनामधील घटनेनंतर २६ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात भाष्य केले. आधी गोरक्षकांवर टीका केली. मग दलितांना मारहाण करू नका. मला गोळ्या घाला, असे भावनिक आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका जिग्नेश मेवाणी याने केली आहे. पंतप्रधानांनी जेव्हा विकास यात्रा काढली तेव्हा तीन दलित युवकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा मोदींनी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’ असे आवाहन का केले नाही, असा प्रश्न जिग्नेश मेवाणीने उनाच्या मेळाव्यात उपस्थित केला.
गोरक्षकांकडून मारहाण झालेल्या दलितांचा मोदींनी उल्लेख केला होता, परंतु मुस्लिमांचा उल्लेख नव्हता केला. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. उनाच्या मेळाव्याला दलितांना पाठिंबा देण्यासाठी गुजरातमधून ठिकठिकाणाहून मुस्लिम लोकही मोठ्या संख्येने आले होते. मेळाव्यात ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या. गुजरातच्या आगामी राजकारणाच्यादृष्टिने या घोषणेला विशेष महत्त्व आहे. कारण भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून मुस्लिमांना एकटे पाडले होते. जातीय दंगलीच्यावेळी मुस्लिमांविरोधात दलितांना वापरले. निवडणुकीच्या राजकारणातही दलितांना वापरून घेतले. उनाच्या घटनेमुळे भाजपच्यादृष्टिने मोठी वजाबाकी सुरू झाली आहे. आधीच पाटीदार समाज विरोधात गेला आहे. त्यात दलितांची भर पडली आहे. मुख्यमंत्री बदलूनही परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही.
नरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरातमधील विकासाचे ढोल वाजवून पंतप्रधानपदाचे दावेदार बनले, त्या गुजरातमधील सामाजिक वास्तव किती भीषण आहे, हे उनाच्या घटनेच्या निमित्ताने जगासमोर आले. उनामधील मेळाव्याहून परतणाऱ्या वीस तरूणांना समतर गावात मारहाण झाली. म्हणजे मेळाव्यासाठी गेलेल्या दलितांना गुजरात सरकार संरक्षणही पुरवू शकले नाही. मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर त्यांनी कारवाई केली. एकूण गुजरातमधील उच्चवर्णियांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही, हेच खरे.
दलित-मुस्लिम ऐक्यामुळे गुजरातमध्ये नवी समीकरणे अस्तित्वात येऊ शकतात. परंतु हे ऐक्य आणि आंदोलकांचा जोष किती काळ टिकून राहतो हेही पाहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि एकूणच भाजप यासंदर्भात कोणते राजकीय डावपेच लढवतात, याचेही औत्सुक्य आहे. ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ ही गुजरातमधली घोषणा देशभर पोहोचली, तर भारतीय जनता पक्षाला त्यांची गोमाताच शिंगावरून सत्तेबाहेर भिरकावून देईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.