Total Pageviews

Wednesday, July 18, 2012

ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव पंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता, जे लिहित होतो ती कविता होती किंवा नाही हेही समजत नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजला होतो. एप्रिल महिना असावा. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावरचं डांबरही वितळून त्याचे छोटे छोटे बुडबुडे येत होते. पावलांचे ठसे त्यावर ठसठशीतपणे उमटत होते. केशवराव भोसले नाटय़गृहाजवळ देवल क्लबच्या जुन्या इमारतीसमोर रस्त्यावर एक मळकट कागद पडला होता. कुतूहल म्हणून तो उचलला तर त्यावर गावनावाची कविता होती -
आभाळ जिथे घन गर्जे/ते गांव मनाशी निजले /अंधार भिजे धारांनी/घर एक शिवेवर पडले..
अन् पाणवठय़ाच्या पाशी/खचलेला एकट वाडा/मोकाट कुणाचा तेथे/कधिं हिंडत असतो घोडा..
झाडांतून दाट वडाच्या/कावळा कधीतरि उडतो/पारावर पडला साधू/ हलकेच कुशीवर वळतो..
गावांतिल लोक शहाणे/कौलांवर जीव पसरती/पाऊस परतण्याआधी/क्षितिजेंच धुळीने मळती..
- तसल्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्याउभ्याच कविता वाचून संपवली, तेव्हा पाय उचलता येईना. पाहिलं तर रस्त्यावरच्या डांबरात पायातलं स्लीपर रुतून बसलं होतं. ते तुटणार नाही, अशा बेतानं हातानंच हळुवारपणे काढलं. डांबरात पाय रुतला, तशीच ती कविता आणि त्या कवितेतलं गावातचं चित्र मनात रुतून बसलं. ती कविता कुणाची हे त्यावेळी माहित नव्हतं. त्यानंतर दोनेक वर्षानी संध्याकाळच्या कवितावाचताना त्यात ती कविता सापडली आणि म्हटलं, ‘अरे, हीच ती रस्त्यात सापडलेली कविता.भर दुपारी रणरणत्या उन्हात डांबरी सडकेवर झालेली ग्रेसनावाच्या कवीची कविता जशी मनात रुतून बसली होती, त्याचप्रमाणं संध्याकाळच्या कवितामधल्या कवितांनी मनावर गारूड केलं. जाणीवपूर्वक मिळवून ग्रेस वाचायला सुरुवात केली. चं्रमाधवीचे प्रदेश’, ‘राजपुत्र आणि डार्लिगनं झपाटून टाकलं.
क्षितिज जसे दिसते/तशी म्हणावी गाणी/ देहावरची त्वचा आंधळी/छिलून घ्यावी कोणी/गाय जशी हंबरते/तसेच व्याकुळ व्हावे/बुडता बुडता सांजप्रवाही/अलगद भरून यावेकवितेप्रमाणंच लयबद्ध असलेल्या त्यांच्या हस्ताक्षरातील पहिल्या कवितेनं व्याकुळतेचा विलक्षण अनुभव दिला आणि पुढच्या काळात त्यांच्या कवितेच्या असंख्य ओळी झिरपत झिरपत खोल मनाच्या डोहात, रक्तार्पयत उतरल्या. दुपारच्या वेळी झोपेतून जागे झाल्यानंतर खिडकीत कोसळणारा पाऊस अनुभवताना पाऊस कधीचा पडतो/झाडाची हलती पाने/हलकेच जाग मज आली/दु:खाच्या मंद स्वराने/या ग्रेसच्या ओळी मनाशी तादात्म्य पावतात.
कविता वाचून कवी तो दिसतो कसा आननि, असा प्रश्न सतत पडत राहिला. कवितेप्रमाणंच ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीही सतत गूढतेच्या धुक्याचं वलय राहिलं. त्यामुळं नागपूरला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वार्ताकनासाठी जाताना प्राधान्याचे विषय होते, ‘ग्रेसआणि आनंदवन’. अधिवेशनाच्या एका सुट्टीदिवशी ग्रेस यांना फोन केला, भेटायला यायचंय म्हटल्यावर त्यांनी सहजपणे याम्हणून सांगितलं. त्यांच्याविषयी जे ऐकलं होतं, त्याच्याशी विसंगत असा हा अनुभव होता. सुमारे तासाभराची ही भेट होती. ग्रेस यांच्याबद्दल जे कुतूहल होतं, ते सगळं विचारलं, अगदी बिनधास्तपणे. तेही मोकळेपणानं बोलत राहिले. रोजचा दिनक्रम, पुस्तकांची रॉयल्टी, त्याचा हिशेब, त्यांचं वर्गातलं शिकवणं, अन्य साहित्यिकांबरोबरचे संबंध..कितीतरी गोष्टींबद्दल विचारत राहिलो. त्याअर्थानं ती रूढ मुलाखतही नव्हती आणि म्हटलं तर अनौपचारिक गप्पाही नव्हत्या. गूढ आणि सगळ्यांपासून फटकून राहणारा हा कवी आपण समजतो तेवढा अलिप्त राहणारा नाही, हेही लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. स्वत:बद्दल, स्वत:च्या प्रतिमेबद्दल कमालीचं कुतूहल होतं त्यांना. नव्या पिढीवर असलेला त्यांच्या कवितेच्या प्रभावाची त्यांना चांगली माहिती होती आणि खूप लोक अनुकरण करतात, हेही माहीत होतं. ग्रेस यांच्या कवितेच्या गूढ धुक्यात फसलेल्या कित्येक नव्या कवींना बाहेर पडण्याची वाट न सापडल्यामुळे अनुकरणातच हौतात्म्य प्राप्त झालं. त्याअर्थानं कवींसह रसिकांनाही मोहात पाडणारा ग्रेस यांच्यासारखा दुसरा कवी मराठीत नाही. यावेळी जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल ते भरभरून बोलले. अन्य साहित्यिकांबरोबर फारशी सलगी नसल्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘जीए कुलकर्णी यांच्यासारख्या हिमालयाशी संवाद असल्यावर छोटय़ा टेकडय़ा काय करायच्या?’ इतकं रोखठोक होतं सगळं त्यांचं. जगभरातल्या प्रतिभावंतांशी स्वत:ला जोडून घेणाऱ्या या प्रतिभावंत कवीला प्राध्यापक म्हणून काम करताना मराठीतले अनेक बेताचे कवीही वर्गात शिकवावे लागत होते. त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘मी जनाबाई शिकवतो, तुकाराम, ज्ञानेश्वर शिकवतो. ते शिकवताना ज्या तादात्म्यानं शिकवतो, त्यावरून विद्यार्थ्यांना कवींमधला फरक समजत असावा.हे खास ग्रेस स्टाइल. स्वत:च्याच मस्तीत लिहिणाऱ्या या कवीनं आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे दाब निर्मितीवर कधीच येऊ दिले नाहीत. एकीकडं दलित साहित्याचा प्रवाह सशक्त बनला असताना आणि मराठीचे अध्यापक म्हणून त्याचं अध्यापनही करणाऱ्या ग्रेस यांनी आपली साहित्य निर्मिती बाह्य दबावांपासून अलिप्त ठेवली. त्यासंदर्भातील आक्षेपांचं खंडन करताना त्यांनी शेक्सपिअरचा दाखला देत बांधिलकी मानली नाही म्हणून साहित्य कमी प्रतीचं ठरत नाही, असं ठाम समर्थनही केलं.
तुकारामहा त्यांचा विलक्षण आवडीचा कवी. राजपुत्र आणि डार्लिगमधल्या तुकारामांवरील कवितेच्या ओळी अशाच झिणझिण्या आणणाऱ्या आहेत - चार चौघे खांदा देतील म्हणून का हुरळून जाऊ / फुटक्या कवटीत तुझा मेंदू कुणासाठी भरून ठेवू ?’ ‘चर्चबेलमध्ये आकांताचे देणेनावाचा तुकारामांवरील लेख आहे. त्याची सुरुवातच विलक्षण आहे - तुकाराम एक थोर कवी. प्रचंड शक्तीचा; आणि आक्रमक प्रतिभेचा. तुकारामाची कविता मला फारशी आवडत नाही. पण मी कोण? कोणीच नाही. त्यामुळे तुकारामाला धक्का पोहोचत नाही.
या लेखात तुकारामांच्या कवितेतील आकांतवृत्ती किती ज्वालाग्राही आहे आणि तुकाराम आपल्या प्रत्येक आकांतवृत्तीचे विसर्जन अनुभूतीच्या करुणामूल्यात कसे करतात, हे ्रग्रेस यांच्या शब्दात मुळापासून वाचण्यासारखे आहे.
चर्चबेलमधल्या एका लेखात त्यांनी म्हटलंय - दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूस मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो मार्ग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इं्िरय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तु !
ग्रेस यांच्यासंदर्भातली एक ऐकलेली, वाचलेली गोष्ट आठवते. खूप वर्षापूर्वी दूरदर्शन वर प्रतिभा आणि प्रतिमानावाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. त्यात ग्रेस यांची मुलाखत झाली होती. ती पाहण्याचा योग आला नाही, परंतु त्या मुलाखतीचे किस्से मात्र खूपदा ऐकायला मिळाले. ग्रेस यांनी स्वत:च्या अटींवर ती मुलाखत दिली होती. मुलाखत सुरू झाल्यापासून संपेर्पयत दूरदर्शनच्या पडद्यावर म्हणे फक्त सिगारेटचा धूर दिसत होता आणि ग्रेस यांचे शब्द धुक्यातून आल्यासारखे वाटत होते. अखेरच्या काळात ग्रेस यांना कर्करोगानं ग्रासलं होतं आणि ते आपल्या पद्धतीनं त्याच्याशी लढत होते. ही लढाई सुरू असतानाच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा वाटलं, या महाकवीला लढाईसाठी पुरस्कारामुळं बळ मिळेल. परंतु या लढाईत ग्रेस हरले. तेव्हा वाटलं, परमेश्वर सामान्य माणसाचे नियम प्रतिभावंतालाही लावून अन्याय करतो, हेच खरं !

संमेलनाची वाटचाल साहित्याकडून अर्थकारणाकडे चिपळूण येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन् होत आहे.  संमेलन चिपळूणमध्ये होणार हे, निश्चित झाल्यापासून अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांनी जो वाद सुरू केला आहे, तो मराठी साहित्य जगताला नवा नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे वैचारिक वाद मागे पडून असल्या फालतू गोष्टींना अलीकडे महत्त्व येऊ लागले आहे आणि ते एकूण आजच्या वाड्.मयीन संस्कृतीशी आणि सारस्वतांच्या वैचारिक वकुबाशी सुसंगत असेच आहे. महामंडळाच्या घटक संस्थेचा सदस्य असलेल्या कुणालाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येत असल्यामुळे हजार-पाचशेच्या पावतीचा सदस्य असलेल्या कुणी अक्षरशत्रूही अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. अध्यक्षपदासाठी मोठे साहित्यिक योगदान किंवा समज वगैरेची गरज नसते. प्रचार करून, दोघा-तिघांना चितपट करून अध्यक्षपद मिळवणाऱ्यांनी फार मोठे वैचारिक दिवे लावले आहेत, असेही अलीकडच्या काळात दिसलेले नाही. गतवर्षीच्या वसंत आबाजी डहाके यांच्या भाषणातील काही पानांचा अपवाद वगळता अलीकडच्या अध्यक्षांची भाषणे रद्दीत घालण्याच्या योग्यतेचीच आहेत. त्यात पुन्हा अध्यक्षपद लाभाचे बनल्यामुळे अनेक साहित्यिकांची हृदये त्यासाठी धडधडू लागली आहेत.
नागपूरला झालेल्या संमेलनाच्या समारोप समारंभात तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संमेलनाध्यक्षांना सरकारतर्फे मानधन देण्याची घोषणा केली होती, परंतु त्यावेळचे अध्यक्ष अरुण साधू यांनी जागेवरच त्याला विरोध केला. कोणताही लाभ नसताना अध्यक्षपदासाठी एवढी चढाओढ लागते आहे, त्याला लाभाची जोड दिली तर अनेक प्रश्न निर्माण होतील, अशी भूमिका साधू यांनी मांडली. हा विषय तिथे थांबायला हवा होता. परंतु पुण्याच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी भरपूर पैसे जमा करून हातचे बक्कळ रक्कम शिल्लक टाकली. त्याच धर्तीवर दोन वर्षापूर्वी ठाण्यात झालेल्या संमेलनाच्या संयोजकांनीही संमेलनाच्या निमित्ताने लाखोंची शिल्लक टाकली. सतीश देसाई यांनी अभिनव उपक्रमाच्या नावाखाली ज्या गोष्टी रेटल्या, त्यात संमेलनाध्यक्षासाठी एक लाखाची तरतूद ही एक बाब होती. परंतु गुटख्याच्या प्रायोजकत्वापासून मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र येण्यार्पयतच्या अनेक चर्चाच्या गदारोळात ती बाब दुर्लक्षित राहिली. दोन वर्षाआधी अरुण साधू यांनी जी गोष्ट नाकारली होती, पुण्याच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी मात्र सतीश देसाईंनी दिलेला लाखाचा धनादेश गुपचूप स्वीकारला आणि ती परंपरा सुरू झाली. त्यामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक हा मानाबरोबरच धनाचाही मुद्दा बनला आहे.
चिपळूणच्या संमेलनाच्या निमित्ताने आधी कोकण मराठी साहित्य परिषदेचे नाव पुढे करून वाद सुरू करण्यात आला. कोमसापच्या मध्यवर्ती समितीने त्यासंदर्भात तटस्थता पाळली असली तरी त्यांच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे अनावश्यक मतप्रदर्शन करून वाद सुरू केला. मुळात हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आहे. कोकणातील साहित्यिकांनी संमेलनात सहभागी व्हायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोमसापचे पदाधिकारी असलेल्या कुणीही आतार्पयत व्रिोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वैचारिक मतभेद जाहीर करून अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावर येण्याचे टाळले असल्याचे ऐकिवात नाही. मधु मंगेश कर्णिक यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष महेश केळुसकर यांच्यार्पयत सगळेच व्यक्तिगतरित्या संमेलनाच्या मंचावर उपस्थित राहिले आहेत. एका संस्थेच्या उपक्रमाला दुसऱ्या संस्थेने आक्षेप घेण्याचे कारण नाही. चिपळूणला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे संमेलन ठरण्याआधी कोमसापने चिपळूणला संमेलन घेण्याचे जाहीर केले होते. प्रारंभीच्या काळातील वाद होता तो तेवढय़ापुरता. परंतु त्यातूनही समजुतीने मार्ग काढण्यात आला. इथे कोमसाप प्रकरणावर पडदा पडायला हवा होता. परंतु कवी अशोक बागवे यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर त्यांनी जी वक्तव्ये केली, त्यातून नवा वाद निर्माण झाला. कोमसापची कार्यपद्धती, संस्थापक मधु मंगेश कर्णिक, संमेलनाच्या अध्यक्षपदाचे आणखी एक उमेदवार ह. मो. मराठे यांच्यासंदर्भात बागवे यांनी काही विधाने केल्याचे प्रसिद्ध झाले. नाही म्हटले तरी कोमसाप हा कोकणातल्या अनेक लिहिणाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दल सार्वत्रिक आदराची भावना आहे. त्यामुळे हा वाद आणखी उफाळला. बागवे यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे किंवा त्यांची विधाने प्रसारमाध्यमांनी वादग्रस्त होतील, अशा रितीने प्रसिद्ध केल्यामुळे वातावरण बिघडले. कोमसापवर टीका करणारे बागवे कालपरवार्पयत कोमसापचे प्रमुख पदाधिकारी होते आणि आजही आहेत. त्यामुळे त्याला वेगळा रंग चढला. नेमके काय साध्य झाले, हे ठोसपणे सांगता येणार नाही, पण बागवे यांना त्यामुळे मुबलक प्रसिद्धी मिळाली. चिपळूणसारख्या छोटय़ा शहरात होणारे संमेलन तारखा ठरायच्या आधीच गाजायला लागले.
अखिल भारतीय संमेलनाने कोटींची उड्डाणे मारल्यानंतर संमेलनाचे आयोजन करण्यासाठी लोक पुढे येत नव्हते. परंतु काही इव्हेंट बहाद्दरांनी त्यावरही उपाय शोधला आणि त्यातूनच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संयोजन म्हणजे पैसे गोळा करण्याचा धंदा बनवला असून पुणे आणि ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. संमेलनासाठी महाराष्ट्र सरकार पंचवीस लाखांचे अनुदान देते. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना असा सांस्कृतिक उत्सव म्हणजे दौलतजादा करायची संधीच वाटते. स्वत:च्या खिशाला दहा रुपयांची खार न बसता लोकांच्या पैशावर साहित्य-संस्कृतीचे आश्रयदाते म्हणून मिरवता येते. अशा मनोवृत्तीतूनच सरकारने विश्वसाहित्य संमेलनाच्या नावाखाली होणाऱ्या मूठभर लोकांच्या विदेशवारीसाठीही पंचवीस लाखांच्या अनुदानाची खैरात सुरू केली. गेल्यावर्षी तर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी पन्नास लाख देऊन टाकले. सरकार इतर अनेक बाबींवर लाखोंची उधळपट्टी करीत असते. त्यामुळे सांस्कृतिक बाबींवर केलेल्या खर्चासाठी आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु आता संमेलनासाठी सरकारी अनुदानाची गरज उरली नसल्याचे गेल्या काही वर्षातील शिल्लक रकमेवरून सिद्ध झाले आहे. या पाश्र्वभूमीवर चिपळूणच्या संमेलनाची संयोजन संस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या एका पदाधिकाऱ्याने संमेलनाच्या खर्चाचा जो नियोजित आकडा सांगितला आहे, तो त्यांच्या भव्य स्वप्नांची साक्ष देणारा आहे. मर्यादित खर्चातही नेटकेपणाने संमेलन करता येते, हे बेळगाव, महाबळेश्वरच्या संमेलनांनी दाखवून दिले आहे. परंतु सांस्कृतिक उत्सवात अर्थकारण शिरल्यामुळे सगळ्यांचीच नियत फिरल्यासारखे वाटू लागली आहे. चिपळूणच्या संमेलनाला तीन कोटी रुपये खर्च येईल, हा कार्यवाहांचा अंदाज सगळ्यांनाच गरगरायला लावणारा आहे. नेटकेपणाने संयोजन केले, तर एक कोटीच्या आत उत्तमपणे संमेलन पार पाडता येऊ शकते. चिपळूणसारख्या छोटय़ा शहरात तर ते सहज शक्य आहे. असे असताना तीन कोटींचा हव्यास कशासाठी, हे समजून येत नाही. स्थानिक संयोजन संस्था असे आर्थिक खेळ आणि घोळ करीत असताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मात्र मिंध्यासारखे त्यांच्या म्हणण्याला माना डोलावत राहतात. संमेलनाचे नियंत्रण महामंडळाकडे असताना महामंडळाचे पदाधिकारी लाचारासारखे राजकीय नेते आणि स्थानिक संयोजकांच्या मागे फरफटत जातात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगताचा प्रमुख उत्सव मानले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्षानुवर्षे साहित्यबाह्य कारणासाठी वादग्रस्त ठरत आहे.

Wednesday, July 4, 2012

येडियुरप्पांची मुजोरी बूकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून  जुलै  रोजी पायउतार झाले, त्याला अकरा महिने झाले. म्हणजे अजून वर्षसुद्धा पूर्ण झालेले नाही. एकीकडे भारतीय जनता पक्षाने कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकले असताना अवैध खाणकाम प्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात येडियुरप्पा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा मागितला. परंतु येडियुरप्पा हे एवढे घमेंडखोर की, त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला.  आमदारांसह  खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले. साधनशुचिता आणि शिस्तीचा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे प्रसंग भूतकाळात पाहिले असले तरी येडियुरप्पांचे प्रकरण जरा जास्तीच हाताबाहेर गेल्यासारखे होते. त्यात नितीन गडकरी यांना जुमानायचे नाही, असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु त्यांचे सगळेच वर्तन संघाच्या आणि भाजपच्या शिस्तीच्या परंपरेला सुरुंग लावणारे असल्याने ते कोणत्याच नेत्याला आणि गटाला मानवणारे नव्हते. त्यामुळे मिळून सारे त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहिले आणि येडियुरप्पांनी आदळ आपट करीत, कुणाच्या कानाखाली वाजवत, कुणाचा लॅपटॉप फोडत राजीनामा दिला होता. त्यांच्याच संमतीने सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. वर्षभरापूर्वीचा हा सगळा प्रकार अद्याप ताजा आहे, परंतु मधल्या काळात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सदानंद गौडा यांनी येडियुरप्पांचा रिमोट झुगारल्यामुळे ते दुखावले आणि त्यांनी गौडांच्या खुर्चीखाली सतत फटाके फोडण्यास सुरुवात केली. गौडांना हटवण्यासाठी पक्षनेतृत्वाला सतत आव्हान दिले.
एखाद्या प्राण्याला माणसाच्या रक्ताची चटक लागल्यावर तो नरभक्षक बनतो, त्याचप्रमाणे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदी असताना सत्तेची चटक लागली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर वचक असूनसुद्धा सत्तेशिवाय त्यांची अवस्था पाण्याबाहेरच्या माशासारखी झालेली दिसते. त्यामुळे ते अधुनमधून बंडाचे निशाण फडकावत आणि शक्तिप्रदर्शन करून आपल्याला मुख्यमंत्री करा, म्हणून पक्षाला भीती दाखवत. पक्षाने आतार्पयत त्यांच्या मागणीला धूप घातलेला नाही, परंतु पक्षनेतृत्व कणखर नसल्यामुळेच त्यांची नाटके सुरू राहिली. अवैध खाणकामप्रकरणी निर्दोषत्व सिद्ध होत नाही, तोर्पयत पक्ष आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी यावेळी पाहिजे जातीचेअसा नवा पवित्रा घेतला आहे. आपण नाही, तर आपल्या लिंगायत समाजातले जगदीश शेट्टर यांचे नाव त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. त्यासाठी गेले आठवडाभर त्यांचे समर्थक आमदार जोर-बैठका काढत आहेत. नऊ मंत्र्यांनी राजीनामे देऊन या मोहिमेला आक्रमक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने त्याची दखल घेऊन दिल्लीहून निरीक्षक पाठवले आणि येडियुरप्पा यांची समजूत काढून वादळ तूर्त शमवण्यात यश मिळवले.
येडियुरप्पा यांना माहीत आहे, की भाजपच्या राजवटीत कर्नाटकात जी नाटके झाली आहेत, ती पाहून येत्या किमान दहा वर्षात कर्नाटकातील जनता पुन्हा भाजपचा नाद करणार नाही. येत्या मे मध्ये म्हणजे दहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. कदाचित त्याआधीही होतील आणि कर्नाटकातून भाजपचे देव उठतील. म्हणूनच उरलेल्या कालावधीत भले तो, चार-पाच महिन्यांचा का असेना मिळेल तेवढा हात मारून घ्यायला हवा, याचसाठी येडियुरप्पा यांचा आटापिटा चालला असावा.
येडियुरप्पा यांनी केवळ बंड करूनच नव्हे, तर अनेक प्रकारे पक्षाला उप्रव देणे सुरू केले. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचे नशीब एवढेच की, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभात येडियुरप्पा आपल्या समर्थकांचे वऱ्हाड घेऊन गेले नाहीत. नाहीतर लग्नाला म्हणून यायचे आणि आहेराऐवजी समर्थक आमदारांच्या सह्यांचे निवेदन देऊन नेतृत्व बदलाची मागणी करायचे. येडियुरप्पा एवढे इरेला पेटले आहेत की, त्यांनी तसे केले असते तरी आश्चर्य वाटले नसते. मधे मधे त्यांनी पक्षनेतृत्वाला असे झटके दिले आहेत. भाजपसह सारा संघपरिवार प्रारंभापासून सोनिया गांधी यांच्यावर आगपाखड करीत असताना येडियुरप्पा यांनी मात्र सोनिया गांधी यांचे मध्यंतरी कौतुक केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची व्यूहरचना सुरू असतानाच येडियुरप्पा यांनी प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगून आपल्याच पक्षाच्या नेत्यांची पंचाईत करून टाकली. एखाद्या पक्षाचा प्रादेशिक पातळीवरील नेता एवढा मुजोर कसा होऊ शकतो, याचा विचार करताना भाजपच्या दक्षिणेतील स्थितीवर नजर टाकावी लागते. कर्नाटकात एकेकाळी भाजपला 0.4 टक्के मते मिळत होती, ती आपल्या प्रयत्नांमुळे  35टक्क्य़ांर्पयत गेली आहेत आणि राज्यातील भाजपमधील आमदारांची संख्या दोन वरुन 122  र्पयत केवळ आपल्याचमुळे गेल्याचा येडियुरप्पांचा दावा आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी जातीचा आधार घेतला आहे. कर्नाटकात वीस टक्के लिंगायत मतदार आहेत आणि ती आपली व्होट बँक आहे, पक्षाने आपली कदर केली नाही तर लिंगायत मतदार पक्षाला माफ करणार नाही, अशी धमकीही ते आडून आडून देत असतात. कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार स्थापन करण्यासाठी बेल्लारीच्या रेड्डी बंधूंची मदत घेताना भाजपने साधनशुचिता गुंडाळून ठेवली, त्याच रेड्डी बंधूंच्या खाणीत येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रिपदाची आहुती गेली. असंगाशी संग करताना भाजपला काही गैर वाटले नाही, कारण कर्नाटकापासून त्यांना दक्षिण दिग्वीजयावर निघायचे होते. दुर्दैवाने नंतरच्या काळात दक्षिणेतील एकाही राज्याने भाजपला थारा दिला नाही. आता तर कर्नाटकातील राजवटही ऱ्हासाकडे निघाली असून येणाऱ्या निवडणुकीत त्याचा निकाल लागेल आणि भाजपसाठी दक्षिणेकडचे दरवाजे बंद होतील.
भाजपमधील नेतृत्वाचा अंतर्गत संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न येडियुरप्पा करताना दिसतात. पक्षाला एकमुखी नेतृत्व नाही. लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे एकमेव राष्ट्रीय नेते असले तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या यादीत असल्यामुळे पक्षात त्यांच्या शब्दाला किंमत नाही. रा. स्व. संघाने हट्टाने राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केलेले नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणात ज्युनिअर असल्यामुळे पक्षाचे अन्य नेते त्यांना मानायला तयार नाहीत. सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरें्र मोदी, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह यांच्यातही ताळमेळ नाही. त्यामुळे येडियुरप्पांचे फावते आहे. येडियुरप्पा यांच्यावर कारवाई म्हणजे कर्नाटकातील सत्तेला स्वत:च्या हाताने सुरुंग लावण्यासारखे असल्यामुळे भाजपचे नेतृत्व ती जोखीम घ्यायला तयार नाही आणि याचाच फायदा उठवत येडियुरप्पा अधुनमधून पक्षनेतृत्वाला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांना माहीत आहे की, आपल्यावर कारवाई करण्याची पक्षनेतृत्वात धमक नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यात एवढे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे की, आपल्यावर कारवाई करण्याचे कुणी बोलून दाखवले तरी अंतर्गत संघर्षातून परस्पर त्याला विरोध केला जाईल. आपल्याला त्यासाठी काहीच करावे लागणार नाही. त्याचमुळे ते बंगळुरूपासून दिल्लीर्पयत एखाद्या डॉनसारखे मिरवतात. पक्षनेतृत्वाला आव्हान देतात. आपल्या मागणीसाठी अल्टीमेटम देतात. पक्षनेतृत्वही त्यांच्या या उथळ व्यवहाराकडे हतबल होऊन पाहात राहते आणि थातूर मातूर आश्वासन देऊन आजचे संकट उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करते. येडियुरप्पा यांची मुजोरी मात्र दिवसेंदिवस वाढतच जाते.