Total Pageviews

Saturday, October 1, 2016

मराठा समाजाची खदखद कशामुळे ?

राज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणालाच येत नाही. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या मराठा समाजाची ही प्रासंगिक खदखद आहे, काही साचत आलेल्या गोष्टी आहेत की यामध्ये भविष्यकालीन उलथापालथीची बीजं दडली आहेत, याबद्दलही कुणी ठोसपणे सांगू शकत नाही. एखाद्या सामाजिक घटनेसंदर्भात एवढी अनिश्चिततेची किंवा अंदाज बांधता न येण्याजोगी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.
मराठा समाज मोर्चांच्या संघटनासाठी निमित्त ठरले ते कोपर्डी येथील घटनेचे. या घटनेनंतर दलित-सवर्ण संघर्षाला चिथावणी देण्याचे, सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न झाले. परंतु महाराष्ट्रात अपवाद म्हणूनही कुठे हिंसक प्रतिक्रिया उमटली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कोपर्डीच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय पातळीवरून करण्यात आली. राज ठाकरे यांनी ती पहिल्यांदा केली. शरद पवार यांनी त्यासंदर्भात खूप सावध प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्या भावनांची दखल घ्यायला हवी, असे सूचक वक्तव्य करून अॅट्रोसिटीच्या कायद्यात दुरुस्तीची मागणी त्यांनी केली. दुरुस्ती आणि रद्द यातील फरक लक्षात न घेता पवारांनाही राज ठाकरे यांच्या पंगतीला बसवण्यात आले, त्यामुळे पवारांना दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. अॅट्रोसिटी संदर्भातील मागणीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर नंतरच्या काळात मोर्चांनी ही मागणी पुढे केली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.
मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर यायला कोपर्डीची घटना केवळ निमित्त ठरली आहे. परंतु तेवढेच कारण आहे, असे म्हणता येत नाही. त्यामागे अनेक वर्षे साचत आलेली खदखद असावी. गेली काही वर्षे मराठवाड्यासह महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळून निघत आहे. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आत्महत्या करणारे शेतकरी बहुतांश मराठा समाजातील आहेत, हे वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे. शेतीत राबणाऱ्या मराठा समाजाची अवस्था वंचितांहून वंचित असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसेल. शेतमजूराला गाव सोडून रोजगारासाठी स्थलांतर तरी करता येते. पण रानात पडिक का होईना पण शेत असलेल्या आणि गोठ्यात भाकड का होईना जनावर असलेल्या शेतकऱ्याला गबाळ पाठीवर टाकून परदेशगमन नाही करता येत. मराठा समाजाची ही अवस्था लक्षात न घेता सतत मराठा समाजाची हेटाळणी केली जाते. आतापर्यंत सत्ता मराठा समाजाच्या हातातच आहे, मराठ्यांनीच पिढ्यान् पिढ्या दलितांवर अत्याचार केले वगैरे दोषारोप केले जातात. आरोपांना भूतकाळातील वास्तवाचा आधार असला तरी ती सर्वंकष वस्तुस्थिती नाही, हेही वास्तव आहे. एखाद्या गावात दोन-चारच तालेवार मराठा घराणी असतात. राज्यातही सत्ता राबवणारी मोजकीच घराणी आहेत. त्यांनाच मराठा समाजाचे प्रतिनिधी मानून सगळ्या मराठा समाजावर दोषारोप ठेवले जातात. गावातल्या बाकीच्या मराठ्यांची अवस्था ओबीसी आणि दलित समाजाहून फारशी वेगळी नसते. दोन वेळा राबल्याशिवाय चूल पेटत नाही.
नगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडात कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना मराठा समाजावर दोषारोप करण्यात आले होते. घटनेची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यासंदर्भात कुणी चकार शब्द काढला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिला महत्त्वाचा निर्णय घेतला तो, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा. सर्व मराठा संघटनांचा विरोध असताना त्यांची दखल न घेता सरकारने आपला निर्णय रेटला. आम्ही तुम्हाला जुमानत नाही, असाच सरकारचा अविर्भाव होता. फडणवीस सरकार एवढे करून थांबले नाही, तर त्यानंतर ठिकठिकाणी होणाऱ्या शिवसन्मान परिषदांवर बंदी घालून आपला जातीयवादी चेहरा दाखवून दिला. ‘सैराट’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ऑनर किलिंगच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला टार्गेट करण्यात आले. सिनेमाबद्दल कुणाचीही तक्रार नव्हती आणि नसावी. त्याला सगळ्यांनी पसंतीची दाद दिली. मराठा समाजाने प्रतिसाद दिला नसता तर महाराष्ट्रात सिनेमा एवढा लोकप्रिय होऊ शकला नसता. परंतु ‘सैराट’च्या निमित्ताने सोशल मीडियामधून मराठा समाजावर चौफेर टीका करण्यात आली. हे सगळे सुरू असतानाच कोपर्डीची घटना घडली.
एकामागोमाग एक घडत गेलेल्या घटनांमुळे मराठा समाजात खदखद होती. ती खदखद मोर्चांच्या रुपाने व्यक्त होत आहे. ‘एक दिवस समाजासाठी’ ही संकल्पना लोकांनी उचलून धरली. वैशिष्ट्य म्हणजे मराठा समाजातील महिला मोठ्या संख्येने प्रथमच रस्त्यावर येत आहेत. या मोर्चांचे एकूण संघटन कौतुकास्पद आहे. परंतु या मोर्चांची भविष्यकालीन दिशा काय असेल, याचाही विचार व्हायला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची विचारधारा हाच मराठा समाजाच्या वाटचालीचा मार्ग असायला पाहिजे. आणि हा मार्ग असेल तर दलितांसह इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊनच मराठ्यांना राजकीय, सामाजिक वाटचाल करावी लागेल. मोर्चाच्या संघटनामध्ये असलेली काही जाणती मंडळी या मार्गाचा पुरस्कार करतात. परंतु या मोर्चांच्या निमित्ताने व्हाट्सअॅपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियामधून व्यक्त होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची भूमिका पाहिली तर ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना, अशी भीती वाटल्यावाचून राहात नाही. आजच्या घडीला फक्त मोर्चांच्या संघटनावर भर दिला जातोय. परंतु तेवढे पुरेसे नाही. संघटनाला प्रबोधनाची जोड द्यायला हवी. प्रबोधन हा प्राधान्याचा मुद्दा असायला हवा. आज ‘मराठा’ म्हणून रस्त्यावर येणारा तरुण उद्या ‘हिंदू’ म्हणून रस्त्यावर उतरणार नाही, यासाठी त्याचे नीट प्रबोधन करायला पाहिजे. कारण संघटन जातीच्या नावावर करता येते, तसेच धर्माच्या नावावरही करता येते. आणि धर्माच्या नावावर दुकानदारी करणारी मंडळी पूर्वापार खूप हुशार आहेत. मराठवाड्याचा काही भाग आणि नगर जिल्ह्याला दलित-सवर्ण संघर्षाची परंपरा आहे. बाकीच्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. गावगाड्यात पूर्वापार लोक सलोख्याने नांदत आहेत. गावगाड्याची ही वीण उसवणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ती घेतली नाही, तर महाराष्ट्र अनेक दशके मागे जाईल.


Tuesday, August 23, 2016

मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’


रंगनाथ पठारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा  नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो.
‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आपले लेखन, आपली आसक्ती, आपला भ्रम याचा तो शोध घेतोय. पुन्हा पुन्हा तो आपलं जगणं रचण्याचा प्रयत्न करतोय, त्याची ही गोष्ट आहे. या लेखकाने तरुण वयात स्त्री-पुरुषांमधल्या नेत्रयुग्माच्या मिथुनाचे दृश्य पाहिले. कॉलेजच्या समारंभासाठी आलेले एक ख्यातनाम लेखक समारंभानंतर एका स्त्रीशी बोलत उभे राहतात. समोरासमोर अगदी निकट उभे असताना त्यांनी एकमेकांच्या नजरांनी जो पूल बांधला होता, त्याने त्यांच्यातले अंतर पूर्णतः नाहीसे झाले होते. भोवतालची माणसं, परिसर किंवा पृथ्वीसुद्धा त्यांच्यादृष्टीने अस्तित्वात उरली नव्हती. नाग-नागिणीच्या मिथुनशिल्पापेक्षा कितीतरी आटोकाट जहरी असं ते मिथुनशिल्प सगळ्यांच्या नजरेसमोर धडधडीत साकार झालं होतं. त्या नेत्रमैथुनाच्या दृश्याच्या परिणामामुळं लेखकाचं जगणंच प्रभावित होऊन जातं. आणि तीच तृष्णा घेऊन त्याचा प्रवास सुरू होतो. त्या तृष्णेपुढं त्याला कशाचीच फिकिर नाही. त्याला कोणतीही सत्ता नकोय. अमरत्व नकोय, कीर्ती नकोय. जिच्या नजरेत नजर घातल्यावर परमसुखाचा अनुभव मिळेल, असे डोळे असलेल्या स्त्रीच्या शोधात तो आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटणारा रस्ता कदाचित तिथं असेल असं त्याला वाटतं.
अशा अनोख्या शोधात निघालेल्या लेखकाला आयुष्याच्या अनेक टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया भेटत राहतात. त्या स्त्रियांचे भावविश्व, त्यांची कौटुंबिक, सामाजिक स्थिती, त्यांचे नातेसंबंध, लेखकाशी आलेला त्यांचा संपर्क, विकसित होत गेलेले संबंध यातून कादंबरी उलगडत जाते. एकेका स्त्रीसोबतचे त्याचे जगणे हे स्वतंत्र आयुष्य असते. अशा अनेक आयुष्यांचे तुकडे आणि हे तुकडे जोडून त्यातून पुन्हा पुन्हा एक नवे आयुष्य रचण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी.
लेखकाच्या मुलाचं लग्न, त्यासाठी मध्यस्थी करणारा राजाराम नावाचा मित्र, लग्नानंतर थोड्या दिवसांनी सुनेनं माहेरी निघून जाणं आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार करणं असे सगळे लेखकाचे कौटुंबिक आयुष्य सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू असतानाच त्याला सुनेत्रा भेटते. ही सुनेत्रा म्हणजे एका नामदारांचे प्रेमपात्र. कविता लिहिण्याची आवड असलेल्या सुनेत्राची ओळख नामदार महोदयच लेखकाशी करून देतात. सुंदर सुनेत्राशी जवळिक वाढू लागल्यानंतर नामदार महोदय लेखकाच्या आयुष्याला कलाटणी देतात. आणखी एका नामदारांचे प्रेमपात्र असलेल्या सुलोचनाबाई, त्यांच्या मुली अंबिका आणि अंबालिका, कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नामवंत लेखकाची मैत्रिण कामाक्षी, फळविक्रेती आसराबाई, सांस्कृतिक दौऱ्यावर सोबत असलेली तरुणी नीलाक्षी अशा विविध स्त्रिया लेखकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटतात. एक भेट, दुसरी भेट, दुसऱ्या भेटीला पहिल्या भेटीचा संदर्भ, त्यातून फुटलेली चौथी, पाचवी गोष्ट, सहाव्या गोष्टीत आलेला दुसऱ्या गोष्टींचा संदर्भ अशा एकात एक मिसळलेल्या तुकड्यांतून लेखकाचे आयुष्य उभे राहिले आहे. एकाच आयुष्याकडे ‘स्वच्या आणि   ‘स्वेतरच्या म्हणजे इतरांच्या नजरेतून पाहिल्यानंतर ते वेगवेगळे भासते. या कादंबरीतही लेखक आयुष्याकडे अनेक दृष्टिकोनातून पाहतो.
अस्तित्वाच्या प्रत्येक ठिपक्यावर लेखकाला एक मुद्रा दिसते. त्यात एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून नृत्य करताना दिसतात. त्यातील स्त्री काहीकेल्या लेखकाच्या हाती लागत नाही. तिच्या शोधात तो जगभर हिंडला, सारं आयुष्य पणाला लावलं, परंतु एखाद्या चपळ हरिणीसारखी ती कायम निसटत राहिली. ती जेव्हा जेव्हा लेखकाला सापडली किंवा सापडली असं वाटलं, तेव्हा लक्षात आलं की ती आपली स्त्री नव्हती. आपलं सारं लेखन म्हणजे या स्त्रीचा शोध असल्याची गर्भित लेखकाची धारणा आहे.
कादंबरीतल्या किंवा कथेतल्या पात्रांमध्ये लेखक किंवा त्याच्या आजुबाजूची माणसे शोधण्याचा प्रयत्न करू नये, याअर्थाने ही कादंबरी वाचकांना घडवण्याचं काम करते.  घटना अनेक घडत असतात. मात्र लेखकाच्या आयुष्यातली अशी घटना अनेक शक्यता निर्माण करीत असते. त्याच्यासाठी घटना निमित्तमात्र असते. तो त्या घटनेच्या आधारे शक्यतांच्या विविध वाटा धुंडाळत राहतो. अनेक घटनांचे तुकडे जोडत त्या तुकड्यांतून भ्रमित करणाऱ्या नव्या घटनांची निर्मिती करीत असतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतला लेखक अशीच स्वतःच्या जगण्याची गोष्ट रचण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट रचता रचता त्या गोष्टीला दुसरी फांदी फुटते, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी आणि ती चौथी फांदी पुन्हा पहिल्यापाशी येते. सत्य-असत्याचे अनेक तुकडे जोडत असंख्य भ्रमांच्या अरण्यात घेऊन जातो. ‘चोषक फलोद्यान’ ही कादंबरी म्हणजे वाचकाला चक्रावून टाकणारे असेच एक अरण्य आहे.
कोणत्याही कलाकृतीची रचना स्वतंत्र आणि स्वायत्त असते. जसं प्रत्येक माणसाचं जगणं स्वतंत्र असतं, तसंच कलाकृतीचं असतं. प्रत्यक्षातली माणसं आणि कलाकृतीतली माणसं वेगळी असतात. प्रत्यक्षातल्या अनेक माणसांचं जगणं कलाकृतीतल्या एका व्यक्तिरेखेत साकारलेलं असू शकतं किंवा एका माणसाचं जगणं कलाकृतीतल्या अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्यात तुकड्यातुकड्यांनी विखुरलेलं असू शकतं. पठारे यांच्या या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की लोकपरंपरेतल्या गोष्टींप्रमाणे कादंबरीतल्या पात्रांचं जगणं प्रवाही आहे. एकेका आयुष्याची कथा संपली असं वाटत असतानाच ती संपलेली असते तिथूनच नव्याने सुरू झालेली असते हे खूप उशीरा लक्षात येते. कुठल्याही एका आयुष्याला पूर्णत्व येत नाही, म्हणून मग लेखक अनेक आयुष्यांचे तुकडे एका आयुष्यात जोडून त्याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतो, तरीही पूर्णत्व असं येत नाहीच.
सगळं जगणं हेच मुळात भ्रामक असतं. तो एक भ्रमाचा फुपाटाच असतो, ते केवळ चोषक फलोद्यान असतं. तुमची दुनिया कशी, तर तुम्हाला दिसली तशी. कारण दुनिया ही तुमच्या मनाची निर्मिती असते. प्रत्यक्षात दुनिया हा फक्त भास असतो, भ्रम असतो. तिच्यात कोणतीही संगती नसते. ती तशी आहे असं मानून ती शोधण्यात आयुष्य घालवल्यावर लक्षात येतं की भासांमध्ये संगती नसणं अधिक नैसर्गिक. सत्य केवळ एकच. चोषक फलोद्यान. असंख्य भ्रमांचं हे असंबद्ध – कदाचित सुसंबद्ध अरण्य.

Wednesday, August 17, 2016

गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये ठिकठिकाणी मेलेली जनावरे उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे. आणि सरकार नाक दाबून बुक्क्यांचा मार खात आहे.

दलितांनी पारंपरिक कामे बंद करण्याची शपथ घेतानाच प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर देशभर रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उनाचे आंदोलन गुजरातपुरते असले तरी त्याला राष्ट्रीय परिमाण आहे. जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैय्या कुमार, तसेच हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचीसुद्धा उनाच्या मेळाव्याला उपस्थित होती. गुजरातमधून दलितांनी फुंकलेले रणशिंग देशभरातील  दलितांचे आत्मभान जागृत करू शकेल, असा विश्वास या आंदोलनाने जागवला आहे. दलित नेत्याला मंत्रिपद देऊन दलितांचा प्रतिकात्मक सन्मान करण्याला महत्त्व आहेच. रामदास आठवले यांनी माग माग मागून मिळालेले मंत्रिपद त्याअर्थाने महत्त्वाचे आहेच. परंतु प्रतिकात्मक मंत्रिपदापेक्षाही दलितांच्याप्रती सन्मानाची भावना  महत्त्वाची असते. गुजरातमध्ये सरकार आणि समाजाकडे त्याचाच अभाव आहे. गुजरात सरकार दलितांच्या जमिनीच्या मागणीला कितपत प्रतिसाद देते, हेही पाहावे लागेल.
उनामधील घटनेनंतर २६ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात भाष्य केले. आधी गोरक्षकांवर टीका केली. मग दलितांना मारहाण करू नका. मला गोळ्या घाला, असे भावनिक आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका जिग्नेश मेवाणी याने केली आहे. पंतप्रधानांनी जेव्हा विकास यात्रा काढली तेव्हा तीन दलित युवकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा मोदींनी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’ असे आवाहन का केले नाही, असा प्रश्न जिग्नेश मेवाणीने उनाच्या मेळाव्यात उपस्थित केला.
गोरक्षकांकडून मारहाण झालेल्या दलितांचा मोदींनी उल्लेख केला होता, परंतु मुस्लिमांचा उल्लेख नव्हता केला. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. उनाच्या मेळाव्याला दलितांना पाठिंबा देण्यासाठी गुजरातमधून ठिकठिकाणाहून मुस्लिम लोकही मोठ्या संख्येने आले होते. मेळाव्यात ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या. गुजरातच्या आगामी राजकारणाच्यादृष्टिने या घोषणेला विशेष महत्त्व आहे. कारण भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून मुस्लिमांना एकटे पाडले होते. जातीय दंगलीच्यावेळी मुस्लिमांविरोधात दलितांना वापरले. निवडणुकीच्या राजकारणातही दलितांना वापरून घेतले. उनाच्या घटनेमुळे भाजपच्यादृष्टिने मोठी वजाबाकी सुरू झाली आहे. आधीच पाटीदार समाज विरोधात गेला आहे. त्यात दलितांची भर पडली आहे. मुख्यमंत्री बदलूनही परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही.
नरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरातमधील विकासाचे ढोल वाजवून पंतप्रधानपदाचे दावेदार बनले, त्या गुजरातमधील सामाजिक वास्तव किती भीषण आहे, हे उनाच्या घटनेच्या निमित्ताने जगासमोर आले. उनामधील मेळाव्याहून परतणाऱ्या वीस तरूणांना समतर गावात मारहाण झाली. म्हणजे मेळाव्यासाठी गेलेल्या दलितांना गुजरात सरकार संरक्षणही पुरवू शकले नाही. मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर त्यांनी कारवाई केली. एकूण गुजरातमधील उच्चवर्णियांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही, हेच खरे.
दलित-मुस्लिम ऐक्यामुळे गुजरातमध्ये नवी समीकरणे अस्तित्वात येऊ शकतात. परंतु हे ऐक्य आणि आंदोलकांचा जोष किती काळ टिकून राहतो हेही पाहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि एकूणच भाजप यासंदर्भात कोणते राजकीय डावपेच लढवतात, याचेही औत्सुक्य आहे. ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ ही गुजरातमधली घोषणा देशभर पोहोचली, तर भारतीय जनता पक्षाला त्यांची गोमाताच शिंगावरून सत्तेबाहेर भिरकावून देईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

Friday, June 24, 2016

कुंबळे नावाचा जादूगार !


अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली, ही बातमी भारतीय क्रिकेटच्या कुणाही चाहत्याला आनंद देणारी आहे. कुंबळेसारख्या उमद्या खेळाडूकडं नवी जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय संघातील कुंबळेच्या सहकाऱ्यांनीच ही निवड केलीय. संघासाठी प्रशिक्षक किती महत्त्वाचा असतो हे जाणतात, त्याचप्रमाणं कुंबळे किती उत्तम सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक आहे, हेसुद्धा तिघं उत्तम रितीनं जाणतात. म्हणूनच तर अनेक दिग्गज नावं स्पर्धेत असताना त्यांनी कुंबळेची निवड केली. संघव्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, हे अनेकदा दिसून आलंय. ग्रेग चॅपेल प्रकरणात तर प्रशिक्षकाचं उपद्रवमूल्य काय असतं, हेही सगळ्यांनी अनुभवलंय. कुंबळेच्या निवडीला महत्त्व येतं ते त्यामुळंच. मार्गदर्शनाचा बडेजाव कुणीही करेल, पण कुंबळे नव्यातल्या नव्या खेळाडूचा मित्र बनू शकतो. त्यांना उभारी देऊ शकतो.

क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असं म्हटलं जायचं. परंतु तो भूतकाळ झाला. कसोटी, साठ षटकांची वन डे, पन्नास षटकांची वन डे, टी-२० असं क्रिकेटचं विश्व मर्यादित बनत गेलं तसतसा क्रिकेटमधला आक्रमकपणा वाढत गेला. किंबहुना आक्रमकपणा ही क्रिकेटच्या मैदानावरची आवश्यक बाब बनली. पण आक्रमकतेच्या जोडीला शिवराळपणा आला. धंदेवाईकपणा आला. आक्रमक तर अनिल कुंबळेसुद्धा होता. कुंबळे अपील जोरकस करायचा. एकदा तर खूप जोरात अपील केलं म्हणून त्याला दंड भरायला लागला होता. पण ते तेवढंच आणि तेवढ्यापुरतंच. बाकी कुंबळे म्हणजे सभ्य माणसांच्या खेळातला शेवटचा मालुसरा म्हणायला हवा. याचा अर्थ नंतरच्या काळातले सगळे असभ्य आहेत, असा होत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या ‘कूल’पणाला सभ्यता नाही म्हणता येत. भारतीय संघाचा कर्णधार असलेला धोनी चेन्नईचा कर्णधारच अधिक शोभायचा. ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावरही त्यानं काही कमी राजकारण केलं नाही. कुंबळेला असा कोणताही दोष लावता येत नाही. जागतिक क्रिकेटमधल्या सभ्यतेचा मसावि काढला तर त्यात अनिल कुंबळे खूप वरच्या स्थानावर असेल.

सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द जवळपास एकाचवेळी सुरू झाली. कुंबळेनंतर सचिन पुढं पाच वर्षे खेळत राहिला. नोव्हेंबर २००८ मध्ये दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी चहापानानंतर अचानक कुंबळेनं निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या अचानक निर्णयानं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्यावेळी त्याला खांद्यावर उचलून घेऊन सगळ्या खेळाडूंनी त्याचा सन्मान केला. क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या खेळाडूंचे निरोप समारंभ अनेकांनी पाहिले असतील, परंतु असा हृद्य निरोप समारंभ कधीच नाही पाहण्यात आला. कुंबळेच्या व्यक्तिमत्त्वातला सुसंस्कृतपणा त्यातून अधिक ठसला.

कुंबळेच्या कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकताना भलीमोठी आकडेवारी सादर करता येऊ शकते. एका डावात दहा बळी घेणारा जगातला दुसरा गोलंदाज, सर्वाधिक बळी घेणारा मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) नंतरचा तिसरा (६१९) गोलंदाज,पाचशेहून अधिक बळी घेणारा भारताचा एकमेव गोलंदाज इत्यादी इत्यादी. परंतु या आकडेवारीच्या पलीकडं कुंबळेनं भारतीय क्रिकेटला खूप काही दिलं. क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या वाट्याला जरा जास्ती कौतुक येत असतं आणि गोलंदाजाची उपेक्षा होत असते. कुणा फलंदाजानं शतकांचं रेकॉर्ड केलं असेल, कुणी धावांचं रेकॉर्ड केलं असेल किंवा आणखी काही, परंतु कुंबळेच्या कारकीर्दीतील दीड तपाच्या काळात भारतानं जे कसोटी सामने जिंकले, त्यातील सर्वाधिक सामने जिंकून देण्यात अनिल कुंबळेचा वाटा आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याच्यासारखा मॅचविनर दुसरा कुणी नाही. कुंबळे खेळत असतानाही अनेकदा भारतीय संघ कसोटी आणि वन डे मध्ये वाईट परिस्थितीतून गेला. परंतु अशा वाईट काळातसुद्धा टीव्हीच्या स्क्रीनवर गोलंदाजी टाकणारा कुंबळे आश्वासक वाटायचा. काही केलं तर हाच करू शकेल, असा विश्वास त्याच्याकडं बघून वाटायचा. आणि बहुतेकवेळा कुंबळे हा विश्वास सार्थ ठरवायचा.

निवृत्तीनंतर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या क्रिकेट कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा मेंटॉर म्हणून त्याची नियुक्ती झाली. वर्षभरानंतर ते सोडून तो मुंबई इंडियन्सचा मेंटॉर बनला. संघटनात्मक कामात झोकून देताना कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा तो अध्यक्ष बनला. त्याचे सहकारी असलेले व्यंकटेश प्रसाद (उपाध्यक्ष) आणि जवागल श्रीनाथ (सचिव) यांच्यासोबत त्यानं संघटनेत काम केलं. हा सगळा अनुभव त्याला प्रशिक्षक म्हणून काम करताना निश्चितच उपयोगी पडेल. अनिल कुंबळे हा खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटमधला जादूगार होता आणि तब्बल अठरा वर्षे त्यानं आपली जादू दाखवली. भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या भूमिकेत या जादूगाराचं पुनरागमन झालंय. त्याच्या कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!


Friday, May 20, 2016

राज ठाकरे उरले टीआरपीपुरते !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास पाहिला तर त्यांची धाव सतत एका खड्ड्याकडून दुसऱ्या खड्ड्याकडे सुरू असल्याचे दिसते. आपल्याकडे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राज ठाकरे यांना ती लागू होत नाही, कारण ते स्वतःच नेहमी पुढे असतात. त्यामुळे नेहमी ठेचा त्यांनाच लागतात. शहाणा माणूस दुसऱ्याला ठेच लागली तरी शहाणा होतो, परंतु राज ठाकरे स्वतः ठेचा खाऊनही शहाणे होत नाहीत, असे दिसते. एक-दोन-चार वर्षे हे रांगण्याचे, दुडदुडण्याचे, धडपडण्याचे वय म्हणून लोक बाळलीलांकडे दुर्लक्ष करतात. परंतु दहा वर्षांनंतरही धडपणे उभे राहता येत नसेल तर शंका वाटायला लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पर्यायाने राज ठाकरे यांच्याबद्दल तसेच वाटायला लागले आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केला. ‘नीट’ परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे, हे खरेच. परंतु इथे राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसा अर्थ नाही, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने कोर्टात प्रयत्न केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व्यक्तिगत लक्ष घालून सगळे प्रकरण हाताळत होते. कोर्टाचा निकाल उलटा गेल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून यंदापुरती सूट देण्याची मागणी केली. ‘नीट’बद्दलची राज ठाकरे यांची भूमिका प्रामाणिक असली तरी राष्ट्रीय पातळीवर एवढे व्यापक प्रयत्न होत असताना त्यांच्या भूमिकेला ‘बाइट’पलीकडे फारसे महत्त्व उरत नाही. परंतु त्यानिमित्ताने का होईना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींपर्यंतचा पूल ‘नीट’ बांधला असल्याचा आभास निर्माण होतो. अर्थात राजप्रेमी माध्यमांनी केलेली ही हवाही असू शकते. राज ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ही घटना महत्त्वाची असली तरी त्यांचे राजकारण खड्ड्यात घालणारी आहे, हे इथे लक्षात घेतले जात नाही.
मनसेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुढीपाडवा मेळावा घेऊन त्यांनी नवी सुरूवात करण्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यातले त्यांचे भाषणही नेहमीपेक्षा वेगळे होते. गंभीर आणि प्रगल्भ म्हणता येईल असे होते. म्हणजे नकला, शिव्या, व्हाट्सअपवरचे विनोद वगैरे फारसे नव्हते. त्यामुळे समोर उपस्थित असलेल्या त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली असली तरी फारसे बिघडणारे नव्हते. कारण तत्कालीन हशा-टाळ्यांपेक्षा दीर्घकालीन प्रभाव किंवा पुढची दिशा महत्त्वाची असते. या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या देशभक्तीच्या राजकारणाचा कठोरपणे समाचार घेतला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावरही टीकेची झोड उठवली. या भाषणातून त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्यादृष्टिनेही काही संकेत दिले नाहीत. निवडणुकीला पुरेसा अवधी असल्यामुळे घाईघाईने काही घोषणा करण्यात अर्थ नाही, असा त्यामागचा उद्देश असू शकतो. परंतु एक शक्यता वाटत होती, की गुढीपाडवा मेळाव्यात थोडे अधिक गांभीर्याने बोलणारे राज ठाकरे पुढच्या काळात बोलण्यापेक्षा कृतीवर भर देतील. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी काही ठोस कृती कार्यक्रम हाती घेतील. परंतु त्याहीबाबतीत त्यांनी हितचिंतकांची निराशा केली. त्यांनी दुष्काळी दौरा काढला. परंतु प्रत्यक्षात तो दुष्काळी दौरा नव्हे, तर कोर्टाच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी काढलेला दौरा असल्याचे स्पष्ट झाले. प्रसारमाध्यमांतून टीका झाल्यानंतर त्यांना स्वतः सांगावे लागले की, मी कोर्टाच्या तारखांसाठी आलोय म्हणून. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी एक फोन सुरू केला, आणि दुष्काळग्रस्तांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. एवढेच काय ते दृश्य काम. दुष्काळग्रस्त भागात जाऊन काम करण्याचे राहो, मुंबई-ठाण्यात शेकडो दुष्काळग्रस्तांनी स्थलांतर केले आहे, त्यांच्यासाठी पक्ष म्हणून मनसेने काही केले असेल तर, तेही पुढे आलेले नाही. म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी नव्या जोमाने सुरुवात केलेल्या या पक्षाने संकटग्रस्त महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले, ही बाब गुलदस्त्यातच राहते.
अशा स्थितीत ‘नीट’चा मुद्दा घेऊन राज ठाकरे पुन्हा मैदानात आले असले तरी तत्कालीक प्रसिद्धीपलीकडे त्यातून काही साध्य होणार नाही. महाराष्ट्रासह आठ-नऊ राज्ये आणि सर्व विरोधी पक्षांनी त्यात लक्ष घातले होते. राज ठाकरे यांनी लक्ष घातले म्हणून यंदापुरती नीटमधून सूट देण्याचा निर्णय झाला, असे  म्हणता येत नाही. बारावीच्या मुलांशी संबंधित एका गंभीर मुद्द्यावर आपण प्रवाहाबाहेर नव्हतो, एवढेच त्यांच्यासाठी समाधान. हे खरे असले तरी यानिमित्ताने त्यांच्या मोदींशी जवळिकीच्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत, त्या मात्र राज ठाकरे यांचे दीर्घकालीन नुकसान करणाऱ्या आहेत. यदाकदाचित त्यांची आणि मोदींची नजिकच्या काळात भेट झाली तर महिनाभरापूर्वी मोदींच्यावर तुटून पडणारे राज ठाकरे पुन्हा अच्छे दिन आल्याचे पोवाडे म्हणणार आहेत काय ? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला चिडवण्यासाठी भाजपकडून हे खेळ केले जाताहेत, हे राज ठाकरे यांना कळत नसेल का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मोठ्या पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापर करण्यासाठी असल्याचाच समज यातून दृढ होईल. मनसेची उरलीसुरली प्रतिष्ठाही मातीत जाईल आणि राज ठाकरे हा महाराष्ट्राचा अँग्री यंग मॅन वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी पुरता उरेल
!

Friday, May 6, 2016

लोकराजा शाहू छत्रपती

जातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ही अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेली संकल्पना बऱ्यापैकी कालबाह्य झाली आहे. बेटीबंदीच्या निर्बंधाचा विळखा मात्र आजही कायम आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अलीकडच्या काळात सुरू केलेली आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची चळवळ त्याचीच साक्ष देते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आंतरजातीय विवाहांचा जोरदार पुरस्कार केला होता. त्याच्याही खूप आधी म्हणजे आजपासून शंभरेक वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला होता.

 शाहूराजे हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी केवळ भाषणे आणि कायदा करून विषय सोडून दिला नाही. त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आपली चुलतबहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी निश्चित केला. मराठ्यातील उच्चकुलीन घराण्यांनी धनगर समाजाशी वैवाहिक संबंध निर्माण करण्याची ही घटना दुर्मीळ आणि तत्कालीन समाजाला पचनी पडणारी नव्हती. कुटुंबापासूनच त्याची सुरुवात होती. परंतु हे संबंध जोडण्याची तयारी व्हावी म्हणून महाराजांनी करवीरच्या शंकराचार्यांकडून, ‘मराठे व धनगर मूलतः एकच आहेत’ असा अभिप्राय मिळवला. कोल्हापूर-इंदूर या दोन संस्थानांमध्ये मराठा-धनगर यांच्यातील शंभर आंतरजातीय विवाह करण्याची योजना त्यांनी आखली होती. त्यानुसार पंचवीस विवाह पार पडले. शाहूराजांच्या अकाली निधनामुळे हे कार्य पुढे गेले नाही.
आजही समाज जी गोष्ट सहज मान्य करू शकत नाही, ती शंभर वर्षांपूर्वी त्यांनी कृतीत आणून दाखवली होती. शाहूराजांच्या दूरदृष्टीच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतात. ज्या त्यांनी शंभर वर्षांपूर्वी कृतीत आणल्या परंतु आजही समाजाला पचनी पडत नाहीत. शाहू महाराजांचा स्पर्श झाला नाही, असे जीवनाचे एकही क्षेत्र आढळत नाही. कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानाच्या या राजाने आपल्या डोंगराएवढ्या कार्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली. महाराष्ट्राचे राज्यकर्ते उठता-बसता त्यांचे नाव घेतात, परंतु कृतीच्या पातळीवर त्यांचा व्यवहार शाहूराजांच्या चार आणेही जवळ जात नाही.
शाहूराजांनी घेतलेला आरक्षणाचा निर्णयही जगाच्या पाठीवरचा असा पहिला क्रांतिकारी निर्णय ठरतो. मागासांसाठी नोकऱ्यांमधील पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय त्यांनी १९०२मध्ये घेतला होता. शंभर वर्षे उलटून गेल्यानंतरही तळागाळातल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मन मोठे करण्याची समाजाची मानसिकता नाही. राज्यकर्ते तर कुठल्या छोट्यातल्या छोट्या घटकालाही दुखावण्याची भूमिका घेत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर आरक्षण धोरणाचे शिल्पकार असलेल्या शाहूराजांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. या निर्णयामुळे शाहूराजांचे शत्रू वाढले आणि ते अधिक संघटित व आक्रमक झाले. लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी त्यावेळी हा निर्णय म्हणजे महाराजांच्या बुद्धिभ्रंशाचे लक्षण असल्याची टीका केली. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, स्त्री शिक्षणाच्या प्रोत्साहनाची धोरणे, वसतिगृहांची चळवळ त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची साक्ष देतात. विधवा पुनर्विवाह कायदा, घटस्फोटाचा व वारसाचा कायदा, देवदासी प्रतिबंधक कायदा, स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायदा असे स्त्रियांना संरक्षण देणारे अनेक कायदे त्यांनी केले.
महाराष्ट्र सरकारने १९७२च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या रोजगार हमी योजनेचे अमाप कौतुक होते. याच योजनेतून भारत सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आकारास आली. परंतु महाराष्ट्र सरकारची रोजगार हमी योजना हीच मुळी शाहूराजांनी १८९६-९७ आणि १८९९-१९०० मधील दुष्काळात आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या उपाययोजनांवर आधारलेली आहे. रोजगार हमी योजनेचे गुणगान गाताना तिचे श्रेय शाहूराजांना दिले जात नाही. दुष्काळात शाहूराजांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण खाते निर्माण करून त्यावर भास्करराव जाधव याच्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळ निवारण कार्यालये स्थापन केली होती.
मुंबई इलाख्यात दुष्काळामुळे हजारो लोक तडफडून मरत असताना कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी पडला नव्हता. कारण शाहूराजांनी दुष्काळात अपंग, वृद्ध आणि निराधार लोकांसाठी ठिकठिकाणी नऊ आश्रम काढले होते, त्यामध्ये पन्नास हजारावर लोकांची सोय करून त्यांचे जीव वाचवले. म्हैसूर राज्यातून धान्य मागवून गावागावांमध्ये धान्याची दुकाने काढली. धान्य घेण्यासाठी लोकांच्या हाती पैसे यावे म्हणून रस्त्यांची, विहिरींची, तलावांची कामे काढली. सरकारची जंगले आणि कुरणे लोकांच्या गुराढोरांसाठी खुली केली. मजुरीवर काम करणाऱ्या महिलांच्या तान्ह्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे उभी केली. महाराष्ट्राने नुकताच भीषण दुष्काळ अनुभवला. दुष्काळनिवारणाचे ढोल वाजवणाऱ्या राज्यकर्त्यांनी प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ असतानाही याच्या दहा टक्के तरी काम केलेले दिसते का ?
काळाच्या पुढे असलेल्या माणसांचे महत्त्व लक्षात यायला समाजही तेवढा प्रगल्भ बनावा लागतो. आजच्या समाजात तेवढी प्रगल्भता व्यापक पातळीवर दिसत नाही. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन होत नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे तीन चेहरे म्हणून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घेतली जातात. अन्य महापुरुषांप्रमाणे या महापुरुषांनाही जातीतल्या मंडळींनी आपल्यापुरते वाटून घेतले आहे. वास्तवात पाहिले तर जोतिराव फुले यांच्यामागे माळी समाजाची शक्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामागे दलितांची ताकद आहे. शाहू महाराजांच्या मागे अशा रितीने मराठाच काय, कुठलाही समाज दिसत नाही. टिळकपंथीयांना तर शाहू महाराज खलनायक वाटतात. आरक्षणासह अस्पृश्यता निर्मूलनापासून आंतरजातीय विवाहापर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय आजही मराठा समाजाच्या पचनी पडताना दिसत नाहीत. असे असले तरी सरकार असो किंवा समाज शाहूंच्या विचारांपासून फारकत घेणे कुठल्याही पातळीवर परवडणारे नाही. 

Tuesday, April 26, 2016

जिथे वाघांची हद्द सुरू होते…

गेल्या काही वर्षांत ‘वाघ वाचवा’ ची साद सातत्याने घातली जातेय.  माणसांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न रोज सतावत असताना वाघांना जरा जास्तीच महत्त्व दिले जातेय, अशी ओरडही केली जात होती. वाघांनी माणूस मारल्यापेक्षा अनेकांचे बळी घेणारा एखादा नरभक्षक वाघ गावकऱ्यांनी मारला तर त्यासंदर्भातील बातम्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकांना पसंत पडत नव्हते. अर्थात त्याचे कारण वेगळे होते. वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वन्यप्राणी गणनेमध्ये लक्षात येत होते आणि अशाच गतीने वाघांची संख्या कमी होऊ लागली तर पृथ्वीतलावरून वाघ नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्राण्यांची एखादी प्रजाती नष्ट होणे गंभीर असतेच, परंतु त्याहीपलीकडे त्या प्राण्याच्या अस्तित्वाचा आशय पोहोचवण्याची गरज असते. परंतु तो पोहोचवण्यात सर्वसंबंधित घटक कमी पडत होते. वाघ वाचवले आणि वाढवले पाहिजेत, परंतु ते का याचे नीट स्पष्टीकरण दिले जात नव्हते.
आजसुद्धा वाघ वाचवण्याची गरज का आहे, याबाबतही आवश्यक ती जाणीवजागृती करण्याची गरज आहे. वाघांसंदर्भात अभ्यास करणारी मंडळी ही भूमिका मांडत असली तरी ती नीट पोहोचत नाही. वाघ हा जंगलाचा कुटुंबप्रमुख आहे, असे मानले तर या कुटुंबप्रमुखाच्या रक्षणाला प्राधान्य द्यायला पाहिजे. वाघ वाचला तर जंगल वाचेल. जंगल वाचले तर जंगलातील इतर जीव वाचतील. जंगल ही नदीची आई आहे, असे म्हटले जाते. कारण बहुतेक नद्या जंगलातच उगम पावतात. जंगल पाणी देते. म्हणजे जंगले टिकली तर पाणी टिकेल आणि पाणी टिकले तर माणूस टिकेल. अशी ही नैसर्गिक साखळी आहे. वाघ वाचवणे म्हणजे केवळ वाघाला वाचवणे नव्हे, तर त्यात माणूस वाचवणे, असाही संदेश असल्याचे समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घेतले तर मग ‘वाघ वाचवा’मोहीम का महत्त्वाची ठरते ते लक्षात येईल. जिथे वाघांची हद्द सुरू होते, तिथे माणसाने ढवळाढवळ करू नये, असाही या मोहिमेचा दुसरा अर्थ निघतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वाघांच्या नव्याने पुढे आलेल्या आकडेवारीचा विचार करायला पाहिजे. वर्ल्ड वाइल्ड फंड आणि ग्लोबल टायगर फोरमने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार जगात ३८९० वाघ अस्तित्वात आहेत. २०१० मध्ये ही संख्या ३२०० होती. म्हणजे गेल्या सहा वर्षांत वाघांची संख्या ६९० ने वाढली आहे. यातली दुसरी नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे वाघांच्या एकूण संख्येतील निम्म्याहून अधिक वाघ भारतामध्ये आहेत. भारतात २२२६, रशियात ४३३, इंडोनेशियात ३७१, मलेशियात २५०, थायलंडमध्ये १९८, नेपाळमध्ये १८९, बांगलादेशात १०६, भूतानमध्ये १०३, चीनमध्ये सात तर व्हिएतनाममध्ये पाच वाघ असल्याचे ही आकडेवारी सांगते. वाघांची संख्या वाढल्याच्या शुभवर्तमानाबरोबर वाघांच्या अधिवास क्षेत्रात वीस हजार चौरस किलोमीटरने घट झाली असल्याची माहिती याचदरम्यान पुढे आली आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी गेल्या शंभर वर्षांत झालेली घट फार मोठी आहे. शंभर वर्षांपूर्वी फक्त आशियामध्ये एक लाख वाघ असल्याचे सांगण्यात येते. आणि आज ही संख्या चार हजारांच्या आत आली आहे.
भारतात जे वाघ आहेत, त्यात संरक्षित क्षेत्राबाहेर लक्षणीय आहेत. सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे, आपले घर हे संरक्षित क्षेत्र असेल तर अंगण हे संरक्षित क्षेत्राबाहेरचे क्षेत्र येते. त्याला बफर क्षेत्र म्हणतात. या बफर क्षेत्रात लोकवस्ती असते. आपल्याकडे जंगलात राहणारे आणि जंगलावर गुजराण असणारे लोक आहेत. मध, लाकूडफाटा गोळा करण्यापासून अनेक प्रकारच्या या लोकांच्या गरजा असू शकतात. या लोकवस्तीच्या गरजांचा सगळा ताण हे बफर क्षेत्र सहन करीत असते. आणि वाघांच्या हत्येच्या बहुतांश घटना अशा बफर क्षेत्रात घडत असतात. वाघाच्या तर अनेक अवयवांना चीन, हाँगकाँगमध्ये मोठी मागणी आहे आणि त्याला किंमतही चांगली मिळते. या शिकारी रोखणे हे सगळीकडचे प्रमुख आव्हान आहे.

वाघांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माणसांचीच आहे. या सुविधा, त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, पाणी, जंगल (निवारा) आणि संरक्षण. नैसर्गिक साखळी टिकवणे महत्त्वाचे असते. या साखळीत प्रत्येक जिवाचे महत्त्व असते. वाघ नसतील तर हरणे वाढतील. त्यांचा जंगलांवर ताण येईल. ती शेतीचे नुकसान करतील. साखळीतला प्रत्येक दुवा महत्त्वाचा असतो. माणूस हरणे मारून खाऊ लागला आणि वाघासाठी हरणे कमी पडू लागली, तर आपोआप वाघ गाई-गुरांकडे वळेल. माणसाने निसर्गाच्या साखळीत ढवळाढवळ केली, तर त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागतील, हे लक्षात घ्यायला हवे. संख्या वाढल्याचे दिसत असले तरी माणसाच्या हस्तक्षेपामुळे वाघांसाठी परिस्थिती बिकट बनत चालली आहे. खाणी वाढताहेत. त्यांचे जंगलांवर अतिक्रमण होते आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठीही नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येतोय. वाघांसाठी जंगलांची सलगता महत्त्वाची आहे. एक जंगल दुसऱ्या जंगलाला जोडणारे हवे. असे कॉरिडॉर नसतील, तर वाघांची संख्या वाढणार नाही. वाघ वाचवण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती हवी आहे.