Total Pageviews

Monday, April 15, 2013

राज ठाकरे आणि अजित पवार

    ज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांसाठी आगामी काळात महाराष्ट्राचे मैदान गाजवणे फार सोपे आहे. खटकेबाज संवाद, चार-दोन वृत्तपत्रीय कात्रणे, पुरावे सादर करत असल्याच्या अविर्भावात केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि काही नेत्यांच्या नकला एवढ्या सामुग्रीवर मैदान गाजवता येते. आणि चेकाळलेल्या गर्दीकडे एकहाती सत्ता मागता येते. अमरावतीमध्ये तर त्यांनी, ‘राज ठाकरे एक पर्याय म्हणून उभा आहे, त्याचा स्वीकार करा’, असे आवाहन केले. काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांना पर्याय देण्यासाठी आपण समर्थ आहोत, अशी वातावरणनिर्मिती आतापासून करण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतो.
  महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला, तर कोणत्याही एका नेत्याच्या पदरात महाराष्ट्राने कधीच भरभरून दान टाकलेले नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात नेत्यांचा व्यापक प्रभाव किंवा त्यांची स्वीकारार्हता हा भाग वेगळा आणि त्यांचे राजकीय पाठबळ हा भाग वेगळा. व्यापक प्रभावाबद्दल बोलायचे तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या चार नेत्यांचा कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव राहिला आहे. त्यानंतरच्या पिढीत त्यातल्या त्यात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख ही नावे घेता येतील. राजकीय पाठबळाचे बोलायचे तर लातूर जिल्ह्याची वेस ओलांडल्यावर विलासरावांचे काही नव्हते आणि तशीच अवस्था गोपीनाथ मुंडे यांची बीडबाहेर होती. गेल्या तीन दशकांत महाराष्ट्राचे राजकारण अनेक वळणे घेत चालले आहे आणि या काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा टिकवून असलेली ही नावे होती, शरद पवार यांनी अजूनही तो आब राखला आहे. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय ताकदीवर नजर टाकली, तर विधानसभेच्या एकूण जागांपैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक मजल त्यांना कधी मारता आली नाही. विधानसभेतले एक चतुर्थांश संख्याबळ असेलेल्या नेत्याला राज्याचे निर्विवाद नेते म्हणता येत नाही. तरीसुद्धा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचे महानेते मानले जाते. तुलनात्मकदृष्ट्या राष्ट्रीय पातळीवर त्यांच्यापेक्षा कमी महत्त्व असलेल्या नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली आहे. उत्तरप्रदेश किंवा पश्चिम बंगाल यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये प्रादेशिक नेतृत्वांनी तो करिश्मा दाखवला आहे. उत्तरप्रदेशात मायावती आणि मुलायमसिंह यादव किंवा अखिलेश यादव यांनी, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर राज्याची सत्ता काबीज केली. आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांनी तो करिश्मा दाखवला होता. प्रादेशिक नेत्यांची अशी उदाहरणे असताना महाराष्ट्रात मात्र शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांना तसा करिश्मा दाखवता आला नाही. दोघांच्याही पक्षांना त्यांच्या कारकीर्दीतले सर्वोच्च यश मिळाले, तेव्हाच्या त्यांच्या त्यांच्या जागा सत्तरच्या पुढे-मागेच होत्या.  
   ही पार्श्वभूमी विचारात घेतली तर राज ठाकरे यांचे एकहाती सत्ता देण्याचे आवाहन किंवा मीच पर्याय आहे, असे म्हणणे विनोदी वाटायला लागते. गेल्या विधानसभेत १३ जागा मिळवलेल्या आणि विद्यमान स्थितीत त्यातल्या अकराच ताब्यात असलेल्या पक्षाचा नेता एकहाती सत्ता मागतो किंवा पर्याय देण्याची भाषा करतो, हे आश्चर्यकारक वाटते. परंतु तो ज्या हजारोंच्या गर्दीवर स्वार होऊन बोलत असतो, ती गर्दी पाहिल्यानंतर जाणवते की, एकहाती सत्तेची स्वप्ने पाहण्यासाठी पोषक वातावरण राज ठाकरे यांच्यासाठी आहे. गर्दीचे मतांमध्ये रुपांतर होत नाही. गेल्यावेळी आंध्र प्रदेशात चिरंजिवीच्या सभांनाही अशीच गर्दी होत होती आणि चिरंजीविही गर्दीवर स्वार होऊन एन. टी. रामाराव बनण्याची स्वप्ने पाहात होता, परंतु ते शक्य झाले नाही. सगळे राजकीय पंडित आणि प्रसारमाध्यमे राज ठाकरे शिवसेना-भाजप युतीत सहभागी होणार किंवा नाही याची चर्चा करीत असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. त्यातून सुरू झालेला संघर्ष दगडफेक, मोडतोड, जाळपोळीपर्यंत पोहोचला.
राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या सभेपासून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी चढाओढ लागली. राज यांना हेच हवे होते. आपल्या भाषणांवर प्रतिक्रिया येत राहाव्यात आणि वातावरण तापत राहावे. अमरावतीमध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. तरीही सिंचनाच्या निमित्ताने टार्गेट अजित पवार हेच राहिले. कोल्हापूर ते जळगाव प्रवासात राज यांच्या सभेतील हिणकसपणा कमी कमी होत जाताना दिसला, परंतु तरीही आरोप-प्रत्यारोप म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांची दगडफेक असेच म्हणावे लागेल. राज ठाकरे ज्याप्रमाणे प्रश्न विचारताहेत, त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनाही किणी प्रकरणी, शिव उद्योग सेनेबाबत किंवा कोहिनूर मिलच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारता येतील. मुंबईतील गिरणी कामगार आणि एकूणच मराठी माणूस देशोधडीला लागताना मराठी माणसांचे  हे स्वयंघोषित कैवारी काय करीत होते, असेही प्रश्न विचारता येतील. अर्थात प्रश्न विचारणाऱ्याचा पाणउतारा  करून प्रश्न उडवून लावण्याचे तंत्र बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे यांनी चांगलेच अवगत केले आहे. आणि त्यांच्या पत्रकारपरिषदेला पत्रकारांच्यातले त्यांचे चाहते, प्रशंसकच मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात, त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र राज यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन पाऊल उचलावे लागेल. गेली दोन वर्षे काँग्रेससह विरोधकांचे टार्गेट अजित पवार हेच आहे. कारण कितीही वादग्रस्त असले तरी अजित पवार हेच महाराष्ट्रातील आजचे सर्वात शक्तिमान नेते आहेत. २०१४च्या निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेससह शिवसेना, मनसे किंवा भाजप यापैकी कुणाशीही दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यापाशी आहे. त्यांची हीच ताकद त्यांना त्रासदायक ठरत आहे. एकीकडे कोणताही गाजावाजा न करता पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे उद्योग करीत आहेत. गडकरींचे अध्यक्षपद गेल्यानंतर स्फुरण चढलेले गोपीनाथ मुंडे अजित पवारांवर हल्ल्यासाठी आतुर आहेत. उद्धव ठाकरे यांनाही फक्त अजित पवारच दिसत आहेत. शरद पवार यांच्यानंतरचे निर्विवाद स्थान अजित पवार यांनी काबीज केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेलेले राष्ट्रवादीचे डझनभर नेते अजित पवार स्पर्धेतून बाद होऊन आपला नंबर लागेल अशी आशा बाळगून आहेत. अजित पवार यांच्या उघड आणि छुप्या विरोधकांपैकी कुणालाही काहीही गमावायचे नाही. काहीही घडले तरी कुणाचे नुकसान होणार नाही. राज ठाकरे यांच्याजवळ तर गमावण्यासारखे काहीच नाही. अशा स्थितीत अजित पवार यांना पुढची वाटचाल संयमाने आणि जबाबदारीने करावी लागेल. आक्रमकतेने नव्हे तर प्रगल्भतेने स्वतःला सिद्ध करावे लागेल.
-