Total Pageviews

Wednesday, August 31, 2011

मुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा

स्त्री भ्रूणहत्या ही राज्यापुढची सध्याची गंभीर समस्या आहे, म्हणूनच अनेक घटकांनी त्याप्रश्नी लक्ष घालून विविध पातळ्यांवर जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलींचे घटते प्रमाण आणि सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध एव्हाना चव्हाटय़ावर आला आहे. गर्भलिंग निदानाचा धंदा करणारे डॉक्टर्स गंदा है पर धंदा है..या धोरणानुसार भ्रूणहत्येची दुकानेच चालवीत आहेत. राज्यभरात साडेपाच हजारांहून अधिक सोनोग्राफी सेंटर्स असून मुंबई-ठाण्यातील त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातला संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या भाळावर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक ठळकपणे गोंदला गेला आहे. गरीबांना मुलीचे ओझे वाटते म्हणून मुलगी नको असते तर श्रीमंतांन इस्टेटीला वारस म्हणून मुलगा हवा असतो. इस्टेटीच्या वारसासाठी हपापलेल्या संपन्न प्रदेशात मुलगी नकोशी वाटते. या साऱ्या मानसिकतेचा लाभ उठवत सोनोग्राफी सेटर्स चालवणारे डॉक्टर आणि काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी उखळ पांढरे करून घेतले. कोणतेही तंत्रज्ञान हे माणसाला उपयुक्त असते, परंतु सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर विकृत मनोवृत्तीने सुरू झाला आणि परिणामी सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र स्त्री भ्रूणहत्येची भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. बीड जिल्ह्यातील भ्रूणहत्येच्या प्रकरणांची मोठी चर्चा झाली कारण तिथल्या डॉक्टरांनी गर्भपात केल्यानंतर नीट विल्हेवाट लावली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टर मराठवाडय़ातील डॉक्टरांपेक्षा हुशार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गर्भलिंग चिकित्सा आणि नंतर गर्भपात करूनही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे प्रकरणे चव्हाटय़ावर आली नाहीत. मात्र मुलींचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत गेले त्यातून या डॉक्टरांचे कर्तृत्व जगासमोर आले. महाराष्ट्राचा विचार केला तर गर्भात मुलींची हत्या करण्याच्या व्यवसायात दरवर्षी सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल होते, यावरून या व्यवसायाच्या व्याप्तीची कल्पना यावी.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायदा आहे. शिक्षेची तरतूद आहे. परंतु त्यासाठी पुरावे गोळा करून शिक्षा करणे कठिण असते. स्टिंग ऑपरेशन करून अशा डॉक्टरांचे बिंग फोडण्याचे प्रयत्नही अलीकडच्या काही वर्षात करण्यात येत आहेत. मात्र स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेल्या कें्रांवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यातूनच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी बिग बॉसप्रमाणे सगळ्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित केली. सोनोग्राफी मशीन्सना सायलेंट ऑब्झव्‍‌र्हर जोडून जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्सवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्यात आली. सायलेंट ऑब्झव्‍‌र्हरमध्ये काही सुधारणा करून आता अ‍ॅक्टिव्ह ट्रॅकर हा पुढचा टप्पा आला आहे. सोनोग्राफी मशीनना जीपीआरएस सिस्टिम बसवली आहे. प्रारंभीच्या काळात कशा पद्धतीने पळवाटा शोधल्या जायच्या याचा अभ्यास करून त्या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सेव्ह द बेबी गर्ल ही मोहीम पंधरा ऑगस्ट दोन हजार नऊला सुरू झाली. सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचे प्रमाण दर हजारी आठशे एकोणचाळीस होते, ते दोन वर्षानंतर सरासरी आठशे एक्क्य़ाऐंशीर्पयत पोहोचले आहे, यावरून या मोहिमेचे यश दिसून येते.

कोणतीही योजना शंभर टक्के निर्दोष असते असे नाही. त्याचप्रमाणे चांगल्या योजनेला विरोध होतच असतो. त्यानुसार कोल्हापूरच्या या प्रयोगाच्या विरोधातही हितसंबंध दुखावलेले अनेक घटक प्रचार करू लागले. यंत्रणेत काही प्रमाणात दोष असू शकतील, ते दूर करण्यासाठीच्या सूचना करायचे सोडून, पूर्णपणे शास्त्रीय पायावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेला हा प्रयोगच कुचकामी असल्याचे सांगण्यात येऊ लागले. सोनोग्राफी सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टरांनी तर आपल्या व्यावसायिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावताना कोल्हापूरच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्यसरकारला दिल्या. कोल्हापूरचा हा प्रयोग पंजाबने स्वीकारला असून अनेक राज्यांनी त्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर त्याची कधी आणि कशी अमलबजावणी केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Wednesday, August 24, 2011

अण्णांची काठी आणि सरकारचा विंचू

राजधानी दिल्लीच्या स्टेजवर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या चौसष्टाव्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून अण्णा हजारे आणि कंपनीचा ग्रँड रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एवढा टीआरपी अन्य कुठल्या कार्यक्रमाला क्वचितच लाभला असेल. अर्थात एखाद्या तासाभराच्या कार्यक्रमाला, एखाद्या रंगतदार क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यातील अखेरच्या काही षटकांचा टीआरपी सर्वाधिक असतो. परंतु एका कार्यक्रमाला सलग इतके दिवस असा टीआरपी मिळवणारा शो म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची नोंद करावी लागेल.
राळेगणसिद्धीच्या छोटय़ाशा रंगमंचावर आतार्पयतची आंदोलने केलेल्या अण्णांनी मुंबईत आझाद मैदानावरही उपोषण केले होते, तेव्हा सुरेश जैन यांच्या इव्हेंटबाजीमुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकपालसाठी अण्णा पहिल्यांदा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु त्याचे स्वरुप आताच्या तुलनेत खूुपच किरकोळ होते. कदाचित अण्णांच्या सोबत जी मंडळी होती, त्यांनाही तेव्हा इव्हेंटच्या भव्यतेची कल्पना आली नसावी किंवा तो एवढा मोठा होऊ शकतो, याचा अंदाज आला नसावा. सरकारनेही फारशी ताणाताणी न करता समझोत्याची भूमिका घेतल्यामुळे सुरुवातीचे प्रकरण थोडक्यात मिटले होते. त्यानंतरचे रामदेवबाबांचे आंदोलन मोडण्यात यश आल्यामुळे कें्र सरकारमधील काही नेते सरकारच्या ताकदीविषयी भ्रमात राहून अण्णा आणि रामदेवबाबा यांना एकाच मापाने मोजण्याची घोडचूक करून बसले. मुळात अण्णा हजारे यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, हे कुणीच विचारात घेतले नाही. अण्णांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी कें्रसरकारची चुकीची पावलेच कारणीभूत ठरली. अण्णांना उपोषणाला बसण्याआधी अटक करणे आणि तिहार तुरुंगात ठेवण्यामुळे वातावरण अधिक तापले. तिहारमध्ये असतानाच अण्णांनी टीव्हीवर आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहिला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या अंगात हळुहळू गांधी संचारायला सुरुवात झाली. भव्य मिरवणुकीने उपोषणाच्या सिंहासनावर बसल्यानंतर तर त्यांचा अविर्भाव प्रतिगांधीसारखाच बनला आणि अण्णा देशवासीयांसाठी संदेश देता देता आदेश देऊ लागले होते. सरकारला ‘चले जाव’चा इशारा देण्यार्पयत त्यांची मजल गेली. रामलीला मैदानावरील एवढी गर्दी पाहून कुणाच्याही डोक्यात हवा गेल्याशिवाय राहणार नाही. अण्णांसाठी तर हे सगळे अभूतपूर्वच होते. त्यांनी कधी स्वप्नातही असे चित्र पाहिले नसेल. रामलीला मैदानावर उपोषण सुरू झाल्यानंतर त्याला सत्संगाचे स्वरूप यायला वेळ लागला नाही. दिवसातून ठराविक वेळा अण्णांचे प्रवचनसदृश्य मार्गदर्शन होऊ लागले. अण्णांच्या उपोषणाला पाच-सहा दिवस झाल्यानंतर सरकारमधील घटकांबरोबरच अण्णांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याप्रती आस्था असलेल्या घटकांना काळजी वाटू लागणे स्वाभाविक होते. परंतु अण्णांच्या जिवावर टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चमकणाऱ्या त्यांच्या सवंगडय़ांना त्याच्याशी काही देणेघेणे नसल्यासारखेच दिसत होते. त्यांना कें्रसरकारला नमवायचे होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाकवायचे होते. कपिल सिब्बल, पी. चिदंबरम वगैरे मंडळींना धडा शिकवयाचा होता. त्यासाठी त्यांना करायचे काहीच नव्हते. उपोषणाला बसून अण्णांनी प्राण पणाला लावले होते. अण्णांच्या साधेपणाची भुरळ पडल्यामुळे लाखो लोक रस्त्यावर येऊन आंदोलनाला पाठिंबा देत होते. आणि अण्णांची बाकी कंपनी टीव्हीच्या कॅमेऱ्यांसमोर येऊन कें्र सरकारला दमबाजी करीत होती. अण्णांच्या उपोषणामुळे आधीच घायाळ झालेल्या कें्रसरकारला डिवचून डिवचून खच्चीकरण करण्यात त्यांना असुरी आनंद मिळतोय, असे वाटत होते. या एकूण प्रकरणात कें्रसरकारविषयी सहानुभूती बाळगण्याचे काहीच कारण नाही. परंतु अण्णा कंपनीच्या वर्तनात जो उन्माद दिसत होता, तो संतापजनक होता. अण्णांच्या एकूण व्यक्तिमत्त्व आणि वर्तनाशी विसंगत असे त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तन होते. यातली चिंता करण्याजोगी गोष्ट म्हणजे ज्या वेगाने आंदोलनाचा फुगा वर गेला होता, तो वेग अनैसर्गिक होता. त्यामुळे तो ज्या वेगाने वर गेलाय त्या वेगानेच खाली कोसळण्याची भीती वाटत होती.
अण्णांनी हाती घेतलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रत्येक माणसाला त्रासदायक ठरणारा आहे, हे खरे असले तरी भ्रष्टाचाराबाबतची लोकांची कल्पना फारच संकुचित असल्याचे ठायी ठायी दिसत होते. रोजच्या व्यवहारात आपल्या भ्रष्ट वर्तनाने लोकांना त्रासदायक ठरणारे अनेक घटक आंदोलनात मिरवत होते. सोळा ऑगस्टला अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी पत्रकारपरिषद घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना काम बंद करून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. म्हणजे आज जो सर्वाधिक भ्रष्ट घटक म्हणून ओळखला जातो, त्या सरकारी कर्मचाऱ्यांनीही आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची अपेक्षा करणे याला काय म्हणायचे? विवेकाला मूठमाती द्यायची आणि आपल्या कृतीने अण्णांच्या आंदोलनाचा पराभव करायचा, याचा विडाच जणू सगळ्यांनी उचलल्यासारखे दिसत होते.
छोटय़ा गावांपासून राजधानी दिल्लीर्पयत अण्णांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक पाहिल्यावर कशाची आठवण येत होती ?
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर लोक गावोगावी ‘भारत माता की जय’ आणि ‘पाकिस्तान जला दो.’ अशा घोषणा देत मिरवणुका काढतात. महापुरामुळे विध्वंस झाला किंवा भूकंपामुळे वित्तहानी-मनुष्यहानी झाली की देशभर एक भारावलेले वातावरण तयार होते आणि मानवतेच्या भावनेतून लोक मदत करायला पुढे येतात. मदत गोळा करण्यासाठी फेऱ्या निघतात. पाच-सात वर्षातून असा एखादा इव्हेंट लागतोच लोकांना. त्याच जातकुळीचे भारावलेपण अण्णांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांमध्ये दिसत होते. यातली वाईट गोष्ट एवढीच की, हा ज्वर दीर्घकाळ टिकत नाही. आणि या उत्स्फुर्त उत्साहाचे एका दीर्घकाळ चालणाऱ्या चळवळीत रुपांतर होत नाही.
अण्णा हजारेंची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ते कुणालाही मॅनेज होत नाहीत. आणि त्यांची सगळ्यात कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा कुणीही वापर करून घेऊ शकते. आताही दिल्लीतली मोजकी मंडळी वेगवेगळ्या हेतूंनी अण्णांचा वापर करून घेत आहेत आणि आपला कुणी वापर करून घेतेय, हे अण्णांना कधीच कळत नाही.

Wednesday, August 3, 2011

ये दीवार गिरती ही नही..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाजारीकरण नुकतेच सुरू होऊन कसोटी क्रिकेटची जादू कमी होण्याचा आणि एकदिवसीय सामन्यांचे पर्यायाने झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढण्याचा काळ होता. अशा काळात राहुल ्रविडचे भारतीय संघात पदार्पण झाले. इंग्लंडविरुद्ध परवा लॉर्डसवरील कसोटीत शतक झळकावून ्रविडने भारतीय संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि लॉर्डसवर शतक झळकावण्याचे आपले स्वप्न साकार केले. त्याच लॉर्डसवर पंधरा वर्षापूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या ्रविडला अवघ्या पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली होती. ्रविडच्या बाबतीत एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे क्रिकेटमध्ये हिमालयाएवढी कामगिरी करूनही राहुल ्रविड नावाच्या खेळाडूचे कर्तृत्व तेंडुलकरच्या सावलीत झाकोळले गेले. त्याच्या वाटय़ाला फारसे कौतुक कधीच आले नाही. परीकथेत नावडत्या राणीचा राजपुत्र जसा उपेक्षित असतो आणि आपल्या चांगुलपणाने सगळ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसाच राहुल ्रविड पंधरा वर्षे भारतीय संघासाठी जीव तोडून खेळत राहिला. एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळातील सभ्यतेचा ऱ्हास झाल्याच्या काळात स्वत:च्या वर्तनाने नव्या पिढीपुढे एक वेगळा आदर्श घालून देत आहे. त्याबाबतीत त्याची तुलना करायचीच तर त्याचा गाववाला अनिल कुंबळेशी करता येते.
सचिन तेंडुलकर, वीरें्र सेहवाग, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे ्रविडसोबत पुढे-मागे खेळलेले भारताचे श्रेष्ठ फलंदाज आहेत. सचिन, सेहवाग, गांगुलीच्या बॅटमधून सीमापार जाणारे चेंडू पाहणे हा जसा आनंद असतो त्याचप्रमाणे लक्ष्मणच्या मनगटाची जादू पाहणे हाही एक वेगळाच आनंद असतो. ्रविडकडे यापैकी काही गोष्टींची कमतरता असली तरी कठोर परिश्रम, एकाग्रता, आणि जिद्दीच्या बळावर तो आज वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीही भारतीय संघाचा आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभा आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ गेल्यापासून सगळ्या प्रसारमाध्यमांनी सचिनच्या शंभराव्या शतकासाठी देव पाण्यात घालून ठेवले होते. दुर्दैवाने दोन्ही कसोटींमध्ये तो योग आला नाही. ते शतक झाले असते तर देशात पुन्हा एकदा दिवाळी झाली असती. मोजक्या धावा करून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ्रविडने लागोपाठ दोन शतके ठोकली, त्यांची अगदी माफक दखल सगळ्यांनी घेतली. यातील टेंटब्रिजचे शतक तर गावसकरच्या शतकांची बरोबरी करणारे होते. आज सचिन तेंडुलकर सर्वात पुढे असला तरी गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील शिखर मानले जाते, ्रविडने धावांच्या संख्येच्याबाबतीत गावसकरना कधीच मागे टाकलेय, परंतु त्यांच्या शतकांची बरोबरी केल्यानंतरही ्रविडच्या वाटय़ाला माफक कौतुकच आले. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. ्रविडच्या बाबतीत असे वारंवार घडत आलेले दिसते.
कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा पार करणे ही साधीसुधी गोष्ट नाही. कठोर परिश्रमाबरोबरच सातत्याशिवाय साध्य होणारी ही गोष्ट नाही. ्रविडने दोन हजार सातमध्ये चेन्नईच्या चिदंबरम स्टेयिमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दहा हजार धावांचा टप्पा पार केला. दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा तो सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतरचा भारताचा तिसरा फलंदाज होता. त्याच्याशिवाय अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ आणि ब्रायन लारा हे जगातील दहा हजारी खेळाडू होते. दहा हजारी क्लबमधील तो जगातला सहावा खेळाडू होता, त्याचीही त्यावेळी फारशी दखल त्यावेळी घेतली गेली नाही, कारण त्याच कसोटीत वीरें्र सेहवागने धुव्वाधार त्रिशतकी खेळी केली होती. सेहवागच्या त्रिशतकाच्या धडाक्यात ्रविडच्या दहा हजार धावा झाकोळून गेल्या. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर विश्लेषण करणारा अजय जडेजा म्हणाला होता की,’सेहवागच्या त्रिशतकापेक्षा ्रविडची कामगिरी अधिक मोलाची आहे, कारण एक मोठी खेळी कुणीही करू शकतो, परंतु दहा हजार धावा करण्यासाठी सातत्याची गरज असते.’
कोणत्याही खेळाडूच्या मूल्यमापनासाठी त्याच्या आकडेवारीशिवाय दुसरे काहीही महत्त्वाचे नसते. त्यादृष्टीने एकशे पंचावन्न कसोटींमध्ये त्रेपन्नच्या सरासरीने साडेबारा हजार धावा काढणारा राहुल ्रविड हा सचिन तेंडुलकरनंतरचा मोठा फलंदाज आहे. परंतु त्याच्या कौतुकासाठी ‘द वॉल’ यापलीकडे कुणी वेगळे कौतुकाचे विशेषण वापरल्याचे आढळत नाही. भारतीय संघाची भिंत म्हणून तो पंधरा वर्षे उभा आहे आणि एका जाहिरातीतल्याप्रमाणे ‘ये दीवार गिरतीही नही..’असे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना अनेकदा म्हणावे लागले आहे. राहुल ्रविड हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक भरवशाचा फलंदाज आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ति ठरणार नाही. हा भरोसा त्याने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केला आहे. टेंटब्रिज कसोटीत दुसऱ्या डावात सुरुवातीच्या टप्प्यातच ही भिंत कोसळली, तेव्हाच लक्षात आले की, आता भारताचे काही खरे नाही. कारण त्या परिस्थितीत मैदानावर उभे राहण्याची क्षमता असलेले फक्त ्रविड आणि लक्ष्मण हे दोघेच होते. दुर्दैवाने दोघेही टिकले नाहीत आणि पुढचे आव्हान सचिन तेंडुलकरच्या आवाक्यातले नव्हते.
्रविडला पहिल्यांदा कसोटी संधी मिळाली ती संजय मांजरेकर जखमी झाल्यामुळे. ्रविड आणि गांगुली भारतीय संघात आल्यामुळे मांजरेकरचे स्थान डळमळीत झाले होते. खरेतर झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढत असताना मांजरेकरसारखा तंत्रशुद्ध फलंदाज कालबाह्य ठरत होता. त्याचे स्थानही डळमळीत झाले होते, त्या परिस्थितीत मांजरेकर जिद्दीने उभा राहिला नाही, त्याची जिद्द कमी पडली आणि त्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला. मांजरेकरच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटच्या घरंदाजपणावर प्रेम करणाऱ्यांना काळजी वाटत होती, ती राहुल ्रविडची. कारण या बाजारू जमान्याचा पुढचा बळी ्रविडच ठरण्याची भीती वाटत होती. परंतु हा पठ्ठय़ा त्याला परिस्थितीवर स्वार झाला. कसोटीसह एकदिवसीय संघातही त्याने आपली जागा निश्चित केली. तरीही अनेकांना ्रविड हा एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य खेळाडू वाटत नाही. अशांच्या माहितीसाठी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे एकदिवसीय सामन्यांमध्ये सौरभ गांगुलीबरोबर तीनशे अठरा आणि सचिन तेंडुलकरसोबत तीनशे एकतीस अशा दोन मोठय़ा भागीदाऱ्या ्रविडच्या नावावर आहेत. बारा शतके आणि ब्याऐंशी अर्धशतकांसह सुमारे चाळिसच्या सरासरीने दहा हजारावर धावा कुटल्या आहेत. एकदिवशीय सामन्यातील जलद अर्धशतकही त्याच्या नावावर आहे. कसोटी, एकदिवशीय सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येही त्याने उत्तम कामगिरी बजावलीय. काहीवेळा खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्याची मागणी होऊ लागली. दोन हजार सातमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर एकदिवसीय संघातून वगळले. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईविरोधात दोनशे अठरा धावा काढून त्याने आपले नाणे अजून खणखणीत असल्याचे दाखवून दिले.
परवा चौतिसावे शतक केल्यानंतर विक्रमादित्य सुनील गावसकरने त्याच्याबद्दल काढलेले उद्गार कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे आहेत. गावसकर म्हणाले, ‘्रविड जेव्हा फलंदाजी करीत असतो, तेव्हा त्याच्या हातात बॅट नव्हे तर भारताचा तिरंगा असल्यासारखे वाटते. आजच्या क्रिकेटपटूंसाठी ्रविडसारखे हे खरेखुरे रोल मॉडेल आहे.’

Monday, August 1, 2011

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करीत नाही, तर मनात साकळून राहते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात कादंबरी, कथा, कविता अशा स्वरूपात मराठीत बरेचसे लेखन झाले आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे दु:ख, दैन्य; त्याने परिस्थितीशी केलेला झगडा आणि परिस्थितीपुढे हार मानून केलेली आत्महत्या असे चित्रणाचे स्वरूप राहिले. आत्महत्येच्या प्रसंगाने कादंबरीचा शोकात्म शेवट होतो. विंगकर यांची कादंबरी शेतकऱ्याची आत्महत्येच्या प्रश्नावरील असली तरी अनेक अर्थानी वेगळी आहे. इथे कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतकरी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या घडते आणि पुढे सबंध कादंबरी त्या घटनेभोवती फिरत राहते. अवघ्या चार-पाच दिवसांचा काळच कादंबरीत येतो, त्याअर्थाने पाहिले तर एका दीर्घकथेचा ऐवज आहे, परंतु आनंद विंगकर यांनी या छोटय़ाशा काळात असा काही जीव भरला आहे की, कादंबरी वाचकाला शोकात्म भावनांनी करकचून बांधून टाकते.
यशवंता, पत्नी पार्वती आणि तीन मुली उषा, आशा आणि नकोशी अशा कुटुंबाची कहाणी आहे. शेतीतले बेभरवशी जगणे, वाढत जाणारे कर्ज, सावकाराचा तगादा आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही अशा सगळ्या संकटांनी घेरलेला सोशिक यशवंता हळुहळू त्रासिक आणि संतापी बनत जातो, इतका की गावात त्याला ‘फायरिग यशवंता’ या नावानं ओळखलं जातं. जो बोकड विकून पोरींना कपडे घेण्याची स्वप्नं पाहिली जात असतात त्याच बोकडाचा कुत्र्याच्या हल्ल्यात बळी जातो. त्यामुळं संतापलेला यशवंता मेलेल्या बोकडामध्ये कीटकनाशक ओतून ते धूड ओढय़ाला टाकून येतो. त्याच रात्री मोठा पाऊस कोसळल्यामुळं हातात आलेल्या शाळूचं मोठं नुकसान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माळावर अनेक कावळे मरून पडलेले दिसतात आणि ओढय़ाकाठी कुठे कुठे सारी कुत्रीही मरून पडलेली असतात. सकाळच्यापारी माळावर गेलेल्या यशवंताच्या डोक्यावर सगळे कावळे घिरटय़ा घालतात आणि त्याच्यावर हल्ला करायला लागतात. आजुबाजूचे लोक कशीतरी त्याची सुटका करून त्याला घरी घेऊन येतात. बोकड गेला, अवकाळी पावसानं शाळू गेला, रागाच्या भरात कीटकनाशक ओतून बोकड टाकल्यानं कावळे-कुत्री मरून पडल्यामुळं सारा गाव छी थू करतोय, सावकार घिरटय़ा घालतोय..असा चहुबाजूंनी संकटं कोसळल्यानं जिवाला कावलेला यशवंता स्वत:सह पार्वतीलाही कीटकनाशक पाजून सुटका करून घेतो.
कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात घटना वेगानं घडत जातात. दीडशे पानांच्या कादंबरीत प्रारंभीच सगळ्या घटना घडून सदतीसाव्या पानावरच नवरा-बायकोची आत्महत्या होते. प्रारंभीच्या काही घटनांमध्ये कमालीची नाटय़मयता आणि योगायोग आल्यामुळे एकूणच कादंबरीच्या पुढच्या प्रवासाबाबत संभ्रम वाटायला लागतो. पुढे काय घडणार या उत्कंठेपेक्षा पुढे आणखी किती दु:खद घटना घडणार आणि नुसतीच एकसुरी शोकांतिका वाचण्याची वेळ येणार, अशीही शंका यायला लागते. मात्र विंगकर यांनी पुढचा सगळा भार विलक्षण ताकदीने पेलला आहे. त्याचमुळे प्रारंभी कथेपुरता मर्यादित जीव असलेल्या गोष्टीला कादंबरीचा आवाका प्राप्त होतो. यशवंता आणि पार्वतीला दवाखान्यात नेल्यानंतरचे चित्रण, थोरली मुलगी उषा आणि तिचा प्रियकर सुभाष यांची प्रेमकहाणी, यशवंताचा भाऊ विलास आणि मुलासारखा असलेला पुतण्या विश्वास, त्याचं आपल्या बहिणींवरचं सख्ख्यासारखं प्रेम, आत्महत्येनंतर सावकारानं उषाच्या प्रेमप्रकरणावरून उठवलेली राळ, त्यावरून कुटुंबात निर्माण झालेला तणाव, भावकीतल्या, गावातल्या लोकांचे परस्परसंबंध असे सारे चित्रण कमालीचे उत्कट आणि प्रवाही आहे. आई-वडिलांच्या मृत्युमुळे आणि प्रियकराच्या वियोगामुळे खचलेल्या थोरल्या उषाला प्रेमप्रकरणाच्या अफवेमुळे कुणाकडून सहानुभूतीचे चार शब्दही मिळत नाहीत. आतून पोखरली तरी मनानं खंबीर असलेली उषा दुसऱ्या दिवशीच शेतातल्या कामांसाठी बाहेर पडते. दु:खाचं तोंड घेऊन खुडणीच्या बायकांसाठी ती मातंग अन बौद्ध वसाहतीत येते तेव्हा तिथल्या साऱ्या बाया तिच्याभोवती गोळा होतात. ‘कशाला आलीस लेकी, नुसता सांगावा धाडला असतास तरी आम्ही आलू असतू..’ असा जिव्हाळा दाखवतात. धुरपाआती तिला जवळ घेते तेव्हा पहिल्यांदा तिला आसू फुटले. तिच्या डोक्यावर घरातल्या कुणी पाणीही घातलेलं नसतं, हे लक्षात आल्यामुळं तिला आंघोळ घातली जाते. भावकीतल्या बायका तिच्याशी नीट बोलायला तयार नसताना दिवसरात्र कष्ट करणाऱ्या परक्या जातीतल्या बाया नातलगासारख्या तिच्या दु:खात सामील होतात. विंगकरांनी उभं केलेलं आस्थेचं एक वेगळंच जग कादंबरी वेगळ्या उंचीवर नेतं. लेखकाच्या भावनिक ताटस्थ्यामुळे कादंबरीला वेगळे परिमाण लाभते
गावगाडय़ातल्या अनेक बारीक-सारीक तपशीलासह कादंबरीत आल्या आहेत. त्यातही काही व्यक्तिचित्रे कमालीची ठसठशीत झाली आहेत. शोकांतिकेपासून सुरू होणारी कादंबरी सुखांतिकेकडे जाते, असे थेट म्हणता येत नाही. परंतु आई-वडिलांच्या मृत्युनंतर थोरली उषा व्यक्तिगत भावनांना मूठमाती देऊन दोन्ही बहिणींसह निर्धाराने जगण्यासाठी कंबर कसते. जगण्याच्या लढाईतल्या एका चिवटपणाचे दर्शन घडवते.
इथे आणखी एक उल्लेख करणे अप्रस्तुत ठरणार नाही, तो म्हणजे दलित लेखकाने केलेले गावगाडय़ाचे असे चित्रण मराठीत अपवादानेच आले आहे. मराठीतील बहुतेक लेखक आपल्या जातीच्या पलीकडे जाताना दिसत नाहीत. या पाश्र्वभूमीवर विंगकरांनी एक वेगळे आव्हान ताकदीने पेलले आहे. मूलत: माणसाचे जगणे, त्याचे दु:ख याबद्दलची कमालीची आस्था लेखकाकडे आहे. त्याचे नाते शोधायचे तर थेट अण्णाभाऊ साठे यांचेच नाव आठवते. कारण सबंध माणसाच्या जगण्याबद्दलची जी आस्था अण्णाभाऊंच्याकडे होती, तशीच ती विंगकरांच्याकडे आढळते. त्याअर्थानेही मराठीतील वेगळी कादंबरी म्हणून तिची नोंद करावी लागेल.

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
आनंद विंगकर ,(लोकवाड्.मय गृह)