Total Pageviews

Friday, October 29, 2010

गृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अवस्था ‘गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळण्याला’ अशी झाली आहे. एखाद्या व्यक्तिच्या मागे कुणी कुणी काय काय लावून द्यावे? साऱ्यांच्या नजरेत खुपणारे गृहखाते त्यांच्याकडे आहे. तासगावच्या एस. टी. स्टँडवर एखाद्याचा खिसा कापला, कुठे जातीय तणाव पसरला किंवा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला..असे काहीही घडले तरी त्यासाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरले जाते. अर्थात मंत्र्यांनी वेशांतर करून धाडसाने काळाबाजार उघड केल्याची किंवा डान्स बारची पाहणी केल्याची उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी तासगाव-सांगलीच्या स्टँडवर वेशांतर करून पाकिटमारांना पकडून द्यावे, अशी अपेक्षा कुणी केली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. आणि अत्यंत गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईचे त्याहीपेक्षा गुप्त पद्धतीने चित्रण एखाद्या वृत्तवाहिनीने केले तरीही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जमानाच तसा आहे. आर. आर. पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर ‘माझे तुमच्यावर लक्ष आहे’ असे नमूद करून कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी (पुराव्यानिशी) आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आपल्या कार्यालयाचा आणि घरचा पत्ता, दूरध्वनीही दिले आहेत. माझे तुमच्यावर लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले असले तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्यावरच कुणीतरी लक्ष बारीक लक्ष ठेवून असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरज येथे झालेल्या शिबिरात व्यासपीठावर त्यांच्यामागील खुर्चीवर खुनाचा आरोप असलेला नगरसेवक राजू गवळी येऊन बसला. लक्षात आल्यामुळे त्याला तेथून घालवून देण्यात आले, परंतु तोवर त्याचा बोभाटा झाला होता. मुलाने मांडीवर घाण केली म्हणून आई-बाप मांडी कापून टाकत नाहीत, तेवढे कनवाळू मन आबांच्याकडे आहे. परंतु मेणाहूनि मऊ असणाऱ्या आबांच्याकडे कठिण वज्रासही भेदण्याचा कणखरपणा आहे. म्हणूनच आपल्या शेजारी गुन्हेगाराला बसवण्यामागे षड्.यंत्र असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही, असा खरमरीत इशारा दिला. त्यामुळे बाकी काही होवो न होवो, आबांच्या नावावर आणखी एक ‘इशारा’ जमा झाला. सावकारांना कोपरापासून ढोपरार्पयत सोलून काढू, हुंडा घेणाऱ्याची पोलिस ठाण्यार्पयत वरात काढू आणि संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही..खरेतर आबांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लागण्याचे फारच मनावर घेतलेले दिसते. म्हणूनच मुंबईतील इफ्तार पार्टीतील दृष्यांपाठोपाठ मिरजेतील हा प्रकार घडल्यामुळे हेतूपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा संशय बळावत आहे. वृत्तवाहिन्यांना असे फुटेज मिळायचा अवकाश की, लगेच ब्रेकिंग न्यूज झळकायला लागतात आणि संबंधिताची इमेज पार ब्रेक होऊन जाते. वस्तुस्थितीची शहानिशा न कळता गुन्हेगार गृहमंत्र्यांच्या शेजारी बसला किंवा दिसला म्हणजे त्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा देखावा प्रसारमाध्यमांमधून उभा केला जातो. वेळ कोणती आहे, ठिकाण कोणते आहे, संबंधितांचा एकत्र येण्याचा हेतू काय आहे अशा अनेक बाबींची शहानिशा केल्याशिवाय असा निष्कर्ष काढणे संबंधितांवर अन्याय करण्यासारखे असते. त्याचा विचार न करता प्रसारमाध्यमे वारंवार या मार्गाचा अवलंब करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
गुन्हेगारांनी आपल्या आसपास फिरकू नये यासाठी आर. आर. आबांनी पोलिस यंत्रणाच कामाला लावलेली दिसते. ते स्वाभाविकही आहे. गृहमंत्र्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या साऱ्याच लोकांची माहिती असते असे नाही. असली तर काही बिघडणार नाही. परंतु अनेक प्रकारच्या व्यापा-तापांतून अशी माहिती ठेवण्याची अपेक्षा बाळगणे जरा अतिच होईल. मात्र संबंधित हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि गुन्हेगारांची सावलीही गृहमंत्र्यांवर पडू नये, याचा बंदोबस्त केला पाहिजे. मुंबई आणि मिरजेती घटनांमुळे सावध झालेल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना तशी तंबी केल्यामुळे पोलिस भलतेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी ‘नो क्राईम’ पास हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. सांगली पोलिसांनी तसे पास काढले असले तरी ती त्यांच्या पातळीवर केलेली उपाययोजना आहे, की आर. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार केलेली कार्यवाही आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आर. आर. पाटील यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगवर ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याच्याशीच ते विसंगत ठरेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वृत्तांत प्रसारमाध्यमांना पुरवणाऱ्या सहकारी मंत्र्यांचा समाचार घेतल्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मंत्रालयात बिल्डरना थेट प्रवेश मिळतो, उद्योजकांना पायघडय़ा घातल्या जातात. पण सामान्य माणसाला? यात मी कुणालाही दोष देत नाही. मी स्वत:सुद्धा याच व्यवस्थेचा भाग आहे व तितकाच दोषीसुद्धा. जनता सार्वभौम आहे याची प्रचिती सध्या तलाठी - पोलिस शिपायांपासून कलेक्टर्पयत कुठेतरी येताना दिसते का?’
आर. आर. पाटील यांनी वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले आहे. परंतु गुन्हेगारांची सावली पडू नये म्हणून सामान्य माणसांना त्यांची भेट घेण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार असेल तर मात्र ते गंभीर आहे. इफ्तार पार्टीतील गुन्हेगारांची संगत हा आर. आर. पाटील यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचा गलथानपणा होता. मिरजेतील प्रकार हे षड्.यंत्र होते असे मानले तरी आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्याने असल्या गोष्टींची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असाल आणि तुमचा हेतू शुद्ध असेल तर कोण काय फुटेज दाखवते आणि कुणाला काय वाटते याची चिंता करण्याचे कारण नाही. इतकी काळजी करायला लागलात तर घरात किंवा मंत्रालयात कोंडून घेऊन काम करावे लागेल. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आज गृहखाते आहे म्हणून पोलिसांना आपल्याभोवतीच्या लोकांचा बंदोबस्त करायला किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगू शकता. उद्या दुसऱ्याच कुठल्या खात्याचे मंत्री असाल तर काय करणार? राजकारणात एवढा प्रवास झाल्यानंतर भावनेच्या बळावर कुठलाही निर्णय घेणे हे प्रगल्भपणाचे लक्षण नव्हे. गुन्हेगारांना घाबरून जेवढे लांब पळाल, तेवढे गुन्हेगार तुमच्यामागे सोडले जातील, एवढे तुमचे विरोधक आणि हितचिंतक सक्षम आहेत. म्हणून बाकी काही करण्यापेक्षा गुन्हेगारांना तुमची आणि तुमच्या पोलिसांची जरब वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे अधिक परिणामकारक आणि लोकहिताचे ठरेल. पुन्हा पोलिसांचे कवच घेऊन भुरटय़ा गुन्हेगारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हालही. पण उद्या खासदार पद्मसिंह पाटील यांच्या मांडीला मांडी लावून तुमचे साहेबच बसतील तेव्हा तुम्ही त्या व्यासपीठावर जाणार की नाही? पप्पू कलानी, हितें्र ठाकून वगैरे समाजसेवक लोकांचे किंवा बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न घेऊन आलेत तर त्यांना भेटणार नाही का? दीपक मानकर यांच्यासारख्या लोकनेत्याने पुण्यात कधी एखाद्या समारंभात गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ढकलून देणार का? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता येणार नसतील तर मग सामान्य माणसांनाच भेटीसाठी पोलिसांचा अडथळा का? असेच चालू राहिले तर सामान्य माणसांपासून तुटत जाल आणि पायाखालची जमीन कधी निसटली हेसुद्धा कळणार नाही.

Wednesday, October 27, 2010

कंदिलाचे दिवस

‘जत्रा’ साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा प्रा. व. बा. बोधे यांची धारावाहिक कादंबरी हा त्यातील वाचकप्रिय भाग होता. त्यांच्या या कादंबरीसाठी काढलेली चित्रे दिलखेचक असायची. कादंबऱ्या वरकरणी साप्ताहिकाच्या प्रकृतीला साजेशा, थोडय़ाशा श्रंगारिक वळणाने जाणाऱ्या असाव्यात असे चित्रावरून वाटायचे. आणि वाचक त्याकडे वळायचा. मात्र प्रत्यक्षात या कादंबऱ्यांमध्ये गावकुसाबाहेरच्या भटक्यांच्या जगण्याचं चित्रण असायचं. त्यात कधी एखादी प्रेमकहाणी यायची. ती प्रा. बोधे यांच्या शैलीने अशी काही खुलवलेली असायची की वाचणारा त्यात अडकून जायचा. गोष्टीवेल्हाळ शैलीमुळे बोधे यांचे लिखाण कधी कंटाळवाणे वाटले नाही. आपल्या वाड्.मयीन संस्कृतीत लोकप्रिय लेखकाकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. बोधे यांनी ‘जत्रा’ मधून केलेले लेखन आणि त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता यामुळे त्यांच्या साहित्याकडे समीक्षकांनी गंभीरपणे पाहिले नाही. कोणत्याही ग्रामीण साहित्यिकापेक्षा बोधे यांनी केलेले ग्रामजीवनाचे चित्रण अधिक प्रभावी आणि गावगाडय़ाला व्यापकपणे कवेत घेणारे आहे. गाव, गावगाडा, बलुतेदारी, दलित जीवन आणि गावाबाहेरच्या भटक्यांचे जगणे असे सगळे बोधे यांच्या साहित्यात येते. मात्र बोधे कुठल्या साहित्यिकांच्या, समीक्षकांच्या किंवा चळवळीच्या कंपूत शिरले नाहीत. त्यामुळे त्यांचे साहित्य दुर्लक्षित राहिले. लोकप्रियता मिळाली तरी समीक्षकांची मान्यता मिळाली नाही. मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘कोकरउडय़ा’ हे आत्मचरित्रही अत्यंत वेगळ्या प्रकारचे असूनही त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.
‘कंदिलाचे दिवस’ हे बोधे यांचे अलीकडील ललितगद्य. मराठीत ललितलेखन म्हणजे छोटय़ा छोटय़ा ललितलेखांचे संकलन असे स्वरुपाचे आहे. परंतु ललितगद्याची रूढ संकल्पना ओलांडून हे पुस्तक पुढे जाते. कादंबरीप्रमाणे एकाच विषयावरील दीर्घ ललितलेखनाचा हा प्रयोग त्याअर्थानेही वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल असा आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ग्रामीण जीवनाचे आणि लोकसंस्कृतीचे आरस्पानी दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. कंदिलाचे दिवस म्हणजे हरवलेल्या संपन्न ग्रामजीवनाचा कलात्मक शोध आहे. आज चाळिशीत असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या खेडय़ात वाढलेल्या कुणाही व्यक्तिला स्वत:चेच अनुभवविश्व वाटावे आणि त्यात हरवून जावे. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी ते खुलवून खुलवून सांगतात. या आठवणी सांगता सांगता खेडय़ातल्या जीवनावर मार्मिक भाष्य करतात. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी सांगताना स्वाभाविकपणे बोधे बालपणातल्या आठवणींमध्ये हरवून जातात. स्वत:चं घर. दार्रिय़ातल्या जगण्याचा संघर्ष, अडचणीच्या काळात एकमेकाच्या मदतीसाठी धावून येणारे साधे-भोळे गावकरी, समूहजीवनातला जिव्हाळा हे सारं येतं. ‘वाहत्या प्रवाहात चांदणं पडावं तसं पन्नास वर्षापूर्वीचं जगणं माझ्या रक्तवाहिन्यांत खोलवर पसरलं आहे. आजही तो ग्रामीण समाज मला लख्ख दिसतो. कंदिलाच्या प्रकाशातली लोकवर्तुळ मनाच्या गाभाऱ्यात जमा होत..अंधाराला मागे सारत झेपावणाऱ्या प्रकाशरेषा स्पष्ट दिसू लागतात..’ असं प्रारंभीच्या निवेदनात स्पष्ट करतानाच बोधे म्हणतात, ‘पन्नास वर्षापूर्वी गावागावात अंधार होता. पण माणसांची मनं प्रकाशाने तेजाळली होती. बापलेक प्रेमाने जगत. मायलेकीत अगत्य होतं. भाऊबहिणींत जिव्हाळा होता. घरांची आडी एकमेकांना बांधली होती. लेकरू जपल्यासारखं प्राण्यांना जपत. आता काळ बदलला. जगण्याची समग्र परिमाणं बदलली. प्रकाशाचे काचवर्तुळ हरवले. हे वर्तुळ फार लहान होते. पण सुखी होते. वर्तुळ विकसित झाले. माणसे हरवत गेली..’
अंधार पडला की घराघरात दिवे, कंदिल लावले जात. या कंदिल लावण्याचा सोहळा बोधे इतक्या तपशीलाने आणि बारकाव्यांनीशी सांगतात की, ते चित्र डोळ्यासमोर हुबेहुब उभं राहतं. ते लिहितात, ‘पूर्वी दिवा लावणं, कंदील लावणं हा सोहळा असायचा. जीवनाचे अनेक उन्हाळे, पावसाळे अंगावर झेललेल्या आईभोवती, आजीभोवती पोरी कोंडाळं करून बसत. मग राख यायची. फडकं यायचं. वात ढकलायला काडी यायची. रॉकेलची बाटली नि नाळकं यायचं. बाटलीची दोरीसुद्धा अंगाचा आकडा करून ताठ उभी राहायची. मग आई, आजी राखेनं काच घासायची. पोरी फडक्यानं कंदील पुसायच्या. कंदिलाचे खांदे, डोकं, कडी, काचेची जाळी काळजीपूर्वक पुसायची. मग आजीच्या हातातलं फडकं कंदिलावर पुन्हा फिरायचं. पोरींचे नाजूक हात काचेवर फिरत. काचेत डोळे घालून पोरी हसत..आजीच्या हातातलं काम हळुहळू पोरींच्या हातात जाई. प्रत्येक पोरगी प्रत्येक काम मन:पूर्वक करे. मग कंदिलात हळवार रॉकेल ओतलं जाई. शेजारचा दिवा अशावेळी उपयोगी पडे. दिव्याच्या पिवळ्याजर्द उजेडात चिमणे देह उजळून निघत. परकरी पोरींच्या चेहऱ्यावर वेगळी प्रभा फाके.’
कंदिलाबद्दल आणि कंदिलाच्या दिवसांबद्दल सांगताना बोधे दिव्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती देतात. दारावर पत्र्याचा करून घेतलेला दिवा, विकतची नाजूक चिमणी, सुं्री याबद्दल तपशीलवार सांगतात. प्रभाकर कंदिलाबद्दल सांगतात. लग्न समारंभात मिरवणाऱ्या मेंटल बत्तीभोवतीच्या गोष्टी रंगवून सांगतात. सांगता सांगता कधी आधुनिक संदर्भ देतात. विकत घेतलेल्या चिमणीच्या आकारासंदर्भात ते लिहितात, या चिमण्या मोठय़ा देखण्या असत. आकार फ्यूएल व्होडकाच्या बाटलीसारखा, वर निमूळता होत गेलेला..
कंदिलाचं अस्तित्व ठळकपणे जाणवायचं ते रानात. वस्तीवस्तीवर चमकणारा कंदिलाचा पिवळाधम्मक ठिपका कुठूनही नजरेत भरायचा..असं चित्रमय शैलीतलं वर्णन पुढे नेताना बोधे लिहितात, ‘ वीज नसलेला तो काळ. माणसं सुगीच्या दिवसांत रानामाळात वस्ती टाकत. खळं सारवून स्वच्छ करत. भाकरीचा नैवेद्य तिवडय़ाजवळ पुरत. कणसाच्या शेजऱ्यावर झोपत. बैलं जवळच बांधावरच्या झुडपांना गुंतवत. हिरवं कडवाळ बैलं चवीनं खात. अशावेळी एकुलता एक कंदील देवाच्या डोळ्यासारखा वस्तीवर जागत राहायचा.’
कंदिलाभोवतीच्या रानातल्या आठवणी, शाळेची कलापथकं, तमाशाचे फड, गावातल्या पारावरच्या गप्पा, नाटकाच्या रंगणाऱ्या तालमी, अभ्यासात जागणाऱ्या रात्री, अशा कितीतरी गोष्टींबद्दल बोधे गोष्टीवेल्हाळ सांगत राहतात. कंदील घेऊन खेकडी धरायला गेलेल्या आठवणी येतात. माळावरच्या भटक्यांच्या पालातला मिणमिणता दिवा आणि नंतरचे त्यांच्या अंधारभरल्या आयुष्याचं चित्रण करतात. कधी नर्मविनोदी शैली, कधी गोष्टीवेल्हाळ वर्णन कधी कधी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरही जाते. गावात वीज आल्यानंतरच्या काळाबद्दल ते लिहितात, ‘माझ्या घरात वीज यायला तब्बल नऊ र्वष लागली. वीज आल्यानं एक झालं, दार्रिय आणखी स्वच्छ रुपात दिसायला लागलं. मधल्या अंधारयुगात चुलीवरच्या दिव्यानेच आम्हाला साथ दिली.’
दिव्याखालच्या अंधारातलं गावातल्या दार्रियाचं चित्र उभं करताना बोधे लिहितात, ‘घरात रॉकेलचा डबा बाळगणारे तुरळक श्रीमंत गावात होते. घरोघर रॉकेलची बाटलीच असायची. काळपटलेल्या जाड काचेच्या बाटलीली दोरी बांधलेली असायची. माणसं रॉकेलसुद्धा पुरवून पुरवून वापरत. काही बायका तर दिवा किंवा कंदील घेऊनच दुकानात जात. त्यात चार आण्याचं रॉकेल टाकून आणत. बाटलीभर रॉकेल घ्यायला पैसे तर हवेत. आहे त्या तुटपुंज्या संसारात कशातरी गरजा भागवायच्या. माझी आई तर चुलीतल्या जाळावरच प्रकाशाची गरज भागवायची. चुलीत चघळ सारायचं. जेवायला ताटं वाढायची. चार काटक्या एका हाताने चुलीत सरकवायच्या. त्या प्रकाशात जेवण उरकायचं.’
भूतकाळतले सारेच रम्य होते असे नाही, तर अनेक वाईट गोष्टीही होत्या. त्याबद्दल बोधे लिहितात, कंदिलाच्या दिवसांत सगळंच चांगलं होतं, असं मी म्हणणार नाही. तेव्हाही उलाढाली करणारे राजकारणी होतेच. फौजदाराला हाताशी धरून गावावर डोळे वटारणारे महाभाग होतेच. केवळ पायलीभर धान्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालणारी माणसं होती. इनामदाराने दिलेल्या एक किलो वांग्यासाठी भर दिवसा त्याला भोग देणाऱ्या बायका होत्या..
कंदिलाच्या भोवतालचे भावविश्व चितारतानाच बोधे खेडय़ातल्या बदलत जाणाऱ्या वास्तवाचे चित्रणही करतात. हे बदलते वास्तव इतके अस्वस्थ करणारे आहे की त्याबद्दल फक्त निरीक्षणे न नोंदवता आसूडासारखे फटकारे लगावतात. त्यामागची तळमळ आणि तगमग शब्दाशब्दातून जाणवते. बदलत्या वास्तवाने ते अस्वस्थ होतात.
वीज नसलेल्या काळातल्या अंधारयुगातल्या माणसांच्या मनातल्या उजेडाच्या गोष्टी सांगता सांगता ते वीज आल्यानंतर मनामनांत दाटलेल्या अंधाराचा समाचार घेतात. खेडय़ातल्या बदलत्या वास्तवाचा वेध घेताना केवळ आठवणी आणि गोष्टींपुरते मर्यादित न राहता चिंतनशील वृत्तीने बदलत्या काळाचा धांडोळा घेतात. राजकारणाने नासवलेल्या खेडय़ातल्या सामाजिक पर्यावरणाचा पोटतिडकीने वेध घेतात. दार्रिय़, अज्ञान आणि जन्मभर अखंड कष्टात होरपळूनही आपल्या संपन्न नैतिक जाणिवा जपणारा समाज या पुस्तकाच्या रुपाने प्रा. व. बा. बोधे यांनी अजरामर केला आहे. गेल्या पन्नास वर्षातले खेडय़ातले वास्तव जाणून घ्यायचे असेल तर ‘कंदिलाचे दिवस’ वाचायलाच हवेत.

Tuesday, October 26, 2010

डॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..!

सरकारी कामं सुलभतेनं व्हावीत म्हणून निर्माण केलेली एक खिडकी योजना ही अलीकडच्या काही वर्षातील आहे. परंतु महसूल खात्यात आलेल्या एका नवख्या अधिकाऱ्यानं सुमारे 22 वर्षापूर्वी ती सुरू करून एक नवा पायंडा सुरू केला होता. संजय राडकर असं त्या अधिकाऱ्याचं नाव. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तहसीलदार कार्यालयाइतकी सामान्य माणसांची नाडणूक अन्यत्र कुठे क्वचित होत असेल. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात सरकारी कामकाज म्हणजे लोकांना शिक्षाच होती. कारण तालुक्याच्या ठिकाणी कुठूनही यायचं तर आधी बरंचसं अंतर चालत यायचं आणि मग मिळेल त्या वाहनानं पोहोचायचं. म्हणजे एक पूर्ण दिवस मोडल्याशिवाय तहसीलदार कार्यालयात येणंच होत नाही. तिथं आल्यावर तिथल्या कारकून मंडळींकडून होणारी अडवणूक बोलायलाच नको. कुठल्याही दाखल्यासाठी महिनो न महिने चकरा माराव्या लागत. मोठय़ा साहेबाकडं जाऊन तक्रार करण्याचंही धारिष्टय़ नसायचं. महसूल खात्यातली पहिलीच नोकरी होती. दाखल्यासाठी लोकांची होणारी अडवणूक राडकरांना जाणवल्यावाचून राहिली नाही. त्यांनी त्यावर असा काही उपाय शोधून काढला, की एका फटक्यात लोकांची दाखले मिळण्याची समस्या दूर झाली.
तहसीलदार कार्यालयाकडून जे दाखले दिले जातात, त्यांची एक यादी केली. प्रत्येक दाखल्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात, त्याची यादी लिहिली. कोणता अर्ज कोणत्या दिवशी कोणत्या खिडकीत द्यायचा याची सूचना लिहिली. आणि तो दाखला कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत, कोणत्या खिडकीत मिळेल अशा साऱ्या सूचना लिहिल्या. आणि लोकांचा कारकूनांशी थेट संपर्क तोडून टाकला. ठराविक दिवशी ठराविक खिडकीत अर्ज द्या आणि ठराविक दिवशी दाखला घेऊन जा, एवढी साधी सिस्टिम घालून दिली.
गोष्ट अगदी छोटीशीच होती, परंतु कारकूनी पातळीवरचा मोठा भ्रष्टाचारच संपवून टाकला.


त्यानंतर कोल्हापूर चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून आले. मोरेवाडीच्या माळावर भूतबंगल्याप्रमाणे भकासपणे चित्रनगरी उभी होती. चित्रीकरणाची सामुग्री होती, ती भाडय़ानं दिली जात होती. बाकी एकराच्या माळावर काहीच होत नव्हतं. त्या माळावर काहीतरी हालचाली सुरू व्हाव्यात यासाठी राडकरांनी प्रयत्न सुरू केले. पाण्याची योजना तयार केली. चित्रीकरणासाठी स्टुडिओची उभारणी सुरू केली. उद्यान, पोलिस ठाणे अशा मराठी चित्रपटांसाठी लागणाऱ्या गोष्टी प्राधान्याने तयार करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेलेल्या चित्रनगरीत जीव भरण्याची चिन्हे दिसत असतानाच राडकरांची बदली झाली आणि पुन्हा चित्रनगरीला मरणकळा आली. कारण सरकारनं तिथं कायमस्वरुपी अधिकारी कधीच नेमला नाही. कोल्हापूर शहरातील कुठल्या तरी उपजिल्हाधिकाऱ्याकडं त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवायचं धोरण ठेवलं. तो अधिकारी पगारपत्रकावर सह्या करण्यापुरता येत असे. चित्रनगरीत प्राण फुंकण्याचं राडकरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.


सांगली जिल्ह्यातील विटय़ाला ते प्रांताधिकारी होते. तिथं असताना त्यांनी रॉकेलच्या काळाबाजाराला चाप लावला. त्यांच्या अधिकारपदाच्या काळातच विटय़ातील अतिक्रमण निर्मूलनाचा विषय आला. त्यांनी सारी अतिक्रमणं हटवण्याचा निर्धार केला. त्यासंदर्भातील सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नोटिसा दिल्या आणि अतिक्रमण निर्मूलनाची तारीखही ठरवली. ज्यांनी अतिक्रमणं केली होती, ते लोक कोर्टातून स्टे मिळवणार हे गृहित होतं. आणि त्यामुळं मोहीम थांबवावी लागू नये याची तयारी राडकरांनी केली होती. त्यादिवशी त्यांनी कोर्टात आपला एक माणूस बसवला. कोर्टात जे जे म्हणून काही प्रकरण येईल, त्याला कॅव्हेट दाखल करायला सुरुवात केली. कुठलंही प्रकरण असूदे. चुकून एखाद्यानं अतिक्रमण निर्मूलनाला स्टे मिळवू नये, हा त्यामागचा उद्देश. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. आणि कुठलाही स्टे येण्याआधी त्यांनी अतिक्रमणं हटवून टाकली. इच्छाशक्ती असेल तर अधिकारी काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणून याकडं पाहता येतं.


कोल्हापूर जिल्ह्यात करवीर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रांताधिकाऱ्याला तलाठय़ांशी खूप जमवून घेऊन काम करावं लागतं. तलाठय़ांना हाताळण्याइतकं कठीण दुसरं काही नसतं. महसूल खात्यातील सर्वसाधारण पद्धत अशी की, वांड तलाठय़ांना वठणीवर आणायच्या भानगडीत कुठला अधिकारी पडत नाही. उलट त्यांना हाताशी धरून सारे व्यवहार केले जातात. असे तलाठी अधिकाऱ्यांच्या खास गोटातले असतात. त्यांच्याशिवाय त्या कार्यालयातलं कुठलंही पान हलत नसतं. राडकरांनी चार्ज घेतल्यानंतर तलाठय़ांचा अभ्यास सुरू केला. काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच गावात होते. त्याना कुणी हलवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि जेव्हा जेव्हा हलवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी थेट मंत्रालयातून आपली जागा कायम राखली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी धोरण म्हणून पाच वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या तलाठय़ांच्या बदल्या केल्या. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एका सज्जावर मांड ठोकून बसलेले तलाठी हादरले. पहिल्यांदाच त्यांच्या सत्तेला कुणीतरी आव्हान दिलं होतं. अनेकांनी मध्यस्थ घालून, ओळखी-पाळखी काढून, वशिला लावून असे हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण राडकर कुणालाच बधले नाहीत. बदलीमुळे आपले संस्थान खालसा झाले असे वाटणाऱ्या एका तलाठय़ाने थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. संबंधित तलाठय़ाची बदली रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. राडकरांनी ते प्रकरण अतिशय कौशल्यानं हाताळलं. फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, पाच वर्षाहून अधिक काळ एका जागी असल्यामुळं त्यांची बदली केलीय. तेव्हा वरून विचारलं की, पाच वर्षे एका जागी असलेल्या सगळ्यांच्याच बदल्या केल्यात का ? त्यावर त्यांनी होय म्हणून सांगितलं. भुजबळांच्या कार्यालयातून फोन ठेवून देण्यात आला. राडकरांनी संबंधित तलाठय़ाला तातडीने बोलावून घेतलं आणि आजच्या आज हदलीच्या ठिकाणी हजर होण्याची ऑर्डर दिली. आणि संध्याकाळर्पयत तिथं हजर झाला नाही, तर राजकीय दबाव आणला म्हणून सस्पेंड करेन अशी धमकी दिली. त्यादिवशी सकाळर्पयत गुर्मीत वावरणाऱ्या त्या तलाठय़ाचं म्यांव मांजर झालं आणि तो चरफडत बदलीच्या ठिकाणी हजर झाला. त्याच्याबरोबरच आणखी जे काही लटपटी खटपटी करण्याच्या प्रयत्नात होते, त्यांनी आपापली बदलीची ठिकाणं गाठली.


राडकर याच कार्यालयात नुकतेच आले असतानाची एक घटना आहे.
कोल्हापुरात त्यादिवशी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘वैदिक धर्म’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. दसरा चौकातलं राजर्षी शाहू स्मारक भवनाचं सभागृह खचाखच भरलं होतं. यावेळी डॉ. साळुंखे यांनी सुमारे सव्वा तास केलेलं भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा दस्तावेज ठरावा. ‘सकाळ’ मध्ये त्या भाषणाचा सुमारे पाऊण पान वृत्तांत मी छापला होता. हा समारंभ संपल्यानंतर हॉलबाहेर आल्यावर राडकर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा असतानाच माझ्याशी निकटवर्ती असलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकांनी पाहिलं. ते जवळ आल्यावर त्यांची ओळख करून दिली.
त्यानंतर त्या साहित्यिकांचा फोन आला. म्हणाले, राडकरसाहेब तुमचे मित्र आहेत का ? तर म्हणालो होय. म्हणाले आमचं एक काम आहे, बराच काळ पेंडिंग आहे. खूप त्रास झालाय त्याचा मला. मी आशा सोडून दिलीय. पण तुम्ही शब्द टाकलात तर काहीतरी होईल. म्हटलं, काम रीतसर असेल तर ते मी करून घेईन. पण काही बेकायदा करायचं असेल तर जमणार नाही. मी त्यांना ते सांगणार नाही. आणि मी सांगितलं तरी ते करणार नाहीत.
त्यावर संबंधित साहित्यिकांनी स्टोरी सांगितली.
कोल्हापूरजवळ कष्टकरी लोकांची एक गृहनिर्माण वसाहत उभारायची होती. सारे गरीब लोक होते. घरांचं स्वप्न उराशी बाळगून होते. परंतु प्रांत कार्यालयाच्या पातळीवर त्याला मंजुरी मिळत नव्हती. तिथं वळवी का काहीतरी अशा नावाचे एक प्रांत होते. त्यांनी ते काम करायला चार लाख रुपयांची मागणी केली होती. यांनी सगळ्यांनी जमवून जमवून दोन लाखांर्पयत रक्कम जमा केली होती. तेवढी द्यायची तयारी होती. परंतु साहेब चार लाखांच्या खाली यायला तयार नव्हते. यांची ऐपत दोन लाखांपेक्षा जास्त नव्हती आणि ते चार लाखाच्या खाली येत नव्हते. त्यामुळं अनेक महिने निर्णयाशिवाय प्रकरण पडून होतं. साहित्यिकांनी अनेक मध्यस्थ, ओळखीचे लोक घातले, पण साहेब बधले नाहीत. चार लाखाच्या खाली एक रुपया घेणार नाही म्हणत होते. प्रकरण पडून असतानाच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी राडकर आले.
साहित्यिकांनी सांगितल्यानुसार राडकरांच्या कानावर प्रकरण घातलं. सारं रीतसर आणि कायदेशीर आहे म्हणून सांगितलं. करुन टाकू म्हणाले. त्यांना फाईल घेऊन भेटायला सांगा.
त्यानुसार साहित्यिक त्यांना भेटले. त्या संपूर्ण प्रकरणात यूएलसी डिपार्टमेंटकडून एका दाखल्याची कमतरता होती. तेवढी पूर्तता करा म्हणजे लगेच करुन टाकू असं राडकरांनी सांगितलं. आणि ते साहित्यिक गेल्यावर त्यांनी मलाही फोन करून तसं सांगितलं.
दरम्यान मधे बराच काळ गेला. साहित्यिक एकदा भेटल्यावर त्यांना विचारलं तर म्हणाले, अहो तो यूएलसीचा दाखला मिळणं खूप त्रासदायक आहे. त्यावर त्यांना म्हटलं की, तो मिळाल्याशिवाय काम होणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी काहीही करा. मधे मी राडकरांना कधीही त्याची आठवण केली नाही. एकदा ते ऑफिसला जात असताना रस्त्यातच भेटले. गाडी थांबवून खाली उतरले आणि म्हणाले, सरांचं ते काम होईल. फक्त यूएलसीमधून तो दाखला द्यायला सांगा. बाकी काहीच अडचण नाही.
दरम्यान साहित्यिकांनी तो दाखला मिळवला. तो मिळवायला त्यांना सतरा हजार रुपये खर्च आला. तो दाखला त्यांनी सादर केला आणि अवघ्या आठ दिवसांत त्यांना प्रकरण मंजूरीची कागदपत्रं रजिस्टर्ड टपलानं घरी पोहोचली. त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या कामासाठी आधीचा अधिकारी चार लाखाच्या खाली येत नव्हता, ते काम या अधिकाऱ्यानं साधा चहासुद्धा न घेता उलट दोन वेळा आपलाच चहा पाजून घरी पाठवलं. हे कुठल्या युगात काम करताहेत ?
हे एकच प्रकरण नाही. राडकरांनी आपल्या कार्यालयातून मंजूर प्रकरणांची कागदपत्रं संबंधितांना रजिस्टर्ड टपालानं पाठवण्याची नवी पद्धत रूढ केली.
महसूल खात्यात असं काही घडू शकतं, यावर आजही कुणाचा विश्वास बसू शकणार नाही.राडकर चांगलं वाचन करायचे. चित्रपट पाहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित असायचे. अनेक क्षेत्रात त्यांनी अनेक मित्र जोडले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात शिकवायलाही जात होते. शिकणं आणि शिकवणं या त्यांच्या आवडीच्या गोष्टी असाव्यात. अगदी अलीकडच्या अनेक नव्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. मधल्या काळात ते एका स्कॉलरशीपवर मनिलाला गेले. फिलिपीन्स विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. नावापुढं ‘डॉ.’ लागलं.


शिवाजी विद्यापीठात प्रा. द. ना. धनागरे यांच्या कुलगुरूपदाच्या काळात चार वर्षे सतत त्यांच्याविरोधात आंदोलनं होत होती. तत्कालीन कुलसचिवांनी राजीनामा दिल्यानंतर कुलसचिवपदाची जाहिरात निघाली. राडकरांना वाटलं, थोडी वाट वाकडी करून पाचेक वर्षे विद्यापीठाचा अनुभव घ्यावा. त्यांनी कुलसचिवपदासाठी अर्ज केला. पदासाठी पात्र ठरत असले तरी वय आणि अनुभव तुलनेने कमी होता. परंतु त्यांना अधिक संधी होती. मात्र त्याच सुमारास धनागरेविरोधी आंदोलन टिपेला पोहोचलं होतं. आंदोलकांनी कुलसचिवपदाच्या मुलाखती हाणून पाडण्याचा निर्धार केला. त्यादिवशी मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. परिणामी मुलाखती स्थगित करण्यात आल्या.
काही महिन्यांनी धनागरे यांची कुलगुरूपदाची मुदत संपली. डॉ. मुरलीधर ताकवले यांची नियुक्ती झाली. हे डॉ. राम ताकवले यांचे धाकडे भाऊ. त्यांनी काही काळाने कुलसचिवपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. राडकरही एक उमेदवार होते. मुलाखती झाल्या. परंतु मुलाखती सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयातून कुलगुरूंना फोन आला आणि एका विशिष्ट उमेदवाराची शिफारस करण्यात आली. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्याचीच निवड झाली. कुलसचिवपद हे विद्यापीठाच्या विद्यमान रचनेत फार महत्त्वाचे आहे, असे नाही. परंतु राडकरांच्यासारखा तरुण अधिकारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आला असता, तर आंदोलनकाळात निर्नायकी स्थिती निर्माण झालेल्या तिथल्या प्रशासनाला नक्कीच त्यांनी शिस्त लावली असती. परंतु ते घडायचे नव्हते. विद्यापीठाला लायकीप्रमाणेच कुलसचिव मिळाले. या कुलसचिवांनी नोकर भरतीत पैसे खाल्ले म्हणूुन नंतर आलेल्या कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी निलंबित केले. प्रकरण कोर्टात गेले. ते निर्दोष सुटलेही. परंतु नोकरभरतीत पैसे गोळा करायला कुलसचिवांनी एका शिपायाची नियुक्ती केली होती आणि पैसे गोळा केले होते, हे खरेच होते. ते कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही एवढेच.

अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीत चांगल्या अधिकाऱ्याला काम करणं अवघड जात असतं. परंतु राडकरांनी आपल्या अंगभूत कौशल्यानं अशा गोष्टींचा कधी जाच करून घेतला नाही. स्वत: कधीही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. पण आपली व्यवस्था सुधारण्याच्या फालतू भानगडीत पडले नाहीत. आपण जिथं काम करतोय, त्या जागेवरून लोकांसाठी काय करता येईल, याचा विचार मात्र ते सतत करायचे. सरकारी यंत्रणा कशीही असली तरी सरकारी यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास वाढायला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी तिथंही चांगल्या अधिकाऱ्यांचा शोध सतत सुरू असतो आणि शोध घेणारे त्यांच्यार्पयत येत असतात.


सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी राडकरांना आपल्याकडं विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून घेतलं. महसूल खात्याची प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालून जात होती. याठिकाणी असतानाचा एक किस्सा आहे.
नाणीजचे नरें्र महाराज हे आज मोठे प्रस्थ आहे. त्यावेळी ते नुकतेच नावारुपाला येत होते. बुवांच्या नादी लागणं हा शंकरराव चव्हाण यांच्यापासूनचा वारसा. अशोकराव उच्चशिक्षित असले तरी बुवांचे नादिष्ट. नरें्र महाराज त्यांच्या घरी आले. त्यांनी सपत्नीक त्यांच्या पायावर डोके ठेवले. आशीर्वादपर मार्गदर्शन केल्यानंतर महाराजांनी आपल्या एका जमिनीच्या भानगडीची फाईल अशोकरावांकडं दिली. अशोकरावांनी राडकरांना बोलावून घेऊन त्यांच्याकडं ते प्रकरण सुपूर्द केलं.
राडकरांनी फाईल पाहिली आणि त्यात बरीच अनियमितता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या साऱ्या गोष्टी नियमित केल्याशिवाय काही करता येणार नाही, असं त्यांचं मत बनलं आणि त्यांनी ते नरें्र महाराजांना सांगितलं. महसूलमंत्र्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांना हे अनपेक्षित होतं. आपण इथून हे प्रकरण मंजूर करून घेऊन जायचं या इराद्यानं आलेल्या महाराजांचा भ्रमनिरास झाला. कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकेल याचं मार्गदर्शन राडकरांनी नरें्र महाराजांना केलं. महाराज निघून गेले. महिनाभरात साऱ्या गोष्टींची पूर्तता केली. आधीच्या फाईलमध्ये ज्या अनियमितता होत्या, त्या दूर केल्या. त्यानंतर ती फाईल राडकरांच्याकडं आली. राडकरांनी ती पुन्हा तपासून ओके केली आणि त्यांनी ओके केल्यानंतरच अशोकरावांनी त्यावर अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.
महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणाले, त्या साहेबानं आधी आपलं प्रकरण अडवलं, पण त्यांनीच ते मार्गी लावून दिलं. चांगला माणूस आहे तो.


लोकप्रतिनिधींना चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असतेच असते. पंतप्रधान कार्यालयातले उपमंत्री बनलेले पृथ्वीराज चव्हाण स्वत:साठी चांगल्या अधिकाऱ्याच्या शोधात असताना त्यांचा शोध डॉ. संजय राडकर या अधिकाऱ्याजवळ येऊन थांबला आणि राडकर थेट पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले.
या सगळ्या घडामोडी घडत असताना राडकरांना आयएएस केडरही मिळालं नव्हतं. ते उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं किंवा नुकतंच झालं होतं.
वर्षभरात पंतप्रधान कार्यालयाला रामराम ठोकून शासकीय सेवेतून पाच वर्षाची सुट्टी घेऊन राडकरांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सेझच्या भूसंपादन विभागात नोकरी पटकावली. लाख-सव्वा लाख रुपये पगारावर.
असं का ? म्हणून विचारलं तर म्हणाले, पाचेक वर्षे बाहेर काढावीत. बऱ्यापैकी पैसे हातात येतील. काही बॅलन्स टाकता येईल. पाच वर्षानी परत येईर्पयत आयएएस केडर मिळेल. कलेक्टर म्हणून काम करता येईल. काहीतरी काम करण्याची संधी मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खात्यावर थोडा बँक बॅलन्स असल्यामुळं जरा ताठ कण्यानं नोकरी करता येईल.
खरंतर प्रांताधिकाऱ्यानं फारशी खावखाव न करताही सहजपणे महिन्याला लाख-दीडलाख मिळू शकतात. प्रयत्न केले तर पाच-दहा लाखांना मरण नाही. असं असतानाही पैसे कमवायचे म्हणून सरकारी नोकरीतून विश्रांती घेऊन राडकरांनी सव्वा लाखांच्या पगाराची रिलायन्स सेझमध्ये नोकरी पत्करली. यावरूनच महसूल खात्यातला हा अधिकारी किती स्वच्छ आणि पारदर्शी होता याचं प्रत्यंतर येतं. पण असं असूनही राडकरांनी हे कधी त्याची जाहिरात केली नाही किंवा मी असा आहे आणि बाकीचे असे आहेत, असं कधी बोलले नाहीत. व्यवस्थेत राहूनही खूपशा चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात याच्यावर त्यांचा विश्वास होता आणि अगदी छोटय़ा छोटय़ा ठिकाणी काम करतानाही ते त्यांनी दाखवून दिलं होतं.
अलीकडं त्यांचा कधीतरी फोन व्हायचा. फोन केला की, बोला चोरमारे साहेब..असं म्हणून खळखळून हसायचे. आम्ही मित्र असलो तरी ते चोरमारे साहेब असंच म्हणायचे. या एकदा ऑफिसला. स्टेशनवर उतरल्यावर फोन करा. गाडी पाठवून देतो. शक्यतो लंचलाच या..असं तीन-चारवेळा बोलणं झालं. पण जाणं काही शक्य झालं नाही.


19 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास स्टार माझा मधून मेघराज पाटलांचा फोन आला. संजय राडकर तुमच्या माहितीचे आहेत का, ते कोल्हापूरला वगैरे होते. म्हटलं होय, मित्र आहेत ते माझे अगदी खास. त्यांनी काही संदर्भ दिलाय का ? त्यावर ते म्हणाले, पाम बीच रोडवर अक्सिडेंटमध्ये ते ठार झालेत.
सारं शरीर थंड पडल्यासारखं वाटलं. पण मेघराज पाटीलच म्हणाले, पण ते तेच आहेत का, कन्फर्म करायचं होतं.
दरम्यानच्या काळात आमच्या नवी मुंबईच्या वार्ताहरानं बातमी पाठवली होती. त्यात रहाडकर असा उल्लेख होता. थोडा धीर आला. कुणीही गेलं असलं तरी ते वाईटच. पण गेलेत ते संजय राडकर नसतील तर बरं आणि नसावेत. मनातल्या मनात देवाचा धावा. काही सुचत नाही तेव्हा तोच शेवटचा आधार असतो.
साम मराठीत मिलिंद औताडेला फोन करून खात्री करून घेतली. त्यानंही तेच ते म्हणून सांगितलं. पण विश्वास बसत नव्हताच.
रात्री घरी निघालो. सव्वा अकराच्या सुमारास ऑफिसमधून असिफ बागवानचा फोन आला. त्यानं राडकरांची माहिती विचारून घेतली. एकदा कुठल्याशा मुलाखतीच्या निमित्तानं त्यांचा फोटो मागवून घेतला होता, तो माझ्या फोल्डरला सेव्ह होता. तो कुठल्या फोल्डरमध्ये आहे, ते सांगितलं.
सुचत काहीच नव्हतं. मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होतो.
अकरा पंचवीसला ठाणे स्टेशनवर उतरल्यावर आणखी एक गोष्ट मनात आली. आपण राडकरांची सगळी माहिती सांगितली. पण गेलेत ते आपलेच संजय राडकर आहेत याची निश्चित खात्री करून घेतलेली नाही. आमचे जे दोन-चार कॉमन मित्र होते, त्यांना मीच खबर दिली होती. त्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती. किंवा त्यांच्या कुणा संबंधितांकडून किंवा आमच्या कॉमन मित्राकडून मला फोन आला नव्हता. त्यांचा फोटो छापला आणि ते ते नसलेच तर? मनात पुन्हा विचार आला, तसं असेल तर सोन्याहून पिवळं. खुलासा करून टाकू. राडकरांची समजूत काढणं अवघड नव्हतं. तेही आपल्या मृत्युची बातमी मस्त एंजॉय करतील. पण जो गेला आहे तो आपला मित्र नाही, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते?
तरीही मन शांत होत नव्हतं.
प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर सारा धीर गोळा करून मोबाईल काढला आणि त्यांच्या नंबरवर फोन लावला. अपेक्षित होतं की स्वीच्ड ऑफ असावा. पण रिंग व्हायला लागली. पलीकडून आवाज आला, ‘बोला, चोरमारेसाहेब, काय म्हणताय?’
अहो, तुमच्या निधनाची बातमी आम्ही छापलीय उद्याच्या अंकात, काय घोळ आहे?
तिकडून राडकरांचं खळाळणारं हास्य..
डोकं सुन्न झालं. मोबाईलची रिंग थांबली होती. तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेला क्रमांक प्रतिसाद देत नाही, अशी काहीशी टेप ऐकू आली.
खरं काय आणि भास कोणता?
रिडायल केलं. पुन्हा रिंग आणि तीच रेकॉर्ड..
आता मात्र खरोखर पायातलं बळ गेलं आणि तिथंच मटकन खाली बसलो! दुपारपासून साचून राहिलेला बांध असा मध्यरात्री फुटला!
इतक्या जवळचं कुणी गेलं की खूप असुरक्षित वाटायला लागतं, तसंच वाटायला लागलं.

Saturday, October 23, 2010

पुढच्या पिढय़ांसाठी प्रश्न

गणित येत नाही म्हणून
मास्तरच्या भीतीनं शाळा सोडून मुंबई गाठणारे
गाववाले
हमाली कमरेचा काटा ढिल्ला होईस्तोवर
कारकून कनिष्ठ मध्यम बीए ऑनर्स
एकवीस रुपये घालून
आहेराचं पाकिट डिंकानं चिकटवणारे
वडापाव मिसळ पुरीभाजीचे आश्रयदाते
चिवटपणे जगणारे ओढग्रस्त जगता जगता
पोपडे निघालेल्या संस्कृतीला
गिलावा करण्यासाठी धडपडणारे
हुंडाबंदीच्या घोषणा ऐकत ऐकत
पोरीच्या हुंडय़ासाठी कणकण साठवणारे
धरणाखाली गेली जमीन घरदार
उरलेलं आयुष्य पुलाखाली
सिग्नलला थांबलेल्या टॅंकरच्या तोटीला
पाणी भरणारे
हे प्रकल्पग्रस्त विकासानं उखडलेले
डायनासोरच्या वाटेवरचे प्रवाशी

ही चायनीजवर पोसलेली
हायब्रीड जनरेशन
नॉस्टाल्जिक झुणका भाकरीपुढे
यांच्या मुताला फेस
कोकाकोलासारखा
हे जागतिक मंदीचे प्रवक्ते
फाइव्ह स्टार हॉटेलात ब्रिफिंग
करणारे कॉकटेल डिनर
हे दलाल शेअर बाजारातले सेन्सेक्सवर
रक्तदाब अवलंबून असणारे
मार्केट क्लोज झाल्यावर रत्नपारखी
सेक्सच्या बाजारातले
ही रद्दी इंग्रजी पेपरांची
महिन्याच्या बिलाइतकी
मुद्दल शाबूत ठेवणारी
हे हायकर्स ट्रेकर्स
गडकिल्ल्यांवर पिकनिक करणारे
हनिमूनच्या आधीच सेक्स
अनुभवलेले नवविवाहित
हिलस्टेशनवर
हरवून जाणारे आठवणींच्या कल्लोळात
हे बाईटसाठी िहडणारे पोटार्थी
पत्रकार भटके विमुक्त क्रिमिलेअर
टीव्हीच्या उथळ पडद्यावरचे
ब्रेकिंग न्यूज
नटीच्या बाळंतपणाची
हे ब्लॉगर्स चावडीवर चकाटय़ा पिटणारे
नव्या युगाचे भूमिपुत्र

उखडणारे पुन्हा उगवतील आणि नव्याने
उगवणारे उखडतील का कधी काळाच्या प्रवाहात
हे प्रश्न पुढच्या पिढय़ांसाठी ठेवावेत हेच बरे

गावाकडची लखलखती वाट

धुळीचे लोट उडवीत गावात शिरणारी एसटी, रणरणत्या उन्हात एक घागर डोक्यावर आणि एक कमरेवर घेऊन माळरानाच्या वाटेवर दिसणाऱ्या बाया, झाडाखाली भरलेल्या शाळेत मुलांना शिकवणारे मास्तर, आजारी व्यक्तिला पाळण्यात घालून दवाखान्याच्या गावाकडे नेणारे गावकरी, दुथडी रोरावत वाहणाऱ्या नदीतून माणसांनी खचाखच भरलेली हेलकावे खात जाणारी नौका..ही कुठल्या चित्रकाराच्या चित्रमालिकेतील चित्रांची किंवा एखाद्या ग्रामीण साहित्यिकांच्या कथांमधली वर्णने नाहीत. वीसेक वर्षापूर्वी महाराष्ट्रात सर्रास अशी चित्रे पाहायला मिळत. अशी चित्रे किंवा कथा-कादंबऱ्यांमधले वर्णन कलेचा वेगळा आनंद देत असले तरी प्रत्यक्षात तसे जगणाऱ्या लोकांना मात्र त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या वेदना शब्दांपलीकडच्या होत्या. परंतु ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात जे काम झाले, त्यामुळे खेडय़ा-पाडय़ांतील चित्र पार बदलून गेले. वर केलेले वर्णन चित्रकारांची चित्रे आणि कथा-कादंबऱ्यांपुरते मर्यादित बनले. ग्रामीण विकासामध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती या क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर ठेवणारी आहे.

पंचायत राज व्यवस्था

महाराष्ट्राच्या एकूण विकासाला दिशा देण्याची महत्त्वाची कामगिरी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडली. राज्याच्या स्थापनेनंतर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. त्या माध्यमातून गावापासून जिल्हा पातळीर्पयतच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यंत्रणा उभी केली. पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात आतार्पयत कें्र आणि राज्य पातळीवर अनेक समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांच्या शिफारशींनुसार वेळोवेळी कायद्यात बदल करण्यात आले. प्रत्येक राज्यात वेगळी व्यवस्था होती. मात्र व्या घटनादुरुस्तीमुळे संपूर्ण देशभर पंचायत राज व्यवस्था एकसारखी बनली. या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक संस्थांना अधिक स्वायत्तता आणि अधिकार देण्याबरोबरच स्त्रियांना टक्के आरक्षण मिळाले. त्यामुळे देशभरातील पंचायत राज व्यवस्थेचा चेहरा बदलला. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. व्या घटनादुरुस्तीने महिलांना टक्के आरक्षण देण्याच्या वर्षभर आधीच महाराष्ट्रात शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत पंचायत राजमध्ये महिलांना टक्के आरक्षण देऊन देशाच्या आधी त्यासंदर्भातील पाऊल उचलले होते.

विकासाचे मापदंड

विकास ही संकल्पना आपल्याकडे सरधोपटपणे वापरली जाते. सर्वागीण प्रगती म्हणजे विकास असे ढोबळमानाने म्हणता येते. ग्रामीण विकासाचा विचार करतानाही ग्रामीण भागाच्या सर्वागीण प्रगतीच्या अनुषंगाने काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. शिक्षण; रस्ते-पूल आदी दळणवळणाच्या सुविधा; आरोग्य सुविधा; पाण्याची उपलब्धता या त्या प्राधान्याच्या बाबी. महाराष्ट्राने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, असे म्हणतो, याचा अर्थ या सर्वच क्षेत्रांत चांगली प्रगती केली आहे. कुठलीही गोष्ट शंभर टक्के साध्य झाली, असे होत नाही. विविध कारणांनी उद्दिष्टांर्पयत पोहोचण्यात अडचणी येत असतात. मात्र त्या अडचणींवर मात करून पुढे जाणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्राची त्या दिशेने झालेली वाटचाल निश्चितच चांगली आहे. दळण-वळणाच्या सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बसच्या सुविधेने लोकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. गाव तेथे एसटी हे धोरण राबवले. त्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारली. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी काम असले तर मैलोन मैल पायपीट करावी लागत होती. पावसाळ्यात तर अनेक छोटय़ा-मोठय़ा ओढय़ांना पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटत होता. रस्ते बंद होत होते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून दवाखान्यात न्यावयाच्या गंभीर रुग्णांर्पयत अनेक पातळ्यांवर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र दळणवळणाच्या सुविधांनी ही परिस्थिती बदलली. जे दळणवळणाचे तेच आरोग्य सुविधेचे. आरोग्यसेवेचे जाळेही ग्रामीण भागात चांगलेच विस्तारले आहे. पंचवीसेक वर्षापूर्वी ग्रामीण भागात लोकांना अनेक दिवस डॉक्टरांची वाट पाहावी लागायची. वैद्यकीय सेवा सहजासहजी उपलब्ध नव्हती. आज परिस्थिती बदलली आहे. वैद्यकीय सेवाही खेडोपाडी पोहोचली आहे आणि दळणवळणाच्या सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे ती सहज उपलब्धही झाली आहे. पावसाच्या अभावामुळे विशिष्ट प्रदेशांच्या भाळावर दुष्काळ कायमचा गोंदला आहे. अशा ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते, मात्र जलसंधारणाच्या कार्यक्रमामुळे अनेक गावांनी परिस्थितीवर मात करून दुष्काळ हटवला आहे. पूर्वी पाण्यासाठी सर्रास काही मैल पायपीट करावी लागायची, ती थांबली असून गावातच नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

ग्रामस्वच्छता अभियान

राज्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असताना खेडी एका स्थित्यंतराच्या उंबरठय़ावर उभी आहेत. शहरे आणि खेडी यांच्यातील अंतर कमी होत असून खेडय़ांचे झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. खेडय़ांचे बाह्य रूप अमूलाग्र बदलू लागले आहे. बाह्य चकचकीतपणाबरोबरच मूलभूत विकासाची प्रक्रियाही गतिमान झाली आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ती ग्रामस्वच्छता अभियानाने. संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान आणि संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा यामुळे महाराष्ट्राच्या खेडय़ांचा चेहरा बदलून गेला. दहा वर्षापूवी आर. आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना हे अभियान सुरू झाले. या अभियानाचे वैशिष्टय़ म्हणजे गावाच्या विकासातील लोकांचा सहभाग. सरकारने निधी द्यायचा आणि मग गावातील विकासकामे करायची, हे फारच चाकोरीबद्ध झाले. यामध्ये यंत्रणा राबवणारी माणसे चांगली नसतील तर काहीच साध्य होत नाही. निधी खर्च पडत जातो आणि परिस्थितीत काहीच बदल होत नाही. ग्रामस्वच्छता अभियानाने त्यावर मात केली. लोकसहभागातून ग्रामविकासाचे सूत्र स्वीकारले. गावा-गावांतील लोक राजकीय गट-तट विसरून कामाला लागले. गावे स्वच्छ होऊ लागली. घरांची अंगणे लखलखीत दिसू लागली. रस्ते चकचकीत होऊ लागले. कचरा आणि सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावली जाऊ लागली. उघडय़ावर शौचाला जाणे कमी झाले. शौचालयांच्या बांधकामांना गती मिळाली. ग्रामस्वच्छता स्पर्धेत यश मिळवण्यासाठी गावा-गावांत इर्षा लागली. बक्षिस मिळणे, न मिळणे हे दुय्यम ठरले. लोकांना स्वच्छतेच्या कायमस्वरुपी सवयी लागल्या. यासंदर्भातील जाणीवजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. त्यायोगे विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागल्या. जनावरांची निगा राखली जाऊ लागली. जनावरांचे गोठेही चकचकीत झाले. सांडपाण्यावर परसबागा फुलल्या. अनेक गावांनी नवनवे प्रयोग केले. राजकीय वैमनस्य कमी झाले. जातीय-धार्मिक तणाव नाहीसे झाले. काही गावांनी सगळ्या घरांसह गावातील सगळी प्रार्थनास्थळे एका रंगात रंगवून एकात्मतेचा नवा आदर्श घालून दिला. सरकारने फक्त दिशा दिली आणि लोक आपणहोऊन कामाला लागले. कुणाचे बंधन नाही, अमूक करा-तमूक करू नका म्हणून कुणाचा जाच नाही, जिथे आवश्यक तिथे सहकार्यासाठी सरकारी अधिकारी उपलब्ध होऊ लागले. त्यातून सबंध ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलून गेला. याच मोहिमेमुळे कें्र सरकारच्या निर्मलग्राम मोहिमेत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला.

तंटामुक्ती अभियान

ग्रामस्वच्छता अभियानानंतरचे महत्त्वाचे अभियान म्हणून राज्य सरकारच्या तंटामुक्ती अभियानाचा उल्लेख करावा लागेल. प्रत्यक्षात गृहखात्यामार्फत राबवले जाणारे हे अभियान असले तरी त्याचा ग्रामीण विकासाशी निकटचा संबंध आहे. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये तंटामुक्तीचा एक छोटासा भाग होता. अनेक गावांनी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, तंटामुक्ती केली होती. तोच धागा पकडून हे स्वतंत्र अभियान सुरू करण्यात आले. वर्षानुवर्षे चालत आलेले खटले, छोटय़ा-मोठय़ा खटल्यांमुळे पोलीस आणि न्यायालयांवर येणारा ताण, खटल्यांमुळे निर्माण होणारे वैमनस्य, गावातील बिघडणारे वातावरण, लोकांचा वाया जाणारा वेळ आणि पैसा या सगळ्या बाबींचा विचार करून हे अभियान सुरू करण्यात आले. गावोगावी तंटामुक्ती समित्या स्थापन करून त्यामार्फत अनेक प्रश्न निकालात काढण्यात आले. गावेच्या गावे तंटामुक्त झाली. वैमनस्य संपले तिथले लोक अधिक एकजुटीने काम करू लागले आणि साहजिकच त्या त्या गावांच्या विकासाला गती मिळाली.

महिलांचे योगदान

लोकसहभागामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला चालना मिळाली, हे खरे. मात्र त्याहीपुढे जाऊन आणखी एक गोष्ट नमूद करावी लागेल, ती म्हणजे एकूणच ग्रामविकासाच्या चळवळीला महिलांच्या सहभागामुळे गती मिळाली. महिलांचा सहभाग नसता तर यातील कुठलीही गोष्ट आजच्याएवढी यशस्वी होऊ शकली नसती. व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना स्थानिक सत्तेत टक्के आरक्षण मिळाले. टक्के अधिकारपदेही मिळाली. आज राज्यातील नऊ हजारांहून अधिक गावांच्या सरपंचपदावर महिला विराजमान आहेत. दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी आणि पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिला कार्यरत आहेत. त्याशिवाय तिन्ही स्तरांवर सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या महिलांची संख्या काही हजारांच्या घरांत आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने स्त्रिया सत्तेत असल्यामुळे त्यांनी विकासाचे मूलभूत प्रश्न विषयपत्रिकेवर आणले. पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळाले. शाळांच्या कामकाजात लक्ष घातल्यामुळे मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अनेक अडचणींचे निवारण करण्यात त्यांना यश आले. ग्रामसभांमधून महिलांची उपस्थिती आणि सहभाग वाढला. निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला. दारुबंदी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सामाजिक चळवळींतही महिला सहभागी होऊ लागल्या. या सगळ्याला पूरक ठरली, ती बचतगटांची चळवळ. बचत गटांच्या चळवळीने महिलांना उंबऱ्याबाहेर पाऊल ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. गटा-गटाने महिला एकत्र येऊ लागल्या. महिला संघटित होऊ लागल्या. कोणतेही संघटन न करता विकासकामे राबवली तर ती टिकावू ठरत नाहीत. बचत गटांमुळे ग्रामीण विकासाची चळवळ चिरंतन बनण्यास मदत झाली. बचत गटांच्या माध्यमांतून महिलांनी निरनिराळी कौशल्ये आत्मसात करून स्वतंत्र व्यवसाय सुरू केले. महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षात सुमारे दोन लाखांहून अधिक बचतगट राज्यात निर्माण झाले आहेत. त्यापैकी दीड लाखांहून अधिक गट महिलांचे आहेत. या बचतगटांना सरकारने कोटय़वधींचे अनुदान दिले. सरकारकडे बचत गटांच्या दोनशे कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत, यावरून त्यांची व्याप्ती लक्षात यावी. ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेत विषय जाण्यापूर्वी ते बचत गटांच्या पातळीवर चर्चेत येऊ लागले. आणि तिथे मूर्त स्वरूप आल्यानंतर ते पुढे जाऊ लागले. गावाच्या प्रश्नांना शिस्त लावण्याचे कामही बचत गटांच्या चळवळीने केले.

पुढची दिशा

ग्रामविकासाची पुढची दिशा काय असायला हवी ? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा आठवण येते, ती महात्मा गांधीजींच्या ‘खेडय़ाकडे चला’ या संदेशाची. तसे करायचे तर खेडी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजेत. गावा-गावांच्या पातळीवर रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत. अशा संधी उपलब्ध झाल्या, तर खेडय़ांचा सर्वागीण विकास होईल आणि शहराकडे येणारे लोंढे कमी होतील. सुवर्णमहोत्सवी वाटचालीनंतरचे लक्ष्य अर्थातच खेडी स्वयंपूर्ण बनवण्याचे असायला हवे.

Wednesday, October 20, 2010

साहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व

आज जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते, ते 1878 मध्ये ग्रंथकार सभेचे अधिवेशन म्हणून सुरू झाले. म्हणजे या संमेलनाला 132 वर्षे झाली आहेत. केवळ ग्रंथकारांचे संमेलन म्हणून सुरू झालेल्या या संमेलनाबाबत कितीही आक्षेप असले तरी ते महाराष्ट्राचे प्रमुख सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षापूर्वी लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्याबाबतीत कळस गाठलेल्या या संमेलनाच्या एकूणच इभ्रतीचा गेल्या काही वर्षात ज्या वेगाने ऱ्हास सुरू झाला आहे, तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर या संमेलनाचा प्रभाव आहे, तसाच लक्षणीय प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनावर शिवसेनेने निर्माण केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावर भारतीय जनता पक्षाच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याइतपत ताकद त्यांनी कमावली होती. परंतु कोणत्याही विचाराशिवाय केवळ भावनिक मुद्दय़ांवर राजकारण करून लोकांना फार काळ फसवता येत नाही. म्हणूनच एकदा युतीकडे सत्ता दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने तशी चूक पुन्हा केली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत वाईट कारभार करूनही लोकांनी सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनाच पसंती दिली. सत्तेचा भाग बाजूला ठेवला तरी शिवसेनेची 44 वर्षे वाटचाल झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. साहित्य संमेलन आणि शिवसेना यांच्यात तसे साम्य काही नसले तरी या दोन्हीपैकी अधिक वेगाने ऱ्हास कशाचा झाला, याचा विचार करताना गोंधळल्यासारखे होते. साहित्य संमेलनाची वाटचाल 132 वर्षाची आणि शिवसेनेची 44 वर्षाची म्हणजे साहित्य संमेलनाचे वय शिवसेनेच्या बरोबर तिप्पटीने आहे. तरीही दोन्हीचा ऱ्हास साधारणपणे एकाचवेळी सुरू झाला आहे. आणि त्याचा परस्परसंबंधही आहे. मुंबईतील संमेलनावेळी शिवसेनाप्रमुखांनी साहित्यिकांना ‘बैल’ म्हणून हिणवले तेव्हा साहित्यिकांची कातडी जराही थरारली नाही. वसंत बापट यांच्यासारखा समाजवादी चळवळीतील म्हणजे शिवसेनेच्या वैचारिक विरोधी छावणीतील अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी त्याचा समाचार घेतला त्यामुळे साहित्यिकांची थोडीफार अब्रू वाचली. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नावाच्या शिखर संस्थेने साहित्यिकांच्या अवमानकारक उल्लेखाबद्दल ब्र काढला नाही. साहित्य संमेलनाची घसरण त्याआधी सुरू झाली होती, परंतु साहित्यिक आणि साहित्य संमेलनाच्या प्रतिष्ठेचा ऱ्हास तेव्हापासून सुरू झाला. आणि शिवसेनेचा ऱ्हासही त्यानंतर वर्षभरात सुरू झाला. तो आजर्पयत थोपवता आलेला नाही.
शिवसेनेचे पक्ष म्हणून असलेले आजचे वय हे प्रौढ म्हणता येईल असे आहे. परंतु शिवसेनेकडून वयाला साजेसा प्रौढपणा कधीच दाखवला गेला नाही. राज ठाकरे यांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख म्हणाले की, माझी नक्कल करतोय, पण विचारांचे काय? तेव्हा शिवसेनाप्रमुख कोणत्या विचारांबद्दल बोलत होते? एकीकडे रोहिंग्टन मेस्त्री यांच्या पुस्तकातील भाषा घाणेरडी आहे म्हणून आदित्य ठाकरेने कुलगुरूंना निवेदन द्यायचे. आणि त्यापेक्षा घाणेरडय़ा भाषेत जाहीरपणे बोलणाऱ्या शिवसेनाप्रमुखांकडून तलवार घ्यायची, हा मोठाच विनोद म्हणता येईल. कोणताही विचार नसतो तेव्हा शिवराळपणा हेच भांडवल बनते आणि चार घटका मनोरंजनासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या जनसमुदायाचीही त्यापेक्षा अधिक अपेक्षा नसते. महाराष्ट्र आणि देशापुढील कुठल्याही प्रश्नाचा गांभीर्याने विचार न करता केवळ शिवीगाळ करणे ही शिवसेनाप्रमुखांची स्टाईल असली तरी ती एका विशिष्ट वयात त्यांना शोभत होती. आज ती त्यांना शोभत नाही, हे त्यांना कोण सांगणार? आणि मनोहर जोशींपासून नीलम गोऱ्हेंर्पयत आणि वैचारिक मित्र असलेल्या पत्रकारांर्पयत सारेच लाभार्थी ‘ठाकरी भाषा’ असे त्याचे उदात्तीकरण करणार! शिवसेनाप्रमुख या वयात जे बोलतात त्याबद्दल त्यांचा राग किंवा संताप येत नाही, तर त्यांच्याविषयी करुणा वाटते. अशा भाषेमुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सत्तेपासून लांब ठेवले आहे, हे लक्षात घेतले नाही, तर त्यांना पुढची पंचवीस वर्षे त्यांना विधानभवनावर भगवा फडकता येणार नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लाचारी पत्करून ऐतिहासिक परंपरा असलेले साहित्य संमेलन कधीच राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधून टाकले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी यावे की येऊ नये, अशा चर्चा एकीकडे सुरू असताना महामंडळाने सारे संमेलनच राजकीय नेत्यांच्या ताब्यात देऊन टाकले. महामंडळाच्या संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना अस्पृश्य मानणे कृतघ्नपणाचे होते. कारण सारे संमेलन राजकीय नेत्यांच्या पैशातून, मनुष्यबळातून उभे करायचे आणि त्यांनी व्यासपीठावर येऊ नये असे म्हणायचे यासारखा भंपकपणा दुसरा कुठला असू शकत नाही. राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर येण्यास विरोध करणे रास्त नसले तरी सारे संमेलन राजकीय नेत्यांच्या ताब्यात देणे संयुक्तिक मानता येणार नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या मांडवात साहित्यिक पाहुणे असे उलटे चित्र दिसू लागले. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या संमेलनाने तर साहित्य संमेलनाच्या इभ्रतीची वाट लावली. संमेलनासाठी कोटय़वधींची माया गोळा केली. आलेल्या साहित्यिकांची नीट व्यवस्था केली नाही. नीट मानधन दिले नाही. जमवलेले पैसे शिल्लक राखून त्यावर डल्ला मारायचे नियोजन आधीच झाले होते. त्यानुसार पुण्यभूषण फाऊंडेशनची तिजोरी भरली. त्यासंदर्भात ओरड झाल्यावर स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी लाख रुपये महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दिले. खरेतर मसापचा त्या पैशावर काडीचाही अधिकार नसताना त्यांनी ते पैसे आपल्याकडे ठेऊन घेतले. साहित्य व्यवहार करणारी मंडळीही किती हिणकस व्यवहार करतात, याचे दर्शन त्यानिमित्ताने घडले. पुण्याच्या संमेलनाचा राडा सुरू असतानाच ठाण्याच्या संमेलनाची घोषणा झाली. ठाणेकरांनी सोवळेपणाचा आव आणत आपण कसे आदर्श संमेलन पार पाडणार आहोत, हे सांगायला सुरुवात केली. पण संमेलनाचे वारे लागले, की भल्याभल्यांची डोकी फिरतात, हे आतार्पयत घडत आले आहे. ठाणेही त्याला अपवाद राहिले नाही. कोषाध्यक्षाच्या निवडीपासूनच ठाण्याचा घोळ सुरू झाला होता. तो त्यांनी नंतर दुरुस्त केला. परंतु संमेलनाचे उद्घाटकपद विक्रीला काढून ठाणेकरांनी संमेलनाची होती नव्हती ती सगळी शिल्लक अब्रू धुळीला मिळवली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून व्हॅल्यूएबल ग्रूपच्या संजय गायकवाड यांची निवड केली आहे, त्यांचे कर्तृत्व आदर वाटावे असेच आहे. उद्योगात मागे राहणाऱ्या मराठी तरुणांनी ज्यांचा आदर्श घ्यावा, असे त्यांचे कर्तृत्व आहे. त्याअर्थाने त्यांच्या निवडीसंदर्भात आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. उलट असा वेगळा विचार केल्याबद्दल ठाण्याच्या संयोजन समितीचे कौतुकच करायला हवे. परंतु हे एवढे साधे आणि सरळ नाही. गतवर्षी पुण्याच्या संमेलनाचे प्रायोजकत्व माणिकचंद कंपनीने मागे घेतल्यानंतर गायकवाड यांनी कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता लाखांची देणगी दिली होती. यंदा ठाण्याच्या संयोजकांनी उद्घाटनासाठी डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या नावांची चर्चा सुरू केली होती. त्याबरोबर काही उद्योजकांची नावेही चर्चेत होती आणि शेवटी संजय गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भरघोस देणगीच्या अपेक्षेनेच त्यांनी गायकवाड यांची निवड केली, याचाच सरळ सरळ दुसरा अर्थ असा निघतो की, संयोजन समितीने उद्घाटकपदाची विक्री केली. साहित्य महामंडळासाठी हा अनुकरणीय पायंडा आहे. यापुढचा टप्पा संमेलनाध्यक्षपदाचा लिलाव करण्याचा असू शकतो. त्यादृष्टीने महामंडळाने तयारी करायला हरकत नाही.

Monday, October 18, 2010

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

मराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह या प्रक्रियेला अधिक सजगपणे सामोरा जाताना दिसतो. नाटककार आणि पत्रकार म्हणून परिचित असलेल्या जयंत पवार यांनीही अनेक नामवंत लेखकांप्रमाणे दिवाळी अंकांची गरज म्हणून कथा लिहिण्यास प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनीच तसे नमूद केले आहे. मागणीनुसार लिहिलेल्या कथा म्हणजे पाडलेल्या कथा असा समज होण्याची शक्यता असते, परंतु पवार यांच्यावर तसा आळ घेण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढय़ा त्यांच्या कथा आशयदृष्टय़ा सशक्त आहेत. ते या सात वर्षाच्या काळात लिहिलेल्या सात कथांचा संग्रहात समावेश आहे.
मराठीत भाऊ पाध्येंचा अपवाद वगळता महानगरी संवेदनेची कथा तेवढय़ा ताकदीने कुणी लिहिली नाही. महानगरी संवेदनेची कथा म्हणून समीक्षकांनी गौरवलेली अन्य जी कथा आहे, ती खरेतर त्या त्या लेखकांच्या समकालीन, समकंपू, समविचारी अशा लेखक-समीक्षकांनीच प्राधान्याने गौरवलेली कथा आहे. एकूण मराठी कथेच्या पसाऱ्यात तिचे अस्तित्व अगदीच क्षीण राहिले. अर्थात माणसांच्या जगण्यापासून फारकत घेऊन केवळ मनोविश्लेषणाच्या अंगाने गेल्यामुळेच हा प्रवाह बळकट झाला नाही. जयंत पवार यांनी हे सगळे प्रवाह बारकाईने वाचलेले, अभ्यासलेले असावेत आणि ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ सारख्या कथेत त्यांच्यावरील या शक्तिंचा प्रभाव जाणवल्यावाचून राहात नाही. लेखक कितीही अष्टपैलू आणि हुकमी असला तरी ज्याचा त्याचा म्हणून एक कमांड एरिया असतो. ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ ही स्वतंत्र कथा म्हणून ठीकठाक असली तरी जयंत पवार यांचा तो प्रांत किंवा कमांड एरिया नव्हे, हेही लक्षात आल्यावाचून राहात नाही. मुंबईतले गिरणगाव, चाळसंस्कृती आणि तिथली स्थित्यंतरे हा जयंत पवार यांचा कमांड एरिया आहे आणि या संग्रहातील बहुतांश कथा त्याच परिसरातल्या आहेत. ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरू !’आणि ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथांमधील काहीसा रुक्षपणाही प्रारंभीच्या काळातील त्यांच्यावरील महानगरी संवेदनेच्या लेखकांच्या प्रभावाचाच भाग असल्याचे लक्षात येते. असे असले तरी गिरणगाव, गिरणी कामगारांच्या संपानंतरची गिरणगावची पडझड, संपकाळातला कामगारांचा लढाऊपणा, चहुबाजूंनी वाताहात होत असताना परिस्थितीशी नेटानं सामना करणारी माणसं, सामान्य माणसांच्या जगण्यातले असामान्य प्रसंग, त्यांची चिकाटी यांचं एवढं उत्तम चित्रण मराठी साहित्यात यापूर्वी आल्याचं आठवत नाही. कथा सुटय़ा सुटय़ा असल्या तरी एकत्रितपणे चांगला परिणाम साधतात आणि मराठी कथेच्या आशयाच्या कक्षाही रुंदावतात. पवार यांनी निवेदनाचे केलेले प्रयोगही वेगळे असल्यामुळे वाचकाला सोबत घेऊनच कथा प्रवास करतात. चाळीत राहणाऱ्या एका थोडय़ाशा उच्चभ्रू कुटुंबानं एक बंद असलेला सामायिक संडास दुरुस्त करून घेतला आणि कुलुप लावून आपल्या ताब्यात ठेवला. तो संडास सगळ्यांच्या वापरासाठी खुला व्हावा म्हणून चाळकऱ्यांनी केलेल्या संघर्षाची कथा ‘एका रोमहर्षक लढय़ाचा गाळीव इतिहास’ मध्ये आहे. त्यासंदर्भात लेखक जे नोंदवतो ते खूप महत्त्वाचे आहे. ‘ह्या लढय़ाची शिदोरी एक महिना चाळकऱ्यांना पुरली आणि मोडून पडायला आलेली माणसं एक महिना ताठ उभी राहिली. दीर्घ काळ चाललेला संप हळूहळू तुटला, मोडला तरी तो एक महिना खातमकर चाळकरी लांबवू शकले.’ ‘जन्म एक व्याधी’ ही कथा अशीच माणसांच्या गांजलेपणाची, त्यांच्यातील नात्यांच्या ओलाव्याची, माणुसकीची, स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी नाती पणाला लावणाऱ्या माणसांच्या मनोव्यापारांची चटका लावणारी कथा आहे.
‘छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चं्र’ ही संग्रहातील अखेरची कथा गिरणगावमधून बाहेर पडून मुंबईतल्या माणसांच्या जगण्याचे हादरवून टाकणारे दर्शन घडवते. पोलिस तपासकथा लिहिणारा लेखक हा कथेचा निवेदक आहे. दोन कवींनी एका रहस्यमय बाईचा घेतलेला शोध हा कथेचा विषय आहे. अरुण काळे आणि भुजंग मेश्राम हे हयात नसलेले दोन कवी जणू पुन्हा जिवंत होऊन अस्वस्थ आत्म्यांप्रमाणे मुंबईत वावरतात. मनोहर ओक आणि विवेक मोहन राजापुरे हे दोन कवीही कथेत येतात. ‘किती जण येतात बे ह्या शहरात. कुठे कुठे पसरतात, हरवतात, नाहीसे होतात. जगायला येतात नि मरून जातात...’ असं एक कवी म्हणतो. तर ‘या शहरातून कवीच कसे एकेक करून नाहीसे होत चाललेत ?’ असं कथेचा निवेदक म्हणतो. संवेदनशील माणसांचं जगणं किती अवघड बनत चाललंय, याचं हादरवून टाकणारं चित्रण या कथेत येतं.
एकूण मराठी कथेला आशयाच्या अंगाने विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जयंत पवार यांची कथा आहे. केवळ मनोविश्लेषणाच्या अंगाने न जाता कथेतील गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन चिंतनाच्या अंगाने समकालीन वास्तवाला भिडण्याचे महत्त्व पवार जाणतात. पहिल्या कथासंग्रहात लेखकाला गवसलेली स्वत:ची बलस्थाने हे मराठी कथेच्यादृष्टीने शुभसूचक आहे. निखिलेश चित्रे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाला लाभली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे पवारांची कथा वाचकाला जगण्याच्या धुमश्चक्रीत मध्यभागी आणून उभे करते.

Saturday, October 16, 2010

मलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने

दिवसेंदिवस महागाई वाढत चाललीय. गरीब माणसाचं जगणं अवघड बनत चाललंय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाची दोन वेळा हाता-तोंडाची गाठ पडतेय. सामान्य माणसाला विकासाच्या महामार्गावर नेऊन उभं केलं पाहिजे, असं मोठमोठे विचारवंत म्हणतात, ते खरंच आहे. मुंबईतल्या अशा सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला महामार्गावर उभं करायला पाहिजे. म्हणजे ते पुण्याकडं पुढा करून. पण त्यासाठी वाशीच्या पुढं नेऊन उभं करायला पाहिजे. नाहीतर मुंबईतल्या मुंबईतच रस्ते आणि फ्लायओव्हरच्या चक्रव्यूहात फिरत राहतील. त्यांनी महामार्गावरून सरळ चालत जायला हवं.


राष्ट्रकूलमध्ये आपले खेळाडू प्रमाणापेक्षा जास्तच पदकं मिळवायला लागलेत. पदकं हे मिळवतात आणि त्याचा त्रास सरकारला होतो. ते तिकडं बंगाल, हरियाणावाले पदक मिळवणाऱ्याला मोठमोठी बक्षिसं देतात. लाजेकाजेस्तव आम्हालाही काही द्यावं लागतं. खेळाडूंनी सरकारच्या परिस्थितीचा विचार करून कामगिरी करावी, असं आवाहन करायला हवं. बक्षिसं द्या. त्यांना नोकऱ्या द्या. त्याही चांगल्या द्या. ते सगळं ठीक आहे, वर त्यांना आपल्या कोटय़ातून घरं द्या. बाकी सगळं ठीक आहे, पण घरं म्हणजे त्रासच आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची खाण आहे. कितीतरी नृत्यांगणा छोटय़ा छोटय़ा घरात राहून कलेची सेवा करीत आहेत. अजून त्यांनाच सगळ्यांना घरं देता आलेली नाहीत, आता हे पदकवाले येतील घरांसाठी त्यांना कुठून घरं द्यायची?ऑफिसला जायच्या गडबडीत असतानाच शाळेत गेलेली मुलगी रडत रडतच घरी आली. फीमाफीचा अर्ज शाळेनं अमान्य करून फी भरण्याची सूचना केली होती. नुसती सूचना केली असती तरी काही वाटलं नसतं. नंतर काहीबाही करून अर्ज पात्र करून घेतला असता. परंतु मुलीच्या कोवळ्या मनाला यातना होतील, असं अद्वातद्वा बोलल्या म्हणे टीचर. दानत नसताना आमच्या शाळेत कशाला शिकायला पाठवलं, असं म्हणाल्याचं मुलीनं सांगितलं. तेव्हा टीचरच्या बोलण्याचा किंवा मुलीच्या ऐकण्याचा मराठीचा प्रॉब्लेम असावा याची मला खात्रीच पटली. सगळीकडंच मराठीची इतकी बोंबाबोंब झाली आहे की, नेमका कशासाठी कोणता शब्द वापरतात, हेच समजत नाही लोकांना. न्यूज चॅनलवाल्यांना कळत नाही. राजकीय नेत्यांना कळत नाही. शाळेतल्या टीचर मंडळींनाही कळत नाही. म्हणून मुलीची समजूत काढली, की शिक्षक दानत नव्हे तर ऐपत म्हणाले असावेत. आणि तसं म्हटले असतील तर त्यात फारसं चुकीचं काही नाही. फी भरण्याची ऐपत नाही म्हणूनच आपण फी माफीसाठी अर्ज केला होता. ते पटवून देण्यासाठी गेल्याच महिन्यात आपल्या शेतातली वीज तोडल्याच्या बातमीचं कात्रण मुलीला दाखवलं. खिशातून पेपरमिंटची गोळी काढून दिली तेव्हा मुलगी रडायची थांबली. मुलं फारच हट्टी झाली आहेत आजकालची. पालकांच्या परिस्थितीचा विचारच करीत नाहीत. गोळी नाहीतर बिस्किट दिल्याशिवाय गप्पच होत नाहीत. आमच्यावेळी पालकांनी डोळे वटारले तरी चड्डी ओली व्हायची. जास्त शहाणपणा केला तर कानाखाली आवाज निघायचा. कशाला हट्ट करतोय? पण हल्ली तसं वागता येत नाही मुलांशी. कोवळ्या मनावर परिणाम होतो त्यांच्या असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात. आमच्यावेळी असं काही बालमानसशास्त्र अस्तित्वात नसावं कदाचित.परिस्थितीपुढं किती शरण जायचं? परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता ? स्वत:पासून सुरुवात करा. स्वत:च्या नावापासून सुरुवात करा. रात्रभर खूप विचार केला.सकाळी पेंटरला फोन लावला. म्हटलं दरवाजावरची नावाची पाटी बदलून घ्यायची आहे.

(मलबार हिल परिसरात रस्त्याच्या कडेला चुरगळलेल्या अवस्थेत सापडलेल्या डायरीची पाने नेमकी कुणाच्या डायरीची आहेत, हे हस्ताक्षरावरून समजू शकले नाही.)

Friday, October 15, 2010

आबा, आता मांडी मोठी करा !

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी असा विषय म्हणजे पर्वणीच असते, त्यामुळे तो भरपूर वाजवला, मात्र त्याचवेळी मु्िरत माध्यमांनी मात्र ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे संशयाचा फायदा फलंदाजाला दिला जातो, त्याप्रमाणे आर. आर. पाटील यांना संशयाचा फायदा देऊन प्रकरण फारसे वाढवले नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे तसे नसते. सर्वात पुढे राहण्यासाठी किंवा तसे भासवण्यासाठी अनेक फालतू गोष्टींनाही अवास्तव महत्त्व देऊन त्याचा गाजावाजा केला जातो. अर्थात ती त्यांची गरज असते. इथे तर राज्याचे गृहमंत्री गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसत होते. गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी नसीम सिद्दीकींच्या सतराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फुलांचे ताटवे फुलले होते. या भेटीचे फुटेज म्हणजे वृत्तवाहिन्यांसाठी घबाडच होते. त्याची उलट सुलट चर्चा झाली. आरोप आणि खुलासेही झाले. प्रकरण घडून आठवडा उलटला असल्यामुळे आर. आर. पाटील यांनी यातून आपली सोडवणूक करुन घेण्यात यश मिळवले, असे म्हणता येते. तरीही प्रकरण इथे संपत नाही.
नेमके प्रकरण काय आणि कसे घडले, याची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांच्या घरी ईदच्या पार्टीत दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर सलीम पटेल, एक वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक इरफान कुरेशी आणि गुन्हेगारीशी संबंधित असलेला मोबीन कुरेशी असे तिघेजण उपस्थित होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून गृहमंत्री आर. आर. पाटील गप्पा मारत बसले असल्याचे महाराष्ट्राने वृत्तवाहिन्यांवरून पाहिले. अशा प्रकरणांमध्ये आरोप करताना खूप काळजी घ्यावी लागते. सार्वजनिक समारंभात अनेकदा राजकीय नेत्यांसोबत गुन्हेगार दिसतात. मोठय़ा समारंभांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी कुणी यावे, कुठे उभे राहावे, कुणी कुणाला गुच्छ द्यावा किंवा हार घालावा यावर कुणाचे नियंत्रण नसते. काही टगे तर अशा समारंभांमध्ये मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याची संधी साधून घेतात. किंवा मान्यवर नेते असलेल्या व्यासपीठावर मागील बाजूला गर्दीत परंतु उठून दिसेल किंवा कॅमेऱ्याच्या कक्षेत येईल, अशा ठिकाणी जागा पटकावत असतात. पुढे-मागे अशा फोटोंचे भांडवल करून प्रसारमाध्यमांतून राळ उठवली जाते. तेलगी प्रकरण हे त्याचे अलीकडचे ठळक उदाहरण सांगता येईल. शरद पवार संरक्षणमंत्री होते, तेव्हा त्यांच्या विमानातून बाँबस्फोटातील दोघा आरोपींनी प्रवास केल्याचे प्रकरणही गाजले होते. परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये ‘आम्हाला माहीत नव्हते’, हे संबंधितांचे म्हणणे काही अंशी पटण्यासारखे होते. इथे आर. आर. पाटील तसे म्हटले तर एकवेळ समजू शकते. परंतु नसीम सिद्दीकीही तसे म्हणत असतील तर ते पटण्यासारखे नाही. त्यामुळे नसीम सिद्दीकींवर राष्ट्रवादीने कारवाई केली तरच आर. आर. पाटील म्हणतात त्यात तथ्य आहे असे म्हणता येईल. कारण ही भेट कुठल्या मांडवात किंवा सभागृहात झालेली नाही. सार्वजनिक समारंभात खुच्र्या टाकलेल्या असतात, तिथे कुणीही कसेही येऊन बसते, ते समजू शकते. परंतु ही भेट जिथे झाली आहे, ते ठिकाण म्हणजे नसीम सिद्दीकींचे घर होते आणि ते त्या इमारतीत सतराव्या मजल्यावर होते. सतराव्या मजल्यावरील एखाद्याच्या घरात संबंधित घरमालकाला आणि त्याच्याकडे येणाऱ्या पाहुण्याला अशा दोघांनाही माहीत नसलेली कुणी अनोळखी माणसे घुसतात, हे कुणाला तरी पटेल का? तरीही आम्ही म्हणतो ते पटवून घ्या, असे आर. आर. पाटील आणि सिद्दीकी म्हणत असतील तर ते लोकांना मूर्ख तरी समजत असावेत किंवा आम्ही कुणाबरोबरही बसू, कुठेही बसू आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही, असा तरी त्यांचा समज असावा.
आर. आर. पाटील हा इथल्या राजकीय व्यवस्थेचा भाग असल्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र आजही लोकांना इतर राजकीय नेत्यांपेक्षा त्यांच्यात काहीसे वेगळेपण जाणवते. ते त्यांनी आजवरच्या राजकीय प्रवासातून कमावले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
काळाप्रमाणे माणसात बदल होत जातो, तसा तो आर. आर. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैलीतही पडत गेला आहे. तो स्वाभाविकही आहे. आर. आर. पाटील यांचे नेतृत्व साऱ्यांच्या नजरेत भरले ते युती सरकारच्या काळात. प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अल्पावधीतच आर. आर. पाटील मीडियाचे डार्लिग बनले होते. लक्षवेधीकार अशी उपाधी त्यांना मिळाली होती. विधानसभेत आर. आर. पाटील एखाद्या विषयावर बोलणार असतील तेव्हा प्रेस गॅलरी खचाखच भरून जायची. त्यावेळी आणि त्याआधीही अनेक मोठमोठे नेते आपल्या बातम्या छापून येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करायचे. मात्र नवखे आर. आर. पाटील आपली बातमी घेऊन आल्याचे कुठल्या पत्रकाराला आठवत नसेल. म्हणजे त्यांनी जे काही कमावले ते आपल्या वक्तृत्वावर आणि कर्तृत्वावर. पुढे मंत्री झाल्यानंतरही त्यांनी ग्रामविकाससारख्या एरव्ही उपेक्षित मानल्या जाणाऱ्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडय़ा-पाडय़ांचा चेहरा बदलण्याचे क्रांतिकारक कार्य केले. गृहमंत्रिपदाची दुसरी इनिंग ही त्यांच्या घसरणीची सुरूवात होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गेलेले गृहमंत्रिपद त्यांनी इर्षेने परत मिळवले, परंतु त्यानंतरही त्यांना घसरण थांबवता आलेली नाही. आणि ही घसरण थांबवण्यासाठी आवश्यक असलेल्या इमेज बिल्डिंगसाठी त्यांना चार पत्रकारांचे कोंडाळे जमवण्याची आवश्यकता भासू लागली. खरेतर भाडोत्री लोकांना हाताशी धरून इमेज बिल्डिंग होत नसते, हे आर. आर. पाटील यांच्यासारख्याला तरी लक्षात यायला हवे होते. प्रारंभीच्या काळात तासगावचे आमदार असलेल्या आर. आर. पाटील यांच्यात अनेकांना राज्याचे भावी नेतृत्व दिसत होते, हे त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि अभ्यासाने कमावलेले यश होते. आमदाराचा नामदार झाल्यावर त्यांची कार्यशैली कमालीची बदलली. मधल्या काळात पक्षाच्या सर्वाधिक आमदारांच्या तक्रारी आर. आर. पाटील यांच्याविरोधात होत्या हेही इथे लक्षात घ्यायला हवे. जसे शरद पवार कार्यकर्त्यांपासून तुटून पुढाऱ्यांच्या कोंडाळ्यात वावरू लागले, तसेच आर. आर. पाटील कार्यकर्त्यांपासून तुटू लागले. आणि त्यातूनच त्यांना इमेज बिल्डिंगसाठी ‘पीआर’ची गरज भासू लागली असावी. मात्र वृत्तपत्राच्या वाचकांना न्यूज कुठली आमि पेड न्यूज कुठली हे लगेच समजते. त्याचप्रमाणे बातमी कुठली आणि मुद्दाम छापून आणलेली बातमी कुठली हेही समजते. वृत्तपत्राचा वाचक तेवढा प्रगल्भ झाला आहे.
दोन्ही काँग्रेस एक असतानाच्या काळातील पक्षाच्या एका शिबिरात आर. आर. पाटील यांनीच एक शेर ऐकवला होता -
हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम
वो कत्ल भी करते है तो चर्चे नही होते..
आज आर. आर. पाटील यांनी त्याची उजळणी करण्याची गरज आहे. जाणते-अजाणतेपणाने गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लागली म्हणून मांडी कापून टाकण्याचे काहीच कारण नाही. मोठा नेता व्हायचे तर मांडी मोठी करायला हवी आणि ती मोठमोठय़ांच्या मांडीला लागायला हवी. म्हणून आबा, आता मांडी मोठी करा !