Total Pageviews

Sunday, February 27, 2011

आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पत्रास कारण की
गेल्या महिन्यात माझ्या
बापानं आत्महत्या केली हे आपणास माहीत असेलच कारण
कालच तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे
पालकत्व सरकारने घेतले आहे त्यांना
सरकार विसरणार नाही असे म्हणालात

महोदय, आमच्या गावात आत्महत्या केलेल्या दोघांच्या कुटुंबियांना
लाखालाखाचे चेक मिळाले त्यांचे फोटो छापून आले चेक घेताना
पण आम्हाला मिळाले नाही काहीच
माझा बाप आयुष्यभर शेतात राबला
तरी तो शेतकरी नव्हता
शेतमजूर होता म्हणतात तुमचे लोक

मुख्यमंत्री महोदय,
माझ्या मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी
कर्ज काढलं होतं माझ्या बापानं
तिला सासरी जाताना खूप रडला माझा बाप
तरी खूप आनंदी होता एका लेकीचं आयुष्य
मार्गी लागलं म्हणून
काही दिवस गेले आणि बाप गप्प गप्प झाला
बोलायचंच बंद झाला कुणाशी
भिंतीला टेकून बसायचा जमिनीवर रेघोटय़ा मारीत
नजर अशी जसं भुईतलं गुप्तधन शोधतोय
दिवसभर राबून यायचा गुरासारखं रात्री
घासभर खावून झोपी जायचा गपगार सकाळर्पयत
अलीकडं अलीकडं दचकून उठायचा
झोपेतून भास व्हायचा त्याला
सावकार दारात आल्याचा

माझा बाप इज्जतीला खूप जपायचा
मुख्यमंत्री महोदय स्वत:च्या आणि सरकारच्याही
सरकारच्या इज्जतीसाठीच त्यानं
बांधून घेतला होता घरामागचा संडास
शेवटी त्या संडासात जाऊनच त्यानं
गळफास लावून घेतला
एंड्रीनसाठी पैसे नसल्यावर दुसरं
काय करणार माणूस तुम्हीच सांगा


तुम्हाला आणखी एक सांगायचं म्हणजे बघा
गेल्या आठवडय़ात चॅनलवाले आले होते आमच्या गावात
त्यांनी मुलाखत घेतली आईची
शूटिंग घेतलं आमच्या सगळ्यांचं घरादारासकट
शेजारी पाजारी म्हणाले म्हातारा मेला म्हणून
हा चान्स भेटला बायणे तुला
सगळ्या देशात गेलं तुझं नाव उद्या संसदेतही
चर्चा होईल तुझ्यावर कलावतीबाईसारखी
आई रडत होती रात्रभर बापाच्या आठवणीनं

तुम्हाला सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री महोदय
मला नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे बघा
आई हातपाय गळाठून बसलीय
धाकटय़ा भावाचं शिक्षण आहे अजून
सगळं मलाच करावं लागणार आहे म्हणून म्हणते मला
नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे
पुढच्याच महिन्यात मला अठरा पूर्ण होतील
मुंबईहून आलेला एक गाववाला सांगत होता
मुंबईत मसाज पार्लर खोललेत तिथं मुलींची भरती
सुरू आहे म्हणत होता
त्याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे ?
आमच्या गावात ब्रॉडबँडची सोय आहे
महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध
होईल का त्याची जाहिरात ?
मला नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे
मुख्यमंत्री महोदय माझ्या पत्राचा
सहानुभूतीपूर्वक विचार करा

Friday, February 25, 2011

संथ वाहते कृष्णामाई...

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात होते. ज्या परिस्थितीत त्यांनी सूत्रे स्वीकारली होती, ती परिस्थिती वेगळी होती आणि त्यांच्यापुढची आव्हानेही वेगळी होती. थेट दिल्लीच्या राजकारणातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राची नीट माहिती नाही, ती आधी करून घ्यावी लागेल, असे सल्ले काही पंडित देत होते. अजित पवार यांचा आक्रमकपणा आणि कामाच्या धडाक्यापुढे ते निष्प्रभ ठरतील, असेही बोलले जात होते. परंतु सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर जाणवलेले वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व कच्चे नाही. कृष्णामाई संथ वाहात असली तरी उथळ नाही, पाणी खूप खोल आहे आणि त्याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकत नाही, हेच दिसून आले. एकीकडे अजित पवार यांची गाडी सुसाट सुटली असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगामुळे अपघाताला निमंत्रण मिळते, याची जाणीव असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावर अनावश्यक वेग वाढवून त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. झालेही तसेच. राज्यभर फटकेबाजी करीत सुटलेली अजित पवार यांची गाडी नांदेड जिल्ह्यात घसरली आणि त्यानंतरच्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारही अडचणीत आले. प्रसारमाध्यमांची ताकद दाखवण्याची घाई झालेल्या पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवरही बहिष्काराचा अनाकलनीय निर्णय घेतला. या काळात अजित पवार माफी न मागण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बहिष्कारामुळे ते जराही विचलित झाले नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवार यांचा विरोध असल्याचा जावईशोध अनेक पत्रकारांनी लावला होता. परंतु पदाची सूत्रे घेतल्यानंतर पारदर्शी कारभाराची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक व्यवहारातही आपण पारदर्शी असल्याचेच अनेकदा दाखवून दिले. शरद पवार यांच्यासंदर्भातील आपले मतभेद त्यांनी पूर्वी जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते करताना त्यांनी कधी राजकीय हिशेबीपणा दाखवला नाही किंवा त्यांच्या नेतृत्वगुणांच्या वैशिष्टय़ांबद्दल जाहीरपणे गौरवोद्गार काढतानाही ते कधी बिचकले नाहीत. आघाडीचा धर्म पाळताना मर्यादा येतात, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विचारांशी सहमती दर्शवतानाच आघाडीच्या धर्माचे पालन किती चांगल्या रितीने करता येते याचा वस्तुपाठही त्यांनी गेल्या शंभर दिवसांत घालून दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्रातील कें्राच्या पातळीवरील कामे झटपट होतील, असे मानले जात होते आणि त्याची प्रचिती पहिल्याच झटक्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी पर्यावरण विभागाच्या परवानगीचा विषय अनेक महिने प्रलंबित होता. चव्हाण यांनी प्राधान्याने या विषयात लक्ष घालून त्याला परवानगी मिळवली आणि दिल्लीदरबारात आपले वजन असल्याचे दाखवून दिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि अणुऊर्जा प्रकल्पाचे खंदे समर्थक असलेल्या चव्हाण यांच्यादृष्टिनेही प्रतिष्ठेचा विषय आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक पातळीवर वातावरण तापवले जात असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्थानिक पातळीवर संवाद सुरू करून प्रकल्पविरोधाची धार कमी केली. चव्हाण यांनीही स्थानिक पातळीवरील लोकांशी संवाद साधून त्यांचे समाधान करण्याची भूमिका घेतली. त्यासंदर्भातील पहिली जनसुनावणी मुंबईत घेतली तेव्हाही अनेकांनी त्याला विरोध करून जैतापूरमध्ये ती घेण्याची मागणी केली. मात्र मुंबईतील जनसुनावणी ठरल्याप्रमाणे घेऊन कोकणाचा दौराही निश्चित केला. या साऱ्यातून मुख्यमंत्र्यांचा ठामपणाच दिसून येतो. प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली किंवा जनमताच्या रेटय़ाखाली कोणताही निर्णय घेण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. जे करायचे ते ठाम आणि ठरवल्याप्रमाणे, अशीच त्यांची कार्यशैली राहिली. सध्या विश्वचषकाचे वारे वाहात आहे, त्याच भाषेत बोलायचे तर आपणाला चस्का लागलाय तो, सेहवाग, विराट कोहली, युसूफ पठाण यांच्या फलंदाजीचा. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ते आवश्यक असले तरी ते दीर्घकालीन फायद्याचे नाही. अजित पवार यांची शैली मर्यादित षटकांसाठी उपयुक्त असली तरी पृथ्वीराज चव्हाण हे कसोटीचे खेळाडू आहेत. राहुल ्रविड किंवा व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे. त्यांच्या एकेका फटक्याची नजाकत भल्याभल्या जाणकारांना भुरळ घालणारी आहे, हे त्यांनी अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेच उदाहरण घेता येईल. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणामुळे संमेलन वादग्रस्त बनत असताना मुख्यमंत्र्यांनी समारोप समारंभाला येऊ नये, असे आवाहन ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते. तरीही ते संमेलनाच्या समारोप समारंभाला आले. मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर संमेलनाच्या संयोजकांनी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या करून भिक्षुकी वृत्तीचे दर्शन घडवले. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी कोणत्याही मागणीची साधी दखलही घेतली नाही. आश्वासन देणे तर दूरच राहिले. उलट नथुरामसंदर्भातील वादाचा थेट उल्लेख करून संबंधितांना खडे बोल सुनावले. असा व्यवहार केलात तर यापुढे तुमच्या व्यासपीठावर यायचे किंवा नाही याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत पृथ्वीराजांचा आसूड कडाडला. तेव्हाच लक्षात आले की, कृष्णेचे पाणी खूप खोल आहे. वैचारिक भूमिकेच्याबाबतीत पक्के असलेले पृथ्वीराज चव्हाण खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतात. शरद पवार यांच्यानंतर एवढी ठाम वैचारिक भूमिका असलेला मुख्यमंत्री त्यांच्यारुपाने लाभला आहे. नाहीतर मधल्या काळात विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणजे मुँह में फुले-आंबेडकर बगलमें बुवा-बापू अशी स्थिती होती. असे बुवा-बापूधार्जिणे मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातील जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा कशी काय करायची? त्यामुळे लगेचच नव्हे, पण विशिष्ट कालावधी ठरवून त्यांना या विधेयकाच्या मंजुरीसंदर्भात पावले उचलावी लागतील. सुदैवाने उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुवा-बापूंच्या भानगडींपासून दूर राहणारे आहेत, त्यामुळे त्यात फारशा अडचणी येणार नाहीत.
टेक्नोसॅव्ही मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेल्या चव्हाण यांनी तंत्रज्ञानाच्या जालात संवेदनशीलता हरवू दिलेली नाही. म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न ते आस्थेने समजून घेतात आणि त्यासंदर्भातील ठोस भूमिकाही जाहीर करतात. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्याचेच उद्योग केले, त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे वेगळेपण नजरेत भरल्यावाचून राहात नाही.
एकूण काय तर कृष्णामाई संथपणे वाहात असल्याचे दिसत असले तरी तीरावरच्या साऱ्या सुखदु:खांची जाणीव ठेऊन वाहात आहे आणि हे पाणी खूप खोल आहे.

Thursday, February 17, 2011

गृहखात्याच्या गोंधळावर खोपडेंचे शरसंधान

वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी गृहखात्यावर शरसंधान केले आहे. सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने इतक्या थेटपणे खात्यासंदर्भात मतप्रदर्शन करण्याचे धाडस करावे, हे मोठे धाडसाचे काम आहे. खोपडे यांचा त्यामागील हेतू काहीही असला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल.
आर. आर. पाटील गृहखात्यालाही चांगले वळण लावतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु गृहखात्याला नेतृत्व देण्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नसल्याचेच अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गमावलेले गृहखाते त्यांनी इर्षेने वर्षभराच्या आत पुन्हा मिळवले, परंतु त्यांना पोलिस दलाची किंवा व्यक्तिगत स्वत:ची गमावलेली प्रतिष्ठा मात्र पुन्हा मिळवता आली नाही. अनामी रॉय यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या कच्छपी लागून पोलिस दलातील अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करताना त्यांनी कधी सदसद्विवेकबुद्धी वापरली नाही.
सरकारी अधिकारी किंवा पोलिस अधिकारी जेव्हा व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागतात, तेव्हा त्यांनी सेवेचा निरोप घेण्याची मानसिक तयारी केलेली असते, असे समजले जाते. सेवेत राहून बंडखोरी करणारे आणि संघर्ष सुरू ठेवणारे गो. रा. खैरनार यांच्यासारखे अधिकारी अपवादात्मक असतात. प्रत्येकालाच हा मार्ग जमतो असे नाही. खैरनार यांची भूमिका प्रामाणिक असली तरी त्यांचे वर्तन सेवाशर्तीचे उल्लंघन करणारे होते. त्याची पर्वा न करता ते नेटाने लढाई लढवत होते. खैरनारांची लढाई सुरू होती, तो काळ अण्णा हजारे यांच्याही आंदोलनाचा होता, त्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या बिगर राजकीय लढाईत राजकीय गणंग घुसल्यामुळे लढाई दीर्घकाळ टिकली नाही. शरद पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे देण्याच्या वल्गना करणाऱ्या खैरनारांना पुराव्याचा एकही कागद सादर करता आला नाही. अण्णा हजारे यांनी मात्र आपली लढाई सुरू ठेवली आणि त्यातूनच माहितीच्या अधिकारासारखी क्रांतिकारक गोष्ट घडू शकली. अण्णांच्या लढाईत प्रारंभीच्या काळात सनदी सेवेचा राजीनामा दिलेले अविनाश धर्माधिकारी होते. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी गृहखात्यावर केलेले शरसंधान. सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने इतक्या थेटपणे खात्यासंदर्भात मतप्रदर्शन करण्याचे धाडस करावे, हे मोठे धाडसाचे काम आहे. खोपडे यांचा त्यामागील हेतू काहीही असला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल.
विद्यमान पोलिस दलातील गटबाजी, सुंदोपसुंदी, नियुक्त्यांसाठीचे राजकारण या साऱ्या बाबी कुणाही संवेदनशील अधिकाऱ्याला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सुरेश खोपडे यांची आतार्पयतची वाटचाल पाहिली, तर एक कर्तृत्ववान अधिकारी अशीच त्यांची ख्याती आहे. वर्दीचा आणि अधिकाराचा वापर समाजात काही चांगले घडवण्यासाठी करणाऱ्या अधिकाऱ्यांची पोलिस दलात एक उज्ज्वल परंपरा आहे, सुरेश खोपडे हे त्या परंपरेतले अधिकारी आहेत आणि ते त्यांनी कामातून सिद्ध केले आहे. मुंबई दंगलीच्या काळात भिवंडी शांत राहिली, ती खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने केलेल्या कामामुळेच. मोहल्ला कमिटय़ांच्या त्यांच्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. मोहल्ला कामटीबरोबरच कामसुधार मंडळ, पोलिस स्टेशन कामकाजाची पुनर्रचना,कायदा सुव्यवस्था हाताळण्याचे नाविन्यपूर्ण प्रयोग, मनुष्यबळ विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना त्यांनी राबवल्या. शांतपणे काम करणे आणि त्यातून जे चांगले घडले ते लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु अशा अधिकाऱ्याचा गृहखात्याची प्रतिमा सुधारण्यासाठी वापर करून घेण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचीच भूमिका घेण्यात आली. खोपडे हे एकमेव उदाहरण नाही. माधवराव सानप यांचेही असेच आहे. तेही खोपडे यांच्याप्रमाणे विधायक मार्गाने पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपडणारे अधिकारी. एक गाव एक गणपतीसारख्या संपूर्ण राज्याने स्वीकारलेल्या उपक्रमाचे प्रणेते. खोपडे यांनी राबवलेला मोहल्ला कमिटीचा उपक्रम किंवा सानप यांनी राबवलेला सामाजिक सलोख्याचा उपक्रम हे खरेतर राज्यसरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा तंटामुक्ती योजनेचे स्त्रोत आहेत. परंतु ही योजना राबवताना प्रशासकीय पातळीवरून राजकारण खेळले गेले आणि खोपडे-सानप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना त्यापासून दूर ठेवले. त्याचमुळे तंटामुक्तीची योजना चांगली असली तरी त्यात काही कच्चे दुवे राहिले. योजनेचा पायाच कच्चा राहिल्यामुळे आकडेवारीच्या स्वरूपात योजनेचे यशापयश मोजले जाऊ लागले. आणि योजना यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेले अधिकारीही गुणात्मकता बाजूला ठेवून संख्यात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडपडू लागले.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात खोपडे यांनी पोलिस दलाच्या दुखण्यांवर बोट ठेवले आहे. भिवंडीसंदर्भातील पुस्तकावरून त्यांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटिस बजावण्यात आली आहे.
मुंबईत मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट महिने आधी शिजत होता. तसेच मुंबईत जुलै रोजी लोकल रेल्वेमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा कट त्याच्या सहा वर्षापूर्वीपासून शिजत होता, तरीही या कटाची माहिती पोलिसांना का प्राप्त झाली नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. रेल्वे बाँबस्फोट झाला तेव्हा आपण रेल्वे पोलिसांचे महानिरीक्षक होतो. त्यावेळी पंतप्रधान मुंबईवर भेटीवर आले, तेव्हा मी तोंड उघडू नये, अशी ताकीद देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. पोलिस दलाच्या गोंधळलेल्या नेतृत्वामुळे मुंबई असुरक्षित असल्याचा त्यांचा आरोप आहे.
आर. आर. पाटील गृहखात्यालाही चांगले वळण लावतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु गृहखात्याला नेतृत्व देण्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नसल्याचेच अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गमावलेले गृहखाते त्यांनी इर्षेने वर्षभराच्या आत पुन्हा मिळवले, परंतु त्यांना पोलिस दलाची किंवा व्यक्तिगत स्वत:ची गमावलेली प्रतिष्ठा मात्र पुन्हा मिळवता आली नाही. अनामी रॉय यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या कच्छपी लागून पोलिस दलातील अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करताना त्यांनी कधी सदसद्विवेकबुद्धी वापरली नाही. तत्कालीन प्रसिद्धीसाठी अनेक घोषणा केल्या, मात्र त्यांच्या अमलबजावणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांचाही भ्रमनिरास झाला. सेवेत असताना खात्यासंदर्भात काही बोलण्याचे परिणाम काय असू शकतील, याची कल्पना सुरेश खोपडे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला नक्कीच असेल. तरीही त्यांनी बोलण्याचे धाडस दाखवले आहे. यावरून पाणी किती डोक्यावरून चालले आहे, याची कल्पना येऊ शकते. खोपडे यांची एक सामाजिक प्रतिमा आहे आणि परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी असावी. म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे बळ राखून असल्यामुळेच त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला असावा. परंतु पोलिस दलातील गँगवॉरमुळे खच्चीकरण झालेले असे कितीतरी अधिकारी आहेत, ज्यांना खासगीतही तोंड उघडण्याचे धाडस होत नाही. जे आपल्यावरील अन्याय गुमान सहन करतात.
पोलिस दलातील राजकारण हा नवा विषय नाही. राजकारणात जसे गट-तट असतात तसे पोलिस दलातही गट-तट कार्यरत आहेत. विरोधी गटातील अधिकाऱ्यांचा गेम करण्यासाठी सारेच सज्ज असतात. अनेक वर्षापासून हे चालत आले आहे. त्यामुळे आताच काहीतरी आक्रित घडते आहे, असे मानण्याचे कारण नाही. आर. आर. पाटील यांच्यासारख्या कथित स्वच्छ आणि संवेदनशील गृहमंत्र्यांच्या काळात परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही, ही यातील चिंतेची बाब आहे. गृहखात्याचे मालक असल्यामुळे त्यांनी अनामी रॉय यांच्यावर मेहेरबानी केली किंवा मर्जीतल्या आणखी कुणा बेनामी अधिकाऱ्यांना हव्या तिथे नेमणुका देणे हा सर्वस्वी त्यांच्या अधिकाराचा विषय आहे. परंतु एकीकडे संवेदनशीलतेचे ढोल वाजवायचे आणि दुसरीकडे संवेदनशील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करायचे, ही यातली क्लेशदायक बाब आहे. पोलिस दलात साऱ्यांनाच मोक्याच्या नेमणुका मिळणार नाहीत आणि ज्यांना मोक्याच्या नेमणुका मिळणार नाहीत ते नाराज होणार हे गृहित असले तरी उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून घेणे हेही चांगल्या नेतृत्वाचे लक्षण असते. गृहमंत्री किंवा पोलिस महासंचालक यापैकी कोणालाही ते साध्य झाले नाही. म्हणूनच सुरेश खोपडे ‘गोंधळलेले नेतृत्व’ असे म्हणतात ते खरे वाटते.

Thursday, February 10, 2011

पोपट मेला असे म्हणायचे नाही !

पोपट काही खात नाही, पोपट पाणी पीत नाही, पोपटाने मान टाकली आहे, पोपट हालचाल करीत नाही..तरीही पोपट मेला असे म्हणायचे नाही. पोपट खूप नाजूक आहे आणि परीकथेतल्याप्रमाणे त्यांचे प्राणच पोपटात अडकले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्या आणि त्याच आगीच्या लपेटीत आल्यामुळे काहीशा वेळाने कुडीतून प्राण निघून गेलेल्या आणि ज्याच्या कुडीत अनेकांचे प्राण अडकले होते, त्या पोपट शिंदेविषयी हा मजकूर नाही. त्या पोपटची गोष्टच निराळी होती. त्याच्या प्राणात अनेकांचे प्राण अडकले होते आणि तो अखेर्पयत तोंड उघडू न शकल्यामुळे पोलिस ज्याचा जबाबही घेऊ शकले नाहीत. त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले आणि अनेकांचा जीव भांडय़ात पडला. पण वेळ अशी आलीय की, त्या पोपटबद्दलही बोलायचं नाही. त्याच्याविषयी कुणी काही बोललं, त्याच्या भेसळखोरीला राजकीय संरक्षण होतं, असं कुणी म्हणालं की छगन भुजबळांना वाटतं आपल्यालाच लक्ष्य करून बोललं जातंय. ते स्वाभाविकही आहे. काही वर्षापूर्वी अंतिम तोतला हा तेलमाफिया चर्चेत आला तेव्हा भुजबळांशीच त्याचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. पुढे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यशवंत सोनवणे यांना जाळून मारण्याची घटनाही योगायोगाने भुजबळांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातच घडली,त्यामुळे भुजबळांच्या पक्षांतर्गत आणि बाहेरील साऱ्या विरोधकांना आयतं कोलीत मिळाले आणि त्यांनी पोपट शिंदेसह तेलमाफियांच्या राजकीय हितसंबंधांची चर्चा सुरू केली. साऱ्या हवेतल्या बाता असल्या तरी रोख भुजबळांवरच होता. भुजबळांसारख्या नेत्याला असे आरोप नवे नाहीत. राजकीय कारकीर्दीला सुरूंग लावणारे अनेक आरोप होऊनही भुजबळांनी सारे परतवून लावले. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रत्येक संकटावेळी बाहेरच्यांपेक्षा पक्षातल्या मंडळींनीच त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. भुजबळांनीही आता मागे वळून साऱ्या गोष्टींचा विचार करायला हवा. म्हणजे एकीकडे महात्मा जोतिराव फुले यांची विचारधारा आणि दुसरीकडे नाळ जोडली जाते ती एकदम तेलगी, अंतिम तोतला किंवा पोपट शिंदे यांच्याशी. अशा गोष्टी आपल्याच वाटय़ाला का येतात, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. म्हणजे मग पोपट मरण्याची वाट पाहावी लागणार नाही आणि पोपट मेला असे कुणी म्हणाले तरी आनंद किंवा दु:ख वाटणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे ऐंशीच्या दशकातले अमिताभ बच्चनच झालेत. भुजबळांचा पत्ता कापून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर मांड ठोकली आणि त्यांचा वारू असा काही उधळला की, तो कुठे थांबेल याचा नेम नाही. पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला यशोशिखरावर नेण्याची त्यांची जिद्द दिसते आहे, मात्र वाटेत अनेक दऱ्या आहेत. कुठल्याही टप्प्यावर अंदाज चुकला तर एखाद्या दरीत सारा खेळ खल्लास होऊ शकतो. शिखरावर पोहोचवण्यासाठी जे मदत करतात, तेच दरीत कोसळण्यासाठीही व्यूहरचना लावू शकतात हे अद्याप बारामतीच्या छोटय़ा पवारांना लक्षात आले नसावे. शरद पवारांनी पत्रकारांना अनेकदा फटकारले आहे. पोरकटासारखे प्रश्न विचारणाऱ्यांचा जागेवर पाणउतारा केला आहे, परंतु एकूण प्रसारमाध्यमांचा अनादर होईल अशी कृती कधी केली नाही. सुपारी घेऊन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापणे आणि एकूण प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींविषयी अनुदार उद्गार काढणे यातला फरक अजित पवारांच्या लक्षात आला नसावा. राज्यात जिथे जाईल तिथल्या स्थानिक नेत्यांना झापत सुटलेल्या अजित पवार यांना पत्रकारही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा अँग्री यंग मॅनची आपली इमेज डॅमेज करणारे वाटले असावेत त्यामुळे त्यांनी पत्रकारांना पट्टय़ात घेतले आणि तिथेच फसले. गेले काही दिवस माध्यमांचे डार्लिग बनलेले अजित पवार एकदम व्हिलन बनले. इथे तर दोन पोपट आहेत. एक पोपट आहे अजित पवार यांचा. एवढय़ा डॅशिंग नेत्याला भर सभेत कुणीतरी सामान्य माणूस प्रश्न विचारतो, जाब विचारतो हे जर लोकांनी टीव्हीवर पाहिले असते तर अँग्री यंग मॅनच्या इमेजचे पार भजे झाले असते आणि इमेजचा पोपट मेला असता. तो जपण्यासाठी त्यांनी थेट पत्रकारांनाच पट्टय़ात घेतले आणि स्वत:च पट्टय़ात सापडले आणि त्यांच्या इमेजचा पोपट झाला. दुसरा पोपट आहे वृत्तवाहिन्यांचा. त्यांनी काहीही दाखवायचे आणि काहीही दाखवता, असे मात्र म्हणायचे नाही. आपणच आपले हसे करून घेतो, हे बऱ्याचजणांना कळत नाही, त्यामुळेच अजित पवारांसारख्यांचे असे बोलण्याचे धाडस होते.
इमेजमध्ये इमेज असेल तर ती गृहमंत्री आर. आर. पाटील यांची. ती म्हणजे काचेच्या भांडय़ासारखी आहे. कितीही जपायचा प्रयत्न केला तरी तिला तडे जातच असतात. आणि तडे गेले की आर. आर. पाटील यांची जीभ ताड् ताड् चालायला लागते. तेलमाफियांच्यासंदर्भात नाव घेतल्यावर जसे भुजबळांचे होते, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा विषय काढला की, आर. आर. पाटील यांचे होते. इथून तिथून कायदा सुव्यवस्थाच ती. अधुनमधून बिघडणारच. पण कायदा-सुव्यवस्थेच्या पोपटाचे नाव नाही घ्यायचे. तो मेला तरी मेला म्हणायचे नाही. यशवंत सोनवणे प्रकरणी गृह आणि पुरवठा खाते नीट काम करीत नसल्यामुळे सारे संशयाचे धुके आपल्याभोवती निर्माण होते, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी भुजबळ यांनी जाहीरपणे केली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतली बातमी फुटल्यामुळे आर. आर. पाटील संतापले आणि बातम्या फोडणाऱ्या ‘पत्रकार मंत्र्यांचा’ विषय पुन्हा एकदा उपस्थित केला. यापूर्वी एकदा त्यांनी ट्विटरवर या विषयाला वाचा फोडली होती. आर. आर. पाटील एवढे संवेदनशील असते तर त्यांनी नागपूर जिल्ह्यातील राजूलवाडी (ता. उमरेड) येथे पोलिसांच्या भीतीने घरदार सोडून जंगलात पळालेल्या पारध्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असता. आर. आर. पाटील यांच्या पोलिस दलाचे पोलिस किती क्रूरपणे वागतात, याचे दर्शन राजूलवाडीत गेल्या आठवडय़ात घडले. हप्ता वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली आणि त्यांनी पन्नालाल राजपूत या सामाजिक कार्यकर्त्यांला रॉकेल भेसळखोर ठरवले. पारध्यांनी पोलिस पथकावर दगडफेक केल्याच्या बातम्यांना राज्यपातळीवर प्रसिद्धी मिळाली. या प्रकरणाची वस्तुस्थिती वेगळीच आहे. नागपूर जिल्ह्यात पारधी वस्त्या आहेत. त्यापैकी राजूलवाडीची वस्ती पन्नालाल राजपूत यांच्या पुढाकारामुळे सुधारलेली आहे. दीडशे कुटुंबांच्या या वस्तीत तीन कुटुंबे दारुचा व्यवसाय करतात, बाकी सारे शेती करतात. अशा वस्तीत पोलिसांनी मर्यादा ओलांडली त्याला लोकांनी विरोध केल्यावर बळाचा वापर केला आणि घाबरून लोक जंगलात पळून गेले. यशवंत सोनवणे हत्येच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या घटनेला रॉकेल भेसळीचा रंग देऊन प्रसारमाध्यमांना बातम्या पुरवल्या. दुसऱ्या दिवशी राखीव पोलिस दल, दंगलविरोधी पथक वस्तीवर धडकले आणि निर्मनुष्य वस्तीची लूट केली. तिजोऱ्या फोडल्या. त्यातील रकमा, मौल्यवान चीजवस्तू गायब झाल्या. पारध्यांच्या कोंबडय़ा कापून पाटर्य़ा केल्या. याची माहिती आर. आर. पाटील यांना असण्याचे कारण नाही. पोलिसांनी जिवावर उदार होऊन अडीचशे लिटर रॉकेल जप्त केल्याचे रिपोर्टिग त्यांच्याकडे झाले असणार. राज्यपातळीवरील प्रसारमाध्यमांनी पहिल्या दिवशी पारध्यांनी केलेल्या दगडफेकीची बातमी छापली आणि विषय सोडून दिला. स्थानिक पातळीवरील वृत्तपत्रांनी मात्र दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन
वस्तुस्थिती समजून घेतली तेव्हा पोलिसांच्या क्रौर्याचे दर्शन घडले. आता पोलिसांच्या संवेदनशीलतेचा पोपट मेला आहे, असे कोमल हृदयाच्या आर. आर. पाटलांना कोण आणि कसे सांगणार? कारण आर. आर. पाटील यांच्या संवेदनशीलतेचा पोपटही कधीच मेला आहे, त्याची त्यांना स्वत:लाही खबर नाही.

Tuesday, February 8, 2011

आलोक : उद्ध्वस्ततेचा भयाण अनुभव

आसाराम लोमटे यांचा ‘आलोक’ हा कथासंग्रह मुळापासून हादरवून आणि स्वास्थ्य बिघडून टाकणारा आहे. मराठी साहित्यात खेडय़ातील वास्तवाचं भेदक चित्रण आतार्पयत मुबलक प्रमाणात आलं आहे, परंतु आसाराम लोमटे ज्या ताकदीनं ते मांडतात ते सारं पार आतून उदसून टाकणारं आहे. सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ कादंबरीनं तसा काहीसा अनुभव दिला होता, परंतु आसाराम लोमटे यांची कथा इतकी आत घुसते की सहजासहजी सावरून लगेच पुढच्या कथेकडं वळता येत नाही. ‘इडा पीडा टळो’ या बहुचर्चित कथासंग्रहानंतर ‘आलोक’ हा आसाराम लोमटे यांचा दुसरा कथासंग्रह. कथा या वाड.मयप्रकाराची बलस्थाने त्यांनी नेमकेपणाने पकडली आहेत. भालचं्र नेमाडे यांना कथेसंदर्भातील आपली विधाने बदलावी लागतील, एवढी ताकद त्यांच्या कथांमध्ये आहे. मराठीला कथाकारांची सशक्त परंपरा आहे आणि अनेक कथाकारांनी लक्षवेधी प्रयोगही केले आहेत. आसाराम लोमटे मात्र कथा सांगताना माणसांच्या जगण्याचे पाप्रुे उलगडून दाखवण्याला प्राधान्य देतात. प्रयोगशीलतेच्या फंदात न पडता पारंपारिक कथनपरंपरेच्याच मार्गाने मराठी कथा पुढे नेतात.
आलोक या कथासंग्रहात आणि या दोन वर्षात लिहिलेल्या सहा कथा आहेत. प्रत्येक कथा साधारणपणे छापील बावीस ते सत्तावीस पानांची आहे, त्यामुळे या कथांना दीर्घकथा म्हटले तरी चालण्यासारखे आहे.
‘ओझं’ ही या कथासंग्रहातील सर्वात तापदायक कथा. आपल्यापेक्षा सात-आठ वर्षानी मोठय़ा पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावानं केलेला संवाद असं कथेचं स्वरूप आहे. कथेत काहीही विलक्षण घडत नाही किंवा कुठंही धक्का देणारे प्रसंग नाहीत, तरीही अगदी पहिल्यापासून ही कथा उध्वस्ततेचा एक भयान अनुभव देते. थोरला भाऊ शेती करणारा, पण पावसाअभावी शेतीतून उत्पन्न काहीच नाही उलट मातीत घातलेलं मातीतच जाण्याची स्थिती, धाकटा कुटुंबाला लागेल तशी मदत आत्मियतेने करीत राहतो. परस्परांवर कमालीचा जीव असलेल्या दोघा भावांचे भावबंध असे उलगडत जातात की, त्यातून कौटुंबिक जिव्हाळा, नात्यांची घट्ट वीण या साऱ्याचं एक मनोज्ञ चित्र समोर उभं राहतं. शेती करणाऱ्या थोरल्याला आपल्या मुलीची चतुराची काळजी असते. तिनं धाकटय़ाच्या घरी राहून शिकावं, अशी त्याची इच्छा परंतु ते नाही जमून येत. त्यामुळं तो कमालीचा दुखावला जातो. पावसाअभावी वाया गेलेलं बियाणं, खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेलं कर्ज, त्यातच लागलेलं दारु पिण्याचं व्यसन असं सारं कथेत येतं. ‘कलकलत्या उन्हात सावली घेऊन आलेल्या ढगानं निघून जावं अन उभ्या जन्माचीच दुपार व्हावी, तसं तिचं झालंय.’, हे वहिनीच्या आयुष्याबद्दलचं भाष्य किंवा थोरल्याच्या व्यसनाचं कळल्यानंतर, ‘आधी वाटायचं लांबून लांबून धूर दिसतोय. पण आता पायाखालीच विस्तव आल्यासारखं जाणवायला लागलं’ या साऱ्यामध्ये कमालीचा साधेपणा असला तरी सारं काळीज कुरतडणारं आहे. कुणाही संवेदनशील माणसाची झोप उडवण्याची ताकद या कथेत आहे. इतका हलवून टाकणारा, मनाच्या तळाशी सुरुंग लावणारा अनुभव अलीकडच्या काळात कुठल्या मराठी लेखकानं दिला नाही.
‘वळण’ ही या कथासंग्रहातील अशीच आणखी एक महत्त्वाची कथा. शेळ्या घेऊन रानात जाणाऱ्या बापाची मुलगी प्रयाग. बापाची लाडकी पगन. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रयाग उर्फ पगन या मुलीची ही कथा. स्कॉलरशीप मिळालेली शाळेतली एकुलती एक मुलगी. शिक्षणाची कमालीची ओढ आणि शिक्षणामुळंच आपलं भाग्य उजळणार आहे, याची समज असलेली,अंगभूत शहाणपणा असलेली. शेजारच्या गावात शाळेसाठी येणारी प्रयाग एकेदिवशी शाळेच्या वाटेवर घडलेल्या एका खुनाची साक्षीदार बनते आणि तिच्यासह तिच्या कुटुंबाचंही स्वास्थ्य हरवून जातं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिकणाऱ्या प्रयागच्या मार्गात अडथळे येतात आणि या साऱ्या भानगडीत तिची शाळाच बंद होण्याची पाळी येते. तिची शाळा सुरू राहण्यासाठी तिच्या अडाणी वडिलांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, शिक्षकांनी केलेली मदत या साऱ्याचे चित्रण कमालीचा अस्वस्थ अनुभव देते.
हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा बनल्याची नोंद असलेल्या आजोबांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आलेल्या नातवाला घडलेल्या आजोबांच्या कर्तृत्वाची सत्यकथा ‘चिरेबंद’, गावातल्या राजकारणातून परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा केला जातो याचे दर्शन घडवणारी ‘कुभांड’, आणि ग्रामपंचायत सदस्याच्या मृत्युनंतरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकारणाच्या अंतरंगाचा वेध घेणारी ‘जीत’ या संग्रहातील इतर कथाही महत्त्वाच्या आहेत.
डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची निस्पृहता आणि प्रलोभनांपासून दूर राहून सामान्य माणसांच्या सुखदु:खांप्रती असलेली निष्ठा दोन कथांमधून व्यक्त होते. लेखकाची वैचारिक भूमिका अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत. ‘खुंदळण’ ही डाव्या चळवळीतून प्रस्थापित राजकीय प्रवाहात आलेल्या दत्तराव या कार्यकर्त्यांच्या घुसमटीची कथा आहे. गावात आणि तालुक्याच्या राजकारणात मुख्य राजकीय प्रवाहापासून वेगळे राहून डाव्या चळवळीत काम करताना निवडणुकीच्या राजकारणात कधी यश येत नाही, असा दत्तराव कौटुंबिक अडचणीच्या काळात प्रस्थापितांच्या कळपाकडे ओढला जातो, ते त्याला सामावून घेऊन मुलीच्या लग्नासाठी मदतही करतात. परंतु जिथे आपली वैचारिक नाळ जोडली आहे, त्या चळवळीपासून तुटल्यामुळे दत्तरावची अवस्था मोठी कठिण होते. नव्या कळपात मन रमत नाही आणि चळवळीतले जुने लोक भेटेल तिथे टोमणे मारतात, अशा परिस्थितीत मनाचा हिय्या करून तो ज्यांच्यापासून तुटलो त्या अप्पांना भेटायला जातो. त्यावेळी ते म्हणतात, ‘दुसऱ्याच्या दावणीला चाऱ्यापाण्याची सोय झाली की लगेच पळतात. काही ढोरंच इतके हावरट की खुटा उपटून पळायची तयारी. मग जगता तरी कशाला ? माणसं पोट जगविण्यासाठी उन्हातान्हाचं राबतात. थोडं पाप केलं तरी पोट भरता येतं. काय गरज दिवस-रात्र रक्त ओकायची ? पण तसं नाही, कष्टकरी माणसं दोन वेळच्या पोटभर जेवणासाठी रक्ताचं पाणी करतात. बाया दोन-दोन महिन्यांची चिल्ली-पिल्ली झोळणीत टाकून मरमर मरतात. काय गरजय त्यांना इतकं सारं करण्यासाठी ? ही माणसं खंगून मरतील पण कोणाच्या वळचणीला जाऊन उष्टय़ावर जगणार नाहीत. जे त्यांना कळतं ते तुम्हाला कळत नाही.’ बदलती राजकीय संस्कृती आणि आयुष्यभर तत्त्वनिष्ठ राहून केलेले राजकारण याचं दर्शन घडवणारी ही कथा आहे. या कथेप्रामाणेच ‘वळण’ या कथेतही प्रयागची शाळा सुटू नये म्हणून मदतीला धावणारे डाव्या चळवळीतील भाई आहेत.
काही कथा पारंपारिक वळणाच्या वाटल्या तरी आसाराम लोमटे वेगळ्या वाटेने जाऊन माणसांच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करतात. आणि तो गाठता गाठता वाचकाच्या मनाचा तळ हलवून टाकतात. माणसांच्या जगण्याविषयी, नातेसंबंधांविषयी, त्याच्या संघर्षाविषयी कमालीच्या आस्थेनं आणि आत्मियतेनं ते लिहितात. ‘इडा पीडा टळो’ या पहिल्या संग्रहाच्या मलपृष्ठावर रंगनाथ पठारे यांनी म्हटले आहे की, आसाराम लोमटे यांच्या कथा या आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत. त्यांच्या कथांतील दु:खाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंत:करण घुसळून टाकतात. आपल्या भावनिक जडत्वावर प्रहार करणाऱ्या या स्वास्थ्यहारक कथा म्हणूनच फार महत्त्वाच्या आहेत.
...
आलोक (कथासंग्रह)
आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन, पृष्ठे एकशे त्रेसष्ठ, किंमत एकशे साठ रुपये.


Wednesday, February 2, 2011

रामदास आठवले दुरावणे परवडणारे नाही !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेच्या मस्तीत असतात तेव्हा आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, याचे थोडेही भान त्यांना नसते. राजकीय स्वार्थासाठी ते निवडणुकीच्या काळात छोटय़ा-मोठय़ा गटांचे लांगूलचालन करतात. निवडणुकीची गणिते जमवण्यासाठी जातीय किंवा प्रादेशिक तडजोडी करीत असतात. मात्र अडचणीच्या काळात आपल्याला सहकार्य केलेल्या छोटय़ा पक्षांचा योग्य सन्मान राखण्याची वृत्ती दोन्हींच्याठायी नाही. दोन्ही पक्षांची नावे वेगळी असली तरी संस्कृती एकच असल्यामुळ्े वृत्तीत फरक असण्याचे कारण नाही. त्यांची ही वृत्तीच त्यांच्या मुळावर आली तर आश्चर्य वाटायला नको. गेले वर्षभर केलेल्या उपेक्षेमुळेच रामदास आठवले यांच्यासारखा धर्मनिरपेक्षतेच्या चळवळीतला त्यांचा मित्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेला, याची योग्य दखल घेतली नाही,तर मात्र नजिकच्या काळात दोन्ही काँग्रेसना त्याची किंमत चुकवावी लागेल. महाराष्ट्रातील दलितांच्या नेतृत्वासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सूचक विधान केले असले तरी काँग्रेसमधून दलितांसाठी नेतृत्व उभे राहणे नजिकच्या काळात तरी शक्य नाही. किंबहुना काँग्रेमधील दलित नेत्याला महाराष्ट्रातील दलित जनता स्वीकारणेही कठिण आहे. काँग्रेसमध्ये दलित नेते नाहीत असे नाही, परंतु ते पक्षातील दलितांचा कोटा भरण्यापुरते आहेत. समरसता मंचात असलेल्या दलितांहून त्यांची अवस्था फारशी वेगळी नसते. अशा नेत्यांना सत्तेचे तुकडे हवे असतात आणि पक्षाला मिरवण्यासाठी दलित चेहरे हवे असतात. आठवले हे राष्ट्रवादीचे मित्र मानले जात असले तरी काँग्रेसलाही त्यांचा लाभ होत असतोच. म्हणूनच आठवले यांच्यासारखा नेता काँग्रेस आघाडीपासून दुरावणे परवडणारे नाही.
अशी सारी पाश्र्वभूमी असल्यामुळेच आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले. महाराष्ट्रातील अनेक दलित नेत्यांनी आतार्पयत शिवसेना-भारतीय जनता पक्षाशी छुपे किंवा उघड संगनमत केले, परंतु रामदास आठवले आतार्पयत त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर होते. आठवले यांनी आपल्यासोबत यावे, यासाठी आतार्पयत अनेकदा प्रयत्न झाले, उघड आवाहने केली, युतीच्या काळात उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यार्पयत मजल गेली, परंतु आठवले यांनी त्यांना दाद दिली नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणूनच वावरले आणि त्यांनी आपल्या परीने काँग्रेस-राष्ट्रवादीलाच सहकार्याची भूमिका घेतली. धर्मनिरपेक्ष प्रवाहाबरोबर राहण्याच्या भूमिकेतून हे घडले. त्यामुळेच आठवले यांनी घेतलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आठवले यांची एकूण कार्यशैली आणि वागणे-बोलणे यामुळे त्यांना राजकारणात कुणी गंभीरपणे घेत नाही. अर्थात अनेकांना सवंग वाटणारी ही शैली आठवले यांनी जाणीवपूर्वक विकसित केली आहे. त्यांच्यामागे जे कार्यकर्ते आहेत तेही त्यांच्या याच बिनधास्त शैलीमुळेच आहेत, हे नजरेआड करून चालत नाही. आठवले यांच्या तुलनेत त्याचे समकालीन किंवा थोडे वरिष्ठ म्हणता येतील, असे जे नेते आहेत त्यांचा वावर गंभीर आणि आक्रमक असला तरी त्यांच्या भूमिका मात्र धरसोडीच्या राहिल्या आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून एक वेगळी मान्यता असली तरीही त्यांची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली. भारिप-बहुजन महासंघाच्या स्थापनेनंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची एक वेगळी वाट निर्माण केली. जी पारंपारिक दलित चळवळ आणि अन्य डाव्या प्रवाहांपेक्षाही वेगळी आहे. मात्र अकोला जिल्ह्यात त्यांनी जो पॅटर्न तयार केला, तो त्यांना राज्याच्या अन्य भागात प्रभावीपणे राबवता आला नाही. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र वेगळे दिसू शकले असते. जोग्रें कवाडे हे दीर्घकाळ धर्मनिरपेक्ष प्रवाहांच्या बरोबर राहिले, मात्र खैरलांजी प्रकरणानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट भाजपशीच संगनमत केले. आठवले जसे शरद पवारांच्या वळचणीला राहिले त्याप्रमाणे रा. सु. गवई यांनी काँग्रेसची वळचण सोडली नाही. शरद पवार यांचे निकटवर्ती असतानाही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते काँग्रेससोबत राहिले. त्याची बक्षिसी त्यांना राज्यपाल पदाच्या रुपाने मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी रिपब्लिकन एकीकरण आणि त्यानंतर रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्थापन होताना त्यांचे पुत्र राजें्र गवई प्रारंभी रिडालोस सोबत राहिले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी रिडालोसला तोंडावर पाडून काँग्रेसशी घरोबा केला. अर्थात त्याआधी प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यात घेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा त्यांनी रा. सु. गवई यांचा मुद्दा उपस्थित केला होता. गवई राज्यपालपदाचा राजीनामा देऊन एकीकरणात येणार आहेत का, असा त्यांचा सवाल होता. राजें्र गवई यांनी रिडालोसची संगत सोडल्यानंतर आंबेडकरांच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला. याव्यतिरिक्त नामदेव ढसाळ, राजा ढाले, टी. एम. कांबळे वगैरे नावे मोठी दिसत असली तरीही त्यांच्यामागे राजकीय ताकद नसल्यामुळे ते कुठे आहेत, याला फारसा अर्थ उरत नाही.
अलीकडच्या काळातील या साऱ्या घटना-घडामोडींचा विाचर केला तर एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे रिपब्लिकन गटांचे ऐक्य व्हावे अशी रामदास आठवले यांची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ होती. त्यासाठी त्यांनी खासदारकीची किंमत दिली. राष्ट्रवादीकडून आलेली खासदारकीची ऑफर स्वीकारली असती तर त्यांना रिपब्लिकन ऐक्याची हाक देता आली नसती, म्हणून विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदारकीची ऑफर नाकारली आणि रिपब्लिकन ऐक्याला प्राधान्य दिले. रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर त्यातूनच रिडालोसची उभारणी झाली. रिडालोसमध्ये बरेच अंतर्विरोध असल्यामुळे आणि महाराष्ट्रात डाव्या चळवळींचे पाठिराखे राहिले नसल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. रिडालोसचा फोलपणा लक्षात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर आठवले यांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुका होऊन गेल्यामुळे आणि नजिकच्या काळात मोठय़ा निवडणुका नसल्यामुळे त्यांना फार किंमत दिली नाही. महाराष्ट्रातील सरकारचा अजून चारेक वर्षाचा काळ बाकी असल्यामुळे सरकारला कुणाच्या कसल्याही मदतीची गरज नाही. विरोधक निष्प्रभ आणि दुभंगलेले असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. अशा काळात आठवले किंवा तत्सम कुणा नेत्याची गरज असण्याचे कारण नाही. नेमकी हीच मानसिकता दोन्ही काँग्रेसच्या मुळावर येणारी आहे. आठवले यांचा राजकीय प्रवास बारकाईने पाहणाऱ्यांना अजूनही ते शिवसेनेबरोबर जातील, असे वाटत नाही. कारण धर्मनिरपेक्षतेसंदर्भातील त्यांची भूमिका पक्की आहे. परंतु ते युतीसोबत जाणारच नाहीत असे नाही. विद्यमान राजकीय परिस्थितीत ज्यांना वैचारिक मित्र मानतो ते पक्ष सत्तेवर असताना दलित चळवळीतील नेत्यांना कोणतेही राजकीय लाभ देण्याची भूमिका घेणार नसतील तर त्यांना धडा शिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून आठवले युतीसोबत जाऊ शकतात. शिवसेनाप्रमुखांची त्यांनी घेतलेली भेट ही दोन्ही काँग्रेसना इशारा देण्यासाठी होती, असेच तूर्ततरी दिसते. रिडल्स इन हिंदूइझमपासून खैरलांजीर्पयतच्या टोकाच्या संघर्षाची परंपरा असल्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे, हे वाटते तितके सोपे नाही. मात्र प्रस्थापितांनी उपेक्षा केली तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आठवले यांनी काही निर्णय घेतला तर तो काँग्रेस आघाडीला महागाात पडल्याशिवाय राहणार नाही.