Total Pageviews

Saturday, July 5, 2014

Brand (?) महाडिक ! 


कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली तीनेक दशके महाडिक ब्रँड चर्चेत आहे. ब्रँड चांगला असतो किंवा खराब असतो. महाडिक Brandच्याबाबतीत सुरुवातीपासून अनेक दंतकथा, वदंता जिल्ह्याच्या राजकारणात प्रचलित आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि त्यांच्या गटाचे लोक आजसुद्धा महाडिक म्हणजे दोन नंबरवाले असाच उल्लेख करतात. महादेवराव महाडिक हे महाडिक कुटुंबातले राजकारणात प्रवेशकर्ते झालेले आद्यपुरुष ! नदीचे मूळ आणि ऋषिचे कूळ शोधू नये असे म्हणतात, त्यात भर घालून Political leaderच्याही कूळ आणि मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी भर घालायला पाहिजे. कोल्हापूरलगतच्या कसबा बावडास्थित छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ (?) संचालक म्हणून महादेवराव महाडिक यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर municipal corporation/s   मध्ये शिरकाव केला. म्हणजे महापालिका निवडणूक लढवली नाही किंवा आपले पॅनलही उभे केले नाही. निवडून आलेल्या वेगवेगळ्या गटाच्या-पक्षाच्या-बिनगटाच्या-बिनाशेंड्याबुडख्याच्या नगरसेवकांना एकत्रित करून महापालिकेत आघाडीची मोट बांधली, जी ताराराणी आघाडी म्हणून ओळखली जात होती. महाडिक यांनी मोट बांधायची. बहुमताएवढे नगरसेवक जमवायचे. त्यांना वेगवेगळी पदे द्यायची. पदाच्या लालसेने नगरसेवक ताराराणी आघाडीत यायचे. त्यामुळे महापालिकेवर दीर्घकाळ आघाडीचे वर्चस्व राहिले. तुम्ही महापालिकेत काय धंदे करता यात मी लक्ष घालायचे नाही आणि महापालिकेतील सत्तेच्या बळावर मी जे उद्योग करतो त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचे अशा परस्पर संगनमताने आघाडीचे नगरसेवक आणि नेते असलेल्या महाडिक यांचा व्यवहार दोनेक दशके सुरू होता. महाडिकांच्या विरोधात जिल्ह्यातील राजकीय पक्षांची मोठी फळी होती. परंतु नेत्यांच्या दळभद्रीपणामुळे महाडिकांच्या साम्राज्याला सुरूंग लावता आला नाही. तो सुरुंग हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी लावला. त्यानंतर महापालिकेत पक्षपातळीवरील राजकारण सुरू झाले. अर्थात त्यामुळे काही गुणात्मक फरक पडला, असे म्हणता येत नाही.

स्वाभिमान गहाण टाकलेले लोकप्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या Corporatorsची सातत्याने हेटाळणी झाली तरी नगरसेवकांनी कधी तक्रार केली नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र महाडिक यांना महापालिकेसारखे राजकारण करता आले नाही. कारण जिल्हा परिषद सदस्य खेड्या-पाड्यांतले होते आणि कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, अशी त्यांची वृत्ती होती. शहरातल्या लोकप्रतिनिधींकडे मात्र तसा ताठ कणा नसल्यामुळे कितीही छी थू झाली तरी सगळे आघाडीच्या छत्राखाली राहिले. कोल्हापूरच्या नगरसेवकांना शिरोलीच्या दावणीला बांधले आहे, असेही म्हटले जात होते.
सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाडिक यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असले, तरी ते पुढाऱ्यांच्या पुढारपणापुरते मर्यादित होते. या प्रवृत्तीला सामान्य जनतेने कधीच थारा दिला नाही. महादेवराव महाडिक यांनी एकदा दिग्वीजय खानविलकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली, परंतु त्यांचा दारूण पराभव झाला. महाडिक यांनी पुढे शिवसेनेचा रस्ता धरला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांनी एकदा जिल्ह्यातील काँग्रेस संपवण्याचा निर्धार केला आणि काही वर्षांनी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानपरिषदेवर निवडून आले. कोणत्याही पक्षाशी निष्ठा नाही. प्रत्येक मतदारसंघात स्वतःच्या सोयीची भूमिका. त्यामुळे राजकारणात त्यांना विश्वासार्हता नव्हती.
महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी २००४मध्ये शिवसेनेकडून Parliamentची निवडणूक लढवली. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब केला, तरीही मंडलिक निवडून आले. २००९मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती, परंतु ती मंडलिक यांच्या विरोधामुळे हुकली. पक्षाने युवराज संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. तेव्हा महाडिक गटाने राष्ट्रवादीविरोधात मंडलिक यांना मदत केली. दरम्यानच्या काळात सतेज पाटील यांच्याशी मतभेद झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून त्यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली, तिथेही पराभव पत्करावा लागला.
एकूण काय तर Brand महाडिक जनतेमध्ये स्वीकारार्ह नाही, हेच वारंवार सिद्ध होत होते. आपण ज्या पद्धतीने राजकारण करतोय ते लोकांना आवडत नाही, त्यात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही हे धनंजय महाडिक यांनी एव्हाना ओळखले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या देहबोलीपासून कार्यपद्धतीपर्यंत एकूण वर्तनव्यवहारात बदल केला होता. सतत लोकांमध्ये राहण्याबरोबरच अनेक समाजोपयोगी कामातला सहभाग टिकवून ठेवला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामात खंड पडू दिला नाही. परंतु ब्रँडची पत वाढण्यासाठी एवढी गोष्ट पुरेशी नव्हती. ती साध्य झाली, धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांच्यामुळे. अरुंधती महाडिक यांचे व्यक्तिमत्त्व, भागीरथी महिला संस्थेमार्फत त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून केलेले महिला संघटनाचे काम यामुळे एकूण महाडिक ब्रँडच्या भूतकाळावर पांघरून घालून त्याला नवी ओळख मिळाली. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना त्याचा मोठा फायदा झाला. किंबहुना त्यांच्या विजयात अरुंधती महाडिक यांनी पाच-सात वर्षे सातत्याने केलेले कामच महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरले.
आधीचे मतभेद पूर्ण बाजूला ठेवून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही सक्रीय सहकार्य केले. या मदतीची परतफेड करण्याची जबाबदारी आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्यावर आहे. त्यांनी तसा शब्दही दिला आहे.
तीस वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात Brand महाडिकला प्रतिष्ठा मिळाली. अर्थात प्रतिष्ठा मिळवणे तुलनेने सोपे असते. कठिण असते ते मिळालेली प्रतिष्ठा टिकवणे. आणि अर्थात ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सगळ्याच महाडिक कंपनीवर येते. परंतु कहानीमध्ये ट्विस्ट येतो तो इथेच.
काँग्रेसचे आमदार असलेल्या महादेवराव महाडिक यांनी आपल्या मुलासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून त्यांना सतेज पाटील यांच्याविरोधात त्याला उभे करावयाचे आहे. त्यासाठी त्यांना निमित्त हवे होते, ते मिळाले आहे कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीमुळे. आपण राहात असलेल्या शिरोली गावाचा हद्दवाढीत समावेश झाला तर मी भाजपमध्ये प्रवेश करीन, असा इशारा त्यांनी जाहीरपणे दिला आहे. महादेवराव महाडिक यांची राजकीय प्रगल्भता वाढत चालली आहे, असे अलीकडे वाटत होते. वीस वर्षे ज्या महापालिकेची सत्ता त्यांनी वापरली, त्या महापालिकेच्या हद्दवाढीच्या विरोधात ते भाजपमध्ये निघालेत. भाजपने हद्दवाढ केली तर कुठे जाणार ? हेही त्यांनी आताच सांगायला हवे.
शेजारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात महाडिक यांचे आणखी एक संस्थान आहे. वाळवा तालुक्यातील येलूर हे महाडिकांचे मूळ गाव. तिथे महादेवरावांचे बंधू म्हणजे धनंजय यांचे आणखी एक काका नानासाहेब महाडिक हे बडे प्रस्थ आहे. शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांनीही चांगले हातपाय पसरले आहेत. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात त्यांचा संघर्ष सुरू असतो. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे वारे वाहू लागल्यामुळे त्यांचेही कान हलू लागले आहेत. शिवसेनेला जयंत पाटील यांच्याविरोधात लढणारा उमेदवार हवा आहे आणि नानासाहेब महाडिक यांना उमेदवारी देणारा पक्ष हवा आहे. त्यामुळे त्यादृष्टिने जोर-बैठका सुरू आहेत.
धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांनी अखंडपणे कष्ट करून महाडिक ब्रँडला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. परंतु महाडिक हे कधी कुठल्या पक्षाचे निष्ठावंत असू शकत नाहीत, हेच पुन्हा सिद्ध करायला त्यांचे दोन्ही काका सिद्ध झाले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत निर्णायक स्वरुपात नेमके काय होते, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.