डीसिकाची ‘सायकल’ आणि पिंजानीचा ‘बँडबाजा’
‘ बायसिकल थीव्ज ’ हा व्हिट्टोरिओ डीसिका या दिग्दर्शकाचा एकोणिसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. जागतिक सिनेमामधला मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाची आठवण राजेश पिंजानी दिग्दर्शित ‘ बाबू बँडबाजा ’ हा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर येते. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर सामान्य माणसाचे जगणे किती कठिण बनले , याचे चित्रण ‘ बायसिकल थीव्ज ’ मध्ये आहे. तर जागतिकीकरणाच्या आक्रमणामुळं इथले छोटे व्यावसायिक , पारंपारिक कलावंत यांचे जगणे मुश्किल करून टाकल्याचे ‘ बाबू बँडबाजा ’ मधून दिसते. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या या चित्रपटाच्या वाटय़ाला म्हणावे तसे कौतुक आलेले नाही. त्याच्या पुढेमागे प्रदर्शित झालेल्या अन्य चित्रपटांबद्दल सगळीकडे धोधो प्रसिद्धीचे पाट वाहताहेत. परंतु त्यापेक्षा गुणवत्तेच्या पातळीवर अनेक पटींनी सरस असलेल्या ‘ बाबू बँडबाजा ’ सिनेमाला पुन्हा बाजारीकरणानेच मारल्याचे दिसून येते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीत आलेल्या आर्थिक मंदीच्या काळातील अस्तित्वासाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाची कथा ‘ बायसिकल थीव्ज ’ ...