संथ वाहते कृष्णामाई...

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात होते. ज्या परिस्थितीत त्यांनी सूत्रे स्वीकारली होती, ती परिस्थिती वेगळी होती आणि त्यांच्यापुढची आव्हानेही वेगळी होती. थेट दिल्लीच्या राजकारणातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राची नीट माहिती नाही, ती आधी करून घ्यावी लागेल, असे सल्ले काही पंडित देत होते. अजित पवार यांचा आक्रमकपणा आणि कामाच्या धडाक्यापुढे ते निष्प्रभ ठरतील, असेही बोलले जात होते. परंतु सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर जाणवलेले वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व कच्चे नाही. कृष्णामाई संथ वाहात असली तरी उथळ नाही, पाणी खूप खोल आहे आणि त्याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकत नाही, हेच दिसून आले. एकीकडे अजित पवार यांची गाडी सुसाट सुटली असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगामुळे अपघाताला निमंत्रण मिळते, याची जाणीव असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावर अनावश्यक वेग वाढवून त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. झालेही तसेच. राज्यभर फटकेबाजी करीत सुटलेली अजित पवार यांची गाडी नांदेड जिल्ह्यात घसरली आणि त्यानंतरच्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारही अडचणीत आले. प्रसारमाध्यमांची ताकद दाखवण्याची घाई झालेल्या पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवरही बहिष्काराचा अनाकलनीय निर्णय घेतला. या काळात अजित पवार माफी न मागण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बहिष्कारामुळे ते जराही विचलित झाले नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवार यांचा विरोध असल्याचा जावईशोध अनेक पत्रकारांनी लावला होता. परंतु पदाची सूत्रे घेतल्यानंतर पारदर्शी कारभाराची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक व्यवहारातही आपण पारदर्शी असल्याचेच अनेकदा दाखवून दिले. शरद पवार यांच्यासंदर्भातील आपले मतभेद त्यांनी पूर्वी जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते करताना त्यांनी कधी राजकीय हिशेबीपणा दाखवला नाही किंवा त्यांच्या नेतृत्वगुणांच्या वैशिष्टय़ांबद्दल जाहीरपणे गौरवोद्गार काढतानाही ते कधी बिचकले नाहीत. आघाडीचा धर्म पाळताना मर्यादा येतात, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विचारांशी सहमती दर्शवतानाच आघाडीच्या धर्माचे पालन किती चांगल्या रितीने करता येते याचा वस्तुपाठही त्यांनी गेल्या शंभर दिवसांत घालून दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्रातील कें्राच्या पातळीवरील कामे झटपट होतील, असे मानले जात होते आणि त्याची प्रचिती पहिल्याच झटक्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी पर्यावरण विभागाच्या परवानगीचा विषय अनेक महिने प्रलंबित होता. चव्हाण यांनी प्राधान्याने या विषयात लक्ष घालून त्याला परवानगी मिळवली आणि दिल्लीदरबारात आपले वजन असल्याचे दाखवून दिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि अणुऊर्जा प्रकल्पाचे खंदे समर्थक असलेल्या चव्हाण यांच्यादृष्टिनेही प्रतिष्ठेचा विषय आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक पातळीवर वातावरण तापवले जात असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्थानिक पातळीवर संवाद सुरू करून प्रकल्पविरोधाची धार कमी केली. चव्हाण यांनीही स्थानिक पातळीवरील लोकांशी संवाद साधून त्यांचे समाधान करण्याची भूमिका घेतली. त्यासंदर्भातील पहिली जनसुनावणी मुंबईत घेतली तेव्हाही अनेकांनी त्याला विरोध करून जैतापूरमध्ये ती घेण्याची मागणी केली. मात्र मुंबईतील जनसुनावणी ठरल्याप्रमाणे घेऊन कोकणाचा दौराही निश्चित केला. या साऱ्यातून मुख्यमंत्र्यांचा ठामपणाच दिसून येतो. प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली किंवा जनमताच्या रेटय़ाखाली कोणताही निर्णय घेण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. जे करायचे ते ठाम आणि ठरवल्याप्रमाणे, अशीच त्यांची कार्यशैली राहिली. सध्या विश्वचषकाचे वारे वाहात आहे, त्याच भाषेत बोलायचे तर आपणाला चस्का लागलाय तो, सेहवाग, विराट कोहली, युसूफ पठाण यांच्या फलंदाजीचा. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ते आवश्यक असले तरी ते दीर्घकालीन फायद्याचे नाही. अजित पवार यांची शैली मर्यादित षटकांसाठी उपयुक्त असली तरी पृथ्वीराज चव्हाण हे कसोटीचे खेळाडू आहेत. राहुल ्रविड किंवा व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे. त्यांच्या एकेका फटक्याची नजाकत भल्याभल्या जाणकारांना भुरळ घालणारी आहे, हे त्यांनी अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेच उदाहरण घेता येईल. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणामुळे संमेलन वादग्रस्त बनत असताना मुख्यमंत्र्यांनी समारोप समारंभाला येऊ नये, असे आवाहन ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते. तरीही ते संमेलनाच्या समारोप समारंभाला आले. मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर संमेलनाच्या संयोजकांनी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या करून भिक्षुकी वृत्तीचे दर्शन घडवले. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी कोणत्याही मागणीची साधी दखलही घेतली नाही. आश्वासन देणे तर दूरच राहिले. उलट नथुरामसंदर्भातील वादाचा थेट उल्लेख करून संबंधितांना खडे बोल सुनावले. असा व्यवहार केलात तर यापुढे तुमच्या व्यासपीठावर यायचे किंवा नाही याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत पृथ्वीराजांचा आसूड कडाडला. तेव्हाच लक्षात आले की, कृष्णेचे पाणी खूप खोल आहे. वैचारिक भूमिकेच्याबाबतीत पक्के असलेले पृथ्वीराज चव्हाण खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतात. शरद पवार यांच्यानंतर एवढी ठाम वैचारिक भूमिका असलेला मुख्यमंत्री त्यांच्यारुपाने लाभला आहे. नाहीतर मधल्या काळात विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणजे मुँह में फुले-आंबेडकर बगलमें बुवा-बापू अशी स्थिती होती. असे बुवा-बापूधार्जिणे मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातील जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा कशी काय करायची? त्यामुळे लगेचच नव्हे, पण विशिष्ट कालावधी ठरवून त्यांना या विधेयकाच्या मंजुरीसंदर्भात पावले उचलावी लागतील. सुदैवाने उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुवा-बापूंच्या भानगडींपासून दूर राहणारे आहेत, त्यामुळे त्यात फारशा अडचणी येणार नाहीत.
टेक्नोसॅव्ही मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेल्या चव्हाण यांनी तंत्रज्ञानाच्या जालात संवेदनशीलता हरवू दिलेली नाही. म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न ते आस्थेने समजून घेतात आणि त्यासंदर्भातील ठोस भूमिकाही जाहीर करतात. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्याचेच उद्योग केले, त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे वेगळेपण नजरेत भरल्यावाचून राहात नाही.
एकूण काय तर कृष्णामाई संथपणे वाहात असल्याचे दिसत असले तरी तीरावरच्या साऱ्या सुखदु:खांची जाणीव ठेऊन वाहात आहे आणि हे पाणी खूप खोल आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर