गृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अवस्था ‘गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळण्याला’ अशी झाली आहे. एखाद्या व्यक्तिच्या मागे कुणी कुणी काय काय लावून द्यावे? साऱ्यांच्या नजरेत खुपणारे गृहखाते त्यांच्याकडे आहे. तासगावच्या एस. टी. स्टँडवर एखाद्याचा खिसा कापला, कुठे जातीय तणाव पसरला किंवा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला..असे काहीही घडले तरी त्यासाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरले जाते. अर्थात मंत्र्यांनी वेशांतर करून धाडसाने काळाबाजार उघड केल्याची किंवा डान्स बारची पाहणी केल्याची उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी तासगाव-सांगलीच्या स्टँडवर वेशांतर करून पाकिटमारांना पकडून द्यावे, अशी अपेक्षा कुणी केली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. आणि अत्यंत गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईचे त्याहीपेक्षा गुप्त पद्धतीने चित्रण एखाद्या वृत्तवाहिनीने केले तरीही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जमानाच तसा आहे. आर. आर. पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर ‘माझे तुमच्यावर लक्ष आहे’ असे नमूद करून कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी (पुराव्यानिशी) आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आपल्या कार्यालयाचा आणि घरचा पत्ता, दूरध्वनीही दिले आहेत. माझे तुमच्यावर लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले असले तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्यावरच कुणीतरी लक्ष बारीक लक्ष ठेवून असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरज येथे झालेल्या शिबिरात व्यासपीठावर त्यांच्यामागील खुर्चीवर खुनाचा आरोप असलेला नगरसेवक राजू गवळी येऊन बसला. लक्षात आल्यामुळे त्याला तेथून घालवून देण्यात आले, परंतु तोवर त्याचा बोभाटा झाला होता. मुलाने मांडीवर घाण केली म्हणून आई-बाप मांडी कापून टाकत नाहीत, तेवढे कनवाळू मन आबांच्याकडे आहे. परंतु मेणाहूनि मऊ असणाऱ्या आबांच्याकडे कठिण वज्रासही भेदण्याचा कणखरपणा आहे. म्हणूनच आपल्या शेजारी गुन्हेगाराला बसवण्यामागे षड्.यंत्र असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही, असा खरमरीत इशारा दिला. त्यामुळे बाकी काही होवो न होवो, आबांच्या नावावर आणखी एक ‘इशारा’ जमा झाला. सावकारांना कोपरापासून ढोपरार्पयत सोलून काढू, हुंडा घेणाऱ्याची पोलिस ठाण्यार्पयत वरात काढू आणि संबंधितांच्या अंगावर कपडे ठेवणार नाही..खरेतर आबांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लागण्याचे फारच मनावर घेतलेले दिसते. म्हणूनच मुंबईतील इफ्तार पार्टीतील दृष्यांपाठोपाठ मिरजेतील हा प्रकार घडल्यामुळे हेतूपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा संशय बळावत आहे. वृत्तवाहिन्यांना असे फुटेज मिळायचा अवकाश की, लगेच ब्रेकिंग न्यूज झळकायला लागतात आणि संबंधिताची इमेज पार ब्रेक होऊन जाते. वस्तुस्थितीची शहानिशा न कळता गुन्हेगार गृहमंत्र्यांच्या शेजारी बसला किंवा दिसला म्हणजे त्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा देखावा प्रसारमाध्यमांमधून उभा केला जातो. वेळ कोणती आहे, ठिकाण कोणते आहे, संबंधितांचा एकत्र येण्याचा हेतू काय आहे अशा अनेक बाबींची शहानिशा केल्याशिवाय असा निष्कर्ष काढणे संबंधितांवर अन्याय करण्यासारखे असते. त्याचा विचार न करता प्रसारमाध्यमे वारंवार या मार्गाचा अवलंब करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
गुन्हेगारांनी आपल्या आसपास फिरकू नये यासाठी आर. आर. आबांनी पोलिस यंत्रणाच कामाला लावलेली दिसते. ते स्वाभाविकही आहे. गृहमंत्र्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या साऱ्याच लोकांची माहिती असते असे नाही. असली तर काही बिघडणार नाही. परंतु अनेक प्रकारच्या व्यापा-तापांतून अशी माहिती ठेवण्याची अपेक्षा बाळगणे जरा अतिच होईल. मात्र संबंधित हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि गुन्हेगारांची सावलीही गृहमंत्र्यांवर पडू नये, याचा बंदोबस्त केला पाहिजे. मुंबई आणि मिरजेती घटनांमुळे सावध झालेल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना तशी तंबी केल्यामुळे पोलिस भलतेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी ‘नो क्राईम’ पास हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. सांगली पोलिसांनी तसे पास काढले असले तरी ती त्यांच्या पातळीवर केलेली उपाययोजना आहे, की आर. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार केलेली कार्यवाही आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आर. आर. पाटील यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगवर ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याच्याशीच ते विसंगत ठरेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वृत्तांत प्रसारमाध्यमांना पुरवणाऱ्या सहकारी मंत्र्यांचा समाचार घेतल्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मंत्रालयात बिल्डरना थेट प्रवेश मिळतो, उद्योजकांना पायघडय़ा घातल्या जातात. पण सामान्य माणसाला? यात मी कुणालाही दोष देत नाही. मी स्वत:सुद्धा याच व्यवस्थेचा भाग आहे व तितकाच दोषीसुद्धा. जनता सार्वभौम आहे याची प्रचिती सध्या तलाठी - पोलिस शिपायांपासून कलेक्टर्पयत कुठेतरी येताना दिसते का?’
आर. आर. पाटील यांनी वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले आहे. परंतु गुन्हेगारांची सावली पडू नये म्हणून सामान्य माणसांना त्यांची भेट घेण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार असेल तर मात्र ते गंभीर आहे. इफ्तार पार्टीतील गुन्हेगारांची संगत हा आर. आर. पाटील यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचा गलथानपणा होता. मिरजेतील प्रकार हे षड्.यंत्र होते असे मानले तरी आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्याने असल्या गोष्टींची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असाल आणि तुमचा हेतू शुद्ध असेल तर कोण काय फुटेज दाखवते आणि कुणाला काय वाटते याची चिंता करण्याचे कारण नाही. इतकी काळजी करायला लागलात तर घरात किंवा मंत्रालयात कोंडून घेऊन काम करावे लागेल. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आज गृहखाते आहे म्हणून पोलिसांना आपल्याभोवतीच्या लोकांचा बंदोबस्त करायला किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगू शकता. उद्या दुसऱ्याच कुठल्या खात्याचे मंत्री असाल तर काय करणार? राजकारणात एवढा प्रवास झाल्यानंतर भावनेच्या बळावर कुठलाही निर्णय घेणे हे प्रगल्भपणाचे लक्षण नव्हे. गुन्हेगारांना घाबरून जेवढे लांब पळाल, तेवढे गुन्हेगार तुमच्यामागे सोडले जातील, एवढे तुमचे विरोधक आणि हितचिंतक सक्षम आहेत. म्हणून बाकी काही करण्यापेक्षा गुन्हेगारांना तुमची आणि तुमच्या पोलिसांची जरब वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे अधिक परिणामकारक आणि लोकहिताचे ठरेल. पुन्हा पोलिसांचे कवच घेऊन भुरटय़ा गुन्हेगारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हालही. पण उद्या खासदार पद्मसिंह पाटील यांच्या मांडीला मांडी लावून तुमचे साहेबच बसतील तेव्हा तुम्ही त्या व्यासपीठावर जाणार की नाही? पप्पू कलानी, हितें्र ठाकून वगैरे समाजसेवक लोकांचे किंवा बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न घेऊन आलेत तर त्यांना भेटणार नाही का? दीपक मानकर यांच्यासारख्या लोकनेत्याने पुण्यात कधी एखाद्या समारंभात गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ढकलून देणार का? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता येणार नसतील तर मग सामान्य माणसांनाच भेटीसाठी पोलिसांचा अडथळा का? असेच चालू राहिले तर सामान्य माणसांपासून तुटत जाल आणि पायाखालची जमीन कधी निसटली हेसुद्धा कळणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

एका ‘सुपारी’ची डायरी