महात्म्याच्या मौनाची भाषांतरे
मौनव्रत सुरू केले हे
बरे झाले. कारण गेले दोन महिने अण्णा अखंड बोलताहेत. ऑगस्टला उपोषणाला बसण्याच्या आधीपासून बोलताहेत.
उपोषणाला बसल्यानंतरही एखाद्या बुवाच्या सत्संगाप्रमाणे ते उपस्थित जनसमुदायाला ‘संबोधित’ करीत
होते. मोठमोठय़ाने घोषणाही देत होते. मग कें्र सरकारला ‘चले
जाव.’चा इशारा देणे असो किंवा ‘इन्किलाब
झिंदाबाद’ चा नारा असो..अण्णांचा त्वेष थक्क करणारा होता. उपोषण
पुढे सरकत होते, तसतसा अण्णांचा आवाज वाढतच चालला होता. महाराष्ट्रातल्या
लोकांना त्याचे काही आश्चर्य वाटत नव्हते, कारण
महाराष्ट्राने अण्णांची डझनभर उपोषणे आणि त्यांचा जबरदस्त स्टॅमिना पाहिला होता. धोतर-टोपीवाल्या
या म्हाताऱ्याची उपोषण सुरू केल्यानंतरची अफाट ऊर्जा पाहून दिल्लीकरांनी तोंडात
बोटं घातली होती. सारा देश भारावून गेला होता. महात्मा गांधी आम्हाला बघायला
मिळाले नाहीत, परंतु हेच आमच्यासाठी गांधीजी, असं म्हणण्यार्पयत लोकांची मजल गेली. तेच ते आणि तेच ते दाखवून
कंटाळलेल्या हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्यांना विक्रीसाठी एक नवीन प्रकरण मिळाले
होते, त्यातूनच आंदोलनाला क्रांतीचे लेबल लावले गेले. एखादे
आंदोलन पाहून वृत्तांकन करणारे पत्रकारच विवेक गमावून कसे चेकाळतात हे पाहताना
महाराष्ट्र गालातल्या गालात हसत होता. महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आंदोलनाची नशा
चढली नव्हती, असे नाही. इथेही अण्णांचे विरोधक ते
भ्रष्टाचाराचे समर्थक किंवा थेट भ्रष्टाचारी असे समजून झोडपणे सुरू होते. जनतेचा
आणि साऱ्या प्रसारमाध्यमांचा हा अभूतपूर्व पाठिंबा पाहून स्वत: अण्णाही भांबावून
गेले होते. म्हणूनच उपोषणाच्या अखेरच्या टप्प्यात ते उलट-सुलट विधाने करीत होते. पंतप्रधानांशिवाय
आपण कोणाशी बोलणार नाही, असे म्हणता म्हणता त्यांच्या
हितचिंतकांनी विलासराव देशमुखांना मध्यस्तीला आणले आणि पुढचे-मागचं सारे विसरून
अण्णांनी विलासरावांची मध्यस्ती मान्य करून संसदेच्या आवाहनाचा मान राखून उपोषण
मागे घेतले. त्यानंतर थोडे दिवस उपचार घेऊन गणेशचतुर्थीला ते राळेगणसिद्धीला परत
आले आणि त्यानंतर त्यांनी जे अखंड बोलणे सुरू केले, ते परवा
मौनव्रत सुरू केले तेव्हाच थांबले. दरम्यानच्या काळात जगातला असा एकही प्रश्न
राहिला नसावा, ज्यावर अण्णांनी आपलं मत व्यक्त केले नाही. अण्णांच्या
भेटीसाठी, दर्शनासाठी देशभरातून लोकांची वर्दळ सुरू झाली. सहली
निघू लागल्या. वृत्तवाहिन्यांनी मुक्काम ठोकले. त्यांच्यापुढे अण्णा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. शिक्षकांना मार्गदर्शन करू लागले. गावकऱ्यांना
मार्गदर्शन करू लागले. होळीला रावणाचे दहन केल्यानंतर अहंकारासह षड्रिपूंचे दहन
करण्यासंबंधी प्रबोधनही त्यांनी केले. परंतु हे करताना आपल्या स्वत:मध्येच
अहंकाराने घर केले आहे, हे त्यांच्या लक्षात आले नव्हते.
अण्णांच्याकडे जसा
हटवादीपणा आहे, तसेच
व्यावहारिक शहाणपणही आहे. दिल्लीत ज्यावेळी केजरीवाल-किरण बेदी कंपनी उपोषण
लांबवून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा
अण्णांनी स्वत: वाटाघाटी सुरू करून उपोषण मागे घेण्याची तयारी सुरू केली होती. आताही
तसेच घडले. केजरीवाल कंपनीने काँग्रेसविरोधात प्रचाराची घोषणा करायला अण्णांना भाग
पाडले, त्यानंतर अण्णा देशभर दौरा करणार होते. परंतु मधेच
त्यांनी मौनव्रताची घोषणा केली आणि केजरीवाल कंपनीचा डाव उधळून लावला. दरम्यानच्या
काळात ‘टीम अण्णा’ने प्रचार केलेल्या
हिस्सार पोटनिवडणुकीचा निकालही जाहीर झाला असून तिथे अपेक्षेप्रमाणं काँग्रेसचा
पराभव झाला. भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई विजयी झाले, मात्र
विजयानंतर त्यांनी श्रेय देण्याऐवजी टीम अण्णाला फटकारले. ‘टीम
अण्णा’चा विरोध भ्रष्टाचाराला आहे का काँग्रेसला असा प्रश्न
त्यांनी उपस्थित केला. हिस्सारच्या पोटनिवडणुकीत ‘टीम अण्णा’ने काँग्रेसला पराभूत करण्याचे आवाहन केले, मात्र
कुणाला मतदान करा हे सांगितले नाही, या राजकीय भोंगळपणाकडेही
बिष्णोई यांनी लक्ष वेधले.
या निवडणुका म्हणजे
जनलोकपाल विधेयकाबाबतचे सार्वमत असून काँग्रेसने या पराभवापासून बोध घ्यावा. जनलोकपाल
विधेयक मंजूर करून घ्यावे, अशी
प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर व्यक्त केली. अण्णांनीही काँग्रेसला
या निकालातून धडा घेण्याचा सल्ला ब्लॉगच्या माध्यमातून दिला असून काँग्रेसने
जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, अन्यथा मी स्वत: येत्या
विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरेन, असा इशारा दिला आहे.
दिल्लीहून
परतल्यानंतर अण्णा ज्या पद्धतीने बोलत आहेत,
त्यामुळे त्यांचे खंदे समर्थक असलेले लोकही गोंधळून गेले आहेत. सगळ्या
पक्षातील चांगल्या लोकांनी बाहेर पडून वेगळा पक्ष काढावा, अशी
अण्णांनी केलेली सूचना ऐकून तर त्यांच्या कट्टरातल्या कट्टर समर्थकांचीही वाचा
बसल्यासारखे झाले. आपण गेले चार महिने ज्यांची ढोलकी वाजवतोय, त्या अण्णांच्याकडे एवढा भोंगळपणा असेल असे त्यांना वाटले नसावे. अण्णांच्या
भूतकाळातील भूमिकांचा बारकाईने अभ्यास न करता किंवा त्यांच्या आताच्या
आंदोलनामागील शक्तिंचा विचार न करता दुसऱ्या क्रांतीचा बिगुल वाजवत अण्णांना
गांधीजींच्या जागी बसवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या नावाच्या टोप्या घालून
नाचणाऱ्या लोकांना क्रांतिकारक समजले जाऊ लागले. प्रसारमाध्यमे तारतम्य सोडून
वाहवत गेल्यामुळे आंदोलनाचा फुगा अनावश्यक फुगला, अण्णांच्या
डोक्यात हवा गेली आणि त्यातून अंतिमत: नुकसान एका चांगल्या आंदोलनाचे झाले. या
आंदोलनाचे चळवळीत रुपांतर होणार नाही, हे पहिल्या टप्प्यातच
स्पष्ट झाले होते. आता तर ‘टीम अण्णा’ने
थेट काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकले आहे. केजरीवाल कंपनीला माहीत आहे की, अण्णा ज्याला ‘हमारा लोकपाल’ म्हणतात
तो ‘ड्रॉप’ जसाच्या तसा मंजूर होणे
शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसविरोधाची नौका पुढे नेणे सहज शक्य आहे. ‘टीम अण्णा’ला फक्त एक ठरवावे लागेल, उत्तर प्रदेशात कुणाचा प्रचार करायचा ? मायावतींचा,
मुलायमसिंह यादवांचा की भाजपचा ? केजरीवाल
यांनी तेवढे स्पष्टीकरण केले म्हणजे अण्णांच्या मौनाचे भाषांतर परिपूर्ण झाले,
असे म्हणता येईल !
/////////////??????????????????????!!!!!!!!!!!!!!!!!!!!!KAY MHANVE TECH KALAT NAHI.TE MAUNAT GELE HE MATRA FAR CHAN ZALE.
उत्तर द्याहटवा