अण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग
आपली चळवळ
भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, की काँग्रेसच्या विरोधात याबद्दलच अण्णा हजारे यांचा गोंधळ झालेला दिसतो,
परंतु त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. अण्णांच्या आजवरच्या
वाटचालीत असे अनेक गोंधळाचे टप्पे दिसतील. अण्णांनी दिल्लीत
झेंडा रोवण्यापूर्वी त्यांच्याबाबतीत एक गोष्ट ठामपणे म्हणता येत होती, ती म्हणजे अण्णांचा वापर कुणीही करून घेऊ शकते, परंतु
अण्णांना कुणी मॅनेज करू शकत नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर वावरत असताना अण्णांनी
तेवढे सत्त्व जपले होते, परंतु केजरीवाल-किरण बेदी-मनीष
शिसोदिया-प्रशांत भूषण वगैरे चौकडीने त्यांचा ताबा घेतला तेव्हापासून अण्णांच्या
बाबतीतले सगळे अंदाज चुकायला लागले असून चौकडीच्या हातातले बाहुले बनून अण्णा
वागायला लागले आहेत. अण्णांच्या गांधी प्रतिमेचे भांडवल करून दिल्लीत गर्दी जमते
आणि वृत्तवाहिन्यांवर ओसंडून कव्हरेज मिळते, हे लक्षात
आल्यामुळे त्याचा लाभ घेऊन काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक
केला जात आहे. अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी यांनी केला, तेव्हा राळेगणच्या गांधींनी त्यांना येरवडय़ाच्या मनोरुग्णालयात पाठवण्याची
भाषा केली. भंपक विधाने करायची, हिंसाचाराचे समर्थन करायचे
आणि टीका होऊ लागली की, मी गांधींजींबरोबर छत्रपती शिवाजी
महाराजांनाही आदर्श मानतो, असे समर्थन वारंवार त्यांना करावे
लागले. दिग्वीजय सिंग यांना प्रसारमाध्यमांनी वाचाळ नेते असे बिरुद लावल्यामुळे
त्यांच्या आरोपाचीही खिल्ली उडवण्यात आली, परंतु अण्णांची
दिशा पाहिली, की दिग्वीजय सिंग यांच्या आरोपातले तथ्य
जाणवल्यावाचून राहात नाही.
अण्णांची लढाई
कें्रसरकारशी आहे. आपल्याला हवा असलेला जनलोकपाल जसाच्या तसा सरकार मान्य नाही, अशी समजूत अण्णा आणि त्यांच्या
टीमने करून घेतली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
अण्णांना पत्र लिहून सरकार सशक्त लोकपाल आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली
असली तरी त्यांना धीर धरवला नाही. संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकांच्या ऐकीव
बातम्यांच्या आधारेच त्यांनी काँग्रेसवर हल्ला सुरू केला. प्रत्यक्ष तलवार हाती
घेतली नाही, तरी त्यांची जीभ धारदारपणे आणि
दांडपट्टय़ाप्रमाणे आडवीतिडवी चालू लागली. म्हणूनच मनमोहन सिंग, सोनिया गांधी, कपिल सिब्बल, चिदंबरम
असे जे कुणी त्यांच्या दांडपट्टय़ाच्या कक्षेत येईल त्याला त्यांनी ठोकून काढले. मधेच
शरद पवारांवर हल्ला झाला, त्याचा देशभरातून निषेध झाला तरी
फक्त अण्णांनी त्याचे समर्थन केले. आपला दांडपट्टा आडवा तिडवा फिरतोय, त्याला दिशा नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले लक्ष्य निश्चित केले,
ते आहे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी. संसदीय समितीच्या
बैठकांच्या ऐकीव बातम्यांपासून त्यांनी राहुल गांधी यांनाच लक्ष्य करून टीका सुरू
केली. संसदीय समिती राहुल गांधी यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे तारे
त्यांनी तोडले. भविष्यात काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या हाती असेल,
हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी तळागाळातल्या
घटकांच्या सुखदु:खांशी समरस होत ज्या रितीने राजकीय वाटचाल सुरू केली आहे, त्यातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे आणि नेतृत्वक्षमतेचे दर्शन घडते आहे.
राहुल गांधी यांनी ज्या रितीने देश समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तेवढी संवेदनशीलता स्वातंत्र्योत्तर काळातील कोणत्याही राजकीय नेत्याने
दाखवल्याचे दिसत नाही. महात्मा गांधी यांनी प्रारंभीच्या काळात देश समजून
घेण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला, त्याच मार्गानी राहुल
गांधींची वाटचाल सुरू आहे. दलित-पीडितांचे जगणे समजून घेणे, रेल्वेच्या
स्लीपर क्लासने गोरखपूरपासून मुंबईर्पयतचा प्रवास करून स्थलांतरितांचे प्रश्न
समजावून घेणे, सहकार समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील साखर
कारखानदार, साखरतज्ज्ञांपासून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांर्पयतच्या
घटकांशी संवाद साधणे, तरुणांच्या श्रमदान शिबिरांत सहभागी
होऊन तरुणांशी संवाद साधणे अशा अनेक पातळ्यांवर कोणताही गाजावाजा न करता त्यांनी
देश समजून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. उत्तरप्रदेशात त्यांनी मायावती
यांच्या भ्रष्ट सरकारविरोधात आक्रमकपणे प्रचारमोहीम चालवली आहे. या साऱ्या
प्रक्रियेत एकदा राहुल गांधी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली, की सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा कालबाह्य ठरतो आणि
भाजपच्या आक्रमणातला निम्मा जोर कमी होतो. म्हणूनच आतापासून राहुल गांधी हे घटनाबाह्य
सत्ताकें्र आहे, सशक्त लोकपाल आणण्यासाठी त्यांचा विरोध आहे,
राहुल गांधी भविष्यातले पंतप्रधान असल्यामुळेच पंतप्रधानपद
लोकपालच्या कक्षेत आणायला काँग्रेसवाले विरोध करीत आहेत अशा प्रकारचा अपप्रचार
अण्णा आणि त्यांच्या चौकडीने चालवला आहे. अण्णांच्या आंदोलनाने अशी भूमिका घेण्याचे
काहीच कारण नव्हते, परंतु दुर्दैवाने त्यांनी ती घेतली आहे,
अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे यातूनच
सिद्ध होते. अण्णांचा अहंकार कमालीच्या उंचीवर गेला आहे. या टप्प्यावरून त्यांचा
अहंकार घरंगळतो, की गांधीजींचा मुखवटा घरंगळतो, याचे उत्तर काळच देईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा