एका पत्रकाराची डायरी

माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना असतात. स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सुरू झाल्यानंतर एकदा आमचे आजोबा म्हणाले होते की, महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिलं, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. अब्राहम लिंकन, हिटलर, साने गुरुजी, एपीजे अब्दुलकलाम, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, सुधीर गाडगीळ, अशोकराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, कवी चं्रशेखर गोखले, संगीतकार सलील कुलकर्णी, मोहन जोशी, सुधीर भट अशा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या थोर थोर लोकांनी जो काही नावलौकिक मिळवला तो काही असा तसाच नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळेच ते शक्य होऊ शकले. आमचे मोठे काका म्हणायचे की, चौथीच्या वर्गात असताना एकदा गृहपाठ केला नाही, म्हणून मास्तरांनी ओल्या फोकेनं फोकळलं, त्यादिवशी दप्तर टाकूनच त्यांनी शाळेला पाठ दाखवली. तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग. पुढं त्यांनी राजकारणात करिअर करून झेडपीच्या अध्यक्षपदार्पयत मजल मारली. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी घटना कुठली, याचा विचार अस्मादिक करतात तेव्हा पट्कन सांगू शकतो, की ज्या दिवशी मंत्रालयाची पायरी चढलो ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. नाहीतर काय म्हणायचं! मुंबईत आलो तेव्हा पायात स्लीपर असायचं. आज वुडलँडचे शूज आहेत. आलो तेव्हा डिलाईल रोडला एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत दहा जणांच्यात शेअर करून राहात होतो. आज जवळच्याच अपार्टमेंटमध्ये भाडय़ानंच राहात असलो तरी मुंबईत आपल्या मालकीचे तीन फ्लॅटस आहेत टक्केवारीतले आणि तिन्ही भाडय़ानं देऊन तीन कुटुंबाची राहण्याची गरज भागवतोय. आपल्या गावातच काय, पंचक्रोशीत भौतिक प्रगतीचा एवढा वेग कुणाला पकडता आला नसेल.
तर मुद्दा होता कलाटणीचा. मंत्रालयात येण्याचा आणि कलाटणीचा संबंध काय? मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक? त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला? अस्मादिक ज्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्याचं नाव मुंबईत कुणी ऐकलं असण्याची काडीमात्र शक्यता नाही. नाही म्हणायला डीजीआयपीआरमधल्या म्हणजे माहिती-जनसंपर्क विभागातल्या अ‍ॅक्रिडिटेशन विभागाच्या कारकूनांच्या कानावरून गेलं असेल नाव. आपण काय लिहितो, कुठं छापून येतं कुणीच शोधू शकणार नाही. तरीसुद्धा मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरच्या केबिनींचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले असतात. खपाच्या उच्चांकाच्या उडय़ा मारणारे अपॉइंटमेंटसाठी ्रोण लावून बसतात आठवडा-पंधरा दिवस. तर मुद्दा असा की, कसलाच आधार नसताना आपण वट निर्माण केलीय. शून्यातून निर्माण केलंय म्हणाना सगळं. पूर्वी मुख्यमंत्र्यांचं ब्रिफिंग दाखवायचेत सह्या्रीवर सातच्या बातम्यात, तेव्हा पहिल्या रांगेत असायचो आपण. सगळा महाराष्ट्र बघायचा. गावाकडनं किती फोन यायचेत. विलासरावांनी बंद केलं सगळं आणि आपलं दर्शन बंद झालं, पण मंत्रालयातली वट तशीच आहे.
बरखाबाईंनी काही सेटलमेंट करून दिली सेंटरमध्ये कॅबिनेटची, त्याच्या बातम्या किती आल्या. एका सेटलमेंटची एवढी चर्चा, आपण तर इथं नुसती सेटलमेंटचीच कामं करीत असतो, पण इकडचं तिकडं कळत नाही. एखाद्या गरीब बिचाऱ्या फौजदाराची, तहसिलदाराची, सरकारी डॉक्टरची गैरसोय होत असते. त्यांना बदलीसाठी थोडी हेल्प करणं म्हणजे समाजसेवाच असते. त्या बिचाऱ्यांना तरी कोण आहे इथं मुंबईत? आणि सारखं सारखं कामं घेऊन जात नाही आपण कुणाकडं. एका खात्यात वर्षातनं एकच काम घेऊन जायचं, असं बंधन घालून घेतलं स्वत:वर. पदरचा चहा पाजून पर्सनल रिलेशनवर कामं करतात लोक. आणि आम्ही काही जाहिरात देत नाही, की आम्ही अशी अशी बदल्यांची कामं करू म्हणून. माहिती काढून लोकच येतात. कधी कुणाला फसवलं नाही, कुणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला नाही. सुपारी घेऊन लॉबिंग करणाऱ्या पत्रसम्राटांची कमतरता नाही इथं. आपण तसल्यांच्या टोळीपासून सुरक्षित अंतरावर राहतो. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधीही चांगलं !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर