दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद

पुणे महापालिकेने बहुमताने ठराव मंजुर केल्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची बदनामी करणारे जेम्स लेनचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्याच्या निषेधासाठी यापैकी कुणीही रस्त्यावर उतरले नव्हते. उलट त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी उभे राहून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोल सांगत होते. त्याच सुमारास पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या बहुलकरांची माफी मागायला राज ठाकरे पुण्याला गेले होते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेपेक्षा वेगळी नाही, हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा या सगळ्यांच्या रोजी-रोटीचा विषय आहे. केवळ छत्रपतींचे नाव घेत त्यांनी समाजामध्ये विद्वेषाची बीजे पेरली आणि त्या बळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यहननाचा विषय आला तेव्हा गप्प राहिले आणि दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी रस्त्यावर उतरले.
जेम्स लेनच्या पुस्तकापासून सुरू झालेला हा विषय मराठा संघटनांनी विशेषत: संभाजी ब्रिगेडने लावून धरला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असा त्यांचा दावा होता. राज्य सरकारतर्फे क्रीडा प्रशिक्षकासाठी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत होता, तो बंद करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्याअनुषंगाने सरकारने इतिहास संशोधकांची एक समितीन नेमली होती, आणि त्या समितीनेही दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा ठोस पुरावा सापडत नसल्याचा निर्वाळा दिला होता, तेव्हापासून दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कारही बंद करण्यात आला. म्हणजे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ही भूमिका महाराष्ट्र सरकारनेही अधिकृतपणे मान्य केली आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेने केलेल्या पुतळा हटवण्याच्या ठरावावर आक्षेप घेता येत नाही. महापालिकेने तो बहुमताने केलेला ठराव आहे आणि पुतळा हटवण्याची प्रक्रिया त्याच ठरावाच्या अनुषंगाने पार पडली आहे. पुतळा मध्यरात्री हलवायचा की दिवसा उजेडी बँडबाजा लावून हा प्रश्न सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा होता. गेली अकरा वर्षे राज्याच्या सत्तेबाहेर असल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या शिवसेनेकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांना आयती संधी चालून आली असून दादोजी कोंडदेव आणि नथुराम गोडसे यांची बाजू घेऊन आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू ठेवला आहे.
मुळात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते किंवा नव्हते, हा शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाच्या नेत्यांनी ठरवण्याचा विषय नाही. यासंदर्भात इतिहास संशोधक आणि त्यातही विशेषत: अलीकडचे संशोधन काय सांगते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून अनेकांनी दादोजी हे गुरू नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु तत्कालीन इतिहास संशोधकांनी केलेली मांडणीच अधिक प्रचलित राहिली आणि त्याच आधारावर दादोजींना गुरू मानण्यात आले. पुन्हा ही मांडणी करताना टप्प्याटप्प्याने दादोजींचे उदात्तीकरणही करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीतील एक प्रमुख इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे यासंदर्भातील म्हणणे असे आहे की, दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी मांडणी केली जाते, ती उत्तरकालीन साधनांच्या आधारे. म्हणजे छत्रपतींच्यानंतर अडीचशे वर्षानी लिहिलेल्या बखरींच्या आधारे ही मांडणी केली जाते. मात्र ती साधने विश्वासार्ह मानता येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणानंतर उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही अधिक खोलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ आढळला. या शिवकालीन ग्रंथात कुठेही दादोजींचा शिक्षक म्हणून उल्लेख येत नाही. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचे मुतालिक एवढाच त्यांचा उल्लेख आहे. आणि इतका अस्सल पुरावा दुसरा कुठलाही आढळत नाही.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुमारे वर्षापूर्वी लिहिलेल्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे लिहिले आहे. त्याचा दाखला काही दादोजी समर्थक देतात. त्यासंदर्भात डॉ. पवार यांचे म्हणणे असे आहे की, ते माझे लेखन हे संशोधन नसून पाठय़पुस्तकासाठी केलेले लेखन आहे. त्यावेळी उपलब्ध साधनांच्या आधारे तो उल्लेख केला आहे. परंतु मी संशोधकाच्या दृष्टिकोनातून या विषयाचा शोध घेतल्यावर दादोजींचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आले. संशोधनाच्या क्षेत्रात सतत शोध सुरू असतात आणि जुनी मांडणी पुसून टाकणारे नवे संशोधन येत असते. त्यामुळे जे अद्ययावत असते तेच अधिक प्रमाण मानायचे असते. दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याची अलीकडे केलेली मांडणी खोडून काढणारी कोणतीही साधने अद्याप कुणी उजेडात आणलेली नाहीत. त्यामुळे तेच आजचे वास्तव आहे. महाराष्ट्र सरकारनेही ती वस्तुस्थिती मान्य केली आहे.
शिवरायांच्या शिक्षणासंदर्भात डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, शहाजींनी जिजाबाई आणि शिवाजीची पाठवणी पुणे जहागिरीवर केली, तेव्हा विद्वान पंडित, निष्णात अध्यापकांचा एक संच त्यांच्याबरोबर दिला. त्यांनी त्यांना नाना विद्या, नाना शास्त्रे शिकवली. रणनीती, राजनीती, अश्वनीती, अश्वपरीक्षा, विषपरीक्षा, जादू यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. स्वत: शहाजी महाराज हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. ते आपल्या पंडिताला संस्कृतमधून समस्या घालीत असत. असा विद्वान मनुष्य आपल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी एका मुतालिकावर कसा काय सोपवू शकेल?
डॉ. पवार यांनी शिवकालीन साधनांच्या आधारे केलेली मांडणी खोडून काढणारे संशोधन त्यानंतर कुणी केलेले नाही. आज दादोजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या लोकांच्या बाजूला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे अशी इतिहासाच्या क्षेत्रात काम करणारी जाणकार मंडळी आहेत. दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातील नवी मांडणी पुढे आल्यानंतर त्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. शिवसेना-मनसेसारख्या संघटना पाठिशी असताना खरेतर त्यांनी कुणाच्या दहशतीला भीक घालण्याचे कारण नाही. दादोजींसंदर्भातील काही अस्सल ऐतिहासिक पुरावे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. शिवसेना काय किंवा मनसे काय, दोन्हींचे सल्लागार म्हणून बाबासाहेब पुरंदरे मिरवत असतात. जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्यांमध्ये संशयाची सुई त्यांच्यासह पुण्यातील काही इतिहास संशोधकांकडे होती. दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी आताचे आंदोलनही त्यांच्याच सल्ल्यावरून होत असल्याचे कुणी मानले तर त्याला चूक म्हणता येणार नाही.
प्रश्न एका दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा नाही. खोटा इतिहास मांडायचा आणि तोच खरा असल्याचे सांगून भावनिक मुद्दय़ावर आंदोलने करायची, हे शिवसेना स्थापनेपासून करत आली आहे. आताही दादोजी कोंडदेवांसंदर्भातील वस्तुस्थिती समजून न घेता राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद खरोखर वेगळे आहेत काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाल्यावाचून राहात नाही.

टिप्पण्या

  1. अतिशय छान व सत्य माहिती आपण वाचकांसाठी सादर केली आहे.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. Vijay Thank you very much for such a important information.
    What Shiv sena and MNS is doing is nothing but the power politics.
    Maharajanchya navanae lagaleli yanchi dukane ata band honyachi wel aali ahe. Swarth apayi aata tyach maharajanchya wishayala hat ghatala jat ahe, sujan maharashtriya nagarikani ya pasun dur rahawe.
    dhanyawad.

    उत्तर द्याहटवा
  3. आपण माझी प्रतिक्रिया प्रकाशित केली नाहीत. स्वत:ला सोयिस्कर तेवढेच चित्र पहायचे की इतरांचेही ऐकायचे हे तुम्हीच ठरवा.

    उत्तर द्याहटवा
  4. बखरी उगाच कोणी खोट्या लिहिल असे वाटत नाही. बखरी सर्वच काही अडीचशे वर्षांनतरच्या नाहीत. बखरींचे पुरावे ग्राह्य का नसावेत याचे स्पष्टीकरण देऊ शकाल काय? आपल्याला आवडतील असे संशोधन जर मराठा संशोधक लावू इच्छित असतील तर ते सर्वांनी का मान्य करावे? निनाद बेडेकर व पुरंदरे हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी केलेले संशोधन तुम्ही बाद ठरवता तर मग पवारांचे संशोध्न का तुम्ही सर्वांवर थोपताय?
    खाली दादोजींबद्दल जे काही मुद्दे दिले आहेत ते तुम्ही कसे खोडणार?
    http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644

    उत्तर द्याहटवा
  5. Mr Vijay,
    The problem is not Bramhin vs Maratha and neither is of History, its politics of the parties SS+MNS+BJP vs NCP+Cong.The real problem which is disturbing is, people like u are supporting the parties which is supporting ur cast. And thats what these parties want. As u have said abt the SS and MNS that they are almost equivalent of James Lane, the same applies to u .... how many Sambahji Brigade ppl have read the book by James Lane? None. ... most of the Brigade ppl I doudbt even would not know Shivaji Mahararaj History .... they r plain gundas as there r gundas of SS and MNS. I would blame people like u more than political parties, who on the basis of cast disturbing the already disturbed social thread of India .... Shame on u ...

    उत्तर द्याहटवा
  6. श्री. साधक आणि श्री. अमित,
    तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
    इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पाहणे कधीही चांगले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिला असून अनेक गोष्टी त्यात घुसडल्या आहेत, हे अनेक इतिहास संशोधकांनी सिद्ध केले आहे. समर्थ रामदासांच्या कर्तृत्वाबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतु त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी काहीही संबंध नव्हता, हे अलीकडच्या काळात संशोधकांनी पुराव्यानिशी मांडले आहे. (अगदी बाबासाहेब पुरंदरे वगैरेंनी सुद्धा ते मान्य केले आहे.) छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रचंड मोठे असल्यामुळे त्याच्याशी ब्राह्मण समाजाला जोडण्याच्या हेतूनेच राजवाडय़ांपासूनच्या अनेक इतिहासकारांनी इतिहासाची चुकीची मांडणी केली. रामदासांप्रमाणेच दादोजींचे नाव जोडण्यामागेही तोच हेतू आहे. जे मत रामदासांबाबत तेच दादोजींबाबत. त्यांचे त्यांचे म्हणून काही योगदान असेल. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हेही शिवकालीन पुराव्यांच्या आधारे मांडण्यात आले आहे. बखरी या शिवकालानंतर खूप उशीरा लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता मर्यादित आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याच्याइतका अस्सल पुरावा नंतर उपलब्ध झालेला नाही,त्यामुळे तूर्त तरी तोच विश्वासार्ह मानावा लागेल. कदाचित दहा-वीस-पन्नास वर्षानी कुणी एखाद्या संशोधकाने नवा पुरावा मांडून शिवाजी महाराजांचे गुरू आणखी वेगळे असल्याचे मांडले आणि त्याची सत्यता जाणवली तर दुरुस्ती करून घ्यायला काहीच हरकत असू नये. अशा प्रश्नांवर वाद-चर्चा व्हायला पाहिजेत परंतु त्या वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे व्हायला पाहिजेत. आणि असे वाद विद्वेषाच्या पातळीवर जाऊ नयेत.
    राहिला मुद्दा लाल महालातील दादोजींचे शिल्प हटवण्याचा आणि त्यानंतर झालेल्या राजकारणाचा. अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये आणि त्याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ वाढवली जाऊ नये, असे कोणाही सूज्ञ व्यक्तीला वाटेल. दादोजींचे शिल्प हटवणे ही काळाची गरज होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न जेम्स लेनने केला. जेम्स लेनला माहिती पुरवणारे पुण्यातील ब्राह्मण इतिहाससंशोधक होते, ज्यांनी दादोजींचा खोटा इतिहास मांडला आणि जिजाऊंच्या चारित्र्यहननाची कुजबूज सुरू ठेवली. असल्या प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. दादोजींचा पुतळा आज उखडला नसता तर या प्रवृत्तींनी पुतळा दाखवत आपल्या मुला-नातवंडांर्पयत ही चारित्र्यहननाची प्रक्रिया संक्रमित केली असती. आणि आज जे दादोजींच्या समर्थनासाठी उतरले आहेत, तेच जेम्स लेनला माहिती पुरवणारे आणि जिजाऊंची बदनामी करणारे आहेत, हेही इथे लक्षात घ्यायला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  7. आदरणीय विजय चोरमारे सर् ,
    साधक आणि अमितसाठी आपण जी प्रतिक्रिया लिहिली आहे ते वास्तव आहे. ही प्रतिक्रिया मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकतो का ?

    बाकी आपलं ब्लॉग अतिशय सुंदर आहे. आपले लोकमत मधील अनेक लेख वाचले आहेत, त्याची कात्रणेही माझ्याजवळ आहेत. आपले विचार आणि लेखनशैली मला आवडली.

    माझा ब्लॉग- सह्याद्री बाणा...

    http://www.sahyadribana.com/

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर