सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट

 


आज दुपारी एक फोन आला, ट्र्यू कॉलरवर दीपक कदम असं नाव दिसत होतं.

आपलं नाव सांगून म्हणाले,

मी सरोजिनी चव्हाण यांचा भाऊ बोलतोय. का कुणासठाऊक  ते स्वतःची ओळख सांगत असतानाच काळजात चर्रर्र झालं. काहीतरी अशुभ सांगणारा तो फोन असल्याची ती जाणीव होती. ते म्हणाले, सरोजिनी चव्हाण यांचं परवादिवशी निधन झालं.

थोरल्या बहिणीसारख्या वाटणा-या सरोजिनीताईंच्या जाण्याच्या बातमीनं सुन्न झालो. गेल्या सव्वा दोन वर्षांतल्या त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींनी मनात कालवाकालव सुरू झाली.

`कर्तृत्ववान मराठा स्त्रिया` या पुस्तकाच्या संपादनाची तयारी करत असताना वर्षभर विविध लोकांशी चर्चा करून पुस्तकात समाविष्ट करावयाच्या स्त्रियांची यादी तयार झाली. त्यापुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा होता, तो म्हणजे कोणत्या व्यक्तिरेखेवर कोण लिहिणार? शारदाबाई गोविंद पवार यांचा चरित्रग्रंथ सरोजिनी चव्हाण यांनी लिहिला होता, त्यामुळं पुस्तकात शारदाबाईंच्यावरचा लेख त्यांच्याकडूनच लिहून घ्यावा असं ठरवलं. त्यासाठी त्यांचा शोध सुरू केला. वाटलं शारदाबाईंच्यावर पुस्तक लिहिलंय, सकाळ प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलंय म्हणजे पुण्याच्या सकाळमधून त्यांची माहिती मिळेल. परंतु तिथं काहीच धागेदोरे मिळाले नाहीत. मग फेसबुकवर शोध घेतला तर तिथं सापडल्या. त्यांच्या फेसबुकवरच्या फोटोमधून घरंदाज मराठा स्त्रीचं दर्शन घडत होतं. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि डोक्यावर पदर असेच त्यांचे बहुतेक फोटो आहेत. टिपिकल मराठा व्यक्तिमत्त्व वाटत असले तरी विचाराने प्रगत असल्याचे नंतरच्या संवादातून जाणवले. एमपीएससीला तीनवेळा मुलाखतीपर्यंत जाऊन आल्या होत्या, परंतु दुर्दैवानं संधीपासून वंचित राहिलेल्या.

त्यांना मेसेज पाठवला. (हे लिहिताना सहज मागं जाऊन बघितलं तर नऊ आणि दहा नोव्हेंबर २०१८ असे दोन दिवस त्यांना मेसेज पाठवले होते.) त्या फेसबुकवर फारशा सक्रीय नसल्यामुळं कधी उत्तर येईल याबाबत साशंक होतो, सुदैवानं दुस-याच दिवशी त्यांचा फोन आला. मी माझी ओळख करून दिली. संपर्काचा उद्देश सांगितला. आणि शारदाबाईंच्यावर लेख हवाय म्हटलं. त्या म्हणाल्या, मी शारदाबाईंच्यावर लिहिनच पण आणखी कोणकोणत्या व्यक्तिरेखा आहेत? यादी सांगितल्यावर त्या म्हणाल्या, मी येसूबाईंच्यावर अभ्यास करतेय त्यांच्यावर लिहू शकेन. म्हटलं लिहा. आधी कोणताही परिचय नसताना पुस्तकासाठी दोन लेख लिहिण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि विशेष म्हणजे दोन महिन्यांत दोन्ही लेख त्यांनी लिहून दिले. पुस्तकासाठीचे बाकीचे लेख मिळवायला मला पुढचे दीड वर्ष लागले.

दरम्यानच्या काळात त्यांच्याशी संवाद सुरू झाला होता. फोनवर त्या भरभरून बोलायच्या. राजकीय विषयांवर खुलून बोलायच्या. राजकारणातल्या न पटणा-या गोष्टींबद्दल स्पष्टपणे व्यक्त व्हायच्या. मूळच्या बारामतीच्या असल्यामुळं राजकारणाची बैठक पक्की होती. पवारांच्या राजकारणाचे अनेक दृश्य-अदृश्य धागे त्यांना परिचयाचे होते.

शारदाबाई पवार यांच्या चरित्रग्रंथानंतर `राजयोगी` हे राजारामबापू पाटील यांचे चरित्र आणि `विधिमंडळातील राजारामबापू` अशा दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे काम त्यांनी केले. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या संसदेतील कामकाजासंदर्भातील पुस्तकावर त्या काम करीत होत्या. `ललिताम्बिका` हे एका वेगळ्या विषयावरचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. शारदाबाई पवार यांचे पुस्तक लिहिल्यामुळे त्या सकाळशी संबंधित असाव्यात म्हणून पुण्यातील अन्य वृत्तपत्रांनी त्यांची कधी दखल घेतली नाही आणि सकाळमधल्याही कुणाला त्यांची नंतर आठवण राहिली नाही. बहुजन समाजातील एक अभ्यासू लेखिका अशा रितीनं उमेदीच्या काळात उपेक्षित राहिली. दोन वर्षांपूर्वी सम्राट फडणीस आणि शीतल पवार यांना त्यांच्यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. दस-याच्या काळात त्यांच्याकडून वेगळ्या विषयावरची लेखमाला सकाळसाठी लिहून घेतली.

दोन वर्षांपूर्वी मंगळवेढ्याच्या एका व्याख्यानमालेसाठी कविमित्र इंद्रजित घुले याला मी त्यांचं नाव सुचवलं होतं. येसूबाईंच्यावर त्यांनी सुरेख व्याख्यान दिल्याचं इंद्रजितनं नंतर मला सांगितलं. येसूबाईंच्या मंगळवेढा परिसरातील संदर्भांच्या अनुषंगाने संशोधन करण्याचे त्यांनी ठरवलं होतं. मी व्याख्यानासाठी त्यांचं नाव सुचवल्याचं त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला विचारलं, `अहो पण मी कधी भाषणं दिली नाहीत. तुम्ही कसं काय माझं नाव सुचवलं?` त्यावर मी म्हटलं, `संयोजकांनी मला हेच विचारलं की त्या चांगलं बोलतात का, तर मी म्हटलं फोनवर खूप बडबड करतात म्हणजे भाषण करीत असणार ` त्यावर आम्ही दोघेही डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो होतो.(आणि आता हे लिहितानाही डोळे डबडबलेत.) पुण्याहून मंगळवेढ्याला त्या स्वतः कार ड्राइव्ह करत गेल्या होत्या. एकदा कोल्हापूरला डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री पवार, इंद्रजित सावंत यांच्याशी काही ऐतिहासिक संदर्भांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मुद्दाम गेल्या होत्या, तेही स्वतः ड्राइव्ह करत.

सव्वा वर्षांपूर्वी त्यांचा एकदा फोन आला आणि त्यांनी कॅन्सरसंदर्भात माहिती दिली. उपचार सुरू आहेत आणि काळजीचे कारण नाही असं म्हणाल्या. काही दिवसांनी पुण्याला गेल्यावर मुद्दाम भेटायला गेलो. वाकडहून कर्वे रोडला नव्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या होत्या. आजारामुळं मलूल झाल्या होत्या, तरी उत्साह कमी झाला नव्हता. तशातही कुटुंबातल्या सगळ्या मंडळींचं आदरातिथ्य भारावून टाकणारं होतं. त्यानंतरही अनेकदा फोनवर बोलणं झालं. `कर्तृत्ववान मराठा स्त्रिया` पुस्तकाचं मा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता.

त्यांचे पती उद्योजक आहेत आणि साखर कारखान्यांशी संबंधित काही उत्पादनं करतात. त्यांच्यासोबत कोल्हापूर, सांगली परिसरात फिरत असताना साखर कारखानदारी पाहून त्या म्हणाल्या होत्या, आपल्या लोकांनी किती मोठी कामं उभी केली आहेत, परंतु त्यासंदर्भात फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्यावर ते म्हणाले, तुम्ही लिहा. तिथून त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि लिहित राहिल्या. अत्यंत आनंददायी अशा प्रवासात त्यांना अचानक कॅन्सरनं गाठलं. त्याच्याशी त्या खंबीरपणे झुंज देत होत्या. बोलण्यावरून वाटत होतं की त्या ही लढाई नक्की जिंकतील. दुर्दैवानं ते घडलं नाही.  

चव्हाण-कदम कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचं बळ मिळो, हीच प्रार्थना!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर