Post Box


Post Box काढली किंवा Post Box बसवली, ही काही दखल घेण्याजोगी news होऊ शकत नाही. परंतु काही छोट्या गोष्टी उगीच nostalgic करून टाकतात. टपालाच्या माध्यमातून होणारा पत्रव्यवहार कितीही हरवला म्हटलं तरी त्यांचं माणसांच्या संवेदनेशी असलेलं नातं आजही तेवढंच जिव्हाळ्याचं आहे. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अस्तित्व उखडून टाकतील, अशी अनेक वादळं आली तरी टपालयंत्रणा खंबीर उभी आहे. आधी कुरियर सेवेची स्पर्धा आली. ई-मेलचा जमाना आला. मोबाइल आणि नंतर स्मार्टफोनने संपर्क-संवाद सुलभ आणि चित्रमय बनवला. त्यामुळं अवघ्या पंधरा पैशात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असलेल्या माणसां-माणसांमधला संवादाचा पूल टिकवून ठेवणाऱ्या टपालाचं महत्त्व कमी होणं स्वाभाविक होतं.
सुविधांमुळे संपर्क वाढला तरी पत्रांमधून होणारा मनमोकळा संवाद थांबल्यामुळं माणसं त्याबाबत नॉस्टाल्जिक बनू लागली. तेवढा जिव्हाळा या यंत्रणेनं निर्माण केला आहे.
तर बातमी आहे कोल्हापूरची. इथला रस्तेविकास प्रकल्प राबवताना रस्त्याकडेला असलेल्या लाल रंगाच्या अनेक टपालपेट्या काढून टाकल्या होत्या. अशा सुमारे ४० टपालपेट्या पुन्हा त्या त्या ठिकाणी नव्यानं बसवण्यात येत आहेत. टपालपेट्या काढून टाकल्यामुळं लोकांची गैरसोय झाली असेल, परंतु त्याबद्दल ओरड झाली नाही.
कोल्हापूरच नव्हे तर राज्यात किंवा देशातही कुठं कधी कुणी टपालपेटीसाठी आंदोलन केल्याचं अलीकडं ऐकिवात नाही. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील वाचकपत्रांच्या स्तंभात ‘अमुक परिसरात टपालपेटी बसवावी’ अशी पत्रे प्रसिद्ध व्हायची. अलीकडे अशी पत्रेही दिसत नाहीत. धंदेवाईक लोक बाजारू गोष्टींसाठी चौकाचौकातून आक्रोशाचं नाटक करत असल्याचं सगळीकडं पाहायला मिळतं. परंतु टपालासारख्या जिव्हाळ्याच्या गोष्टीसाठी कधी कुणी रस्त्यावर येत नाही, याला कृतघ्नपणा म्हणायचा की बाजारू व्यवस्थेशी जुळवून घेणं हे दृष्टिसापेक्ष आहे.
Post Box ऊन-वारा-पावसात लोकांच्या शब्दरूपी भावना जपते. पावसाळ्याआधी फुटक्या, गंजलेल्या टपालपेट्या दुरुस्त कराव्या लागतात किंवा बदलाव्या लागतात. ठिकठिकाणी पावसाळ्याआधी तशी मोहीम हाती घेण्यात येते आणि सध्या ती मोहीम सुरू झाली आहे.
देशभर पसरलेल्या 150,000 पेक्षा अधिक टपाल कार्यालयांमार्फत चालणारा टपाल खात्याचा कारभार हे जगातील सगळ्यात मोठं जाळं आहे. 1774 मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून ते जाळं अव्याहत सुरू आहे. रस्त्याकडेला उभी असलेली लाल रंगाची टपालपेटी हीच या खात्याची ब्रँड अँबॅसेडर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर