राजकीय सामना


सुमारे ३८ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सामना’ चित्रपटात एक सत्ताधीश कारखानदार आणि फाटका स्वातंत्र्यसैनिक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. हिंदुराव धोंडे-पाटलांची सगळी कारस्थाने उघड केल्यानंतरही मास्तर त्यांच्याकडे येऊन म्हणतात, ‘तुमचं पोरकं झालेलं राज्य तुम्हाला परत बोलावतंय...’ धोंडे पाटलांना अटक झाल्यावर मास्तर मुक्काम हलवून पुढच्या प्रवासाला लागतात. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून साक्षात काळाकडे....
काळाबरोबर संघर्ष, संघर्षाची जातकुळी आणि उद्देश बदलत गेले. सगळीच क्षेत्रे एवढी राजकारणग्रस्त झाली, की चळवळी त्यापासून अलिप्त राहू शकत नव्हत्या. परिणामी, नेत्याचे राजकारण सुरू झाले की, चळवळीचा ऱ्हास सुरू होतो. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळीचा विचार केला, तर अनेक बाबी निदर्शनास येतात.
ऊस दरासाठीची पश्चिम महाराष्ट्रातील चळवळ गेल्या दहा-बारा वर्षातील आहे. ( ऊसदर मिळेपर्यंत महिनाभरच ती चालते.)  त्याआधी कारखानदार जो दर देतील तोच शेतकरी घेत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चळवळ उसाच्या क्षेत्रात खूप उशीरा आली. या चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले. शरद जोशी यांचा स्वतंत्र भारत पक्ष भाजपबरोबर गेल्यानंतर शेतकरी संघटनेतून बाहेर पडून २००४ मध्ये राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिरोळ तालुक्यापुरत्या मर्यादित चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शिरोळ मतदार संघातून विधानसभेची निवडणूक जिंकली. नंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि पाठोपाठ सांगली, सातारा जिल्ह्यातही चळवळ विस्तारली. २००९ मध्ये त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली आणि राजू शेट्टी हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षीपर्यंत दरवर्षी काहीतरी जादाचे मिळवून दिले. चळवळीच्या माध्यमातून राजकारणातही त्यांनी बस्तान बसवले. महानगरी प्रसारमाध्यमांना विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांना ग्रामीण पार्श्वभूमीचे काहीतरी हवे असते, ती गरज अलीकडच्या काळात राजू शेट्टी यांनी पुरवली.
शेट्टी यांचा राजकीय उदय आणि शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री बनणे हा साधारणपणे एकच काळ आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी शरद पवार हेच जबाबदार आहेत, असे म्हणण्याची एक फॅशन आली होती. राजू शेट्टी यांनी त्याचा बरोबर फायदा घेतला आणि सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करीत राहिले. आमदारकीचा अवघा एक वर्षाचा अनुभव एकीकडे आणि चार दशकांचा राजकीय अनुभव दुसरीकडे अशी स्थिती होती. परंतु शरद पवार यांच्याविरोधात बोलताहेत म्हटल्यावर पवारविरोधी प्रसारमाध्यमांतून त्यांना स्थानिक पातळीवर भरपूर प्रसिद्धी मिळू लागली. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते प्रस्थ काँग्रेसलाही त्रासदायक ठरत होते. त्यामुळे राजू शेट्टी काँग्रेसच्या नेत्यांचेही डार्लिंग बनले. लोकसभा निवडणुकीत त्याचा त्यांना सर्व पातळ्यांवर लाभ मिळाला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरूज कोसळला.
गेली दहा वर्षे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राजू शेट्टी आणि साखर कारखानदार यांच्यातील सामना नियमितपणे होत असतो. कधी रस्त्यावर, कधी कारखान्यासमोर तर कधी समोरासमोरच्या बैठकीत. सरकार दरवर्षी मध्यस्थाची भूमिका बजावत होते, परंतु यंदा पृथ्वीराज चव्हाण यांनी एकूण प्रक्रियेतून अंगच काढून घेतले. सभासद हे कारखान्याचे मालक आहेत, त्यांनीच कारखानदारांबरोबर बसून तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही भूमिका योग्य असली तरी वर्तमान स्थितीत ती व्यवहार्य नव्हती. कारण त्यामुळे हिंसाचार झाला. दोन शेतकऱ्यांचे बळी गेले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. एसटी सेवा बंद पडल्याने ऐन दिवाळीत हजारो लोकांचे हाल झाले. याची जबाबदारी संघटना आणि सरकार या दोन्ही घटकांना टाळता येणार नाही. आंदोलन सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी तोडगा दृष्टिपथात नाही. सामना कुठपर्यंत खेळवायचा, हे सध्यातरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हातात आहे. परंतु राजू शेट्टी आणि मंडळींकडून परस्पर शरद पवार, अजित पवार यांचा हिशेब चुकता केला जातोय, त्याचा आनंद घेण्यात तेही मश्गुल दिसताहेत.
‘सामना’चित्रपटानंतर तीन तपांचा काळ लोटला आहे. फरक एवढाच पडला आहे, की धोंडे-पाटलांविरोधात लढणारे मास्तर आपल्या उद्देशापर्यंत गेल्यानंतर मुक्काम हलवून पुढच्या प्रवासाला लागतात. आताचा प्रस्थापितांविरोधातला संघर्ष सत्तेच्या शिडीकडे जाणारा आहे. आज तेंडुलकर हयात असते आणि त्यांनी आजच्या काळाशी सुसंगत सामना लिहायचे ठरवले असते, तर मास्तरांऐवजी चळवळीचा नेता घेतला असता आणि त्याने निवडणुकीत प्रस्थापिताचा पराभव करून चित्रपट संपवला असता. किंवा त्याहीपुढे जाऊन निवडणूक जिंकल्यानंतर चळवळीचे हे नेतृत्व प्रस्थापितांच्या रांगेत बसल्याचे दाखवले असते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर