मंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या


  चंद्रपूर किंवा आणखी कुठल्या तरी लांबच्या जिल्ह्यात झोपडय़ांना आग लागली, पाच-सातशे झोपडय़ा जळून खाक झाल्या, सगळ्या लोकांचे संसार उघडय़ावर आले आणि माणसांच्या जीवन-मरणाचा कितीही निकडीचा प्रश्न असला तरी तो विषय मंत्रालयात आल्यावर एक फाईलयापलीकडे त्याला फारशी किंमत नसते. तिथं माणसं कितीही टाचा घासत असली तरी मंत्रालय आपल्या गतीनं चाललेलं असतं. इथल्या लोकांना कुणाची काही पडलेली नसते..मंत्रालयात काम करीत असूनही संवेदनशील असलेले एक अधिकारी मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भात सांगत होते.
सरकारी सेवेतलेच आणखी एक सचोटीने काम करणारे अधिकारी आहेत. अनेक वर्षे मंत्रालयात काम केलेले, परंतु सध्या मंत्रालयाच्या इमारतीत नाहीत, ते म्हणाले, ‘मंत्रालयात काम करताना मला नेहमी जाणवायचं, की या इमारतीत प्रचंड निगेटिव्हव व्हायब्रेशन्स आहेत. इथं कधीही काहीतरी वाईट घडू शकतं. परवा आग लागल्यावर मला त्याची प्रचिती आली.
फेसबुकवर उथळपणे बडबड करणाऱ्या लोकांच्या या प्रतिक्रिया नाहीत किंवा सरकारी यंत्रणेविषयी द्वेषाची पेरणी करणाऱ्या सिव्हिल सोसायटीतल्या कुणा वाचाळवीरांच्याही प्रतिक्रिया नाहीत. मंत्रालयात काम केलेल्या, विद्यमान सरकारी व्यवस्थेचा भाग असलेल्या परंतु त्या व्यवस्थेपेक्षा काही वेगळे करू इच्छिणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली मंत्रालयाची इमारत आगीनंतर काळी ठिक्कर पडल्यावर अवघा महाराष्ट्र हळहळला. पहिले एक-दोन दिवस शंका-कुशंकांचे मोहोळ उठले, उठवण्यात आले. मात्र दोन दिवसांत सारे शांत झाले आणि अवघ्या तीन दिवसांत त्याच इमारतीतून पुन्हा राज्याचा कारभार सुरू करून राज्यकर्त्यांनी राज्यातील जनतेला योग्य संदेश दिला आणि सबंध देशाला राकट, कणखर देशाचे दर्शन घडवले. कितीही मोठे संकट आले तरी महाराष्ट्र डगमगत नाही, हे यापूर्वीही अनेक संकटांच्यावेळी दिसून आले आहे. यावेळीही पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्याच कणखरपणाचे दर्शन घडवले. दुर्घटनेनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत दुष्काळाचा विषय प्राधान्याने घेऊन सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत, हे कृतीतून दाखवून दिले.
हे सगळे खरे असले तरीही या दुर्घटनेच्या निमित्ताने अनेक वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन घडले. आपल्याकडची एकूणच प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेतेही पुरेशा जबाबदारीने वागत नाहीत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे आणि यावेळीही ते दिसून आले. उदाहरणच घ्यायचे तर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या चेंबरसंदर्भात दिलेल्या माहितीचे घेता येईल. आगीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रालयात सर्वात आधी अजित पवार पोहोचले. त्यांनी जळालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना, सगळे जळाले आहे, परंतु मुख्यमंत्र्यांचे चेंबर मात्र सुरक्षित असल्याचे सांगून त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले. मंत्रालयात आत जे नुकसान झाले होते, त्यासंदर्भात पहिल्यांदा माहिती देणारे अजित पवार होते. त्यांनी जे पाहिले ते सांगितले. परंतु प्रसारमाध्यमांनी त्यांनी सांगितलेल्या तपशीलातील मधलेच मुख्यमंत्र्यांचे चेंबर सुरक्षित राहिले आहे, याचे आश्चर्य वाटतेहे वाक्य तोडून पुन्हा पुन्हा दाखवले आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचीही प्रतिक्रिया घेऊन एकूण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. एखादा अपघात झाल्यानंतर त्यामध्ये पाच-सात लोक ठार होतात आणि एखादाच माणूस आश्चर्यकारकरित्या जिवंत राहतो. त्याच्या जिवंत राहण्यासंदर्भात सगळेच आश्चर्य व्यक्त करतात, परंतु ते आश्चर्यच असते. आश्चर्य व्यक्त करणाऱ्यांच्या मनात हा माणूस जिवंत राहिलाच कसा?’ असा प्रश्न नसतो. अजित पवार यांच्या विधानाला मात्र तसा रंग देण्यात आला. तीच बाब आगीनंतर अजित पवार यांच्या मंत्रालयातून बाहेर पडण्यासंदर्भातील. सोबतच्या लोकांना तिथेच टाकून अजित पवार बाहेर पळाले, असा अपप्रचार करण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती नेमकी काय होती, हे स्पष्ट केल्यानंतरही आरोपांचे सत्र सुरूच आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनीही मुंबईत येऊन खास पत्रकारपरिषद घेऊन अजित पवारांचा समाचार घेतला. अर्थात भाजपची आणि भाजपच्या यच्चयावत नेत्यांची गेल्या काही महिन्यांत जी घसरण सुरू आहे, त्याला जावडेकर यांचा अपवाद असण्याचे कारण नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन तारे तोडले. युद्धाच्यावेळी सेनापतीने लढायचे असते, अशी मौलिक सूचनाही त्यांनी केली. दुर्दैवाने संसदेवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा जावडेकर प्रवक्ते नव्हते, नाहीतर त्यांनी आपल्या नेत्यांनाही तसा सल्ला दिला असता. जावडेकर यांच्या सल्ल्याशिवाय त्यांचे नेते लढले असतील तर त्याची माहिती नाही. त्यांचे लोहपुरुष गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन वगैरे मंडळी ज्या ढाल-तलवारींच्या सहाय्याने लढले, ती शस्त्रे कोणत्या वस्तुसंग्रहालयात ठेवली आहेत, हे जावडेकर यांनी सांगितले तर ती जाऊन पाहता येतील. प्रसारमाध्यमांचे एक ठीक आहे, चोवीस तास बातम्यांचे दळण सुरू ठेवायचे, तर बातमी शोधावी लागते, उकरून काढावी लागते, परंतु राजकीय नेतेही दिवसेंदिवस अधिकाधिक बेजबाबदार वागू-बोलू लागले आहेत.  वेळ कोणती आहे आणि आपण इथे कुणाचे कसले हिशेब चुकते करतोय, याचे जराही भान ही मंडळी ठेवत नाहीत.
दुर्घटना तर घडून गेली. योग्य यंत्रणांच्या मार्फत कारणांचा शोध घेतला जाईल. त्रुटी शोधल्या जातील. आपत्तीव्यवस्थापनाच्या बाबतीत आपण अजूनही बालवाडीत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण वेळोवेळी येणारे महापूर असोत, मुंबईतली अतिवृष्टी असो, /सारखा हल्ला असो किंवा मंत्रालयाची आग. दुर्घटना घडल्यानंतर तात्पुरती चर्चा होते, उथळ कार्यतत्परता आणि दाखवेगिरीला उधाण येते, मोठमोठय़ा घोषणा केल्या जातात आणि काही दिवसांतच सारे विसरून सगळेजण नव्या दुर्घटनेच्या स्वागताची तयारी करू लागतात. त्यामुळे आपल्याकडील आपत्तीव्यवस्थापन भविष्यात कधी सुधारेल, याची हमी देता येत नाही.
मंत्रालय जळाले म्हणजे नेमके काय जळाले? इमारत जळाली, कागदपत्रे जळाली, जुने रकॉर्डस जळाले. सगळ्या बाबी प्रशासनाला मागे नेणाऱ्या आहेत. अर्थात प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत आपली क्षमता सिद्ध केली आहे, परंतु यापुढची परिस्थिती सगळ्यांसाठीच कसोटीची ठरणार आहे. आगीचे कारण सांगून लोकांची कामे अडवू नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी येते काही महिने तसाच अनुभव येत राहील, यात शंका नाही. कारण काहीही असो, पण आतार्पयत मंत्रालयात अडवणूक झालेल्या शेकडो लोकांच्या मनात कधी ना कधीतरी मंत्रालयाला काडी लावण्याचा विचार येऊन गेला असेल. मंत्रालय म्हणजे कल्पवृक्ष नाही, जिथे सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. परंतु मंत्रालय लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्हे, तर अडवणूक करण्यासाठी असावे, अशी भावना वाढीस लावणारे व्यवहारच इथे होत असतात. कोणतेही काम टोलवाटोलवी करण्यासाठी असते आणि कोणताही कागद वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही, हे इथले वास्तव आहे आणि अशाच प्रवृत्तीची माणसे इथे ठाण मांडून बसली आहेत. आगीच्या निमित्ताने अशा माणसांच्या प्रवृत्तींचे दहन झाले असेल तर मंत्रालयाला लागलेली आग इष्टापत्ती ठरली, असे म्हणता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर