व्यंगचित्र आणि संसदेचा शाळकरी गोंधळ



देशातील जनतेच्या आशाआकांक्षा आणि मूलभूत तत्त्वांना सामावून घेणारी संहिता सादर करणाऱ्या आपल्या घटनाकारांचे शहाणपण आणि त्यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक आहे. अनेक देशांच्या घटना केवळ कागदी गठ्ठयांमध्ये बंदिस्त राहिल्या असताना ही अतिशय गुंतागुंतीची संहिता केवळ कागदोपत्री न राहाता आपल्या जगण्यातले वास्तव बनले त्यामागे हेच कारण आहे. भारताची राज्यघटना हा एक आगळा दस्तावेज आहे, जो इतर अनेक देशांच्या घटनांसाठी पथदर्शक ठरला. यात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेचे नाव घ्यावे लागेल. तीन वर्षाच्या प्रदीर्घ आणि अखंड शोधामागील मुख्य उद्देश हा घटनेत योग्य संतुलन साधण्याचा होता, जेणेकरून घटनेनुसार ज्या संस्थांची निर्मिती करावयाची आहे, त्या केवळ तात्पुरत्या, घाईघाईत केलेल्या न ठरता प्रदीर्घ काळासाठी भारतीय जनतेच्या आकांक्षांना सामावून घेण्याचे सामथ्र्य त्यांच्यात निर्माण व्हावे.
- एनसीईआरटीच्या अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा निष्कर्ष आहे. ज्या प्रकरणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र आहे, त्या प्रकरणाच्या समारोपामध्ये हा निष्कर्ष दिला आहे. यावरून पुस्तकाची एकूण भूमिका स्पष्ट होते. जातीयवादी शक्ति विचारांच्या प्रसारासाठी पाठय़पुस्तकांचा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतात, ही आपल्याकडची परंपरा आहे. हिंदुत्ववादी शक्तिंनी जिथे संधी मिळेल तिथे आपली विषयपत्रिका राबवली आहे. किंबहुना सत्ता राबवताना शालेय अभ्यासक्रम हाच त्यांच्या प्राधान्याचा विषय असतो. एनसीईआरटीचे हे पुस्तक मात्र त्या परंपरेतले नाही. 2006 मध्ये हे पुस्तक तयार झाले, तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते, जे आजही सत्तेवर आहे. डॉ. सुहास पळशीकर आणि योग्रें यादव या दोन पुरोगामी अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक तयार झाले आहे. हे पाठय़पुस्तक सहज चाळले तरी त्यासाठी संबंधितांनी किती कल्पकतेने काम करवून घेतले आहे, ते लक्षात येते. पाठय़पुस्तकाच्या निर्मितीमधील हा एक वेगळा प्रयोग आहे. बालभारतीसारख्या संस्थांनीही त्याचे अनुकरण करायला हवे होते. परंतु दुर्दैवाने शिक्षणक्षेत्रातल्या या वेगळ्या प्रयोगाची मिळून साऱ्यांनी हत्या केली आहे.
संबंधित पाठय़पुस्तकाचे स्वरूप, त्याच्या संपादकांची भूमिका यापैकी कोणतीही गोष्ट विचारात घेतली नाही. ज्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण करण्यात आला आहे, त्याच्या अवती-भवती काय आहे, हेही पाहिले नाही. अर्थात बाबासाहेबांच्या नावावर राजकीय, संघटनात्मक दुकानदारी करणाऱ्यांना हे समजून घ्यायचे नाही, हे आपण समजून घेऊ शकतो. कारण कोणतीही गोष्ट समजून घ्यायची नाही, हे त्यांनी ठरवून टाकले आहे. हे अडाणीपण हेच त्यांच्या दुकानदारीचे मूळ भांडवल आहे. अडाणीपणातून आक्रमकता येत असते आणि बहुतांश वेळा ती हिंसेमध्ये परावर्तीत होत असते. व्यंगचित्रावरून गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपब्लिकन पँथर नामक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठात डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयाची मोडतोड केली. रामदास आठवले यांच्यापासून आनंदराज आंबेडकर यांच्यार्पयत दलित नेत्यांनी व्यंगचित्राच्या संदर्भाने निषेध नोंदवला. परंतु पळशीकर यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध करण्याचे धारिष्टय़ एकटय़ा प्रकाश आंबेडकर यांनी दाखवले. गेल्या काही वर्षातील महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची शोकांतिका म्हणूनच या घटनेकडे पाहता येईल. पुरोगामी म्हणवून घेणारे गट आक्रमक बनताना जातीय द्वेषाची भूमिका घेऊ लागले. भाषणांना शिविगाळीचे स्वरुप येऊ लागले. आणि या चळवळी ठराविक जातीसमूहांपुरत्या मर्यादित बनल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून उभ्या राहिलेली व्रिोही सांस्कृतिक चळवळही दिवसेंदिवस संकुचित बनत गेली. त्यामुळे पुरोगामी ब्राह्मण अभ्यासक, विचारवंत चळवळीपासून दुरावत गेले. पळशीकर यांच्यावरील हल्लाही त्याचदृष्टिने चिंताजनक आहे. पळशीकर हे पुरोगामी विचारधारेतले महत्त्वाचे अभ्यासक आहेत. दलित संघटना त्यांना टार्गेट करणार असतील, तर आंबेडकरी चळवळ आपला एक हितचिंतक गमावेल. त्यात नुकसान पळशीकरांचे नव्हे तर चळवळीचे होईल. केवळ प्रकाश आंबेडकर यांनाच त्याचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केला. या एकूण प्रकरणानंतर डॉ. पळशीकर यांनी देशातील सार्वजनिक चर्चेचा स्तर उंचावायला हवा’, अशी प्रतिक्रिया दिली. संसदेत हा विषय अचानक का उपस्थित झाला, याचे कुतूहल राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मलाही आहे. परंतु  मधील पुस्तकाचा विषय  मध्ये का उपस्थित झाला, यामागचे राजकारण लक्षात आलेले नाही, हेही त्यांचे म्हणणे खूप महत्त्वाचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व थरांत आदराचीच भावना आहे. शंकर यांच्या 1949 मध्ये काढलेल्या संबंधित व्यंगचित्रातूनही बाबासाहेबांच्याबद्दल अनादर व्यक्त होत नाही. परंतु त्याचा आशय समजून न घेता जो गोंधळ घातला गेला, तो साठ वर्षाच्या संसदेला शोभेसा नव्हता. तरीही हा गोंधळ एकवेळ समजून घेता येईल. पुढचा-मागचा संदर्भ न देता केवळ संबंधित व्यंगचित्र संसदेत सादर केले गेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे काही गंभीर घडले असल्याचे चित्र निर्माण केले गेले. अचानक उपस्थित झालेल्या विषयामुळे काहीतरी धक्कादायक घडल्याप्रमाणे सारे सभागृह त्याच्या विरोधात एकवटले. सभागृहाची ती उत्स्फुर्त प्रतिक्रिया म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते, असे असले तरी दोनच दिवसांनी षष्टय़ब्दी साजरी करणाऱ्या संसदेला ते शोभादायक नव्हतेच. षष्टय़ब्दीनिमित्त झालेल्या अधिवेशनात सगळ्यांनी संसदच सर्वश्रेष्ठ असल्याचा सूर लावला. परंतु या सर्वश्रेष्ठ संस्थेचे सदस्य मात्र तिच्या इभ्रतीला धक्का पोहोचवत आहेत, हे दुसऱ्याच दिवशी पुन्हा संसदेने दाखवून दिले. व्यंगचित्राचा विषय उपस्थित होऊन तीन दिवस झाले होते आणि त्या तीन दिवसात या सर्वोच्च संस्थेच्या कुणाही सन्माननीय सदस्याला एनसीईआरटीचे संबंधित पुस्तक पाहावेसे वाटले नाही. तिच्या सल्लागारांशी बोलण्याची गरज वाटली नाही किंवा त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामागची भूमिका समजून घ्यावीशी वाटली नाही. व्यंगचित्राचा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला, आणि प्रणव मुखर्जी यांनी संबंधित पुस्तकच रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली.
राज्यशास्त्राचे अकरावीचे हे पुस्तक म्हणजे स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर, भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेसंदर्भातील विधान असल्याचे या पुस्तकाच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक असलेल्या योग्रें यादव यांनी म्हटले होते. व्यंगचित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे आणि वर्गात चर्चेसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा अंतर्भाव असलेले हे पाठय़पुस्तक म्हणजे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षानी का होईना भारतीय मातीत लोकशाहीने मूळ धरल्याचेच लक्षण आहे, अशा शब्दात न्यूयॉर्क टाइम्सने 15 ऑगस्ट 2007 ला प्रसिद्ध केलेल्या वृत्तात या पुस्तकाचे कौतुक केले होते. त्यानंतर अवघ्या पाच वर्षात हेच पुस्तक वादग्रस्त बनवून आणि रद्द करण्याची भाषा करून देशाच्या संसदेसह सार्वजनिक व्यवहारानेही दाखवून दिले आहे की, बाबासाहेबांना अभिप्रेत लोकशाही या देशात रुजायला अजून बराच अवकाश आहे. वर्तमान वास्तवातच एवढं व्यंग भरलं आहे, की त्यामुळं व्यंगचित्राकडं निर्मळपणे पाहण्याची दृष्टिच आपण गमावून बसलो आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर