नागनाथअण्णा नावाची दंतकथा !


  स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्याची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी ज्या मोजक्या लोकांनी प्रयत्न केले, त्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केलेलं कार्य मोठं होतं, परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर त्यांनी केलेलं कार्य खूप मोलाचं आहे. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकारी चळवळीतलं आदर्श मॉडेल वाळवा येथे उभं केलं. राज्यातील सहकारातल्या नेत्यांनी कारखान्याच्या माध्यमातून स्वत:च्या तुंबडय़ा भरल्या. नागनाथअण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिलं.
जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य फार थोडय़ा लोकांना लाभतं, त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. नागनाथअण्णांचा सामाजिक चेहरा गेल्या पंचवीस वर्षात पुढं आला आहे. त्याआधी त्यांच्याबद्दलच्या दंतकथाच खूप चर्चेत असायच्या. दक्षिण महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांच्या वाळव्यालगतच्या शिराळा तालुक्यातही या दंतकथांची चर्चा व्हायची. नागनाथ नायकवडी यांनी फासेपारधी पाळले असून त्यांच्या दरोडेखोराच्या टोळीचे प्रमुख आहेत, अशी एक दंतकथा ऐकायला मिळत होती. ऐंशी सालाच्या पुढेमागे अण्णांनी एक विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यावेळी त्यांची निवडणूक निशाणी होती सिंह. अण्णांनी प्रचारासाठी खरोखरचे सिंहच आणले होते, त्यामुळं अशा दंतकथांना बळकटीच मिळत होती. फासेपारध्यांबद्दलच्या दंतकथेला आधार होता, परंतु त्यामागची सामाजिक दृष्टी समजून घेण्याएवढी समज त्यावेळच्या समाजाकडं नव्हती. वाळव्याला अण्णांनी फासेपारध्यांचं पुनर्वसन केलं आहे. त्यामागची सामाजिक भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. तुलना करणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही, परंतु इथे आठवण येते ती राजर्षी शाहू महाराजांची. समाजाने पिढय़ानपिढय़ा गुन्हेगारीचा शिक्का मारलेल्या या समाजाला पहिल्यांदा पोटाशी धरलं ते शाहू महाराजांनी. त्यांना माणूस म्हणून समजून घेतलं, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या सेवेत घेतलं. गुन्हेगारीचा शिक्का कपाळी मारलेल्या लोकांना पोटाशी धरताना राजर्षी शाहू महाराजांनी जी सहृदयता दाखवली, तीच अण्णांनी दाखवली. त्याअर्थाने अण्णा शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार ठरतात.
धरणग्रस्तांच्या चळवळीचा आवाज गेल्या दोन अडीच दशकात ऐकायला येतो. डॉ. भारत पाटणकर, धनाजी गुरव, संपत देसाई अशी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांसाठी लढताहेत. परंतु त्याची सुरुवात नागनाथअण्णांनी केली. कोयना धरणामुळे शेकडो लोक विस्थापित झाले. त्यावेळी ना पुनर्वसनाचा कायदा होता, ना हक्कासाठी लढणाऱ्या चळवळी होत्या. त्यामुळे धरणग्रस्त अक्षरश: देशोधडीला लागले. पोट भरण्यासाठी वाट फुटेल तिकडे गेले. पनवेलपासून मुंबईर्पयत रस्त्यांकडेला, पुलांखाली, झोपडपट्टय़ांतून आसरा घेतला. विकासासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या लोकांच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे आले होते. प्रकल्पग्रस्तांपैकी काही कार्यकर्त्यांना हुतात्मा कारखान्याची यंत्रणा मदतीसाठी देऊन अण्णांनी विखुरलेल्या धरणग्रस्तांना गोळा केले. कुठून कुठून त्यांना हुडकून काढले आणि संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू केला. महाराष्ट्रातील धरणग्रस्तांच्या चळवळीचे आज जे काही यश दिसते आहे, त्यासाठी नागनाथअण्णांनी प्रारंभीच्या काळात घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. नंतरच्या काळातही प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीमागे अण्णा ठामपणे उभे राहिले.
मागण्यांची तड न लागल्यामुळे गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्रातील धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतात. ठिय्या आंदोलनाच्या तयारीने निघणारे धरणग्रस्त बायको-मुलांसह चंबूगबाळे घेऊनच मोर्चासाठी निघतात. पहिल्या वर्षी असा मोर्चा कोल्हापुरात आला, तेव्हा जेवण बनवण्याचं साहित्य घेऊन लोक आले होते. आंदोलनस्थळी आलेल्या अण्णांनी ते पाहिल्यावर म्हणाले, ‘हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे शेतकरी कष्टकरी सभासद तुमच्या पाठिशी असताना तुम्हाला हे करण्याची गरज नाही.दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळ-संध्याकाळ वाळव्याहून सगळ्या लोकांचं जेवण येऊ लागलं. तीनेक आठवडे आंदोलन सुरू होतं. नंतरही जेव्हा जेव्हा धरणग्रस्तांनी सांगली, कोल्हापूरला आंदोलनं केली, त्यांचा सगळा पाहुणचार नागनाथअण्णांनी केला.
फुले-शाहू-आंबेडकर हा अण्णांचा वीक पॉइंट. ही नावं घेऊन कोणीही मदतीसाठी आलं, तर रिकाम्या हातानं परत जायचं नाही. अण्णा जसे करडय़ा शिस्तीचे होते, तसेच त्यांच्या स्वभावात भाबडेपणा आणि निरागसताही होती. अण्णांच्या भाबडेपणाचा चळवळीतल्या काही भुरटय़ा लोकांनी कधी गैरफायदाही घेतला, तरी अण्णांनी कधी चळवळीसाठी हात आखडता घेतला नाही. बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांनी प्रारंभीच्या काळात मनुवादाविरुद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकले आणि उत्तर प्रदेशात जम बसवला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात कांशीराम यांना आणण्यासाठी अण्णांनी पुढाकार घेतला. त्यावेळी बहुजन समाज पक्ष गोव्यात विधानसभा निवडणुका लढवत होता. पक्षाच्या प्रचारासाठी अण्णांच्या कार्यकर्त्यांची फळी गेली होती. गोव्यात प्रचाराला म्हणजे मजा, असे समजून काही कार्यकर्ते असेच त्यात घुसले होते. परंतु अण्णांच्या शिस्तीमुळं दिवसभर प्रचार केल्यावर संध्याकाळी कुठंतरी मुक्काम ठोकून हातानं जेवण बनवून त्यांना खावं लागायचं. गोव्यात प्रचारासाठी आलेल्या कांशीराम यांनी हे पाहिलं आणि उपरोधानं म्हणाले, ‘महाराष्ट्र के मराठा यहाँ रोटिया बना रहे है.काहीही असलं तरी अण्णांचं हे असंच असतं. साधेपणा म्हणजे साधेपणा. साखर कारखान्यांच्या गेस्ट हाऊसच्या खूप रंजक कथा ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. परंतु वाळव्याच्या कारखाना गेस्ट हाऊसवर कधी नॉनव्हेज शिजल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळं बाकीच्या गोष्टी दूरच. कुणी गेलं तर पहिल्यांदा दुधाचा ग्लास हाती येतो. जेवण साधंच पण अगत्य असतं.
पुढे कांशीराम यांनी भाजपबरोबर सोयरिक केली, तेव्हा अण्णा व्यथित झाले आणि त्यांनी बसपबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामार्फत काम सुरू केलं. धर्मनिरपेक्ष शक्ती वाढल्या पाहिजेत, हीच त्यांची धारणा होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यांनी अनेक परिषदा, मेळावे घेऊन सद्भावना वाढीसाठी प्रयत्न केले. पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी एक वृत्तपत्र सुरू करावे, अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांबरोबर त्यांनी काही बैठकाही घेतल्या. परंतु त्यांचं ते स्वप्न मात्र आकाराला येऊ शकलं नाही.
आंबेडकरी चळवळ वाढली पाहिजे, अशी तळमळ अण्णांना वाटत होती. रिपब्लिकन पक्ष, त्याच्या नेत्यांविषयीही अण्णांना विशेष प्रेम होतं. रिपब्लिकन पक्षाचे चारही नेते रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई आणि जोग्रें कवाडे लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा अण्णांनी आपल्या खास माणसांमार्फत चौघांसाठीही आपल्यापरीनं काही मदत पाठवली होती. पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी कारखान्यातर्फे सुमो गाडी दिली होती. पुढं त्या गाडीचं काय झालं, हे कुणालाच कळलं नाही.
कॉम्रेड शरद पाटील यांनी दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन सुरू केलं, त्याचं दुसरं संमेलन अण्णांनी वाळव्याला घेतलं. कवीवर्य नारायण सुर्वे त्याचे अध्यक्ष होते. काही वर्षानी बाबुराव बागूल यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक संमेलन घेतलं. व्रिोही सांस्कृतिक चळवळ उभी राहात असताना अण्णाच त्याच्या पाठिशी उभे होते. कराडला अलीकडं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी त्याला पर्यायी संमेलन म्हणून प्रा. राजें्र कुंभार यांनी आपले साहित्य संमेलनघेतले, त्याला मांडवापासून सगळी मदत अण्णांनी केली आणि कराड शहरातून चार तास चाललेल्या ग्रंथदिंडीत ऐंशी वर्षाचे अण्णा सर्वात पुढे चालत होते. अण्णा चळवळीसाठी काही देत तेव्हा आपलं म्हणून कधीच देत नाहीत. हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या कष्टकरी शेतकरी सभासद आणि कामगारांच्यावतीनं देतोय. असं सांगायचे. म्हणजे देऊनही सगळ्यापासून स्वत: नामानिराळे. त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचा, कष्टकऱ्यांचा आधारवड कोसळला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर