अण्णांच्या आंदोलनापुढचे अडथळे कोणते ?


अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापुढे सध्या कोणते अडथळे निर्माण झाले आहेत? प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून उपचारानंतर अण्णा राळेगणसिद्धी मुक्कामी विश्रांती घेत आहेत. अण्णांच्या प्रकृतीला आराम पडो आणि लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी पुन्हा समाजकारणात सक्रीय व्हावे, अशी प्रार्थना देशभरातील लोक करीत आहेत. अण्णांनी सक्रीय व्हावे, याचा अर्थ त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन काँग्रेसविरोधात रान उठवावे, असा होत नाही. परंतु टीम अण्णा म्हणून जो कंपू ओळखला जातो, त्यातील बहुतांश लोकांना दोन दिवसापूर्वीर्पयत तसे वाटत होते. त्यासाठीच त्यांनी कोअर कमिटीची बैठकीचा फार्स केला. बैठकीला अण्णा उपस्थित नसल्यामुळे निर्णय झाला नाही, असे सांगण्यात आले. टीमच्या म्होरक्यांनी राळेगणमध्ये येऊन अण्णांची भेट घेतली आणि त्यानंतर निवडणुक प्रचारात उतरणार नसल्याची घोषणा केली. काँग्रेसला मतदान करू नका, असे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा कुणाला मतदान करायचे असे लोक विचारतात आणि त्याचे उत्तर सध्या आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्ही प्रचार करणार नाही, परंतु लोकांमध्ये जाऊन जागृत नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे टीमचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. हे उशीरा सुचलेले शहाणपण म्हणायचे की आंदोलनाची उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी उचललेले पाऊल?
अण्णांच्या आजारपणामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनही शीतपेटीत बंद झाले. या आंदोलनापुढचे नेमके अडथळे कोणते आहेत? आंदोलनाची अशी केविलवाणी अवस्था का झाली ?
आंदोलनासमोरील अडथळ्यांचा विचार करताना टीममधील सदस्यांच्या आततायीपणाची खूप चर्चा झाली आहे. परंतु टीमचे एक बुजुर्ग सदस्य शांतिभूषण याचे जे प्रकरण नव्याने चव्हाटय़ावर आले आहे, त्यामुळे टीमची पुरती नाचक्की झाली आहे. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्या प्रकरणांमध्ये संबंधितांना खुलासा करण्यासाठी काहीएक जागा होती. आर्थिक गैरव्यवहाराचे थेट व्यक्तिगत लाभार्थी म्हणून आरोप करताना त्यांना संशयाचा फायदा मिळत होता. परंतु शांति भूषण यांच्या प्रकरणामध्ये तशी जागा नाही. त्यांनी घरखरेदीत थेट चारसोबीसगिरी केली असून न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही न्यायालयावर पक्षपाताचा आरोप करून वरच्या न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे. अलाहाबादमधील ज्या घरात एकोणिसशे सत्तरपासून राहात होते, तो सात हजार आठशे अठरा चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला बंगला शांति भूषण यांनी दोन हजार दहामध्ये अवघ्या एक लाख रुपयांना खरेदी केला. या बंगल्याची बाजारभावाने किंमत सुमारे वीस कोटी रुपयांच्या आसपास होते. वीस कोटींचा बंगला एक लाख रुपयांत खरेदी करून त्याची स्टॅम्प डय़ूटी म्हणून अवघे सेहेचाळीस हजार रुपये भरून त्यांनी व्यवहार पूर्ण केला. प्रत्यक्षात या व्यवहाराची स्टॅम्प डय़ूटी एक कोटी चौतीस लाख रुपये होते. स्टॅम्प डय़ुटीची ही रक्कम भरण्याबरोबरचती चुकवल्याचा प्रमाद केल्याबद्दल दंड म्हणून सत्तावीस लाख रुपये भरण्याचा आदेश न्यायालयाने त्यांना दिला आहे. कोटय़वधींचा हा व्यवहार लाखात केल्याचे दाखवून सरकारची फसवणूक करणारे हे भीष्माचार्य अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून वावरत आहेत. त्यांच्या या व्यवहाराबद्दल टीमच्या इतर सदस्यांचे म्हणणे काय आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. किंबहुना अशा प्रकरणांपासून बाजूला जाण्यासाठी अण्णांनी दाखवलेला मौनाचा मार्गच त्यांच्या उपयोगी पडेल.
शांति भूषण यांचे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर कमी म्हणून की काय, अण्णांचे गाववाले आणि राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक रिंगणात उतरणार आहेत. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले मापारी यांनी काही महिन्यांपूर्वी अण्णांच्या आंदोलनासाठी पक्षापासून फारकत घेतली होती. दरम्यान आंदोलन थंडावले आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी आग्रह केल्यानंतर अण्णांच्या परवानगीने त्यांनी उमेदवारी स्वीकारली. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की, अण्णांनी मापारी यांना उमेदवारीसाठी मान्यता दिलीच कशी ? अण्णांचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू आहे आणि शरद पवार हे देशातील नंबर एकचे भ्रष्टाचारी नेते असल्याचे अण्णांचे ठाम मत आहे. एप्रिलमध्ये लोकपालसाठी दिल्लीत पोहोचण्याआधी त्यांनी आधी शरद पवार यांच्याविरोधात तोफ डागली होती. अलीकडे एका माथेफिरु तरुणाने पवार यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्याबद्दल मनोमन आनंदही अण्णांनी व्यक्त केला होता. अण्णांच्या नजरेतून भ्रष्टाचारी असलेला नेता ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्या पक्षाची उमेदवारी अण्णांच्या स्थानिक पातळीवरील शिलेदाराने स्वीकारावी, हे आश्चर्यच आहे. अर्थात कुणीही कार्यकर्ता अण्णांच्या आंदोलनासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणार नाही. राजकारण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि अण्णांचे आंदोलन ही सटीसहामाही घडणारी गोष्ट आहे. त्यातही आता हे आंदोलन अण्णांच्या हातात राहिलेले नाही. केजरीवाल, किरण बेदी वगैरेंच्या हुकुमशाहीपुढे स्थानिक पातळीवरील कुणाला कसलीही संधी नाही. त्यामुळे मापारींच्या निर्णयाबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. अण्णांनी त्यांना संमती दिली असावी कारण, अण्णांनी विरोध केल्यानंतरही मापारी यांनी उमेदवारी स्वीकारली असती, तर ते अण्णांच्यासाठी अधिक मानहानीकारक ठरले असते. त्यापेक्षा परवानगी आणि आशीर्वाद देण्याचे व्यावहारिक शहाणपण अण्णांनी दाखवले असावे.
या दोन्ही अडथळ्यांवर मात करून आंदोलनात हवा कशी भरायची, हा प्रश्न गंभीर बनला आहे आणि तो अण्णांनी असंगाशी संग केल्यामुळे निर्माण झाला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावरील गर्दी अण्णांच्या डोक्यात गेली. परंतु मुंबईत तेवढी गर्दी जमली नाही. मुंबईतील उपोषणाआधीपासून अण्णांची प्रकृती ठीक नव्हती. उपोषणामुळे प्रकृती अधिक खालावली हे खरेच आहे. परंतु त्याहीपेक्षा आंदोलनाकडे लोकांनी पाठ फिरवल्यामुळे अण्णांना मानसिक धक्का बसला असावा. गर्दीचे गणित डोक्यात ठेवून आंदोलन केल्यामुळेच हे घडले. नाहीतर गर्दी, ही अण्णांची ताकद कधीच नव्हती. अण्णांनी आतार्पयत जी आंदोलने केली, ती केवळ सत्याग्रहाच्या ताकदीच्या बळावर. त्यावेळी कधीही त्यांनी गर्दी जमवून दबावतंत्र वापरले नव्हते. उपोषण हेच त्यांचे हत्यार होते आणि आजही आहे. दिल्लीतील टोळक्याच्या नादी लागून त्यांनी सत्याग्रहाची गर्दीशी सांगड घातली आणि तिथेच त्यांनी आंदोलनाच्या पराभवाची पायाभरणी केली. भविष्यातच गर्दीची गणिते डोक्यात न ठेवता, व्यक्तिद्वेष टाळून, कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधातील भूमिका टाळून मुद्दय़ावर आधारित लढाई केली, तरच आंदोलन पुन्हा उभारी घेऊ शकेल. नाहीतर गर्दी पांगलीच आहे, त्याबरोबर आता टीमच्या सदस्यांचीही पांगापांग होईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर