बाबासाहेबांचे बोट सोडून चाललेले अनुयायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अद्याप सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप आलेले नाही. समाजातील सर्व घटकांनी आंबेडकर जयंती साजरी केली असे सगळीकडे दिसत नाही. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता अभियानापासून तंटामुक्ती मोहिमेर्पयत अनेक योजना राबवण्यात येऊ लागल्या. सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागले. त्यातूनच काही गावांमध्ये सर्व जाती-धर्माचे उत्सव गावाने एकत्रितपणे साजरे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अशी गावे फारच थोडी आहेत. बाकी सगळीकडे आंबेडकर जयंती हा दलितांचा त्यातही पुन्हा नवबौद्धांचा उत्सव एवढय़ापुरताच मर्यादित राहिला आहे. पुरोगामी म्हणून ढोल वाजवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतून आपल्याला बाहेर काढता आलेले नाही.
जयंतीच्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात. जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या कार्याची उजळणी करून त्यांच्या पावलांवरून चालण्याचा खोटा खोटा निर्धार करायचे सोडून अनाठायी प्रश्न उपस्थित करणे औचित्यभंग करणारे आहे, असे कुणी म्हणू शकेल. परंतु कधीतरी या प्रश्नांची चर्चा होण्याची गरज आहे आणि ती जयंतीच्या निमित्ताने झाली तर बिघडले कुठे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असा उल्लेख अलीकडे वारंवार होत असतो. हे अनुयायी म्हणजे नेमके कोण, असा प्रश्न निर्माण होतो. खरोखर कुणाला म्हणायचे बाबासाहेबांचे अनुयायी ? जे जयंतीच्या मिरवणुकीत सामील होतात ते सारेच अनुयायी असतात का ? किंवा त्यातल्याही लोकांची त्यांच्या त्यांच्या विशेषत्वानुसार विभागणी करूनही विचार करता येतो. रा. सु. गवई, प्रकाश आंबेडकर, जोग्रें कवाडे, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, राजा ढाले असे जे काही महाराष्ट्रातील दलित चळवळीचे नेते आहेत, त्यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का ? किंवा मग बाबासाहेबांचे विचार उत्तर प्रदेशासारख्या राज्यात रुजवणारे आणि त्या बळावर राज्यातील सत्तेची चावी मिळवणारे दिवंगत कांशीरामजी आणि बहेन मायावतीजी यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का ? जागतिक नाणेनिधीचे प्रतिनिधी असलेले डॉ. नरें्र जाधव यांना किंवा अलीकडेच राज्यसभेचे खासदार बनलेले डॉ. भालचं्र मुणगेकर यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? पुतळा विटंबनेनंतर काचा फोडणाऱ्यांना; बस, रेल्वेची जाळपोळ करणाऱ्यांना अनुयायी म्हणायचे का ? अनुपम खेरच्या घरावर हल्ला करणारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, की अण्णा हजारेंच्या विरोधात मोर्चा काढणारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत? हे सगळेच स्वत:ला अनुयायी म्हणवून घेत असले तरी सच्चे अनुयायी कुणाला म्हणता येईल? जसे प्रत्येक पुरोगामी आपण समोरच्यापेक्षा अधिक पुरोगामी असल्याचे भासवत असतो आणि समोरचा कसा भोंदू पुरोगामी आहे, हे त्याच्या माघारी सांगत असतो, तसेच काहीसे आंबेडकरांच्या अनुयायांच्याबाबतीत म्हणता येते. प्रत्येकजण आपणच कसे सच्चे अनुयायी आहोत, हे सांगताना दिसतो. बाबासाहेबांचे बोट सोडून बाळासाहेबांचे बोट धरणारे नामदेव ढसाळही तुझे बोट धरून चालतो आहे म्हणतात, तेव्हा ते नेमके कुणाचे बोट धरून चालताहेत असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. सत्तेच्या चाव्या दलितांनी आपल्या हातात घेतल्या पाहिजेत, एवढेच काय ते बाबासाहेबांचे विधान कवटाळून सत्तेसाठी हव्या त्या तडजोडी करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणायचे तर त्यासाठी मोठेच धाडस असायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची राजकीय वाटचाल कधीच विश्वासार्ह राहिली नाही आणि जोग्रें कवाडे यांनाही धर्मनिरपेक्ष राजकीय प्रवाहाशी बांधिलकी टिकवता आली नाही. रिडालोसमध्ये सामील होऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडून काँग्रेसवरील निष्ठा अबाधित ठेवणारे राजें्र गवई यांना अनुयायी म्हणता येईल का ? रामदास आठवले यांनी खासदारकी नाकारून एका टप्प्यावर स्वाभिमानाचे दर्शन घडवले, परंतु सत्तेच्या तुकडय़ासाठी तडजोडीचा मोह त्यांनाही आवरला नाही आणि शिवशक्ती-भीमशक्तिच्या भ्रामक कल्पनेत अडकून त्यांनीही आपली विश्वासार्हता पणाला लावली. हे वरवरचे दाखले झाले. नेत्यांच्या राजकीय व्यवहाराच्या अंतरंगात डोकावले तर याहून अधिक भीषण वास्तव नरजेर पडेल. निवडणुकीच्या काळात यांनी केलेल्या तडजोडींबाबत एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या नेत्याने तोंड उघडले तर अनेक अदृश्य गोष्टी उजेडात येतील. एकूणच स्वाभिमान जपून राजकीय व्यवहार न करणाऱ्या या नेत्यांना बाबासाहेबांचे अनुयायी कसे म्हणायचे, असा प्रश्न कुणाच्या मनात निर्माण झाला तर त्याचे काय उत्तर देता येईल? बाबासाहेबांचे हे अनुयायी चौकाचौकातल्या फ्लेक्सपासून वृत्तपत्रे-टीव्हीर्पयत सगळीकडे मिरवत असतात. याव्यतिरिक्त घरातली भाकरी बांधून घेऊन नागपूर-चं्रपूरपासून चैत्यभूमीवर अभिवादनासाठी नित्यनेमाने येणारे लाखो अनुयायी आहेत, ज्यांना या फ्लेक्सवाल्यांसारखी स्वतंत्र ओळख नसते. बाबासाहेबांचे नाव घेऊन त्यांना काही स्वार्थ साधायचा नसतो, संघटना चालवायची नसते किंवा राजकारणही करायचे नसते. ज्या महामानवाने आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवले, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले त्याला अभिवादन करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंची गर्दी चैत्यभूमीवर उसळते. रापलेल्या चेहऱ्याची, डोळेपैलतीराला लागलेली ही माणसे ज्या निष्ठेने आलेली असतात, तेवढीच निष्ठा नव्या पिढीच्या ठायीही दिसते. शाळकरी मुलांपासून महाविद्यालयीन तरुण-तरुणींर्पयत सारे वयोगट असतात. वर निळे आकाश, समोर अथांग पसरलेला निळा सागर आणि ज्यांच्या उरात बाबासाहेबांच्या श्रद्धेच्या लाटा उसळताहेत अशी जनसागराची निळाई. कोणत्याही अपेक्षा न ठेवता येणाऱ्या या गर्दीला बाबासाहेबांच्यानंतर त्यांच्या विचारधारेचा एकही सच्चा नेता मिळू नये, ही खरेतर शोकांतिकाच. प्रत्येक नेता आपणच बाबासाहेबांचे अनुयायी असल्याच्या वल्गना करीत नेतृत्वासाठी पुढे येतो. एकाला कुणीच जुमानत नाही, तेव्हा चौघेजण एकत्र आल्याचे नाटक करतात. हातात हात घालून अभिवादनाचे फोटोसेशन करतात. महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने असे फोटो अनेकदा पाहिले. रिडालोसच्या स्थापनेच्या आधीचे रिपब्लिकन ऐक्य हे अलीकडच्या काळातले शेवटचे. परंतु बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या एकाही नेत्याला या भोळ्याभाबडय़ा जनतेच्या विश्वासाला पात्र राहता आले नाही. तीनेक दशकांपूर्वीपासून रस्त्यावरच्या लढाया करणारे, भाषणांमधून अंगार फुलवणारे हे सारे नेते आता नाही म्हटले तरी म्हातारे झाले आहेत. वयाबरोबर येणारी प्रगल्भता मात्र कुणाकडेही दिसली नाही. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्यानंतरचे नेतृत्वच दलित समाजात दिसत नाही. स्वत:पुरते पाहणाऱ्या या नेत्यांनी आपल्यानंतरच्या पिढीतले नेतृत्वही तयार केले नाही. बाबासाहेबांचे बोट सोडून चालल्यामुळे सामान्य लोकांनीही त्यांची साथ सोडली. आणि दलित चळवळीची वाताहत झाली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर