पुढच्या पिढय़ांसाठी प्रश्न

गणित येत नाही म्हणून
मास्तरच्या भीतीनं शाळा सोडून मुंबई गाठणारे
गाववाले
हमाली कमरेचा काटा ढिल्ला होईस्तोवर
कारकून कनिष्ठ मध्यम बीए ऑनर्स
एकवीस रुपये घालून
आहेराचं पाकिट डिंकानं चिकटवणारे
वडापाव मिसळ पुरीभाजीचे आश्रयदाते
चिवटपणे जगणारे ओढग्रस्त जगता जगता
पोपडे निघालेल्या संस्कृतीला
गिलावा करण्यासाठी धडपडणारे
हुंडाबंदीच्या घोषणा ऐकत ऐकत
पोरीच्या हुंडय़ासाठी कणकण साठवणारे
धरणाखाली गेली जमीन घरदार
उरलेलं आयुष्य पुलाखाली
सिग्नलला थांबलेल्या टॅंकरच्या तोटीला
पाणी भरणारे
हे प्रकल्पग्रस्त विकासानं उखडलेले
डायनासोरच्या वाटेवरचे प्रवाशी

ही चायनीजवर पोसलेली
हायब्रीड जनरेशन
नॉस्टाल्जिक झुणका भाकरीपुढे
यांच्या मुताला फेस
कोकाकोलासारखा
हे जागतिक मंदीचे प्रवक्ते
फाइव्ह स्टार हॉटेलात ब्रिफिंग
करणारे कॉकटेल डिनर
हे दलाल शेअर बाजारातले सेन्सेक्सवर
रक्तदाब अवलंबून असणारे
मार्केट क्लोज झाल्यावर रत्नपारखी
सेक्सच्या बाजारातले
ही रद्दी इंग्रजी पेपरांची
महिन्याच्या बिलाइतकी
मुद्दल शाबूत ठेवणारी
हे हायकर्स ट्रेकर्स
गडकिल्ल्यांवर पिकनिक करणारे
हनिमूनच्या आधीच सेक्स
अनुभवलेले नवविवाहित
हिलस्टेशनवर
हरवून जाणारे आठवणींच्या कल्लोळात
हे बाईटसाठी िहडणारे पोटार्थी
पत्रकार भटके विमुक्त क्रिमिलेअर
टीव्हीच्या उथळ पडद्यावरचे
ब्रेकिंग न्यूज
नटीच्या बाळंतपणाची
हे ब्लॉगर्स चावडीवर चकाटय़ा पिटणारे
नव्या युगाचे भूमिपुत्र

उखडणारे पुन्हा उगवतील आणि नव्याने
उगवणारे उखडतील का कधी काळाच्या प्रवाहात
हे प्रश्न पुढच्या पिढय़ांसाठी ठेवावेत हेच बरे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट