अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करीत नाही, तर मनात साकळून राहते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात कादंबरी, कथा, कविता अशा स्वरूपात मराठीत बरेचसे लेखन झाले आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे दु:ख, दैन्य; त्याने परिस्थितीशी केलेला झगडा आणि परिस्थितीपुढे हार मानून केलेली आत्महत्या असे चित्रणाचे स्वरूप राहिले. आत्महत्येच्या प्रसंगाने कादंबरीचा शोकात्म शेवट होतो. विंगकर यांची कादंबरी शेतकऱ्याची आत्महत्येच्या प्रश्नावरील असली तरी अनेक अर्थानी वेगळी आहे. इथे कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतकरी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या घडते आणि पुढे सबंध कादंबरी त्या घटनेभोवती फिरत राहते. अवघ्या चार-पाच दिवसांचा काळच कादंबरीत येतो, त्याअर्थाने पाहिले तर एका दीर्घकथेचा ऐवज आहे, परंतु आनंद विंगकर यांनी या छोटय़ाशा काळात असा काही जीव भरला आहे की, कादंबरी वाचकाला शोकात्म भावनांनी करकचून बांधून टाकते.
यशवंता, पत्नी पार्वती आणि तीन मुली उषा, आशा आणि नकोशी अशा कुटुंबाची कहाणी आहे. शेतीतले बेभरवशी जगणे, वाढत जाणारे कर्ज, सावकाराचा तगादा आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही अशा सगळ्या संकटांनी घेरलेला सोशिक यशवंता हळुहळू त्रासिक आणि संतापी बनत जातो, इतका की गावात त्याला ‘फायरिग यशवंता’ या नावानं ओळखलं जातं. जो बोकड विकून पोरींना कपडे घेण्याची स्वप्नं पाहिली जात असतात त्याच बोकडाचा कुत्र्याच्या हल्ल्यात बळी जातो. त्यामुळं संतापलेला यशवंता मेलेल्या बोकडामध्ये कीटकनाशक ओतून ते धूड ओढय़ाला टाकून येतो. त्याच रात्री मोठा पाऊस कोसळल्यामुळं हातात आलेल्या शाळूचं मोठं नुकसान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माळावर अनेक कावळे मरून पडलेले दिसतात आणि ओढय़ाकाठी कुठे कुठे सारी कुत्रीही मरून पडलेली असतात. सकाळच्यापारी माळावर गेलेल्या यशवंताच्या डोक्यावर सगळे कावळे घिरटय़ा घालतात आणि त्याच्यावर हल्ला करायला लागतात. आजुबाजूचे लोक कशीतरी त्याची सुटका करून त्याला घरी घेऊन येतात. बोकड गेला, अवकाळी पावसानं शाळू गेला, रागाच्या भरात कीटकनाशक ओतून बोकड टाकल्यानं कावळे-कुत्री मरून पडल्यामुळं सारा गाव छी थू करतोय, सावकार घिरटय़ा घालतोय..असा चहुबाजूंनी संकटं कोसळल्यानं जिवाला कावलेला यशवंता स्वत:सह पार्वतीलाही कीटकनाशक पाजून सुटका करून घेतो.
कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात घटना वेगानं घडत जातात. दीडशे पानांच्या कादंबरीत प्रारंभीच सगळ्या घटना घडून सदतीसाव्या पानावरच नवरा-बायकोची आत्महत्या होते. प्रारंभीच्या काही घटनांमध्ये कमालीची नाटय़मयता आणि योगायोग आल्यामुळे एकूणच कादंबरीच्या पुढच्या प्रवासाबाबत संभ्रम वाटायला लागतो. पुढे काय घडणार या उत्कंठेपेक्षा पुढे आणखी किती दु:खद घटना घडणार आणि नुसतीच एकसुरी शोकांतिका वाचण्याची वेळ येणार, अशीही शंका यायला लागते. मात्र विंगकर यांनी पुढचा सगळा भार विलक्षण ताकदीने पेलला आहे. त्याचमुळे प्रारंभी कथेपुरता मर्यादित जीव असलेल्या गोष्टीला कादंबरीचा आवाका प्राप्त होतो. यशवंता आणि पार्वतीला दवाखान्यात नेल्यानंतरचे चित्रण, थोरली मुलगी उषा आणि तिचा प्रियकर सुभाष यांची प्रेमकहाणी, यशवंताचा भाऊ विलास आणि मुलासारखा असलेला पुतण्या विश्वास, त्याचं आपल्या बहिणींवरचं सख्ख्यासारखं प्रेम, आत्महत्येनंतर सावकारानं उषाच्या प्रेमप्रकरणावरून उठवलेली राळ, त्यावरून कुटुंबात निर्माण झालेला तणाव, भावकीतल्या, गावातल्या लोकांचे परस्परसंबंध असे सारे चित्रण कमालीचे उत्कट आणि प्रवाही आहे. आई-वडिलांच्या मृत्युमुळे आणि प्रियकराच्या वियोगामुळे खचलेल्या थोरल्या उषाला प्रेमप्रकरणाच्या अफवेमुळे कुणाकडून सहानुभूतीचे चार शब्दही मिळत नाहीत. आतून पोखरली तरी मनानं खंबीर असलेली उषा दुसऱ्या दिवशीच शेतातल्या कामांसाठी बाहेर पडते. दु:खाचं तोंड घेऊन खुडणीच्या बायकांसाठी ती मातंग अन बौद्ध वसाहतीत येते तेव्हा तिथल्या साऱ्या बाया तिच्याभोवती गोळा होतात. ‘कशाला आलीस लेकी, नुसता सांगावा धाडला असतास तरी आम्ही आलू असतू..’ असा जिव्हाळा दाखवतात. धुरपाआती तिला जवळ घेते तेव्हा पहिल्यांदा तिला आसू फुटले. तिच्या डोक्यावर घरातल्या कुणी पाणीही घातलेलं नसतं, हे लक्षात आल्यामुळं तिला आंघोळ घातली जाते. भावकीतल्या बायका तिच्याशी नीट बोलायला तयार नसताना दिवसरात्र कष्ट करणाऱ्या परक्या जातीतल्या बाया नातलगासारख्या तिच्या दु:खात सामील होतात. विंगकरांनी उभं केलेलं आस्थेचं एक वेगळंच जग कादंबरी वेगळ्या उंचीवर नेतं. लेखकाच्या भावनिक ताटस्थ्यामुळे कादंबरीला वेगळे परिमाण लाभते
गावगाडय़ातल्या अनेक बारीक-सारीक तपशीलासह कादंबरीत आल्या आहेत. त्यातही काही व्यक्तिचित्रे कमालीची ठसठशीत झाली आहेत. शोकांतिकेपासून सुरू होणारी कादंबरी सुखांतिकेकडे जाते, असे थेट म्हणता येत नाही. परंतु आई-वडिलांच्या मृत्युनंतर थोरली उषा व्यक्तिगत भावनांना मूठमाती देऊन दोन्ही बहिणींसह निर्धाराने जगण्यासाठी कंबर कसते. जगण्याच्या लढाईतल्या एका चिवटपणाचे दर्शन घडवते.
इथे आणखी एक उल्लेख करणे अप्रस्तुत ठरणार नाही, तो म्हणजे दलित लेखकाने केलेले गावगाडय़ाचे असे चित्रण मराठीत अपवादानेच आले आहे. मराठीतील बहुतेक लेखक आपल्या जातीच्या पलीकडे जाताना दिसत नाहीत. या पाश्र्वभूमीवर विंगकरांनी एक वेगळे आव्हान ताकदीने पेलले आहे. मूलत: माणसाचे जगणे, त्याचे दु:ख याबद्दलची कमालीची आस्था लेखकाकडे आहे. त्याचे नाते शोधायचे तर थेट अण्णाभाऊ साठे यांचेच नाव आठवते. कारण सबंध माणसाच्या जगण्याबद्दलची जी आस्था अण्णाभाऊंच्याकडे होती, तशीच ती विंगकरांच्याकडे आढळते. त्याअर्थानेही मराठीतील वेगळी कादंबरी म्हणून तिची नोंद करावी लागेल.

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
आनंद विंगकर ,(लोकवाड्.मय गृह)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर