Total Pageviews

Wednesday, August 24, 2011

अण्णांची काठी आणि सरकारचा विंचू

राजधानी दिल्लीच्या स्टेजवर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या चौसष्टाव्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून अण्णा हजारे आणि कंपनीचा ग्रँड रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एवढा टीआरपी अन्य कुठल्या कार्यक्रमाला क्वचितच लाभला असेल. अर्थात एखाद्या तासाभराच्या कार्यक्रमाला, एखाद्या रंगतदार क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यातील अखेरच्या काही षटकांचा टीआरपी सर्वाधिक असतो. परंतु एका कार्यक्रमाला सलग इतके दिवस असा टीआरपी मिळवणारा शो म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची नोंद करावी लागेल.
राळेगणसिद्धीच्या छोटय़ाशा रंगमंचावर आतार्पयतची आंदोलने केलेल्या अण्णांनी मुंबईत आझाद मैदानावरही उपोषण केले होते, तेव्हा सुरेश जैन यांच्या इव्हेंटबाजीमुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकपालसाठी अण्णा पहिल्यांदा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु त्याचे स्वरुप आताच्या तुलनेत खूुपच किरकोळ होते. कदाचित अण्णांच्या सोबत जी मंडळी होती, त्यांनाही तेव्हा इव्हेंटच्या भव्यतेची कल्पना आली नसावी किंवा तो एवढा मोठा होऊ शकतो, याचा अंदाज आला नसावा. सरकारनेही फारशी ताणाताणी न करता समझोत्याची भूमिका घेतल्यामुळे सुरुवातीचे प्रकरण थोडक्यात मिटले होते. त्यानंतरचे रामदेवबाबांचे आंदोलन मोडण्यात यश आल्यामुळे कें्र सरकारमधील काही नेते सरकारच्या ताकदीविषयी भ्रमात राहून अण्णा आणि रामदेवबाबा यांना एकाच मापाने मोजण्याची घोडचूक करून बसले. मुळात अण्णा हजारे यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, हे कुणीच विचारात घेतले नाही. अण्णांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी कें्रसरकारची चुकीची पावलेच कारणीभूत ठरली. अण्णांना उपोषणाला बसण्याआधी अटक करणे आणि तिहार तुरुंगात ठेवण्यामुळे वातावरण अधिक तापले. तिहारमध्ये असतानाच अण्णांनी टीव्हीवर आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहिला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या अंगात हळुहळू गांधी संचारायला सुरुवात झाली. भव्य मिरवणुकीने उपोषणाच्या सिंहासनावर बसल्यानंतर तर त्यांचा अविर्भाव प्रतिगांधीसारखाच बनला आणि अण्णा देशवासीयांसाठी संदेश देता देता आदेश देऊ लागले होते. सरकारला ‘चले जाव’चा इशारा देण्यार्पयत त्यांची मजल गेली. रामलीला मैदानावरील एवढी गर्दी पाहून कुणाच्याही डोक्यात हवा गेल्याशिवाय राहणार नाही. अण्णांसाठी तर हे सगळे अभूतपूर्वच होते. त्यांनी कधी स्वप्नातही असे चित्र पाहिले नसेल. रामलीला मैदानावर उपोषण सुरू झाल्यानंतर त्याला सत्संगाचे स्वरूप यायला वेळ लागला नाही. दिवसातून ठराविक वेळा अण्णांचे प्रवचनसदृश्य मार्गदर्शन होऊ लागले. अण्णांच्या उपोषणाला पाच-सहा दिवस झाल्यानंतर सरकारमधील घटकांबरोबरच अण्णांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याप्रती आस्था असलेल्या घटकांना काळजी वाटू लागणे स्वाभाविक होते. परंतु अण्णांच्या जिवावर टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चमकणाऱ्या त्यांच्या सवंगडय़ांना त्याच्याशी काही देणेघेणे नसल्यासारखेच दिसत होते. त्यांना कें्रसरकारला नमवायचे होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाकवायचे होते. कपिल सिब्बल, पी. चिदंबरम वगैरे मंडळींना धडा शिकवयाचा होता. त्यासाठी त्यांना करायचे काहीच नव्हते. उपोषणाला बसून अण्णांनी प्राण पणाला लावले होते. अण्णांच्या साधेपणाची भुरळ पडल्यामुळे लाखो लोक रस्त्यावर येऊन आंदोलनाला पाठिंबा देत होते. आणि अण्णांची बाकी कंपनी टीव्हीच्या कॅमेऱ्यांसमोर येऊन कें्र सरकारला दमबाजी करीत होती. अण्णांच्या उपोषणामुळे आधीच घायाळ झालेल्या कें्रसरकारला डिवचून डिवचून खच्चीकरण करण्यात त्यांना असुरी आनंद मिळतोय, असे वाटत होते. या एकूण प्रकरणात कें्रसरकारविषयी सहानुभूती बाळगण्याचे काहीच कारण नाही. परंतु अण्णा कंपनीच्या वर्तनात जो उन्माद दिसत होता, तो संतापजनक होता. अण्णांच्या एकूण व्यक्तिमत्त्व आणि वर्तनाशी विसंगत असे त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तन होते. यातली चिंता करण्याजोगी गोष्ट म्हणजे ज्या वेगाने आंदोलनाचा फुगा वर गेला होता, तो वेग अनैसर्गिक होता. त्यामुळे तो ज्या वेगाने वर गेलाय त्या वेगानेच खाली कोसळण्याची भीती वाटत होती.
अण्णांनी हाती घेतलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रत्येक माणसाला त्रासदायक ठरणारा आहे, हे खरे असले तरी भ्रष्टाचाराबाबतची लोकांची कल्पना फारच संकुचित असल्याचे ठायी ठायी दिसत होते. रोजच्या व्यवहारात आपल्या भ्रष्ट वर्तनाने लोकांना त्रासदायक ठरणारे अनेक घटक आंदोलनात मिरवत होते. सोळा ऑगस्टला अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी पत्रकारपरिषद घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना काम बंद करून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. म्हणजे आज जो सर्वाधिक भ्रष्ट घटक म्हणून ओळखला जातो, त्या सरकारी कर्मचाऱ्यांनीही आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची अपेक्षा करणे याला काय म्हणायचे? विवेकाला मूठमाती द्यायची आणि आपल्या कृतीने अण्णांच्या आंदोलनाचा पराभव करायचा, याचा विडाच जणू सगळ्यांनी उचलल्यासारखे दिसत होते.
छोटय़ा गावांपासून राजधानी दिल्लीर्पयत अण्णांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक पाहिल्यावर कशाची आठवण येत होती ?
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर लोक गावोगावी ‘भारत माता की जय’ आणि ‘पाकिस्तान जला दो.’ अशा घोषणा देत मिरवणुका काढतात. महापुरामुळे विध्वंस झाला किंवा भूकंपामुळे वित्तहानी-मनुष्यहानी झाली की देशभर एक भारावलेले वातावरण तयार होते आणि मानवतेच्या भावनेतून लोक मदत करायला पुढे येतात. मदत गोळा करण्यासाठी फेऱ्या निघतात. पाच-सात वर्षातून असा एखादा इव्हेंट लागतोच लोकांना. त्याच जातकुळीचे भारावलेपण अण्णांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांमध्ये दिसत होते. यातली वाईट गोष्ट एवढीच की, हा ज्वर दीर्घकाळ टिकत नाही. आणि या उत्स्फुर्त उत्साहाचे एका दीर्घकाळ चालणाऱ्या चळवळीत रुपांतर होत नाही.
अण्णा हजारेंची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ते कुणालाही मॅनेज होत नाहीत. आणि त्यांची सगळ्यात कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा कुणीही वापर करून घेऊ शकते. आताही दिल्लीतली मोजकी मंडळी वेगवेगळ्या हेतूंनी अण्णांचा वापर करून घेत आहेत आणि आपला कुणी वापर करून घेतेय, हे अण्णांना कधीच कळत नाही.

2 comments:

  1. भ्रष्टाचार आर्थिक कारणासाठी केला जातो हे गृहीत धरून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालविले जात आहे तोपर्यंत ते यशस्वी होणे कठीण आहे.

    ReplyDelete