मलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने

दिवसेंदिवस महागाई वाढत चाललीय. गरीब माणसाचं जगणं अवघड बनत चाललंय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाची दोन वेळा हाता-तोंडाची गाठ पडतेय. सामान्य माणसाला विकासाच्या महामार्गावर नेऊन उभं केलं पाहिजे, असं मोठमोठे विचारवंत म्हणतात, ते खरंच आहे. मुंबईतल्या अशा सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला महामार्गावर उभं करायला पाहिजे. म्हणजे ते पुण्याकडं पुढा करून. पण त्यासाठी वाशीच्या पुढं नेऊन उभं करायला पाहिजे. नाहीतर मुंबईतल्या मुंबईतच रस्ते आणि फ्लायओव्हरच्या चक्रव्यूहात फिरत राहतील. त्यांनी महामार्गावरून सरळ चालत जायला हवं.


राष्ट्रकूलमध्ये आपले खेळाडू प्रमाणापेक्षा जास्तच पदकं मिळवायला लागलेत. पदकं हे मिळवतात आणि त्याचा त्रास सरकारला होतो. ते तिकडं बंगाल, हरियाणावाले पदक मिळवणाऱ्याला मोठमोठी बक्षिसं देतात. लाजेकाजेस्तव आम्हालाही काही द्यावं लागतं. खेळाडूंनी सरकारच्या परिस्थितीचा विचार करून कामगिरी करावी, असं आवाहन करायला हवं. बक्षिसं द्या. त्यांना नोकऱ्या द्या. त्याही चांगल्या द्या. ते सगळं ठीक आहे, वर त्यांना आपल्या कोटय़ातून घरं द्या. बाकी सगळं ठीक आहे, पण घरं म्हणजे त्रासच आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची खाण आहे. कितीतरी नृत्यांगणा छोटय़ा छोटय़ा घरात राहून कलेची सेवा करीत आहेत. अजून त्यांनाच सगळ्यांना घरं देता आलेली नाहीत, आता हे पदकवाले येतील घरांसाठी त्यांना कुठून घरं द्यायची?



ऑफिसला जायच्या गडबडीत असतानाच शाळेत गेलेली मुलगी रडत रडतच घरी आली. फीमाफीचा अर्ज शाळेनं अमान्य करून फी भरण्याची सूचना केली होती. नुसती सूचना केली असती तरी काही वाटलं नसतं. नंतर काहीबाही करून अर्ज पात्र करून घेतला असता. परंतु मुलीच्या कोवळ्या मनाला यातना होतील, असं अद्वातद्वा बोलल्या म्हणे टीचर. दानत नसताना आमच्या शाळेत कशाला शिकायला पाठवलं, असं म्हणाल्याचं मुलीनं सांगितलं. तेव्हा टीचरच्या बोलण्याचा किंवा मुलीच्या ऐकण्याचा मराठीचा प्रॉब्लेम असावा याची मला खात्रीच पटली. सगळीकडंच मराठीची इतकी बोंबाबोंब झाली आहे की, नेमका कशासाठी कोणता शब्द वापरतात, हेच समजत नाही लोकांना. न्यूज चॅनलवाल्यांना कळत नाही. राजकीय नेत्यांना कळत नाही. शाळेतल्या टीचर मंडळींनाही कळत नाही. म्हणून मुलीची समजूत काढली, की शिक्षक दानत नव्हे तर ऐपत म्हणाले असावेत. आणि तसं म्हटले असतील तर त्यात फारसं चुकीचं काही नाही. फी भरण्याची ऐपत नाही म्हणूनच आपण फी माफीसाठी अर्ज केला होता. ते पटवून देण्यासाठी गेल्याच महिन्यात आपल्या शेतातली वीज तोडल्याच्या बातमीचं कात्रण मुलीला दाखवलं. खिशातून पेपरमिंटची गोळी काढून दिली तेव्हा मुलगी रडायची थांबली. मुलं फारच हट्टी झाली आहेत आजकालची. पालकांच्या परिस्थितीचा विचारच करीत नाहीत. गोळी नाहीतर बिस्किट दिल्याशिवाय गप्पच होत नाहीत. आमच्यावेळी पालकांनी डोळे वटारले तरी चड्डी ओली व्हायची. जास्त शहाणपणा केला तर कानाखाली आवाज निघायचा. कशाला हट्ट करतोय? पण हल्ली तसं वागता येत नाही मुलांशी. कोवळ्या मनावर परिणाम होतो त्यांच्या असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात. आमच्यावेळी असं काही बालमानसशास्त्र अस्तित्वात नसावं कदाचित.



परिस्थितीपुढं किती शरण जायचं? परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता ? स्वत:पासून सुरुवात करा. स्वत:च्या नावापासून सुरुवात करा. रात्रभर खूप विचार केला.



सकाळी पेंटरला फोन लावला. म्हटलं दरवाजावरची नावाची पाटी बदलून घ्यायची आहे.

(मलबार हिल परिसरात रस्त्याच्या कडेला चुरगळलेल्या अवस्थेत सापडलेल्या डायरीची पाने नेमकी कुणाच्या डायरीची आहेत, हे हस्ताक्षरावरून समजू शकले नाही.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर