आबा, आता मांडी मोठी करा !

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी असा विषय म्हणजे पर्वणीच असते, त्यामुळे तो भरपूर वाजवला, मात्र त्याचवेळी मु्िरत माध्यमांनी मात्र ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे संशयाचा फायदा फलंदाजाला दिला जातो, त्याप्रमाणे आर. आर. पाटील यांना संशयाचा फायदा देऊन प्रकरण फारसे वाढवले नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे तसे नसते. सर्वात पुढे राहण्यासाठी किंवा तसे भासवण्यासाठी अनेक फालतू गोष्टींनाही अवास्तव महत्त्व देऊन त्याचा गाजावाजा केला जातो. अर्थात ती त्यांची गरज असते. इथे तर राज्याचे गृहमंत्री गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसत होते. गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी नसीम सिद्दीकींच्या सतराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फुलांचे ताटवे फुलले होते. या भेटीचे फुटेज म्हणजे वृत्तवाहिन्यांसाठी घबाडच होते. त्याची उलट सुलट चर्चा झाली. आरोप आणि खुलासेही झाले. प्रकरण घडून आठवडा उलटला असल्यामुळे आर. आर. पाटील यांनी यातून आपली सोडवणूक करुन घेण्यात यश मिळवले, असे म्हणता येते. तरीही प्रकरण इथे संपत नाही.
नेमके प्रकरण काय आणि कसे घडले, याची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांच्या घरी ईदच्या पार्टीत दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर सलीम पटेल, एक वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक इरफान कुरेशी आणि गुन्हेगारीशी संबंधित असलेला मोबीन कुरेशी असे तिघेजण उपस्थित होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून गृहमंत्री आर. आर. पाटील गप्पा मारत बसले असल्याचे महाराष्ट्राने वृत्तवाहिन्यांवरून पाहिले. अशा प्रकरणांमध्ये आरोप करताना खूप काळजी घ्यावी लागते. सार्वजनिक समारंभात अनेकदा राजकीय नेत्यांसोबत गुन्हेगार दिसतात. मोठय़ा समारंभांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी कुणी यावे, कुठे उभे राहावे, कुणी कुणाला गुच्छ द्यावा किंवा हार घालावा यावर कुणाचे नियंत्रण नसते. काही टगे तर अशा समारंभांमध्ये मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याची संधी साधून घेतात. किंवा मान्यवर नेते असलेल्या व्यासपीठावर मागील बाजूला गर्दीत परंतु उठून दिसेल किंवा कॅमेऱ्याच्या कक्षेत येईल, अशा ठिकाणी जागा पटकावत असतात. पुढे-मागे अशा फोटोंचे भांडवल करून प्रसारमाध्यमांतून राळ उठवली जाते. तेलगी प्रकरण हे त्याचे अलीकडचे ठळक उदाहरण सांगता येईल. शरद पवार संरक्षणमंत्री होते, तेव्हा त्यांच्या विमानातून बाँबस्फोटातील दोघा आरोपींनी प्रवास केल्याचे प्रकरणही गाजले होते. परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये ‘आम्हाला माहीत नव्हते’, हे संबंधितांचे म्हणणे काही अंशी पटण्यासारखे होते. इथे आर. आर. पाटील तसे म्हटले तर एकवेळ समजू शकते. परंतु नसीम सिद्दीकीही तसे म्हणत असतील तर ते पटण्यासारखे नाही. त्यामुळे नसीम सिद्दीकींवर राष्ट्रवादीने कारवाई केली तरच आर. आर. पाटील म्हणतात त्यात तथ्य आहे असे म्हणता येईल. कारण ही भेट कुठल्या मांडवात किंवा सभागृहात झालेली नाही. सार्वजनिक समारंभात खुच्र्या टाकलेल्या असतात, तिथे कुणीही कसेही येऊन बसते, ते समजू शकते. परंतु ही भेट जिथे झाली आहे, ते ठिकाण म्हणजे नसीम सिद्दीकींचे घर होते आणि ते त्या इमारतीत सतराव्या मजल्यावर होते. सतराव्या मजल्यावरील एखाद्याच्या घरात संबंधित घरमालकाला आणि त्याच्याकडे येणाऱ्या पाहुण्याला अशा दोघांनाही माहीत नसलेली कुणी अनोळखी माणसे घुसतात, हे कुणाला तरी पटेल का? तरीही आम्ही म्हणतो ते पटवून घ्या, असे आर. आर. पाटील आणि सिद्दीकी म्हणत असतील तर ते लोकांना मूर्ख तरी समजत असावेत किंवा आम्ही कुणाबरोबरही बसू, कुठेही बसू आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही, असा तरी त्यांचा समज असावा.
आर. आर. पाटील हा इथल्या राजकीय व्यवस्थेचा भाग असल्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र आजही लोकांना इतर राजकीय नेत्यांपेक्षा त्यांच्यात काहीसे वेगळेपण जाणवते. ते त्यांनी आजवरच्या राजकीय प्रवासातून कमावले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
काळाप्रमाणे माणसात बदल होत जातो, तसा तो आर. आर. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैलीतही पडत गेला आहे. तो स्वाभाविकही आहे. आर. आर. पाटील यांचे नेतृत्व साऱ्यांच्या नजरेत भरले ते युती सरकारच्या काळात. प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अल्पावधीतच आर. आर. पाटील मीडियाचे डार्लिग बनले होते. लक्षवेधीकार अशी उपाधी त्यांना मिळाली होती. विधानसभेत आर. आर. पाटील एखाद्या विषयावर बोलणार असतील तेव्हा प्रेस गॅलरी खचाखच भरून जायची. त्यावेळी आणि त्याआधीही अनेक मोठमोठे नेते आपल्या बातम्या छापून येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करायचे. मात्र नवखे आर. आर. पाटील आपली बातमी घेऊन आल्याचे कुठल्या पत्रकाराला आठवत नसेल. म्हणजे त्यांनी जे काही कमावले ते आपल्या वक्तृत्वावर आणि कर्तृत्वावर. पुढे मंत्री झाल्यानंतरही त्यांनी ग्रामविकाससारख्या एरव्ही उपेक्षित मानल्या जाणाऱ्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडय़ा-पाडय़ांचा चेहरा बदलण्याचे क्रांतिकारक कार्य केले. गृहमंत्रिपदाची दुसरी इनिंग ही त्यांच्या घसरणीची सुरूवात होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गेलेले गृहमंत्रिपद त्यांनी इर्षेने परत मिळवले, परंतु त्यानंतरही त्यांना घसरण थांबवता आलेली नाही. आणि ही घसरण थांबवण्यासाठी आवश्यक असलेल्या इमेज बिल्डिंगसाठी त्यांना चार पत्रकारांचे कोंडाळे जमवण्याची आवश्यकता भासू लागली. खरेतर भाडोत्री लोकांना हाताशी धरून इमेज बिल्डिंग होत नसते, हे आर. आर. पाटील यांच्यासारख्याला तरी लक्षात यायला हवे होते. प्रारंभीच्या काळात तासगावचे आमदार असलेल्या आर. आर. पाटील यांच्यात अनेकांना राज्याचे भावी नेतृत्व दिसत होते, हे त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि अभ्यासाने कमावलेले यश होते. आमदाराचा नामदार झाल्यावर त्यांची कार्यशैली कमालीची बदलली. मधल्या काळात पक्षाच्या सर्वाधिक आमदारांच्या तक्रारी आर. आर. पाटील यांच्याविरोधात होत्या हेही इथे लक्षात घ्यायला हवे. जसे शरद पवार कार्यकर्त्यांपासून तुटून पुढाऱ्यांच्या कोंडाळ्यात वावरू लागले, तसेच आर. आर. पाटील कार्यकर्त्यांपासून तुटू लागले. आणि त्यातूनच त्यांना इमेज बिल्डिंगसाठी ‘पीआर’ची गरज भासू लागली असावी. मात्र वृत्तपत्राच्या वाचकांना न्यूज कुठली आमि पेड न्यूज कुठली हे लगेच समजते. त्याचप्रमाणे बातमी कुठली आणि मुद्दाम छापून आणलेली बातमी कुठली हेही समजते. वृत्तपत्राचा वाचक तेवढा प्रगल्भ झाला आहे.
दोन्ही काँग्रेस एक असतानाच्या काळातील पक्षाच्या एका शिबिरात आर. आर. पाटील यांनीच एक शेर ऐकवला होता -
हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम
वो कत्ल भी करते है तो चर्चे नही होते..
आज आर. आर. पाटील यांनी त्याची उजळणी करण्याची गरज आहे. जाणते-अजाणतेपणाने गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लागली म्हणून मांडी कापून टाकण्याचे काहीच कारण नाही. मोठा नेता व्हायचे तर मांडी मोठी करायला हवी आणि ती मोठमोठय़ांच्या मांडीला लागायला हवी. म्हणून आबा, आता मांडी मोठी करा !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट