साहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व

आज जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते, ते 1878 मध्ये ग्रंथकार सभेचे अधिवेशन म्हणून सुरू झाले. म्हणजे या संमेलनाला 132 वर्षे झाली आहेत. केवळ ग्रंथकारांचे संमेलन म्हणून सुरू झालेल्या या संमेलनाबाबत कितीही आक्षेप असले तरी ते महाराष्ट्राचे प्रमुख सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षापूर्वी लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्याबाबतीत कळस गाठलेल्या या संमेलनाच्या एकूणच इभ्रतीचा गेल्या काही वर्षात ज्या वेगाने ऱ्हास सुरू झाला आहे, तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर या संमेलनाचा प्रभाव आहे, तसाच लक्षणीय प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनावर शिवसेनेने निर्माण केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावर भारतीय जनता पक्षाच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याइतपत ताकद त्यांनी कमावली होती. परंतु कोणत्याही विचाराशिवाय केवळ भावनिक मुद्दय़ांवर राजकारण करून लोकांना फार काळ फसवता येत नाही. म्हणूनच एकदा युतीकडे सत्ता दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने तशी चूक पुन्हा केली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत वाईट कारभार करूनही लोकांनी सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनाच पसंती दिली. सत्तेचा भाग बाजूला ठेवला तरी शिवसेनेची 44 वर्षे वाटचाल झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. साहित्य संमेलन आणि शिवसेना यांच्यात तसे साम्य काही नसले तरी या दोन्हीपैकी अधिक वेगाने ऱ्हास कशाचा झाला, याचा विचार करताना गोंधळल्यासारखे होते. साहित्य संमेलनाची वाटचाल 132 वर्षाची आणि शिवसेनेची 44 वर्षाची म्हणजे साहित्य संमेलनाचे वय शिवसेनेच्या बरोबर तिप्पटीने आहे. तरीही दोन्हीचा ऱ्हास साधारणपणे एकाचवेळी सुरू झाला आहे. आणि त्याचा परस्परसंबंधही आहे. मुंबईतील संमेलनावेळी शिवसेनाप्रमुखांनी साहित्यिकांना ‘बैल’ म्हणून हिणवले तेव्हा साहित्यिकांची कातडी जराही थरारली नाही. वसंत बापट यांच्यासारखा समाजवादी चळवळीतील म्हणजे शिवसेनेच्या वैचारिक विरोधी छावणीतील अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी त्याचा समाचार घेतला त्यामुळे साहित्यिकांची थोडीफार अब्रू वाचली. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नावाच्या शिखर संस्थेने साहित्यिकांच्या अवमानकारक उल्लेखाबद्दल ब्र काढला नाही. साहित्य संमेलनाची घसरण त्याआधी सुरू झाली होती, परंतु साहित्यिक आणि साहित्य संमेलनाच्या प्रतिष्ठेचा ऱ्हास तेव्हापासून सुरू झाला. आणि शिवसेनेचा ऱ्हासही त्यानंतर वर्षभरात सुरू झाला. तो आजर्पयत थोपवता आलेला नाही.
शिवसेनेचे पक्ष म्हणून असलेले आजचे वय हे प्रौढ म्हणता येईल असे आहे. परंतु शिवसेनेकडून वयाला साजेसा प्रौढपणा कधीच दाखवला गेला नाही. राज ठाकरे यांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख म्हणाले की, माझी नक्कल करतोय, पण विचारांचे काय? तेव्हा शिवसेनाप्रमुख कोणत्या विचारांबद्दल बोलत होते? एकीकडे रोहिंग्टन मेस्त्री यांच्या पुस्तकातील भाषा घाणेरडी आहे म्हणून आदित्य ठाकरेने कुलगुरूंना निवेदन द्यायचे. आणि त्यापेक्षा घाणेरडय़ा भाषेत जाहीरपणे बोलणाऱ्या शिवसेनाप्रमुखांकडून तलवार घ्यायची, हा मोठाच विनोद म्हणता येईल. कोणताही विचार नसतो तेव्हा शिवराळपणा हेच भांडवल बनते आणि चार घटका मनोरंजनासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या जनसमुदायाचीही त्यापेक्षा अधिक अपेक्षा नसते. महाराष्ट्र आणि देशापुढील कुठल्याही प्रश्नाचा गांभीर्याने विचार न करता केवळ शिवीगाळ करणे ही शिवसेनाप्रमुखांची स्टाईल असली तरी ती एका विशिष्ट वयात त्यांना शोभत होती. आज ती त्यांना शोभत नाही, हे त्यांना कोण सांगणार? आणि मनोहर जोशींपासून नीलम गोऱ्हेंर्पयत आणि वैचारिक मित्र असलेल्या पत्रकारांर्पयत सारेच लाभार्थी ‘ठाकरी भाषा’ असे त्याचे उदात्तीकरण करणार! शिवसेनाप्रमुख या वयात जे बोलतात त्याबद्दल त्यांचा राग किंवा संताप येत नाही, तर त्यांच्याविषयी करुणा वाटते. अशा भाषेमुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सत्तेपासून लांब ठेवले आहे, हे लक्षात घेतले नाही, तर त्यांना पुढची पंचवीस वर्षे त्यांना विधानभवनावर भगवा फडकता येणार नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लाचारी पत्करून ऐतिहासिक परंपरा असलेले साहित्य संमेलन कधीच राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधून टाकले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी यावे की येऊ नये, अशा चर्चा एकीकडे सुरू असताना महामंडळाने सारे संमेलनच राजकीय नेत्यांच्या ताब्यात देऊन टाकले. महामंडळाच्या संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना अस्पृश्य मानणे कृतघ्नपणाचे होते. कारण सारे संमेलन राजकीय नेत्यांच्या पैशातून, मनुष्यबळातून उभे करायचे आणि त्यांनी व्यासपीठावर येऊ नये असे म्हणायचे यासारखा भंपकपणा दुसरा कुठला असू शकत नाही. राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर येण्यास विरोध करणे रास्त नसले तरी सारे संमेलन राजकीय नेत्यांच्या ताब्यात देणे संयुक्तिक मानता येणार नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या मांडवात साहित्यिक पाहुणे असे उलटे चित्र दिसू लागले. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या संमेलनाने तर साहित्य संमेलनाच्या इभ्रतीची वाट लावली. संमेलनासाठी कोटय़वधींची माया गोळा केली. आलेल्या साहित्यिकांची नीट व्यवस्था केली नाही. नीट मानधन दिले नाही. जमवलेले पैसे शिल्लक राखून त्यावर डल्ला मारायचे नियोजन आधीच झाले होते. त्यानुसार पुण्यभूषण फाऊंडेशनची तिजोरी भरली. त्यासंदर्भात ओरड झाल्यावर स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी लाख रुपये महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दिले. खरेतर मसापचा त्या पैशावर काडीचाही अधिकार नसताना त्यांनी ते पैसे आपल्याकडे ठेऊन घेतले. साहित्य व्यवहार करणारी मंडळीही किती हिणकस व्यवहार करतात, याचे दर्शन त्यानिमित्ताने घडले. पुण्याच्या संमेलनाचा राडा सुरू असतानाच ठाण्याच्या संमेलनाची घोषणा झाली. ठाणेकरांनी सोवळेपणाचा आव आणत आपण कसे आदर्श संमेलन पार पाडणार आहोत, हे सांगायला सुरुवात केली. पण संमेलनाचे वारे लागले, की भल्याभल्यांची डोकी फिरतात, हे आतार्पयत घडत आले आहे. ठाणेही त्याला अपवाद राहिले नाही. कोषाध्यक्षाच्या निवडीपासूनच ठाण्याचा घोळ सुरू झाला होता. तो त्यांनी नंतर दुरुस्त केला. परंतु संमेलनाचे उद्घाटकपद विक्रीला काढून ठाणेकरांनी संमेलनाची होती नव्हती ती सगळी शिल्लक अब्रू धुळीला मिळवली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून व्हॅल्यूएबल ग्रूपच्या संजय गायकवाड यांची निवड केली आहे, त्यांचे कर्तृत्व आदर वाटावे असेच आहे. उद्योगात मागे राहणाऱ्या मराठी तरुणांनी ज्यांचा आदर्श घ्यावा, असे त्यांचे कर्तृत्व आहे. त्याअर्थाने त्यांच्या निवडीसंदर्भात आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. उलट असा वेगळा विचार केल्याबद्दल ठाण्याच्या संयोजन समितीचे कौतुकच करायला हवे. परंतु हे एवढे साधे आणि सरळ नाही. गतवर्षी पुण्याच्या संमेलनाचे प्रायोजकत्व माणिकचंद कंपनीने मागे घेतल्यानंतर गायकवाड यांनी कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता लाखांची देणगी दिली होती. यंदा ठाण्याच्या संयोजकांनी उद्घाटनासाठी डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या नावांची चर्चा सुरू केली होती. त्याबरोबर काही उद्योजकांची नावेही चर्चेत होती आणि शेवटी संजय गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भरघोस देणगीच्या अपेक्षेनेच त्यांनी गायकवाड यांची निवड केली, याचाच सरळ सरळ दुसरा अर्थ असा निघतो की, संयोजन समितीने उद्घाटकपदाची विक्री केली. साहित्य महामंडळासाठी हा अनुकरणीय पायंडा आहे. यापुढचा टप्पा संमेलनाध्यक्षपदाचा लिलाव करण्याचा असू शकतो. त्यादृष्टीने महामंडळाने तयारी करायला हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट