चार आण्याची गोष्ट

पैसा मोठा आणि माणूस छोटा होण्याची प्रक्रिया अनेक वर्षापासून सुरू आहे. पैसे तेच आहेत फक्त त्यांचे मूल्य कमी होत चालले आहे. चवलीचा जमाना कधीच मागे पडला. काही वर्षापूर्वी पाच, दहा, वीस पैशांची नाणी चलनातून बंद झाली. आता पंचवीस पैशांच्या नाण्याची म्हणजे चार आण्याची म्हणजे पावलीची पाळी आली. एखादी गोष्ट आयुष्यातून कायमची निघून जाण्याची हुरहूर काय असते, ते ती गमावणाऱ्यालाच समजू शकते. चार आण्याचे तसेच आहे. ग्रामीण भागातील लोकांची ही ‘पावली.’ रुपयांचा पाव भाग ती पावली आणि अर्धा भाग ती अधेली म्हणजे आठ आणे. पावलीचा संदर्भ पाव भागापुरताच मर्यादित नव्हता, तर गरीबाच्या हातात चार आण्याचे नाणे असणे देव पावल्याची भावनाच असायची. जत्रेला जाणाऱ्या मुलांना पालक दहा पैसे द्यायचे, त्यात एक गारेगार आणि बत्तासे यायचे. अशा काळात एखाद्या पालकाने मुलाच्या हातात चार आणे ठेवले तर अख्खी जत्रा खरेदी करण्याचे बळ त्याला मिळायचे. संगीत बारीला बसलेला शौकिनही आपल्या आवडत्या गाण्याची फर्माईश करताना, हातात चार आण्याचे नाणे घेऊन ‘पावलीचं म्हणणं काय?’आहे ते सांगायचा आणि केवळ पावलीवर आधीचे गाणे तुटून नवे गाणे सुरू व्हायचे. अगदी अलीकडे अलीकडे तीन आकडय़ातील पगार चांगला मानला जायचा तेव्हा पैशाचे महत्त्व सांगताना, एक रुपया एसटीच्या चाकाएवढा वाटतो, असे म्हणण्याची पद्धत होती. काळ बदलत गेला, एसटीचे चाक आहे तेवढेच राहिले, रुपया मात्र साऱ्याच अर्थानी लहान होत गेला. एक रुपयाला बाजारात काय काय मिळते, याचा धांडोळा घेतला तर चॉकलेट-गोळ्यांच्या पलीकडे फारसे सांगता येत नाही. कॉईन बॉक्सवरून फोन लावता येत असला तरी पल्स रेट कमी होत आहेत, या गतीने हळुहळू फोनसाठीही दोन रुपयांचे नाणेच लागेल. चार आण्याचे नाणे बंद झाल्यामुळे आता आणखी काही वर्षे तरी आठ आण्यांचे नाणे हे चलनातील सर्वात कमी मूल्याचे नाणे असेल. चलनाची ही घसरण केवळ अर्थव्यवस्थेशी निगडित असल्याचे मानणे संवेदनशून्यतेचे लक्षण ठरेल. समाजातील मूल्यांच्या घसरणीशी त्याचा निकटचा संबंध येतो. केवळ पैशांचे मूल्य कमी होत असते तर ते समजण्यासारखे होते, परंतु पैशांपेक्षाही मूल्यांची घसरण अधिक वेगाने होत आहे आणि चार आणे बंद होण्याची घटना, ही त्याची तीव्रतेने जाणीव करून देणारी आहे. अनेकांच्या भावविश्वात जागा मिळवलेले चार आणे चलनातून कायमचे जाणार आहेत. गेल्या काही वर्षात चलनात चार आणे आढळत नव्हते, तरी त्यांचे अस्तित्व होते. एखाद्या पानाच्या दुकानात चार आण्याचे नाणे मिळायचे तेव्हा काही तरी दुर्मिळ गवसल्याचा आनंद वाटायचा आणि तो पैशांच्या मूल्यापलीकडे जाऊन मानसिक समाधान देणारा असायचा. हे नाणे बंद झाले तर कधीतरी दुर्मिळ गवसण्याचा आनंदालाही मुकावे लागणार आहे. चार आण्यानंतर अर्थातच पाळी आठ आण्यांची असेल आणि पैसे नावाची संकल्पनाच हद्दपार होऊन पूर्ण रुपयांमध्ये व्यवहार होऊ लागतील. भालचं्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीतला एक प्रसंग आहे. खासदारांनी सुरू केलेल्या महाविद्यालयात बऱ्याचशा सुमार प्राध्यापकांच्या नेमणुका झाल्यामुळे शिक्षणाचा पार बट्टय़ाबोळ होतो. काही जाणते प्राध्यापक खासदारांना भेटून परिस्थिती कानावर घालतात तेव्हा खासदार म्हणतात, ‘आपल्या भागात किंवा सबंध महाराष्ट्रातसुद्धा आपल्या विषयात सोळा आणे विद्वत्ता असलेला मनुष्य कोणी असतो काय ? चौदा आणे ? बारा आणे तरी ? आठ आणे स्कॉलर असतीलही, पण तेही मोठमोठय़ा शहरांत नावाजलेल्या संस्थांमध्ये कमी पगारावर जायला मागतात.’ त्यावर एक ज्येष्ठ प्राध्यापक म्हणतात, ‘आपण किमान चार आणे स्कॉलर तरी घेऊ या ?’ प्राध्यापकीच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रातील माणसांची कुवत मोजण्याचे साधन म्हणूनही आजच्या जमान्यात चार आण्याला महत्त्व होते. आता ते परिमाणही कालबाह्य होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट