आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पत्रास कारण की
गेल्या महिन्यात माझ्या
बापानं आत्महत्या केली हे आपणास माहीत असेलच कारण
कालच तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे
पालकत्व सरकारने घेतले आहे त्यांना
सरकार विसरणार नाही असे म्हणालात

महोदय, आमच्या गावात आत्महत्या केलेल्या दोघांच्या कुटुंबियांना
लाखालाखाचे चेक मिळाले त्यांचे फोटो छापून आले चेक घेताना
पण आम्हाला मिळाले नाही काहीच
माझा बाप आयुष्यभर शेतात राबला
तरी तो शेतकरी नव्हता
शेतमजूर होता म्हणतात तुमचे लोक

मुख्यमंत्री महोदय,
माझ्या मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी
कर्ज काढलं होतं माझ्या बापानं
तिला सासरी जाताना खूप रडला माझा बाप
तरी खूप आनंदी होता एका लेकीचं आयुष्य
मार्गी लागलं म्हणून
काही दिवस गेले आणि बाप गप्प गप्प झाला
बोलायचंच बंद झाला कुणाशी
भिंतीला टेकून बसायचा जमिनीवर रेघोटय़ा मारीत
नजर अशी जसं भुईतलं गुप्तधन शोधतोय
दिवसभर राबून यायचा गुरासारखं रात्री
घासभर खावून झोपी जायचा गपगार सकाळर्पयत
अलीकडं अलीकडं दचकून उठायचा
झोपेतून भास व्हायचा त्याला
सावकार दारात आल्याचा

माझा बाप इज्जतीला खूप जपायचा
मुख्यमंत्री महोदय स्वत:च्या आणि सरकारच्याही
सरकारच्या इज्जतीसाठीच त्यानं
बांधून घेतला होता घरामागचा संडास
शेवटी त्या संडासात जाऊनच त्यानं
गळफास लावून घेतला
एंड्रीनसाठी पैसे नसल्यावर दुसरं
काय करणार माणूस तुम्हीच सांगा


तुम्हाला आणखी एक सांगायचं म्हणजे बघा
गेल्या आठवडय़ात चॅनलवाले आले होते आमच्या गावात
त्यांनी मुलाखत घेतली आईची
शूटिंग घेतलं आमच्या सगळ्यांचं घरादारासकट
शेजारी पाजारी म्हणाले म्हातारा मेला म्हणून
हा चान्स भेटला बायणे तुला
सगळ्या देशात गेलं तुझं नाव उद्या संसदेतही
चर्चा होईल तुझ्यावर कलावतीबाईसारखी
आई रडत होती रात्रभर बापाच्या आठवणीनं

तुम्हाला सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री महोदय
मला नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे बघा
आई हातपाय गळाठून बसलीय
धाकटय़ा भावाचं शिक्षण आहे अजून
सगळं मलाच करावं लागणार आहे म्हणून म्हणते मला
नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे
पुढच्याच महिन्यात मला अठरा पूर्ण होतील
मुंबईहून आलेला एक गाववाला सांगत होता
मुंबईत मसाज पार्लर खोललेत तिथं मुलींची भरती
सुरू आहे म्हणत होता
त्याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे ?
आमच्या गावात ब्रॉडबँडची सोय आहे
महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध
होईल का त्याची जाहिरात ?
मला नोकरीची फार म्हणजे फार गरज आहे
मुख्यमंत्री महोदय माझ्या पत्राचा
सहानुभूतीपूर्वक विचार करा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर