पोपट मेला असे म्हणायचे नाही !

पोपट काही खात नाही, पोपट पाणी पीत नाही, पोपटाने मान टाकली आहे, पोपट हालचाल करीत नाही..तरीही पोपट मेला असे म्हणायचे नाही. पोपट खूप नाजूक आहे आणि परीकथेतल्याप्रमाणे त्यांचे प्राणच पोपटात अडकले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्या आणि त्याच आगीच्या लपेटीत आल्यामुळे काहीशा वेळाने कुडीतून प्राण निघून गेलेल्या आणि ज्याच्या कुडीत अनेकांचे प्राण अडकले होते, त्या पोपट शिंदेविषयी हा मजकूर नाही. त्या पोपटची गोष्टच निराळी होती. त्याच्या प्राणात अनेकांचे प्राण अडकले होते आणि तो अखेर्पयत तोंड उघडू न शकल्यामुळे पोलिस ज्याचा जबाबही घेऊ शकले नाहीत. त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले आणि अनेकांचा जीव भांडय़ात पडला. पण वेळ अशी आलीय की, त्या पोपटबद्दलही बोलायचं नाही. त्याच्याविषयी कुणी काही बोललं, त्याच्या भेसळखोरीला राजकीय संरक्षण होतं, असं कुणी म्हणालं की छगन भुजबळांना वाटतं आपल्यालाच लक्ष्य करून बोललं जातंय. ते स्वाभाविकही आहे. काही वर्षापूर्वी अंतिम तोतला हा तेलमाफिया चर्चेत आला तेव्हा भुजबळांशीच त्याचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. पुढे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यशवंत सोनवणे यांना जाळून मारण्याची घटनाही योगायोगाने भुजबळांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातच घडली,त्यामुळे भुजबळांच्या पक्षांतर्गत आणि बाहेरील साऱ्या विरोधकांना आयतं कोलीत मिळाले आणि त्यांनी पोपट शिंदेसह तेलमाफियांच्या राजकीय हितसंबंधांची चर्चा सुरू केली. साऱ्या हवेतल्या बाता असल्या तरी रोख भुजबळांवरच होता. भुजबळांसारख्या नेत्याला असे आरोप नवे नाहीत. राजकीय कारकीर्दीला सुरूंग लावणारे अनेक आरोप होऊनही भुजबळांनी सारे परतवून लावले. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रत्येक संकटावेळी बाहेरच्यांपेक्षा पक्षातल्या मंडळींनीच त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. भुजबळांनीही आता मागे वळून साऱ्या गोष्टींचा विचार करायला हवा. म्हणजे एकीकडे महात्मा जोतिराव फुले यांची विचारधारा आणि दुसरीकडे नाळ जोडली जाते ती एकदम तेलगी, अंतिम तोतला किंवा पोपट शिंदे यांच्याशी. अशा गोष्टी आपल्याच वाटय़ाला का येतात, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. म्हणजे मग पोपट मरण्याची वाट पाहावी लागणार नाही आणि पोपट मेला असे कुणी म्हणाले तरी आनंद किंवा दु:ख वाटणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे ऐंशीच्या दशकातले अमिताभ बच्चनच झालेत. भुजबळांचा पत्ता कापून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदावर मांड ठोकली आणि त्यांचा वारू असा काही उधळला की, तो कुठे थांबेल याचा नेम नाही. पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला यशोशिखरावर नेण्याची त्यांची जिद्द दिसते आहे, मात्र वाटेत अनेक दऱ्या आहेत. कुठल्याही टप्प्यावर अंदाज चुकला तर एखाद्या दरीत सारा खेळ खल्लास होऊ शकतो. शिखरावर पोहोचवण्यासाठी जे मदत करतात, तेच दरीत कोसळण्यासाठीही व्यूहरचना लावू शकतात हे अद्याप बारामतीच्या छोटय़ा पवारांना लक्षात आले नसावे. शरद पवारांनी पत्रकारांना अनेकदा फटकारले आहे. पोरकटासारखे प्रश्न विचारणाऱ्यांचा जागेवर पाणउतारा केला आहे, परंतु एकूण प्रसारमाध्यमांचा अनादर होईल अशी कृती कधी केली नाही. सुपारी घेऊन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापणे आणि एकूण प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींविषयी अनुदार उद्गार काढणे यातला फरक अजित पवारांच्या लक्षात आला नसावा. राज्यात जिथे जाईल तिथल्या स्थानिक नेत्यांना झापत सुटलेल्या अजित पवार यांना पत्रकारही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा अँग्री यंग मॅनची आपली इमेज डॅमेज करणारे वाटले असावेत त्यामुळे त्यांनी पत्रकारांना पट्टय़ात घेतले आणि तिथेच फसले. गेले काही दिवस माध्यमांचे डार्लिग बनलेले अजित पवार एकदम व्हिलन बनले. इथे तर दोन पोपट आहेत. एक पोपट आहे अजित पवार यांचा. एवढय़ा डॅशिंग नेत्याला भर सभेत कुणीतरी सामान्य माणूस प्रश्न विचारतो, जाब विचारतो हे जर लोकांनी टीव्हीवर पाहिले असते तर अँग्री यंग मॅनच्या इमेजचे पार भजे झाले असते आणि इमेजचा पोपट मेला असता. तो जपण्यासाठी त्यांनी थेट पत्रकारांनाच पट्टय़ात घेतले आणि स्वत:च पट्टय़ात सापडले आणि त्यांच्या इमेजचा पोपट झाला. दुसरा पोपट आहे वृत्तवाहिन्यांचा. त्यांनी काहीही दाखवायचे आणि काहीही दाखवता, असे मात्र म्हणायचे नाही. आपणच आपले हसे करून घेतो, हे बऱ्याचजणांना कळत नाही, त्यामुळेच अजित पवारांसारख्यांचे असे बोलण्याचे धाडस होते.
इमेजमध्ये इमेज असेल तर ती गृहमंत्री आर. आर. पाटील यांची. ती म्हणजे काचेच्या भांडय़ासारखी आहे. कितीही जपायचा प्रयत्न केला तरी तिला तडे जातच असतात. आणि तडे गेले की आर. आर. पाटील यांची जीभ ताड् ताड् चालायला लागते. तेलमाफियांच्यासंदर्भात नाव घेतल्यावर जसे भुजबळांचे होते, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा विषय काढला की, आर. आर. पाटील यांचे होते. इथून तिथून कायदा सुव्यवस्थाच ती. अधुनमधून बिघडणारच. पण कायदा-सुव्यवस्थेच्या पोपटाचे नाव नाही घ्यायचे. तो मेला तरी मेला म्हणायचे नाही. यशवंत सोनवणे प्रकरणी गृह आणि पुरवठा खाते नीट काम करीत नसल्यामुळे सारे संशयाचे धुके आपल्याभोवती निर्माण होते, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी भुजबळ यांनी जाहीरपणे केली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतली बातमी फुटल्यामुळे आर. आर. पाटील संतापले आणि बातम्या फोडणाऱ्या ‘पत्रकार मंत्र्यांचा’ विषय पुन्हा एकदा उपस्थित केला. यापूर्वी एकदा त्यांनी ट्विटरवर या विषयाला वाचा फोडली होती. आर. आर. पाटील एवढे संवेदनशील असते तर त्यांनी नागपूर जिल्ह्यातील राजूलवाडी (ता. उमरेड) येथे पोलिसांच्या भीतीने घरदार सोडून जंगलात पळालेल्या पारध्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असता. आर. आर. पाटील यांच्या पोलिस दलाचे पोलिस किती क्रूरपणे वागतात, याचे दर्शन राजूलवाडीत गेल्या आठवडय़ात घडले. हप्ता वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली आणि त्यांनी पन्नालाल राजपूत या सामाजिक कार्यकर्त्यांला रॉकेल भेसळखोर ठरवले. पारध्यांनी पोलिस पथकावर दगडफेक केल्याच्या बातम्यांना राज्यपातळीवर प्रसिद्धी मिळाली. या प्रकरणाची वस्तुस्थिती वेगळीच आहे. नागपूर जिल्ह्यात पारधी वस्त्या आहेत. त्यापैकी राजूलवाडीची वस्ती पन्नालाल राजपूत यांच्या पुढाकारामुळे सुधारलेली आहे. दीडशे कुटुंबांच्या या वस्तीत तीन कुटुंबे दारुचा व्यवसाय करतात, बाकी सारे शेती करतात. अशा वस्तीत पोलिसांनी मर्यादा ओलांडली त्याला लोकांनी विरोध केल्यावर बळाचा वापर केला आणि घाबरून लोक जंगलात पळून गेले. यशवंत सोनवणे हत्येच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या घटनेला रॉकेल भेसळीचा रंग देऊन प्रसारमाध्यमांना बातम्या पुरवल्या. दुसऱ्या दिवशी राखीव पोलिस दल, दंगलविरोधी पथक वस्तीवर धडकले आणि निर्मनुष्य वस्तीची लूट केली. तिजोऱ्या फोडल्या. त्यातील रकमा, मौल्यवान चीजवस्तू गायब झाल्या. पारध्यांच्या कोंबडय़ा कापून पाटर्य़ा केल्या. याची माहिती आर. आर. पाटील यांना असण्याचे कारण नाही. पोलिसांनी जिवावर उदार होऊन अडीचशे लिटर रॉकेल जप्त केल्याचे रिपोर्टिग त्यांच्याकडे झाले असणार. राज्यपातळीवरील प्रसारमाध्यमांनी पहिल्या दिवशी पारध्यांनी केलेल्या दगडफेकीची बातमी छापली आणि विषय सोडून दिला. स्थानिक पातळीवरील वृत्तपत्रांनी मात्र दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन
वस्तुस्थिती समजून घेतली तेव्हा पोलिसांच्या क्रौर्याचे दर्शन घडले. आता पोलिसांच्या संवेदनशीलतेचा पोपट मेला आहे, असे कोमल हृदयाच्या आर. आर. पाटलांना कोण आणि कसे सांगणार? कारण आर. आर. पाटील यांच्या संवेदनशीलतेचा पोपटही कधीच मेला आहे, त्याची त्यांना स्वत:लाही खबर नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट