रामदास आठवले दुरावणे परवडणारे नाही !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेच्या मस्तीत असतात तेव्हा आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, याचे थोडेही भान त्यांना नसते. राजकीय स्वार्थासाठी ते निवडणुकीच्या काळात छोटय़ा-मोठय़ा गटांचे लांगूलचालन करतात. निवडणुकीची गणिते जमवण्यासाठी जातीय किंवा प्रादेशिक तडजोडी करीत असतात. मात्र अडचणीच्या काळात आपल्याला सहकार्य केलेल्या छोटय़ा पक्षांचा योग्य सन्मान राखण्याची वृत्ती दोन्हींच्याठायी नाही. दोन्ही पक्षांची नावे वेगळी असली तरी संस्कृती एकच असल्यामुळ्े वृत्तीत फरक असण्याचे कारण नाही. त्यांची ही वृत्तीच त्यांच्या मुळावर आली तर आश्चर्य वाटायला नको. गेले वर्षभर केलेल्या उपेक्षेमुळेच रामदास आठवले यांच्यासारखा धर्मनिरपेक्षतेच्या चळवळीतला त्यांचा मित्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेला, याची योग्य दखल घेतली नाही,तर मात्र नजिकच्या काळात दोन्ही काँग्रेसना त्याची किंमत चुकवावी लागेल. महाराष्ट्रातील दलितांच्या नेतृत्वासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सूचक विधान केले असले तरी काँग्रेसमधून दलितांसाठी नेतृत्व उभे राहणे नजिकच्या काळात तरी शक्य नाही. किंबहुना काँग्रेमधील दलित नेत्याला महाराष्ट्रातील दलित जनता स्वीकारणेही कठिण आहे. काँग्रेसमध्ये दलित नेते नाहीत असे नाही, परंतु ते पक्षातील दलितांचा कोटा भरण्यापुरते आहेत. समरसता मंचात असलेल्या दलितांहून त्यांची अवस्था फारशी वेगळी नसते. अशा नेत्यांना सत्तेचे तुकडे हवे असतात आणि पक्षाला मिरवण्यासाठी दलित चेहरे हवे असतात. आठवले हे राष्ट्रवादीचे मित्र मानले जात असले तरी काँग्रेसलाही त्यांचा लाभ होत असतोच. म्हणूनच आठवले यांच्यासारखा नेता काँग्रेस आघाडीपासून दुरावणे परवडणारे नाही.
अशी सारी पाश्र्वभूमी असल्यामुळेच आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले. महाराष्ट्रातील अनेक दलित नेत्यांनी आतार्पयत शिवसेना-भारतीय जनता पक्षाशी छुपे किंवा उघड संगनमत केले, परंतु रामदास आठवले आतार्पयत त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर होते. आठवले यांनी आपल्यासोबत यावे, यासाठी आतार्पयत अनेकदा प्रयत्न झाले, उघड आवाहने केली, युतीच्या काळात उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यार्पयत मजल गेली, परंतु आठवले यांनी त्यांना दाद दिली नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणूनच वावरले आणि त्यांनी आपल्या परीने काँग्रेस-राष्ट्रवादीलाच सहकार्याची भूमिका घेतली. धर्मनिरपेक्ष प्रवाहाबरोबर राहण्याच्या भूमिकेतून हे घडले. त्यामुळेच आठवले यांनी घेतलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आठवले यांची एकूण कार्यशैली आणि वागणे-बोलणे यामुळे त्यांना राजकारणात कुणी गंभीरपणे घेत नाही. अर्थात अनेकांना सवंग वाटणारी ही शैली आठवले यांनी जाणीवपूर्वक विकसित केली आहे. त्यांच्यामागे जे कार्यकर्ते आहेत तेही त्यांच्या याच बिनधास्त शैलीमुळेच आहेत, हे नजरेआड करून चालत नाही. आठवले यांच्या तुलनेत त्याचे समकालीन किंवा थोडे वरिष्ठ म्हणता येतील, असे जे नेते आहेत त्यांचा वावर गंभीर आणि आक्रमक असला तरी त्यांच्या भूमिका मात्र धरसोडीच्या राहिल्या आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून एक वेगळी मान्यता असली तरीही त्यांची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली. भारिप-बहुजन महासंघाच्या स्थापनेनंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची एक वेगळी वाट निर्माण केली. जी पारंपारिक दलित चळवळ आणि अन्य डाव्या प्रवाहांपेक्षाही वेगळी आहे. मात्र अकोला जिल्ह्यात त्यांनी जो पॅटर्न तयार केला, तो त्यांना राज्याच्या अन्य भागात प्रभावीपणे राबवता आला नाही. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र वेगळे दिसू शकले असते. जोग्रें कवाडे हे दीर्घकाळ धर्मनिरपेक्ष प्रवाहांच्या बरोबर राहिले, मात्र खैरलांजी प्रकरणानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट भाजपशीच संगनमत केले. आठवले जसे शरद पवारांच्या वळचणीला राहिले त्याप्रमाणे रा. सु. गवई यांनी काँग्रेसची वळचण सोडली नाही. शरद पवार यांचे निकटवर्ती असतानाही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते काँग्रेससोबत राहिले. त्याची बक्षिसी त्यांना राज्यपाल पदाच्या रुपाने मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी रिपब्लिकन एकीकरण आणि त्यानंतर रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्थापन होताना त्यांचे पुत्र राजें्र गवई प्रारंभी रिडालोस सोबत राहिले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी रिडालोसला तोंडावर पाडून काँग्रेसशी घरोबा केला. अर्थात त्याआधी प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यात घेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा त्यांनी रा. सु. गवई यांचा मुद्दा उपस्थित केला होता. गवई राज्यपालपदाचा राजीनामा देऊन एकीकरणात येणार आहेत का, असा त्यांचा सवाल होता. राजें्र गवई यांनी रिडालोसची संगत सोडल्यानंतर आंबेडकरांच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला. याव्यतिरिक्त नामदेव ढसाळ, राजा ढाले, टी. एम. कांबळे वगैरे नावे मोठी दिसत असली तरीही त्यांच्यामागे राजकीय ताकद नसल्यामुळे ते कुठे आहेत, याला फारसा अर्थ उरत नाही.
अलीकडच्या काळातील या साऱ्या घटना-घडामोडींचा विाचर केला तर एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे रिपब्लिकन गटांचे ऐक्य व्हावे अशी रामदास आठवले यांची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ होती. त्यासाठी त्यांनी खासदारकीची किंमत दिली. राष्ट्रवादीकडून आलेली खासदारकीची ऑफर स्वीकारली असती तर त्यांना रिपब्लिकन ऐक्याची हाक देता आली नसती, म्हणून विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदारकीची ऑफर नाकारली आणि रिपब्लिकन ऐक्याला प्राधान्य दिले. रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर त्यातूनच रिडालोसची उभारणी झाली. रिडालोसमध्ये बरेच अंतर्विरोध असल्यामुळे आणि महाराष्ट्रात डाव्या चळवळींचे पाठिराखे राहिले नसल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. रिडालोसचा फोलपणा लक्षात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर आठवले यांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुका होऊन गेल्यामुळे आणि नजिकच्या काळात मोठय़ा निवडणुका नसल्यामुळे त्यांना फार किंमत दिली नाही. महाराष्ट्रातील सरकारचा अजून चारेक वर्षाचा काळ बाकी असल्यामुळे सरकारला कुणाच्या कसल्याही मदतीची गरज नाही. विरोधक निष्प्रभ आणि दुभंगलेले असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. अशा काळात आठवले किंवा तत्सम कुणा नेत्याची गरज असण्याचे कारण नाही. नेमकी हीच मानसिकता दोन्ही काँग्रेसच्या मुळावर येणारी आहे. आठवले यांचा राजकीय प्रवास बारकाईने पाहणाऱ्यांना अजूनही ते शिवसेनेबरोबर जातील, असे वाटत नाही. कारण धर्मनिरपेक्षतेसंदर्भातील त्यांची भूमिका पक्की आहे. परंतु ते युतीसोबत जाणारच नाहीत असे नाही. विद्यमान राजकीय परिस्थितीत ज्यांना वैचारिक मित्र मानतो ते पक्ष सत्तेवर असताना दलित चळवळीतील नेत्यांना कोणतेही राजकीय लाभ देण्याची भूमिका घेणार नसतील तर त्यांना धडा शिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून आठवले युतीसोबत जाऊ शकतात. शिवसेनाप्रमुखांची त्यांनी घेतलेली भेट ही दोन्ही काँग्रेसना इशारा देण्यासाठी होती, असेच तूर्ततरी दिसते. रिडल्स इन हिंदूइझमपासून खैरलांजीर्पयतच्या टोकाच्या संघर्षाची परंपरा असल्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे, हे वाटते तितके सोपे नाही. मात्र प्रस्थापितांनी उपेक्षा केली तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आठवले यांनी काही निर्णय घेतला तर तो काँग्रेस आघाडीला महागाात पडल्याशिवाय राहणार नाही.

टिप्पण्या

 1. माझ्या 'सह्याद्री बाणा'- http://www.sahyadribana.com या ब्लॉगवर लिहिलेला लेख-

  'शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा' ?
  link- http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_4097.html

  आपली प्रतिक्रिया कळवावी.
  प्रकाश पोळ, कराड, सातारा.

  Email- prakashpol6@gmail.com

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट