आलोक : उद्ध्वस्ततेचा भयाण अनुभव

आसाराम लोमटे यांचा ‘आलोक’ हा कथासंग्रह मुळापासून हादरवून आणि स्वास्थ्य बिघडून टाकणारा आहे. मराठी साहित्यात खेडय़ातील वास्तवाचं भेदक चित्रण आतार्पयत मुबलक प्रमाणात आलं आहे, परंतु आसाराम लोमटे ज्या ताकदीनं ते मांडतात ते सारं पार आतून उदसून टाकणारं आहे. सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ कादंबरीनं तसा काहीसा अनुभव दिला होता, परंतु आसाराम लोमटे यांची कथा इतकी आत घुसते की सहजासहजी सावरून लगेच पुढच्या कथेकडं वळता येत नाही. ‘इडा पीडा टळो’ या बहुचर्चित कथासंग्रहानंतर ‘आलोक’ हा आसाराम लोमटे यांचा दुसरा कथासंग्रह. कथा या वाड.मयप्रकाराची बलस्थाने त्यांनी नेमकेपणाने पकडली आहेत. भालचं्र नेमाडे यांना कथेसंदर्भातील आपली विधाने बदलावी लागतील, एवढी ताकद त्यांच्या कथांमध्ये आहे. मराठीला कथाकारांची सशक्त परंपरा आहे आणि अनेक कथाकारांनी लक्षवेधी प्रयोगही केले आहेत. आसाराम लोमटे मात्र कथा सांगताना माणसांच्या जगण्याचे पाप्रुे उलगडून दाखवण्याला प्राधान्य देतात. प्रयोगशीलतेच्या फंदात न पडता पारंपारिक कथनपरंपरेच्याच मार्गाने मराठी कथा पुढे नेतात.
आलोक या कथासंग्रहात आणि या दोन वर्षात लिहिलेल्या सहा कथा आहेत. प्रत्येक कथा साधारणपणे छापील बावीस ते सत्तावीस पानांची आहे, त्यामुळे या कथांना दीर्घकथा म्हटले तरी चालण्यासारखे आहे.
‘ओझं’ ही या कथासंग्रहातील सर्वात तापदायक कथा. आपल्यापेक्षा सात-आठ वर्षानी मोठय़ा पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावानं केलेला संवाद असं कथेचं स्वरूप आहे. कथेत काहीही विलक्षण घडत नाही किंवा कुठंही धक्का देणारे प्रसंग नाहीत, तरीही अगदी पहिल्यापासून ही कथा उध्वस्ततेचा एक भयान अनुभव देते. थोरला भाऊ शेती करणारा, पण पावसाअभावी शेतीतून उत्पन्न काहीच नाही उलट मातीत घातलेलं मातीतच जाण्याची स्थिती, धाकटा कुटुंबाला लागेल तशी मदत आत्मियतेने करीत राहतो. परस्परांवर कमालीचा जीव असलेल्या दोघा भावांचे भावबंध असे उलगडत जातात की, त्यातून कौटुंबिक जिव्हाळा, नात्यांची घट्ट वीण या साऱ्याचं एक मनोज्ञ चित्र समोर उभं राहतं. शेती करणाऱ्या थोरल्याला आपल्या मुलीची चतुराची काळजी असते. तिनं धाकटय़ाच्या घरी राहून शिकावं, अशी त्याची इच्छा परंतु ते नाही जमून येत. त्यामुळं तो कमालीचा दुखावला जातो. पावसाअभावी वाया गेलेलं बियाणं, खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेलं कर्ज, त्यातच लागलेलं दारु पिण्याचं व्यसन असं सारं कथेत येतं. ‘कलकलत्या उन्हात सावली घेऊन आलेल्या ढगानं निघून जावं अन उभ्या जन्माचीच दुपार व्हावी, तसं तिचं झालंय.’, हे वहिनीच्या आयुष्याबद्दलचं भाष्य किंवा थोरल्याच्या व्यसनाचं कळल्यानंतर, ‘आधी वाटायचं लांबून लांबून धूर दिसतोय. पण आता पायाखालीच विस्तव आल्यासारखं जाणवायला लागलं’ या साऱ्यामध्ये कमालीचा साधेपणा असला तरी सारं काळीज कुरतडणारं आहे. कुणाही संवेदनशील माणसाची झोप उडवण्याची ताकद या कथेत आहे. इतका हलवून टाकणारा, मनाच्या तळाशी सुरुंग लावणारा अनुभव अलीकडच्या काळात कुठल्या मराठी लेखकानं दिला नाही.
‘वळण’ ही या कथासंग्रहातील अशीच आणखी एक महत्त्वाची कथा. शेळ्या घेऊन रानात जाणाऱ्या बापाची मुलगी प्रयाग. बापाची लाडकी पगन. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रयाग उर्फ पगन या मुलीची ही कथा. स्कॉलरशीप मिळालेली शाळेतली एकुलती एक मुलगी. शिक्षणाची कमालीची ओढ आणि शिक्षणामुळंच आपलं भाग्य उजळणार आहे, याची समज असलेली,अंगभूत शहाणपणा असलेली. शेजारच्या गावात शाळेसाठी येणारी प्रयाग एकेदिवशी शाळेच्या वाटेवर घडलेल्या एका खुनाची साक्षीदार बनते आणि तिच्यासह तिच्या कुटुंबाचंही स्वास्थ्य हरवून जातं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिकणाऱ्या प्रयागच्या मार्गात अडथळे येतात आणि या साऱ्या भानगडीत तिची शाळाच बंद होण्याची पाळी येते. तिची शाळा सुरू राहण्यासाठी तिच्या अडाणी वडिलांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, शिक्षकांनी केलेली मदत या साऱ्याचे चित्रण कमालीचा अस्वस्थ अनुभव देते.
हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा बनल्याची नोंद असलेल्या आजोबांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आलेल्या नातवाला घडलेल्या आजोबांच्या कर्तृत्वाची सत्यकथा ‘चिरेबंद’, गावातल्या राजकारणातून परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा केला जातो याचे दर्शन घडवणारी ‘कुभांड’, आणि ग्रामपंचायत सदस्याच्या मृत्युनंतरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकारणाच्या अंतरंगाचा वेध घेणारी ‘जीत’ या संग्रहातील इतर कथाही महत्त्वाच्या आहेत.
डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची निस्पृहता आणि प्रलोभनांपासून दूर राहून सामान्य माणसांच्या सुखदु:खांप्रती असलेली निष्ठा दोन कथांमधून व्यक्त होते. लेखकाची वैचारिक भूमिका अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत. ‘खुंदळण’ ही डाव्या चळवळीतून प्रस्थापित राजकीय प्रवाहात आलेल्या दत्तराव या कार्यकर्त्यांच्या घुसमटीची कथा आहे. गावात आणि तालुक्याच्या राजकारणात मुख्य राजकीय प्रवाहापासून वेगळे राहून डाव्या चळवळीत काम करताना निवडणुकीच्या राजकारणात कधी यश येत नाही, असा दत्तराव कौटुंबिक अडचणीच्या काळात प्रस्थापितांच्या कळपाकडे ओढला जातो, ते त्याला सामावून घेऊन मुलीच्या लग्नासाठी मदतही करतात. परंतु जिथे आपली वैचारिक नाळ जोडली आहे, त्या चळवळीपासून तुटल्यामुळे दत्तरावची अवस्था मोठी कठिण होते. नव्या कळपात मन रमत नाही आणि चळवळीतले जुने लोक भेटेल तिथे टोमणे मारतात, अशा परिस्थितीत मनाचा हिय्या करून तो ज्यांच्यापासून तुटलो त्या अप्पांना भेटायला जातो. त्यावेळी ते म्हणतात, ‘दुसऱ्याच्या दावणीला चाऱ्यापाण्याची सोय झाली की लगेच पळतात. काही ढोरंच इतके हावरट की खुटा उपटून पळायची तयारी. मग जगता तरी कशाला ? माणसं पोट जगविण्यासाठी उन्हातान्हाचं राबतात. थोडं पाप केलं तरी पोट भरता येतं. काय गरज दिवस-रात्र रक्त ओकायची ? पण तसं नाही, कष्टकरी माणसं दोन वेळच्या पोटभर जेवणासाठी रक्ताचं पाणी करतात. बाया दोन-दोन महिन्यांची चिल्ली-पिल्ली झोळणीत टाकून मरमर मरतात. काय गरजय त्यांना इतकं सारं करण्यासाठी ? ही माणसं खंगून मरतील पण कोणाच्या वळचणीला जाऊन उष्टय़ावर जगणार नाहीत. जे त्यांना कळतं ते तुम्हाला कळत नाही.’ बदलती राजकीय संस्कृती आणि आयुष्यभर तत्त्वनिष्ठ राहून केलेले राजकारण याचं दर्शन घडवणारी ही कथा आहे. या कथेप्रामाणेच ‘वळण’ या कथेतही प्रयागची शाळा सुटू नये म्हणून मदतीला धावणारे डाव्या चळवळीतील भाई आहेत.
काही कथा पारंपारिक वळणाच्या वाटल्या तरी आसाराम लोमटे वेगळ्या वाटेने जाऊन माणसांच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करतात. आणि तो गाठता गाठता वाचकाच्या मनाचा तळ हलवून टाकतात. माणसांच्या जगण्याविषयी, नातेसंबंधांविषयी, त्याच्या संघर्षाविषयी कमालीच्या आस्थेनं आणि आत्मियतेनं ते लिहितात. ‘इडा पीडा टळो’ या पहिल्या संग्रहाच्या मलपृष्ठावर रंगनाथ पठारे यांनी म्हटले आहे की, आसाराम लोमटे यांच्या कथा या आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत. त्यांच्या कथांतील दु:खाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंत:करण घुसळून टाकतात. आपल्या भावनिक जडत्वावर प्रहार करणाऱ्या या स्वास्थ्यहारक कथा म्हणूनच फार महत्त्वाच्या आहेत.
...
आलोक (कथासंग्रह)
आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन, पृष्ठे एकशे त्रेसष्ठ, किंमत एकशे साठ रुपये.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर