पुन्हा मराठा आरक्षण
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून लवकरच मुद्दा मार्गी लावण्यात येईल , असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवजयंतीला शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात दिले आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला. आरक्षण हा सामाजिक मुद्दा असला तरीही अलीकडच्या काळात तो राजकीय पटावरील सगळ्यात संवेदनशील मुद्दा बनला आहे. त्याच्याशी खेळ म्हणजे साक्षात आगीशी खेळ असतो. अनेक राज्यांनी स्वतंत्रपणे आणि देशानेही अनेकदा त्याची झळ अनुभवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश वेळा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढून त्याच्या बळावर राजकारण केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच या प्रश्नाची तीव्रता सारख्या प्रमाणात नाही. पुण्याच्या काही भागासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाची तीव्रता अधिक आहे. मराठा सेवा संघ , मराठा महासंघ आणि त्यांच्याशी संलग्न विविध संघटना त्याप्रश्नी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतात. महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदेच्या तसेच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्याही निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये हा मुद्दा आला नाही. र...