ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव पंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता, जे लिहित होतो ती कविता होती किंवा नाही हेही समजत नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजला होतो. एप्रिल महिना असावा. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावरचं डांबरही वितळून त्याचे छोटे छोटे बुडबुडे येत होते. पावलांचे ठसे त्यावर ठसठशीतपणे उमटत होते. केशवराव भोसले नाटय़गृहाजवळ देवल क्लबच्या जुन्या इमारतीसमोर रस्त्यावर एक मळकट कागद पडला होता. कुतूहल म्हणून तो उचलला तर त्यावर गावनावाची कविता होती -
आभाळ जिथे घन गर्जे/ते गांव मनाशी निजले /अंधार भिजे धारांनी/घर एक शिवेवर पडले..
अन् पाणवठय़ाच्या पाशी/खचलेला एकट वाडा/मोकाट कुणाचा तेथे/कधिं हिंडत असतो घोडा..
झाडांतून दाट वडाच्या/कावळा कधीतरि उडतो/पारावर पडला साधू/ हलकेच कुशीवर वळतो..
गावांतिल लोक शहाणे/कौलांवर जीव पसरती/पाऊस परतण्याआधी/क्षितिजेंच धुळीने मळती..
- तसल्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्याउभ्याच कविता वाचून संपवली, तेव्हा पाय उचलता येईना. पाहिलं तर रस्त्यावरच्या डांबरात पायातलं स्लीपर रुतून बसलं होतं. ते तुटणार नाही, अशा बेतानं हातानंच हळुवारपणे काढलं. डांबरात पाय रुतला, तशीच ती कविता आणि त्या कवितेतलं गावातचं चित्र मनात रुतून बसलं. ती कविता कुणाची हे त्यावेळी माहित नव्हतं. त्यानंतर दोनेक वर्षानी संध्याकाळच्या कवितावाचताना त्यात ती कविता सापडली आणि म्हटलं, ‘अरे, हीच ती रस्त्यात सापडलेली कविता.भर दुपारी रणरणत्या उन्हात डांबरी सडकेवर झालेली ग्रेसनावाच्या कवीची कविता जशी मनात रुतून बसली होती, त्याचप्रमाणं संध्याकाळच्या कवितामधल्या कवितांनी मनावर गारूड केलं. जाणीवपूर्वक मिळवून ग्रेस वाचायला सुरुवात केली. चं्रमाधवीचे प्रदेश’, ‘राजपुत्र आणि डार्लिगनं झपाटून टाकलं.
क्षितिज जसे दिसते/तशी म्हणावी गाणी/ देहावरची त्वचा आंधळी/छिलून घ्यावी कोणी/गाय जशी हंबरते/तसेच व्याकुळ व्हावे/बुडता बुडता सांजप्रवाही/अलगद भरून यावेकवितेप्रमाणंच लयबद्ध असलेल्या त्यांच्या हस्ताक्षरातील पहिल्या कवितेनं व्याकुळतेचा विलक्षण अनुभव दिला आणि पुढच्या काळात त्यांच्या कवितेच्या असंख्य ओळी झिरपत झिरपत खोल मनाच्या डोहात, रक्तार्पयत उतरल्या. दुपारच्या वेळी झोपेतून जागे झाल्यानंतर खिडकीत कोसळणारा पाऊस अनुभवताना पाऊस कधीचा पडतो/झाडाची हलती पाने/हलकेच जाग मज आली/दु:खाच्या मंद स्वराने/या ग्रेसच्या ओळी मनाशी तादात्म्य पावतात.
कविता वाचून कवी तो दिसतो कसा आननि, असा प्रश्न सतत पडत राहिला. कवितेप्रमाणंच ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीही सतत गूढतेच्या धुक्याचं वलय राहिलं. त्यामुळं नागपूरला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वार्ताकनासाठी जाताना प्राधान्याचे विषय होते, ‘ग्रेसआणि आनंदवन’. अधिवेशनाच्या एका सुट्टीदिवशी ग्रेस यांना फोन केला, भेटायला यायचंय म्हटल्यावर त्यांनी सहजपणे याम्हणून सांगितलं. त्यांच्याविषयी जे ऐकलं होतं, त्याच्याशी विसंगत असा हा अनुभव होता. सुमारे तासाभराची ही भेट होती. ग्रेस यांच्याबद्दल जे कुतूहल होतं, ते सगळं विचारलं, अगदी बिनधास्तपणे. तेही मोकळेपणानं बोलत राहिले. रोजचा दिनक्रम, पुस्तकांची रॉयल्टी, त्याचा हिशेब, त्यांचं वर्गातलं शिकवणं, अन्य साहित्यिकांबरोबरचे संबंध..कितीतरी गोष्टींबद्दल विचारत राहिलो. त्याअर्थानं ती रूढ मुलाखतही नव्हती आणि म्हटलं तर अनौपचारिक गप्पाही नव्हत्या. गूढ आणि सगळ्यांपासून फटकून राहणारा हा कवी आपण समजतो तेवढा अलिप्त राहणारा नाही, हेही लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. स्वत:बद्दल, स्वत:च्या प्रतिमेबद्दल कमालीचं कुतूहल होतं त्यांना. नव्या पिढीवर असलेला त्यांच्या कवितेच्या प्रभावाची त्यांना चांगली माहिती होती आणि खूप लोक अनुकरण करतात, हेही माहीत होतं. ग्रेस यांच्या कवितेच्या गूढ धुक्यात फसलेल्या कित्येक नव्या कवींना बाहेर पडण्याची वाट न सापडल्यामुळे अनुकरणातच हौतात्म्य प्राप्त झालं. त्याअर्थानं कवींसह रसिकांनाही मोहात पाडणारा ग्रेस यांच्यासारखा दुसरा कवी मराठीत नाही. यावेळी जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल ते भरभरून बोलले. अन्य साहित्यिकांबरोबर फारशी सलगी नसल्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘जीए कुलकर्णी यांच्यासारख्या हिमालयाशी संवाद असल्यावर छोटय़ा टेकडय़ा काय करायच्या?’ इतकं रोखठोक होतं सगळं त्यांचं. जगभरातल्या प्रतिभावंतांशी स्वत:ला जोडून घेणाऱ्या या प्रतिभावंत कवीला प्राध्यापक म्हणून काम करताना मराठीतले अनेक बेताचे कवीही वर्गात शिकवावे लागत होते. त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘मी जनाबाई शिकवतो, तुकाराम, ज्ञानेश्वर शिकवतो. ते शिकवताना ज्या तादात्म्यानं शिकवतो, त्यावरून विद्यार्थ्यांना कवींमधला फरक समजत असावा.हे खास ग्रेस स्टाइल. स्वत:च्याच मस्तीत लिहिणाऱ्या या कवीनं आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे दाब निर्मितीवर कधीच येऊ दिले नाहीत. एकीकडं दलित साहित्याचा प्रवाह सशक्त बनला असताना आणि मराठीचे अध्यापक म्हणून त्याचं अध्यापनही करणाऱ्या ग्रेस यांनी आपली साहित्य निर्मिती बाह्य दबावांपासून अलिप्त ठेवली. त्यासंदर्भातील आक्षेपांचं खंडन करताना त्यांनी शेक्सपिअरचा दाखला देत बांधिलकी मानली नाही म्हणून साहित्य कमी प्रतीचं ठरत नाही, असं ठाम समर्थनही केलं.
तुकारामहा त्यांचा विलक्षण आवडीचा कवी. राजपुत्र आणि डार्लिगमधल्या तुकारामांवरील कवितेच्या ओळी अशाच झिणझिण्या आणणाऱ्या आहेत - चार चौघे खांदा देतील म्हणून का हुरळून जाऊ / फुटक्या कवटीत तुझा मेंदू कुणासाठी भरून ठेवू ?’ ‘चर्चबेलमध्ये आकांताचे देणेनावाचा तुकारामांवरील लेख आहे. त्याची सुरुवातच विलक्षण आहे - तुकाराम एक थोर कवी. प्रचंड शक्तीचा; आणि आक्रमक प्रतिभेचा. तुकारामाची कविता मला फारशी आवडत नाही. पण मी कोण? कोणीच नाही. त्यामुळे तुकारामाला धक्का पोहोचत नाही.
या लेखात तुकारामांच्या कवितेतील आकांतवृत्ती किती ज्वालाग्राही आहे आणि तुकाराम आपल्या प्रत्येक आकांतवृत्तीचे विसर्जन अनुभूतीच्या करुणामूल्यात कसे करतात, हे ्रग्रेस यांच्या शब्दात मुळापासून वाचण्यासारखे आहे.
चर्चबेलमधल्या एका लेखात त्यांनी म्हटलंय - दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूस मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो मार्ग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इं्िरय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तु !
ग्रेस यांच्यासंदर्भातली एक ऐकलेली, वाचलेली गोष्ट आठवते. खूप वर्षापूर्वी दूरदर्शन वर प्रतिभा आणि प्रतिमानावाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. त्यात ग्रेस यांची मुलाखत झाली होती. ती पाहण्याचा योग आला नाही, परंतु त्या मुलाखतीचे किस्से मात्र खूपदा ऐकायला मिळाले. ग्रेस यांनी स्वत:च्या अटींवर ती मुलाखत दिली होती. मुलाखत सुरू झाल्यापासून संपेर्पयत दूरदर्शनच्या पडद्यावर म्हणे फक्त सिगारेटचा धूर दिसत होता आणि ग्रेस यांचे शब्द धुक्यातून आल्यासारखे वाटत होते. अखेरच्या काळात ग्रेस यांना कर्करोगानं ग्रासलं होतं आणि ते आपल्या पद्धतीनं त्याच्याशी लढत होते. ही लढाई सुरू असतानाच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा वाटलं, या महाकवीला लढाईसाठी पुरस्कारामुळं बळ मिळेल. परंतु या लढाईत ग्रेस हरले. तेव्हा वाटलं, परमेश्वर सामान्य माणसाचे नियम प्रतिभावंतालाही लावून अन्याय करतो, हेच खरं !

टिप्पण्या

  1. गोडघाटे सर कदाचित तुकारामासारख्या सुबोध कवीला त्यांच्या दुर्बोध भाषेत शिकवीत असतील.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर !कालच आम्ही साता-यातील मित्रांनी ग्रेस यांच्या आठवणी जागविल्या.वर्ष झाले.तू म्हणतोस तसे ग्रेस रुतलेत हेच खरे.खूप खोल.मनात.अगदी मनाच्याही मनात.काही कार्यक्रमानिमित्त साता-यातून जेंव्हा ते जायचे तेंव्हा दोन -तीनदा त्याना भेटण्याचा योग आला होता.ऐकले तेव्हढा माणूस अगदीच नव्हे (तर नाहीच)एकलकोंडा,तीरसट नव्हता.स्टेशनवर भेटलो.आम्ही आवर्जून भेटलो म्हणून कोण कौतुक केले.आम्ही १मे ला गुलमोहोर डे साजरा करतो.त्याला सलग पाच वर्षे फोन करून शुभेछा देत असत.मोठा माणूस.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट