येडियुरप्पांची मुजोरी



 बूकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून  जुलै  रोजी पायउतार झाले, त्याला अकरा महिने झाले. म्हणजे अजून वर्षसुद्धा पूर्ण झालेले नाही. एकीकडे भारतीय जनता पक्षाने कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकले असताना अवैध खाणकाम प्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात येडियुरप्पा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा मागितला. परंतु येडियुरप्पा हे एवढे घमेंडखोर की, त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला.  आमदारांसह  खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले. साधनशुचिता आणि शिस्तीचा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे प्रसंग भूतकाळात पाहिले असले तरी येडियुरप्पांचे प्रकरण जरा जास्तीच हाताबाहेर गेल्यासारखे होते. त्यात नितीन गडकरी यांना जुमानायचे नाही, असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु त्यांचे सगळेच वर्तन संघाच्या आणि भाजपच्या शिस्तीच्या परंपरेला सुरुंग लावणारे असल्याने ते कोणत्याच नेत्याला आणि गटाला मानवणारे नव्हते. त्यामुळे मिळून सारे त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहिले आणि येडियुरप्पांनी आदळ आपट करीत, कुणाच्या कानाखाली वाजवत, कुणाचा लॅपटॉप फोडत राजीनामा दिला होता. त्यांच्याच संमतीने सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. वर्षभरापूर्वीचा हा सगळा प्रकार अद्याप ताजा आहे, परंतु मधल्या काळात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सदानंद गौडा यांनी येडियुरप्पांचा रिमोट झुगारल्यामुळे ते दुखावले आणि त्यांनी गौडांच्या खुर्चीखाली सतत फटाके फोडण्यास सुरुवात केली. गौडांना हटवण्यासाठी पक्षनेतृत्वाला सतत आव्हान दिले.
एखाद्या प्राण्याला माणसाच्या रक्ताची चटक लागल्यावर तो नरभक्षक बनतो, त्याचप्रमाणे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदी असताना सत्तेची चटक लागली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर वचक असूनसुद्धा सत्तेशिवाय त्यांची अवस्था पाण्याबाहेरच्या माशासारखी झालेली दिसते. त्यामुळे ते अधुनमधून बंडाचे निशाण फडकावत आणि शक्तिप्रदर्शन करून आपल्याला मुख्यमंत्री करा, म्हणून पक्षाला भीती दाखवत. पक्षाने आतार्पयत त्यांच्या मागणीला धूप घातलेला नाही, परंतु पक्षनेतृत्व कणखर नसल्यामुळेच त्यांची नाटके सुरू राहिली. अवैध खाणकामप्रकरणी निर्दोषत्व सिद्ध होत नाही, तोर्पयत पक्ष आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी यावेळी पाहिजे जातीचेअसा नवा पवित्रा घेतला आहे. आपण नाही, तर आपल्या लिंगायत समाजातले जगदीश शेट्टर यांचे नाव त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. त्यासाठी गेले आठवडाभर त्यांचे समर्थक आमदार जोर-बैठका काढत आहेत. नऊ मंत्र्यांनी राजीनामे देऊन या मोहिमेला आक्रमक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने त्याची दखल घेऊन दिल्लीहून निरीक्षक पाठवले आणि येडियुरप्पा यांची समजूत काढून वादळ तूर्त शमवण्यात यश मिळवले.
येडियुरप्पा यांना माहीत आहे, की भाजपच्या राजवटीत कर्नाटकात जी नाटके झाली आहेत, ती पाहून येत्या किमान दहा वर्षात कर्नाटकातील जनता पुन्हा भाजपचा नाद करणार नाही. येत्या मे मध्ये म्हणजे दहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. कदाचित त्याआधीही होतील आणि कर्नाटकातून भाजपचे देव उठतील. म्हणूनच उरलेल्या कालावधीत भले तो, चार-पाच महिन्यांचा का असेना मिळेल तेवढा हात मारून घ्यायला हवा, याचसाठी येडियुरप्पा यांचा आटापिटा चालला असावा.
येडियुरप्पा यांनी केवळ बंड करूनच नव्हे, तर अनेक प्रकारे पक्षाला उप्रव देणे सुरू केले. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचे नशीब एवढेच की, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभात येडियुरप्पा आपल्या समर्थकांचे वऱ्हाड घेऊन गेले नाहीत. नाहीतर लग्नाला म्हणून यायचे आणि आहेराऐवजी समर्थक आमदारांच्या सह्यांचे निवेदन देऊन नेतृत्व बदलाची मागणी करायचे. येडियुरप्पा एवढे इरेला पेटले आहेत की, त्यांनी तसे केले असते तरी आश्चर्य वाटले नसते. मधे मधे त्यांनी पक्षनेतृत्वाला असे झटके दिले आहेत. भाजपसह सारा संघपरिवार प्रारंभापासून सोनिया गांधी यांच्यावर आगपाखड करीत असताना येडियुरप्पा यांनी मात्र सोनिया गांधी यांचे मध्यंतरी कौतुक केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची व्यूहरचना सुरू असतानाच येडियुरप्पा यांनी प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सांगून आपल्याच पक्षाच्या नेत्यांची पंचाईत करून टाकली. एखाद्या पक्षाचा प्रादेशिक पातळीवरील नेता एवढा मुजोर कसा होऊ शकतो, याचा विचार करताना भाजपच्या दक्षिणेतील स्थितीवर नजर टाकावी लागते. कर्नाटकात एकेकाळी भाजपला 0.4 टक्के मते मिळत होती, ती आपल्या प्रयत्नांमुळे  35टक्क्य़ांर्पयत गेली आहेत आणि राज्यातील भाजपमधील आमदारांची संख्या दोन वरुन 122  र्पयत केवळ आपल्याचमुळे गेल्याचा येडियुरप्पांचा दावा आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी जातीचा आधार घेतला आहे. कर्नाटकात वीस टक्के लिंगायत मतदार आहेत आणि ती आपली व्होट बँक आहे, पक्षाने आपली कदर केली नाही तर लिंगायत मतदार पक्षाला माफ करणार नाही, अशी धमकीही ते आडून आडून देत असतात. कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार स्थापन करण्यासाठी बेल्लारीच्या रेड्डी बंधूंची मदत घेताना भाजपने साधनशुचिता गुंडाळून ठेवली, त्याच रेड्डी बंधूंच्या खाणीत येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रिपदाची आहुती गेली. असंगाशी संग करताना भाजपला काही गैर वाटले नाही, कारण कर्नाटकापासून त्यांना दक्षिण दिग्वीजयावर निघायचे होते. दुर्दैवाने नंतरच्या काळात दक्षिणेतील एकाही राज्याने भाजपला थारा दिला नाही. आता तर कर्नाटकातील राजवटही ऱ्हासाकडे निघाली असून येणाऱ्या निवडणुकीत त्याचा निकाल लागेल आणि भाजपसाठी दक्षिणेकडचे दरवाजे बंद होतील.
भाजपमधील नेतृत्वाचा अंतर्गत संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न येडियुरप्पा करताना दिसतात. पक्षाला एकमुखी नेतृत्व नाही. लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे एकमेव राष्ट्रीय नेते असले तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या यादीत असल्यामुळे पक्षात त्यांच्या शब्दाला किंमत नाही. रा. स्व. संघाने हट्टाने राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केलेले नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणात ज्युनिअर असल्यामुळे पक्षाचे अन्य नेते त्यांना मानायला तयार नाहीत. सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरें्र मोदी, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह यांच्यातही ताळमेळ नाही. त्यामुळे येडियुरप्पांचे फावते आहे. येडियुरप्पा यांच्यावर कारवाई म्हणजे कर्नाटकातील सत्तेला स्वत:च्या हाताने सुरुंग लावण्यासारखे असल्यामुळे भाजपचे नेतृत्व ती जोखीम घ्यायला तयार नाही आणि याचाच फायदा उठवत येडियुरप्पा अधुनमधून पक्षनेतृत्वाला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांना माहीत आहे की, आपल्यावर कारवाई करण्याची पक्षनेतृत्वात धमक नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यात एवढे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे की, आपल्यावर कारवाई करण्याचे कुणी बोलून दाखवले तरी अंतर्गत संघर्षातून परस्पर त्याला विरोध केला जाईल. आपल्याला त्यासाठी काहीच करावे लागणार नाही. त्याचमुळे ते बंगळुरूपासून दिल्लीर्पयत एखाद्या डॉनसारखे मिरवतात. पक्षनेतृत्वाला आव्हान देतात. आपल्या मागणीसाठी अल्टीमेटम देतात. पक्षनेतृत्वही त्यांच्या या उथळ व्यवहाराकडे हतबल होऊन पाहात राहते आणि थातूर मातूर आश्वासन देऊन आजचे संकट उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करते. येडियुरप्पा यांची मुजोरी मात्र दिवसेंदिवस वाढतच जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर