विकलांग आंदोलनाला ‘राजकीय’ संजीवनी


  माणसाची उंची माणसाएवढीच राहणे योग्य असते. परंतु राजकारण, समाजकारणात स्वत:च्या प्रतिमेपेक्षा मोठी पोस्टर्स लावून आपण प्रत्यक्षात जेवढे आहोत त्यापेक्षा अधिक मोठे आहोत, अशा भ्रमात वावरणाऱ्या मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. अण्णा हजारे यांच्या भोवतीच्या कोंडाळ्याने त्यांचे भव्य पोस्टर बनवले, अण्णांना गांधीजींपेक्षा मोठे भासवण्यासाठी त्यांचे होलसेल मार्केटिंग केले. प्रतिमेपेक्षा मोठे पोस्टर बनवले तेव्हाच, त्याला कितीही बाजूंनी टेकू दिले तरी ते कोलमडण्याची हमी होती आणि तसेच घडले. अपेक्षित पाठिंबा आणि प्रकृतीची साथ न मिळाल्यामुळे अण्णांना मुंबईतील तीन दिवसांचे उपोषण दुसऱ्याच दिवशी मागे घ्यावे लागले. त्याबरोबर गेले नऊ महिने भावनिक लाटांवर आरूढ होऊन उन्मादाने उसळणारे एक आंदोलन अकाली विकलांग झाले.
अण्णा आणि त्यांची सिव्हील सोसायटी विरुद्ध घटना आणि संसदेचे सार्वभौमत्व मानणारे अशा दोन गटांमध्ये तुंबळ हमरीतुमरी सुरू होती. देशातील तमाम प्रसारमाध्यमे अण्णांच्या बाजूने क्रांतीची मशाल घेऊन मैदानात उतरली होती. अण्णा आणि त्यांच्या चौकडीचा उन्माद एवढा होता, की अण्णांना विरोध करणारा तो भ्रष्टाचारी किंवा भ्रष्टाचाराचा समर्थक असे चित्र रंगवले जाऊ लागले. टीम अण्णापेक्षा प्रसारमाध्यमांचा उथळपणा आणि उन्माद अधिक होता. तरीही अण्णांचे उपोषण फसले तेव्हा अण्णांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांपैकीही अनेकांना हळहळ वाटल्यावाचून राहिले नाही. भावनिक मुद्दय़ांवर उभ्या राहणाऱ्या आंदोलनांचे जे व्हायचे असते तेच अण्णांच्या आंदोलनाचे झाले. परंतु भ्रष्टाचारासारख्या गंभीर मुद्दय़ावर उभे राहिलेले आंदोलन मुद्दा सोडून भरकटले आणि भावनिक पातळीवर नेल्यामुळे ते अकाली शरपंजरी पडले, ही त्यातली दुर्दैवी बाब होती. अण्णा हटवादी आहेत, हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत हे आक्षेप अण्णांच्यावर आधीही घेतले जात होते, तरीसुद्धा कोणतीही ताकद नसलेला हा माणूस सत्याग्रहाचे हत्यार वापरून सरकार नावाच्या मदमस्त सत्तेला नमवतो, त्याबद्दल त्यांच्याप्रती मनाच्या एका कोपऱ्यात आदर, सहानुभूती होती. अण्णा दिल्लीत गेल्यानंतर चांडाळ चौकडीच्या हातातील बाहुले बनले आणि गर्दी पाहून त्यांच्या वागण्या-बोलण्यातून अहंकार डोकावू लागला, तिथूनच त्यांनी आपले सहानुभूतीदार गमावायला सुरुवात केली. दिल्लीतल्या प्रतिसादाच्या लाटा मुंबईत येईर्पयत ओसरल्या त्यामागे हेच कारण होते. परंतु स्वत: अण्णा किंवा त्यांच्या चांडाळ चौकडीतील कुणाच्याही ते लक्षात आले नाही. स्वत:च्या प्रेमात पडलेल्या लोकांचे असेच होत असते. अनेक जनआंदोलने समर्थपणे हाताळणाऱ्या मेधा पाटकर यांच्या लक्षात अण्णांच्या आंदोलनातील त्रुटी आल्या नसतील, असे कसे म्हणायचे? मेधा पाटकर या काही केजरीवाल, किरण बेदी यांच्यासारख्या उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या गणंग नाहीत. तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांसाठी सारी हयात त्यांनी खर्ची घातल्यामुळे आंदोलनाचा चेहरा त्यांना वाचता यायला पाहिजे होता, परंतु अण्णांभोवतीच्या अलोट गर्दीने त्यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्तीलाही भूल पाडली. ही सारी गर्दी म्हणजे क्रांतिसाठी सज्ज झालेले क्रांतिकारक आहेत आणि आपण या आंदोलनापासून काडीमोड घेतला तर एका ऐतिहासिक लढय़ाच्या श्रेयापासून वंचित राहू, अशी भीती त्यांना वाटली असावी. अण्णांनी मुंबईत उपोषण केले तेव्हा हे क्रांतिकारक ख्रिसमसच्या सुटीवर गेले होते आणि वर्षाखेरीला मद्याच्या फेसाबरोबर फसफसणाऱ्यांमध्ये याच क्रांतिकारकांचा भरणा होता, हे एव्हाना मेधा पाटकर यांच्या लक्षात आले असेल. टीम अण्णा एकापाठोपाठ एक चुका करत गेल्यामुळे नऊ महिने पूर्ण व्हायच्या आत देशातील जनतेने मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर अण्णांच्या आंदोलनाचे शटर ओढले. सिव्हील सोसायटीच्या उन्मादाला लोकांनीच परस्पर उत्तर दिल्यामुळे अण्णाविरोधकांना विशेषत: काँग्रेसच्या पाठिराख्यांना आनंद वाटणे स्वाभाविक असले तरीही आंदोलनाची शोकांतिका कुणाही संवेदनशील व्यक्तिला चटका लावणारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जनतेचा सर्वाधिक पाठिंबा मिळालेला लढा अवघ्या नऊ महिन्यांत विकलांग व्हावा, हे कारुण्यजनक होते. जेपींच्या आंदोलनानंतर देशात सत्तापरिवर्तन झाले होते, म्हणजे किमान सत्तापरिवर्तन करण्याएवढी ताकद त्या आंदोलनात होती. अण्णांचे आंदोलन त्या तुलनेत टीव्हीच्या पडद्यापुरतेच मर्यादित राहिले. काँग्रेसविरोधी टोकाचा द्वेष व्यक्त करूनही दरम्यानच्या काळात झालेल्या पोटनिवडणुकांत आणि महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांतही लोकांनी काँग्रेसला भरभरून मते दिली, परंतु त्याचा अर्थ टीम अण्णाने समजून घेतला नाही.
अण्णांच्या आंदोलनाचे मुंबईच्या एमएमआरडीए मैदानात पानिपत झाले, असे वाटत असतानाच सगळ्या राजकीय पक्षांनी आणि विशेषत: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने त्या आंदोलनात पुन्हा प्राण फुंकण्याचे काम केले. दुर्दैवाने आंदोलनानंतर अण्णांची प्रकृती खालावली आणि आंदोलनाला मिळालेल्या झटक्यामधून टीम अण्णाचे सदस्य सावरले नाहीत, त्यामुळे त्यांना राजकारण्यांच्या निर्लज्जपणाचा लाभ उठवता आला नाही. परंतु लोकपाल विधेयकावरून राज्यसभेत ज्या निर्लज्जपणे सरकारपुरस्कृत तमाशा झाला, तो पाहिल्यानंतर सरकार आणि संसद यांच्याप्रती आदर असणाऱ्यांनाही एका क्षणी टीम अण्णाचा हेकेखोरपणा योग्य होता की काय, असे वाटल्यावाचून राहिले नाही. दोन दिवस आधी लोकसभेत कमावले ते सरकारने राज्यसभेत मध्यरात्री गमावले. अण्णांच्या विकलांग बनलेल्या आंदोलनामध्ये पुन्हा प्राण भरण्यासाठी एवढी कृती पुरेशी आहे. आतार्पयतच्या वाटचालीत काँग्रेसने काही ऐतिहासिक चुका केल्या असल्या तरी काँग्रेसच्या व्यापक शहाणपणावर देशवासीयांचा विश्वास आहे. म्हणूनच टीम अण्णा रस्त्यावर गोंधळ घालत असतानाही काँग्रेसबद्दल सहानुभूती असलेला मोठा वर्ग होता. लोकपाल विधेयक लोकसभेत मांडून आणि ते मंजूर करून घेऊन सरकारने आपल्या समर्थकांची आणि अनेक विरोधकांचीही मने जिंकली. परंतु राज्यसभेतील तमाशामुळे आंदोलनाला राजकीय संजीवनी मिळाली असून यापुढील काळात टीमअण्णाने कितीही गोंगाट केला तरी, त्यांना दोष देणे कठिण जाईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर