पवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे..  चार दशकांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या शरद पवार यांचे राजकीय आयुष्य चढउतारांनी भरले असून त्यात नाटय़मय घटनांची रेलचेल आहे. त्यामुळे पवार यांच्या दरवेळच्या मुलाखतीतून नवी बातमी मिळते. पवारांनी गेल्या दशकभरात अशा अनेक बातम्या दिल्या आहेत. खंजिर प्रकरणापासून बाबरी मशीद पाडण्यार्पयतच्या घटनांसंदर्भातील आपली भूमिका सांगून संबंधित घटनांची वेगळी बाजू समोर आणली आहे. आपल्याशी संबंधित अनेक राजकीय घटनांवरचा धुक्याचा पडदा स्वत:च दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
अलीकडेच स्टार माझाया वृत्त वाहिनीसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आणि वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीने वृत्तपत्रांना काही बातम्या दिल्या. महाराष्ट्रातील नवे नेतृत्व, राष्ट्रवादीतील नेतृत्वाची विभागणी यासंदर्भात पवार मनमोकळेपणाने बोलले. याच मुलाखतीतून आणखी एका महत्त्वाच्या घटनेसंदर्भात पवार यांनी भाष्य केले आहे किंवा चुकीची कबुली दिली आहे. एकोणिसशे त्र्याण्णवमध्ये संरक्षणमंत्री पदावरून पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतरची ही घटना आहे. एक्क्य़ाण्णवमध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पवारांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला पाचारण केले. त्यावेळी सुधाकरराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सुपूर्द करून पवारांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. त्र्याण्णवमध्ये मध्ये जातीय दंगलीमुळे देशाची आर्थिक राजधानी होरपळून निघाली. दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्रिपदी असलेल्या नाईक यांना यश आले नाही, त्यामुळे नरसिंहराव यांनी पवार यांना मुंबईत पाठवले. आपला अनुभव आणि प्रशासन कौशल्याच्या बळावर पवार यांनी दंगल नियंत्रणात आणण्याबरोबरच मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणले. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक पूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे चित्र पुढे आले आणि त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत असंतोषही उफाळून आला. त्यावेळी परिस्थितीची गरज किंवा नरसिंहराव यांची राजकीय खेळी असेल, पवार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात आले. यापूर्वी पवार यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींमधून मुंबईतील दंगल नियंत्रण किंवा बॉम्बस्फोटावेळची परिस्थिती हाताळल्यासंदर्भात विवेचन केले होते. परंतु त्यातील मधल्या बऱ्याच ओळी रिकाम्या होत्या. बिट्विन द लाईन्सम्हणतात तशा प्रकारे. पवार यांच्या एकूण राजकीय वर्तनव्यवहारात त्यांच्या प्रत्यक्ष कृती, इशारे किंवा शब्दांपेक्षा त्यातल्या रिकाम्या जागाच महत्त्वाच्या मानल्या जातात. अलीकडच्या काही वर्षात पवार अधुनमधून मधल्या काळातल्या मोकळ्या जागाही भरू लागले आहेत. काही गोष्टींची कबुली देऊ लागले आहेत. दंगलीच्या वेळी आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. बेस्टची बससेवा, आरेचा दूधपुरवठा आणि लोकल वाहतूक सुरळीत केली. त्यावेळी माझे चुकलेच, ती गोष्ट सुधाकरराव नाईक यांच्याकडून करून घ्यायला हवी होती, अशी कबुली पवार यांनी दिली आहे. कारण त्यामुळे आपण आणि सुधाकरराव नाईक यांच्यातील अंतर वाढल्याचे पवार यांनी मान्य केले.
दोघांमधले गैरसमज दूर व्हायला सहा वर्षाचा कालावधी जावा लागला. पवार यांनी काँग्रेसमधून निलंबन ओढवून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यापूर्वी  पहिला मेळावा घेतला, त्या मेळाव्यासाठी पवार यांच्यासोबत सुधाकरराव नाईक आलेले पाहून अनेकांना धक्का बसला होता. राजकीय कारकीर्दीतील अत्यंत कठिण काळात सुधाकरराव नाईक यांची सोबत, ही पवार यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि नव्या वाटचालीला बळ देणारी घटना होती.
पवार यांनी भूतकाळाल्या आठवणींना उजाळा द्यायचा, तर त्यांना अनेक गोष्टींची कबुली द्यावे लागेल आणि भविष्यातही अनेक कबुल्या देत राहावे लागेल, असे वर्तमानावरूनही दिसून येते. परळीच्या मुंडे कुटुंबात सध्या जे महाभारत सुरू झाले आहे, त्यासंदर्भात पवार यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी महत्त्वाची ठरू शकली असती. परंतु त्यापासून ते अलिप्त राहिले आहेत, त्यामागे त्यांची हतबलता आहे की, जे होईल ते पाहात राहण्याची भूमिका हे स्पष्ट होत नाही. शरद पवार यांनी आपल्या वाटचालीत विरोधकांवर मात करताना सगळे हातखंडे वापरले असतील, शब्द फिरवले असतील किंवा विरोधकांच्या शब्दात बोलायचे तर विश्वासघाताचे राजकारण केले असेल. कुणी कितीही आरोप केले तरी त्यांनी सुसंस्कृत राजकारण केले. म्हणूनच परवा दिल्लीत त्यांच्यावर माथेफिरूने हल्ला केला तेव्हा सगळे राजकीय पक्ष आणि नेते त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. राजकारण आणि व्यक्तिगत संबंध याची गल्लत केली नाही म्हणूनच सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे, त्यावरून त्यांना सतत संशयाच्या भोवऱ्यातही ढकलले जाते. बाकी काहीही असले तरी घरे फोडण्याचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. उलट जिथे जिथे अशी शक्यता वाटली तिथे जोडण्याचे काम केले. उदाहरणे अनेक आहेत. जयदेव ठाकरे यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यावेळी ठाकरे-पवार संघर्ष तीव्र असतानाही पवारांनी, कौटुंबिक मतभेदाला खतपाणी न घालण्याची भूमिका घेतली. साताऱ्याच्या अभयसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजेंना भाजपमध्ये घेऊन राजकारण केले होते. परंतु पवार यांनी हा वाद सामोपचाराने मिटवून त्यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. साताऱ्याच्या राजघराण्यातील सलोख्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामागे मोहिते-पाटील यांचे घर फुटू नये हे प्रमुख कारण होते. कारण विजयसिंह किंवा रणजितसिंह यापैकी कुणालाही उमेदवारी दिली असती तरी त्यांचा सामना प्रतापसिंह मोहिते-पाटलांशी होणार होता. प्रतापसिंहांनी आधीच प्रचाराचा नारळही फोडला होता, पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी माघार घेतली. 
परळीमधून विधानसभेसाठी पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु गोपीनाथरावांची मुलगी उभी राहिली आहे, तिथे आपण असा विचार करणार नसल्याचे सांगून पवार यांनी ते नाकारले होते. याचा मुंडे कुटुंबात दरी निर्माण झाली होती आणि ती वाढतच चालली होती. काका-पुतण्यार्पयत ती मर्यादित होती, तोवर ठीक होते. परंतु जेव्हा गोपीनाथरावांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे त्यात उतरले आणि त्यांनी मुंडे-महाजन कुटुंबातील कौटुंबिक पातळीवरील मतभेद चव्हाटय़ावर मांडले तेव्हा प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट झाले. कौटुंबिक पातळीवरील प्रकरण हाताळण्यात गोपीनाथ मुंडे स्वत:च अपयशी ठरले असून त्याबद्दल त्यांना इतर कुणावर दोषारोप करता येणार नाहीत. हे खरे असले तरीही कौटुंबिक वादात रस घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासला आहे. अजित पवार यांचा वैचारिक वकुब पाहता त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. परंतु शरद पवार यांनी ठरवले असते तर यातल्या अनेक बाबी टाळू शकले असते. अजित पवार यांच्या सत्ताकांक्षेपुढे शरद पवार यांचा धृतराष्ट्र झाला आहे, हेच यावरून दिसून येते. हे एकूण प्रकरण म्हणजे आणखी काही वर्षानी शरद पवार यांना आणखी एक कबुली देण्यासाठीची संधी म्हणावी लागेल. त्यावेळी पवार म्हणतील, ‘अजितने गोपीनाथ मुंडेंचे घर फोडले तेव्हा मी हस्तक्षेप करायला हवा होता. परंतु तो न करून मी गंभीर चूक केली. यशवंतरावांनी आम्हाला अशी शिकवण दिली नव्हती..

टिप्पण्या

  1. 1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यावर वाट्टेल ते आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्याची मोठी किंमत पवारांना चुकवावी लागली. ते त्या आरोपांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. पण वाट्टेल ते आरोप करणाऱ्या मुंडे यांनी नंतर त्यातील एकही आरोप सिद्ध करुन दाखवण्याची तसदी घेतली नाही. मोठ्या पवारांनी याकडे फारसे लक्ष दिले नसले तरी आरोप सिद्ध न करण्याची जबाबदारी घेता कुणी काही बोलत राहिले तर त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे या भूमिकेतून अजित पवारांनी मुंडेंचे वर्तन गांभीर्याने घेतेले आहे. घर फोडण्याचा मुद्दा असेल तर आपणच आपल्या घरात आग लागत असताना शांत बसून नंतर त्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात काय हशील आहे...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट