निळा कोल्हा, गांधीजी वगैरे…




निळ्या कोल्ह्याची गोष्ट बहुतेकांना माहीत आहे. भूक लागल्यामुळे गावात शिरलेल्या कोल्ह्याच्या मागे कुत्री लागतात, तेव्हा कोल्हा एका धोब्याच्या घरात शिरतो आणि जीव वाचवण्यासाठी पिंपात लपून बसतो. त्या पिंपात नीळ असते. कुत्री निघून गेल्याचा अंदाज घेऊन थोडय़ा वेळाने निळीत भिजलेला कोल्हा बाहेर येतो आणि जंगलात धूम ठोकतो. निळ्या कोल्ह्याला पाहून कोण हा विचित्र प्राणी आला म्हणून वाघ, सिंहासह सारे प्राणी घाबरून जातात. निळ्या रंगामुळे सगळे घाबरल्याचे लक्षात आल्यावर कोल्हा परिस्थितीचा ताबा घेतो आणि म्हणतो, ‘मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी पाठवले आहे. आजपासून मी तुमचा राजा असेन.ब्रह्मदेवाचीच आज्ञा असल्याचे मानून वाघ, सिंहासह सगळे प्राणी त्याचा जयजयकार करतात. कोल्हेराजाची राजवट सुरू होते. एके दिवशी दरबार भरलेला असतानाच राज्याबाहेर कोल्हेकुई सुरू होते. त्याबरोबर निळ्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि भावनातिरेकात तेही आपल्या बांधवांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागतात. भर दरबारात सोंग उघडे पडते तेव्हा सारे प्राणी त्याच्यावर हल्ला करतात..
सोंग घेतले की असेच होते. सोंग असो किंवा मुखवटा ते सदासर्वकाळ निभावता येत नाही. त्याला काहीएक कालमर्यादा निश्चितच असते. गांधीजींचे सोंग ही तर महाकठीण गोष्ट. अर्थात बालवाडीपासून विद्यापीठांर्पयतच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गांधीजींची सोंग काढले जाते. गणपतीच्या मिरवणुकीत, काही मोर्चामध्येही गांधीजींचे सोंग घेतलेली पात्रे भेटतात. पंचा, टक्कल, चष्मा आणि हातात काठी घेतले की झाले गांधीजी. हे सोंग फारसे अवघड नसते. कारण सोंग काढणाऱ्याला गांधीजींच्या भूमिकेत शिरण्याची गरज नसते. त्यांना गांधीजींसारखी वेशभूषा करून डिट्टो गाांधींसारखे दिसण्यात त्यांना गंमत वाटत असते. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मोर्चा किंवा मिरवणूक संपली की सोंग संपत असते. त्यानंतर ती व्यक्ती आपापले छंद जोपासण्यास मोकळी असते. कदाचित मोर्चात किंवा मिरवणुकीत भेटलेले हे गांधीजी नंतर बार किंवा गुत्त्यामध्येही आढळू शकतात. गांधीजींचे सोंग वठवले म्हणून त्यांच्यासारखे वागण्याचा आग्रह धरला जाऊ लागला तर सार्वजनिक जीवनातून गांधी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि केवळ गांधीजींसारखी वेशभूषा केली म्हणून गांधीजींच्या जवळपास जाता येत नाही. गांधीजींचे नाव घेतले किंवा त्यांनी केलेली एखादी कृती केली म्हणून प्रतिगांधी बनता येत नाही.
दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरोधात लढा उभारला असताना एका गोऱ्या पठाण तरुणाने केलेल्या हल्ल्यात गांधीजींचे दात पडले होते. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल केल्यावर गांधीजींचे समर्थक जमले आणि त्या तरुणाविरोधात पोलिस तक्रार करुया, त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणू लागले. तेव्हा त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वावर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू.त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी पदयात्रा काढली होती, तेव्हा अनेकदा सनातन्यांनी त्यांच्यावर शारीरिक हल्ले करण्याचे प्रयत्न केले. परंतु यापैकी कोणत्याही वेळी गांधीजींनी त्या हल्ल्यांचा प्रतिकार केला नाही किंवा हल्ला करणाऱ्यांविरोधात तक्रारही केली नाही. दुष्टाच्या दुष्टत्वाचा मुकाबला दुष्टत्वाने नव्हे तर सुष्टत्वाने केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या विरोधकांशी शत्रुत्व न धरता त्याच्या मनातील चुकीच्या समजुती बदलण्यासाठी हृदयपरिवर्तन केले पाहिजे, या मताचे ते होते. जोतिराव फुले यांनीही आपल्याला ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले होते. महात्मा होण्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते आणि ती जोतिराव फुले आणि मोहनदास करमचंद गांधी या दोघांनीही दिली होती. अहिंसा हे केवळ उच्चारण्याचे शब्द नव्हे तर गांधीजींसाठी हयातभराचे आचरण होते. त्यासाठी त्यांना कधी सोंग घ्यावे लागले नाही किंवा नाटक करावे लागले नाही.
स्वत:च्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहणे आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे, ही स्वत:ला शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया गांधीजींनी लहानपणापासून ठेवली होती, म्हणून ते महात्मा बनले होते. त्यासाठी त्यांनी कधी अवसान आणले नाही किंवा कधी त्यांना सोंगही घ्यावे लागले नाही. म्हणूनच स्वत:वरील हल्ल्यांबाबतही ते सोशिक राहिले आणि दुसऱ्या कुणा व्यक्तिला कुणी थोबाडीत मारली तर एकच मारली का ?’ अशी त्यांची मळमळ कधी उफाळून आली नाही. कारण अहिंसा हा त्यांचा धर्म होता, ते सोंग नव्हते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर