कुणाचे बापजादे काय करीत होते ?

मुंबईसह पुणे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्याच्या प्रथम चरणात बापजाद्यांच्या नावावर पावत्या फाटू लागल्या आहेत. अर्थात दोन्ही बाजूंनी केली जाणारी वक्तव्ये एवढय़ा हिणकस पातळीवरील आहेत, की त्यांची दखल घेतली तर महत्त्व दिल्यासारखे होईल. स्वत:चे कर्तृत्व थिटे पडायला लागले की, बापजाद्यांच्या पुण्याईचा आधार घेतला जातो, परंतु इथे वंशज एवढे पॉवरफुल आणि स्वयंभू आहेत, की त्यांना कुणाच्या पुण्याईची गरज भासत नाही. त्यांचा उन्माद एवढा जोरात आहे की, विरोधकांच्या बापजाद्यांची मापे काढण्यार्पयत त्यांची मजल गेली आहे. पहिल्या टप्प्यातच ही पातळी गाठली आहे, त्यावरून पुढील काळात काय घडू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आणि अजित पवार यांनी जो काही तमाशा मांडला आहे, तो महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवराळपणाची परंपरा उद्धव आणि राज संयुक्तपणे पुढे चालवत आहेत, परंतु त्यांच्या तोंडाला लागून अजित पवार मात्र आपली परंपरा विसरले आहेत, असे वाटते. ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बारामतीचा म्हमद्या,’ ‘मैद्याचं पोतंअशा गलिच्छ भाषेत शरद पवारांवर टीका करीत होते, तेव्हा पवारांनी कधीही वाकडा-तिकडा शब्द उच्चारला नव्हता. माझं बालपण कोल्हापुरात गेलंय. मी लहानपणी राजाचा असं शिकलेलो नाही..असं बोलून पवार सूचकपणे ठाकरेंच्या शिवराळ भाषेचा प्रतिवाद करायचे आणि आपल्यावर यशवंतरावांसारख्या सुसंस्ककृत नेत्याचे संस्कार असल्याचे सांगायचे. अजित पवार यांना काकांची सभा ऐकण्याचा योग कधी आला नसावा त्यामुळे शिवराळपणाचा सुसंस्कृतपणे प्रतिवाद कसा करायचा, हे त्यांना माहीत नसावे किंवा ठाकरे कंपनीला त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे आक्रमक नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण होते, असा त्यांचा गैरसमज असावा. कुणाचे बापजादे काय करीत होते, याच्याशी महाराष्ट्रातील जनतेला देणे-घेणे नाही. आजच्या घडीला राजकारण करताना तुम्ही काय कर्तृत्व गाजवत आहात, हे अधिक महत्त्वाचे आहे.
पहिल्या टप्प्यातच राज ठाकरे यांनी जे काही मांडले आहे, ते पाहता त्यांना सारी निवडणुक स्वत:भोवती फिरवत ठेवायची असावी असे दिसते. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नसते, त्यांना काहीही बोलायला मुभा असते. त्याबाबतीत ठाकरे कंपनीची बरोबरी कुणी करू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनी अशाच प्रकारे  मध्ये महाराष्ट्र ढवळून काढला, त्याला गोपीनाथ मुंडे यांची आक्रमक साथ मिळाली आणि शरद पवार यांच्याकडून अपक्षांची रसद मिळाली त्यामुळे शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली. परंतु युतीचा कारभार पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पुन्हा कधीही निवडून देण्याचा विचार केला नाही. तोंडाचा बाजार मांडणे आणि राज्याचा कारभार चालवणे या भिन्न गोष्टी आहेत आणि त्यातील फरक समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. अर्थात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रामराज्याचा अनुभव येत नाही हे खरे असले तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पर्याय म्हणून युतीला स्वीकारले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या मार्गानेच जाण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची जी वैशिष्टय़े होती, ती सारी त्याच्याही भाषणात खच्चून भरलेली असतात. नाहीतर हल्ली लोक अनेक गोष्टींनी एवढे त्रासलेले असतात की, त्यांनाही दोन घटका मनोरंजन हवे असते. टीव्हीवर तसे मनोरंजक काही नसते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा, नाटक पाहणे महागाईमुळे परवडणारे राहिलेले नाही. अशा काळात राज ठाकरे यांच्या भाषणाइतके मनोरंजनमूल्य अन्य कोणत्याही गोष्टीला नाही, त्यामुळे लोक आवर्जून गर्दी करतात. आणि गर्दीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांना चौकार षटकार ठोकावे लागतात. नकला कराव्या लागतात. पुण्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार किंवा आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात त्यांनी जी वक्तव्ये केली, त्यामागे टीकेपेक्षाही मनोरंजन हाच त्यांचा उद्देश असावा. परंतु मनोरंजनही सुमार आणि दर्जेदार अशा दोन प्रकारचे असते. राज ठाकरे हे व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांना कलेची चांगली जाण असल्याचे मानले जाते. वस्तुस्थितीवर व्यंगात्मक प्रतिक्रिया प्रभावी ठरते, परंतु व्यंगावरचा विनोद हा हिणकस मानला जातो. पोलिस भरतीसंदर्भातील प्रवेश सादर करताना राज ठाकरे यांनी आर. आर. पाटील यांच्या उंचीसंदर्भात केलेली टिपणी अशीच खालच्या पातळीवरची होती. अशाच प्रकारे उद्या कुणी ठाकरे कंपनीवर विनोद करायचे म्हटले तरी फारसे अवघड नाही.
राज ठाकरे यांनी महापालिका उमेदवारीसाठी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून त्याकडे स्वागतशील दृष्टिने पाहण्यास हरकत नाही. परंतु या परीक्षेच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीला आपण क्रांतिकारी वळण देत आहोत, असा त्यांचा जो अविर्भाव दिसून येतो, त्याची आवश्यकता नाही. यानिमित्ताने त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमधील दिनकर भोसलेचा अजेंडाच हाती घेतल्याचे दिसते. कारकूनासाठी परीक्षा होते, पोलिसांसाठी परीक्षा होते, मग पंतप्रधानांसाठी परीक्षा का नाही किंवा गृहमंत्र्यांची उंची का मोजत नाहीत, हे त्यातूनच येते. सिनेमात शेवटी दिनकर भोसले जे बोलतो की, या देशाचा अर्थमंत्री चांगला अर्थतज्ज्ञ का होत नाही, कायदामंत्री चांगला कायदेतज्ज्ञ का होत नाही वगैरे वगैरे..राज ठाकरेंना सिनेमातले डायलॉग प्रत्यक्षात आणायचे असल्याचेच दिसून येते.
इथे एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे, ती म्हणजे प्रारंभीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची अट घालण्याचा विचार झाला नव्हता असे नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. ज्या देशातील बहुसंख्य जनता निरक्षर आहे, त्या जनतेचा प्रतिनिधी साक्षरांना केले, तर साक्षरांच्या गैरव्यवहाराचे काय, असा त्यांचा युक्तिवाद होता. शिवाय मागासांना निरक्षर ठेवायचे आणि निरक्षरांना मूर्ख ठरवून त्यांना सर्व प्रकारच्या मालकी हक्कांपासून वंचित ठेवायचे, असाही डाव असल्याचे बाबासाहेबांचे म्हणणे होते. घटनेच्या माध्यमातून एक व्यक्ति एक मूल्य हे क्रांतिसूत्र त्यांनी त्याच उद्देशाने दिले. परीक्षा देऊन उमेदवारी मिळवलेले आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी चांगला कारभार करतील, याचा काय भरवसा ? कारण जास्त हुशार लोकांनीच अधिक भ्रष्टाचार केल्याचा देशाचा इतिहास आहे. आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अल्पशिक्षित मुख्यमंत्र्यांनी केलेला लोकाभिमुख कारभारही विस्मरणात जाण्याएवढा जुना झालेला नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट