ज्ञानपीठ? छे ! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हवे!यंदाचं साहित्य संमेलन बडोद्यानं नाकारल्यानंतर स्थळनिश्चितीसाठी वसई, सासवड, चं्रपूर असा दौरा करून चं्रपूरवर शिक्कामोर्तब झाले. यानिमित्तानं साहित्य संमेलन आणि तत्संबंधी व्यवहाराची चर्चा सुरू असतानाच ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली. ज्ञानपीठ पुरस्कार ही भारतीय साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी घटना मानली जाते, परंतु मराठी साहित्यिकाला पुरस्कार मिळत नाही, तोवर आपल्याला त्याची एका मर्यादेपलीकडे जाऊन दखल घ्यावीशी वाटत नाही. आपल्यादृष्टीने अखिल भारतीय संमेलन, त्यानिमित्ताने होणारी अध्यक्षपदासाठीची निवडणूक, संमेलनासाठी गोळा केल्या जाणाऱ्या देणग्या, स्वागताध्यक्षपदासाठीची चढाओढ, महामंडळाच्या पातळीवरील राजकारण या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आणि रंजक असतात, की ज्ञानपीठ ही त्यामानाने फारच नीरस गोष्ट असते. अर्थात हे सारे आपल्या वाड्.मयीन संस्कृतीला आणि मराठी उत्सवप्रियतेला साजेसेच असते. कोणताही व्यवहार करताना गल्लीतले वर्चस्व हाच आपला प्राधान्यक्रम असतो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर झटय़ाझोंब्या खेळून अनावश्यक शक्ती वाया घालवण्यात आपण रस घेत नाही. आणि त्या पातळीवर स्पर्धा असली तर ती पुन्हा आपल्याच प्रांतातील व्यक्तिशी असते. आपल्याला किंवा आपण ज्याचे समर्थन करतोय त्या व्यक्तिला काही मिळणार नसेल तर आपल्या विरोधकालाही मिळू नये, भले ते तिसऱ्या कुणाला मिळाले तरी चालेल, अशी ही मानसिकता आहे. साहित्यापासून राजकारणार्पयत सगळीकडे ही मराठी मानसिकता पुरेपूर भरून राहिली आहे.
कन्नड भाषेला यंदा आठवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पातळीवर मराठी साहित्य किती मागे आहे, याचीच पुन्हा एकदा आठवण झाली. आतार्पयत हिंदी भाषेसाठी नऊ, कन्नडसाठी आठ, बंगाली आणि मल्याळमसाठी प्रत्येकी पाच, उर्दूसाठी चार तर मराठी, गुजराती आणि ओरियासाठी प्रत्येकी तीनवेळा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. कन्नडसाठी आठ ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले याचा अर्थ कन्नड साहित्य मराठीपेक्षा अधिक सकस आहे किंवा मराठीला अवघे तीनच पुरस्कार मिळाले म्हणजे ते कसाच्या बाबतीत कमी पडते, असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु संबंधित भाषेतील किती साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, हे त्या भाषेतील साहित्याचा कस मोजण्याचे एक परिमाण काही प्रमाणात तरी मानले जाते. आणि आपण त्याबाबतीत फारसे सजग नाही, हेच आतार्पयतच्या परिस्थितीवरून दिसून येते. मराठी साहित्यिकांपुढे ज्ञानपीठ की संमेलनाध्यक्षपद असे दोन पर्याय ठेवले, तर बहुतांश साहित्यिक संमेलनाध्यक्षपदाचा पर्याय निवडतील, अशी आपल्याकडची स्थिती आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या जैन कुटुंबीयांना स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्टतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. भारतीय साहित्यातील सर्वोच्च सन्मान म्हणूनच तो आजही ओळखला जातो. असा हा देशातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आतार्पयत मराठीत वि. स. खांडेकर (ययाति) एकोणीसशे चौऱ्याहत्तर, वि. वा. शिरवाडकर (नटसम्राट) एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि विंदा करंदीकर (अष्टदर्शने) दोन हजार तीन - अशा तीन साहित्यिकांना मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने आतार्पयत दर्जा आणि प्रतिष्ठा टिकवली आहे, हे खरे असले तरी तिथेही सारे आलबेल आहे, असे नाही. गटबाजी, मोर्चेबांधणी या गोष्टींना तिथेही अनन्यसाधारण महत्त्व असते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सुचवले म्हणून एका लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, असे एका नामवंत साहित्यिकाने जाहीरपणे सांगितले होते. त्यात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. कधीतरी तसे घडले असले म्हणून एकूण ज्ञानपीठाच्या एकूण प्रतिष्ठेपुढे प्रश्नचिन्ह नाही निर्माण करता येत.
ज्ञानपीठ पुरस्कार निवडीची प्रक्रिया पाहिली तर त्यातील अनेक बारकावे लक्षात येतात आणि मराठी साहित्यिकांना अधिक प्रमाणात हा पुरस्कार का मिळाला नाही, हेही लक्षात येते. प्रत्येक भारतीय भाषेसाठी त्या त्या भाषेतील तीन तज्ज्ञांची समिती नेमण्यात येते. ही समिती दर तीन वर्षानी बदलली जाते. संबंधित भाषेतील प्रस्ताव या समितीमार्फत पुरस्कार निवड समितीपुढे जातात आणि त्यातून निवड समिती पुरस्काराची घोषणा करते. ज्ञानपीठ निवड समितीवर काम केलेल्या मराठी साहित्यिकांची संख्याही खूप कमी आहे. काका कालेलकर, प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि प्रा. विजया राजाध्यक्ष यांनीच या समितीवर काम केल्याचे काम केल्याचे ज्ञानपीठाच्या वेबसाईटवरून दिसून येते. एकोणीसशे पासष्टपासून सुरू झालेल्या या पुरस्कारांच्या नियमावलीत एकोणीसशे ऐंशी सालापासून थोडी सुधारणा करण्यात आली आणि संबंधित साहित्यिकाची आधीच्या वीस वर्षातील कामगिरी विचारात घेतली जाऊ लागली. एका भाषेतील साहित्यिकाला पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षे त्या भाषेतील साहित्यिकाचा पुरस्कारासाठी विचार करायचा नाही, असा ज्ञानपीठाचा नियम आहे. कन्नड भाषेला आतार्पयत आठ पुरस्कार मिळाले त्याचे कारण असे सांगितले जाते की, कन्नड भाषेच्या तज्ज्ञांनी ज्ञानपीठाचे नियम समजून घेतले आणि ते समजून घेऊनच कन्नड भाषेसाठी एकदिलाने प्रयत्न करीत राहिले. एक नाव निश्चित करायचे, त्याचा पाठपुरावा करत राहिले की दोन-तीन वर्षात त्याला मिळून जाते. त्यानंतर तीन-चार वर्षे शांत राहायचे आणि पुन्हा नवा लेखक घेऊन त्यासाठी प्रयत्न करीत राहायचे. याउलट मराठीच्याबाबतीत घडत असते. मराठी भाषेचे जे तीन तज्ज्ञ असतात, त्या तिघांचे एका मराठी नावावर कधी एकमत होत नाही. तिघांचे तीन प्रस्ताव असतात. एकाने तेंडुलकरांचे नाव घ्यायचे, दुसऱ्याने गंगाधर गाडगीळांसाठी आग्रह धरायचा आणि तिसऱ्याने जी. ए. कुलकर्णीचा पाठपुरावा करायचा. संबंधित भाषेच्या तज्ज्ञांचेच एकमत होत नसल्यामुळे ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीला त्या भाषेला बाजूला ठेवायला आयते निमित्त मिळते. वि. वा. शिरवाडकरांना नटसम्राटनाटकासाठी पुरस्कार मिळाला त्याच्या काही वर्षे आधीपासून त्यांच्या नावाचा प्रस्ताव जात होता, परंतु त्याहीवेळी त्यांच्याबरोबरीने विंदा करंदीकर यांचीही चर्चा असायची. म्हणज कुसुमाग्रजांच्या बरोबरीने ज्या विंदांच्या नावाची चर्चा होती, त्यांना त्यानंतर सोळा वर्षानी पुरस्कार मिळाला. त्यासाठी त्यांचा अष्टदर्शनेसंग्रह यावा लागला. ज्ञानपीठावरील मराठी भाषेच्या तज्ज्ञांनी एकमताने काम केले असते तर ज्ञानपीठाच्या यादीत आणखी काही नावे दिसली असती. व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकणी, श्री. ना. पेंडसे, इंदिरा संत हे साहित्यिक ज्ञानपीठाच्या योग्यतेचे नाहीत, असे कसे म्हणणार? त्र्यं. वि. सरदेशमुखांसारखा साहित्यिक कन्नड भाषेत असता तर त्यांचे नाव कधीच ज्ञानपीठाच्या यादीत समाविष्ट झाले असते. राष्ट्रीय राजकारणात मराठी नेते एकमेकांचे पाय ओढतात, त्याच पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरील वाड्.मयीन व्यवहारातही मराठी साहित्यिक-समीक्षक आपापले गट सोडून मराठीचा व्यापक विचार करीत नाहीत. हिंदूकादंबरीमुळे रा. भालचं्र नेमाडे हे ज्ञानपीठाचे दावेदार मानले जाऊ लागले आहेत. नेमाडे यांचे योगदान, अनेक पिढय़ांवर असलेला त्यांच्या साहित्याचा प्रभाव या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अशा लेखकाला देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तर तो मराठी साहित्याचा आणि त्यातील नव्या प्रवाहाचा सन्मान ठरेल. परंतु त्यासाठी आधी ज्ञानपीठावरील मराठी भाषा समितीच्या तज्ज्ञांमध्ये एकमत व्हायला हवे! नेमाडेंच्या साहित्याचे महत्त्व कळण्याएवढी समज त्या तज्ज्ञांकडे हवी!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट