संघटित मुजोरीने मुंबईकर हैराण

मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा मागे पडली. दिवसेंदिवस बिघडत जाणारी इथली परिस्थिती पाहुन शांघाय दूर राहिले, किमान आहे त्या मुंबईचे विद्यमान अस्तित्व किती प्रमाणात जपता येते, अशीच चिंता करण्याजोगी स्थिती आहे. दहशतवादाच्या टांगत्या तलवारीमुळे मुंबईकरांना सदैव जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. परंतु अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहता एकवेळ दहशतवादी हल्ले परवडले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईकरांना रोजच्या जगण्यात वेठीला धरणाऱ्यांची घटकांची संख्या वाढायला लागली आहे आणि कोणतीही यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही.

रिक्षा आणि टॅक्सी हे मुंबईकरांचे सगळ्यात मोठे दुखणे आहे. रिक्षाचालक किंवा टॅक्सीचालक हे कष्टकरी घटक आहेत, परंतु कष्टकरी म्हणून आदर किंवा सहानुभूती बाळगावी अशी परिस्थिती नाही. या कष्टकऱ्यांच्या अंगी असलेला माजोरीपणा मुंबईकरांना रोज अनुभवायला मिळतो. प्रवाशांना जिकडे जायचे आहे, तिकडे जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीवाले कधीच तयार नसतात, तर त्यांना जिकडे जायचे आहे त्या मार्गावर येणाऱ्यांसाठीच त्यांची सेवा असते. टॅक्सीचालकांच्या अनेक संघटना आहेत, परंतु आपल्या संघटनेच्या सदस्यांनी किमान शिस्त पळावी, त्यांनी व्यवसाय करताना किमान माणुसकीने व्यवहार करावा यासाठी या संघटना काहीच करीत नाहीत. फक्त झुंडशाही करून प्रवाशांना वेठीस धरण्यापुरत्याच या संघटना आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार करण्याएवढा वेळ लोकांकडे नसतो, याची माहिती असल्यामुळेच बिनधास्तपणे त्यांचा लुबाडणुकीचा धंदा सुरू असतो. उपनगरांतील रिक्षाचालकांच्या मुजोरीबद्दल बोलायलाच नको, अशी स्थिती आहे. दोनच दिवसांपूर्वी रिक्षा मीटर जलद करून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली. त्याअर्थाने हे रिक्षाचालक गुन्हेगार आहेत. परंतु गुन्हेगारी अंगात भिनल्यामुळे ते कारवाईने बिचकले नाहीत, तर त्या विरोधात दुसऱ्या दिवशी त्यांनी संप पुकारला. या संपात सहभागी होण्यास काही रिक्षाचालकांनी नकार दिल्यानंतर वेगवान मीटरवाल्या रिक्षाचालकांनी आपल्या व्यवसायबंधूंच्या रिक्षांची मोडतोड केली. त्यामुळे दहिसर, बोरिवली, वां्रे या परिसरात अचानक रिक्षा बंद झाल्या. एखादी सेवा अचानक बंद होते तेव्हा तिचे काय परिणाम होतात, हे नव्याने सांगायला नको. रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी अघोषित संपाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. परंतु एरव्ही झुंडशाही दाखवून दाखवणाऱ्या या नेत्यांना आपल्याच व्यवसायातील चुकीचे वागणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात संघटनात्मक ताकद का वापरता येत नाही?

रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणेच उपनगरी रेल्वेचे मोटरमन ही नवी उप्रवी जमात म्हणून पुढे येत आहे. गेल्यावर्षी मोटरमननी संप करून मुंबईच्या गतीला ब्रेक लावून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली होती. त्याचीच झलक गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेच्या मोटरमननी दाखवली होती. एका मोटरमनवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ अचानक काम थांबवून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली होती. अचानक संप करून मुंबईकरांना वेठीला धरणारे हेच मोटरमन मध्यंतरी मी अण्णा हजारेअशा टोप्या घालून भ्रष्टाचारविरोधी लढय़ाला पाठिंबा देत होते. त्यांचे वर्तन भ्रष्टाचारामध्येच मोडते, हे त्यांना कोण सांगणार ? मोटरमन ही मुंबईकरांसाठी कायमस्वरूपी डोकेदुखी ठरणार आहे, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याचा निर्णय सरकारी पातळीवर होण्याची गरज आहे.

अलीकडच्या काळात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे सरकारी पातळीवरही कठोर कायदे करण्यात येत आहेत. असे असले तरीही सगळे प्रश्न कायद्याने सुटत नाहीत आणि जिथे भावनिक मुद्दे येतात तिथे कायदे मागे पडतात. संतापाच्या भरात हल्ले होतात, असा हल्ला झाल्यानंतर लगेच डॉक्टर संपात उतरतात. बऱ्याचदा वरिष्ठ डॉक्टर राहतात बाजूला आणि निवासी डॉक्टरांना रोषाला सामोरे जावे लागते. निवासी डॉक्टरांची मार्ड नावाची संघटना असे काही घडण्याची वाटच पाहात असल्याप्रमाणे संपाचे हत्यार उपसते आणि आपल्या इतर प्रलंबित मागण्याही पुढे रेटायला पाहते. निवासी डॉक्टरांनीही आपले उप्रमवमूल्य वाढवून ठेवले आहे. त्यातच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपामुळे रुग्णसेवा कशी कोलमडली आहे, असे चित्र निर्माण करुन सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. खरेतर वैद्यकीय व्यावसायिकाने एकदा व्यवसाय सुरू केला की त्याचा धंदा कधी होतो आणि डॉक्टराचे रुपांतर लुटारूमध्ये कधी होते हेच समजत नाही. त्याची तयारी निवासी डॉक्टर म्हणून काम करतानाच सुरू केली जाते. या निवासी डॉक्टरांच्या वारंवार होणाऱ्या संपाला पायबंद घालण्यासाठी सरकार कधीच कठोर पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे लोकांना वेठीला धरणारी ही एक नवीनच यंत्रणा उभी राहिल्याचे दिसते.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपही मुंबईकरांना नवा नाही. ते मोटरमनचे भाऊबंदच असल्यामुळे त्यांच्याकडेही जणू मुंबईकरांच्या गतीला ब्रेक लावण्याचा व्यवसायसिद्ध परवानाच आहे. मुंबईकरांना जगणे असह्य करण्यासाठी शरद राव यांचे नेतृत्व आता पुरेसे आहे. एकेकाळी संपसम्राट म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांचा दबदबा होता. जॉर्ज फर्नाडिस यांच्याएवढा वकुब आणि वैचारिक उंची नसतानाही केवळ उप्रवमूल्य दाखवत दाखवत शरद राव यांच्या नेतृत्वाचा फुगा फुगत गेला आणि आज तो मुंबईकरांसह महापालिका प्रशासनाची आणि सरकारचीही डोकेदुखी बनला आहे. संप करण्याचे अचूक टायमिंग साधण्यात त्यांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. संपामुळे मुंबईकरांचे जे हाल होतात, त्याचा असुरी आनंद घेण्याची विकृतीही बरोबरीने वाढत चालल्याचे दिसते. सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद राव हे नेते असले तरीही ते आपल्या पक्षनेतृत्वालाही जुमानत नाहीत एवढी त्यांची मुजोरी वाढली आहे. आपल्या संघटनेचे बिल्ले लावून मोकाटपणे उंडारणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नेतृत्वच मोठे होत असते. आपल्या हक्कांसाठी त्यांना लढता येते. नाक कधी आणि कसे दाबायचे म्हणजे तोंड उघडेल याचे मर्म त्यांना कळालेले असते. परंतु आपला बिल्ला लावणाऱ्या किंवा आपला झेंडा घेणाऱ्या कर्मचाऱ्याने नीट काम करावे, कामाच्या वेळा पाळाव्यात, भ्रष्टाचार करू नये, लोकांची अडवणूक करू नये, यासाठीचे प्रबोधन नाही करता येत. त्यांची बेशिस्त आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हेच संघटनेचे भांडवल असते. आणि त्या भांडवलावर शरद राव सव्वा कोटी मुंबईकरांना वेठीला धरू शकतात. त्यांचे नेते अजित पवार राज्यभर दादागिरी करीत फिरत असतात, परंतु शरद रावांच्या अरेरावीपुढे त्यांचे काही चालत नाही किंवा त्यांनी असले धंदे करू नयेत म्हणून त्यांना समजावता येत नाही.

ही संघटनात्मक झुंडशाही कमी म्हणून की काय, कोणताही मुद्दा नसला तरी धार्मिक किंवा भावनिक प्रश्नावरून ठाकरे कंपनी मुंबईला कधी वेठीला धरतील याचा नेम नसतो. मुंबईकरांचे रोजचे जगणे असह्य करून टाकणाऱ्या घटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उगवणारा दिवस नीटपणे सुरू होईल आणि नित्याप्रमाणेघरी पोहोचता येईल, याची खात्री कुणालाच देता येत नाही. सरकार नावाची यंत्रणा असून नसल्यासारखी आहे कारण तिचे अस्तित्व अशा प्रसंगी कुठेच जाणवत नाही

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट